माझं तिच्यावरती प्रेम आहे..
तिचंही माझ्यावर प्रेम आहे..
तिला व्यक्त व्हायला वेळ नाही..
हेही एक अव्यक्त सत्य आहे..।।..१
सर्वांचीच मनांतरे जपण्याचा..
तिचाच निष्पाप स्वभाव आहे..
मला ती नेहमीच गृहीत धरते..
मीही सारे सारे जाणून आहे..।।..२
मुलं,सुना,नातवंड, सासुसासरे..
शेजारी पाजारी , नातेवाईक..
सर्वांनाच नेहमी ती जीव लावते..
निरपेक्ष सर्वांसाठी जगते आहे..।।..३
धावपळीत सरतो सारा दिवस..
थकून निपचित निजूनी जाते..
अशी श्रमिका भोळी भाबडी..
तिजवर माझे नितांत प्रेम आहे..।।..४
आनंद देण्यातच , सुख असतं..
तिच्या नजरेतुन मौन ओसंडतं..
म्हणते ,आपलं नातं युगांयुगांचं..
असेच मैत्रप्रेम मी जगतो आहे..।।..५
कधीही कसलंच मागणं नाही..
इथं आपलं तसं काहीही नसतं..
सत्य तिला कळून चूकलं आहे..
निर्मोही जगणं तिला जमलं आहे..।।..६
हे निर्व्याज निर्हेतुक प्रेम लाभणं..
हेच एक , भाळीचं संचित आहे..
सुख म्हणजे दुसरं असतं काय ?..
हे मी समजून उमजून जगतो आहे..।।..७
©️ वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
(गुढीपाडवा. शके १९४३)
रचना क्र. ५६ / १३ – ४ – २०२१
Leave a Reply