आंतरराष्ट्रीय योग दिनापाठोपाठच भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने उचललेले कौतुकास्पद आणि अभिमानास्पद पाऊल म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’ म्हणून घोषित करणे हे होय. आपल्या मातीतल्या या वैद्यकशास्त्राला स्वतंत्र असा दिन जाहीर होण्यास सुमारे सत्तर वर्षे वाट पाहावी लागणे ही अतिशय दुःखद घटना म्हणावी लागेल. त्यामुळे हा निर्णय घेतल्याबद्दल सर्वप्रथम मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मा. केंद्रीय आयुष मंत्री श्रीपादजी नाईक या दोघांचेही मनःपूर्वक आभार. माझे मत फुकट गेले नाही याचा आधी एक देशभक्त म्हणून अभिमान होताच; आता एक वैद्य म्हणूनदेखील तो दुणावला हे निश्चित!!
पहिला वहिला ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’ साजरा झाला खरा; मात्र त्या अनुषंगाने काही आत्मपरीक्षण करावे अशी स्थिती असल्याने काही मुद्दे मांडत आहे. एकंदरीतच आयुष मंत्रालय, आयुर्वेदीय संघटना आणि व्यक्तिश: प्रत्येक वैद्य यांनी याचा गांभीर्याने आणि जबाबदारीने विचार करायला हरकत नाही असे वाटते.
१. योग दिन आंतरराष्ट्रीय पातळीवर इतक्या यशस्वीपणे साजरा केल्यावर खरे तर आयुर्वेदाशी संबंधित दिवसदेखील केवळ राष्ट्रीय पातळीवर साजरा न करता; आंतरराष्ट्रीय पातळीवरच साजरा होण्याची आवश्यकता होती. आज जगभरात आयुर्वेदाबद्दल आदर आणि उत्सुकता आहे. या निमित्ताने आपण विविध दालने उघडू शकलो असतो. दुर्दैवाने तसे झाले नाही. पुढील वर्षीपासून तसे करण्याचा मनोरथ असेल का?!
२. ज्या प्रमाणात या दिनाचा प्रचार- प्रसार सर्वसामान्य जनतेपर्यंत व्हायला हवा होता; त्या प्रमाणात तो झालाच नाही. वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या, सोशल मीडिया या माध्यमांतून याविषयीचे वातावरण तयार करण्यास आम्ही कमी पडलो. (योग दिनाला केली जाणारी वातावरण निर्मिती आठवा. त्या तुलनेत या दिवसाची माहिती किती सामान्य भारतीय नागरिकांना होती याचाही अंदाज घ्या.)
३. या दिनाच्या निमित्ताने ‘आयुष’ मंत्रालयाने काढलेल्या पत्रकात; आयुर्वेदातील महाविद्यालये, विविध शैक्षणिक संघटना इत्यादींनी ‘Ayurveda for prevention and control of diabetes’ या विषयावर आधारित कार्यक्रम करावे असे सुचवण्यात आले होते. आयुर्वेदाची स्वतंत्र परिभाषा आहे. आम्ही वैद्यगण ती परिभाषा लोकांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा परिस्थितीत ‘डायबेटिस’ ऐवजी ‘प्रमेह’ वा ‘मधुमेह’ ही आयुर्वेदीय परिभाषा या निमित्ताने देशासमोर आणता आली असती. मात्र त्याला या पत्रकाने पद्धतशीर सुरुंग लावला.
४. काही संघटनांनी या निमित्ताने जागृतीपर कार्यक्रम हाती घेतले. त्यांचे अभिनंदन करायलाच हवे. मात्र इथेही दुही, कंपूशाही, श्रेयवाद या आयुर्वेदाला लाभलेल्या जुन्याच शापांनी डोके वर काढल्याचे स्पष्ट दिसून आले. आपल्या परिघाच्या बाहेरील गुणवान वैद्यांना सामील करून न घेण्याची प्रवृत्ती किती काळ चालणार याचे उत्तर परमेश्वरच देऊ जाणे!!
५. बऱ्याच मोठ्या संख्येने आम्ही वैद्यगणदेखील या निमित्ताने काही शिबिरे वा तत्सम कार्यक्रम आयोजित करून आपले रुग्ण वा समाजातील अन्य व्यक्तींपर्यंत पोहचण्यात कमी पडलो. आपण या दिवसासाठी काय योगदान दिले याचे उत्तर प्रत्येक वैद्याने स्वतःला विचारावे; किमान १० जणांपर्यंत जरी या दिनाची जागरूकता आपण नेऊ शकलो असू तरी ते महत्वाचे योगदान आहे असे मी मानतो. यावर्षी उदासीन राहिलेल्यांनी मात्र पुढील वर्षीपासून तसे न होण्याची खात्री करावी लागेल. आपण आपला वाढदिवस जसा उत्साहात साजरा करतो; त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक जोशात हा दिवस साजरा व्हायला हवा.
६. बहुतांशी आयुर्वेद महाविद्यालयांना दिवाळीची सुट्टी असल्याने या दिवशी महाविद्यालयांतून म्हणावे त्या प्रमाणात विद्यार्थ्यांना सामील करून काही भरीव कार्यक्रम हातात घेता आले नाहीत. यावरही आपल्याला काहीतरी उत्तर शोधणे क्रमप्राप्त आहे.
७. स्वतंत्र आयुष मंत्रालय स्थापन करून खरं तर मा. पंतप्रधानांनी अतिशय महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मंत्रालय स्थापन झाले; पुढे काय? धनत्रयोदशीच्याच दिवशी संदीप आचार्य यांनी लोकसत्तेत याविषयी एकल छोटा लेख लिहिला होता. या मंत्रालयाचे कारभार कागदी घोड्यांचेच असल्याचे लेखातून (आणि प्रत्यक्षातदेखील) दिसत आहे. जिथे अंग झाकायला कपडे नाहीत तिथे नेक टाय लावून फिरण्यात काय हशील? आज आयुष चिकित्सापद्धतींची नेमकी हीच गत आहे. यापूर्वीही मी नेहमीच वारंवार सांगितल्याप्रमाणे मोदी सरकार हे आयुष पदवीधरांची शेवटची आशा आहे. किमान त्यांनी तरी अपेक्षाभंग हा सुरुवातीलाच नमुद केल्याप्रमाणे; राष्ट्रीय आयुर्वेद दिन जाहीर केला गेला याचा प्रत्येक वैद्याप्रमाणेच मलाही अतोनात आनंद आहे. मात्र; अल्पसंतुष्ट असण्यापेक्षा आपण कुठे कमी पडलो याचा शोध घेऊन परिपूर्णतेकडे जाण्याचा प्रयत्न करणे केव्हाही श्रेयस्कर. इथे कोणावर टीका करण्याचा यत्किंचितही हेतू नाही. मात्र; ९५% गुण मिळवण्याची क्षमता असलेला विद्यार्थी सतत ३५-४०% गुणच मिळवत असेल तर ‘पास तर होतोय ना’ असं म्हणून त्याचे कोडकौतूक करून गालगुच्चे घ्यायचे की त्याने अजून प्रयत्न करायला हवेत म्हणून जरा कान पिळायचे? माझा उद्देश तितकाच आहे. आयुष मंत्रालयाकडून या गोष्टींचा विचार केला जाईल अशी आशा. बहुतांश वैद्य- वैद्येतर वाचकवर्ग या मतांबद्दल कोणतेही गैरसमज करून न घेता आपुलकीने त्यांचा विचार करेल अशी खात्री वाटते. त्यातही काहींची बुद्धी पटावरच्या उंटाप्रमाणे चाललीच तर मात्र नाईलाज आहे.
आयुर्वेद हे आपल्या मातीतले शास्त्र आहे. त्याला सर्वार्थाने सार्वभौमत्वाच्या सिंहासनावर पुनर्प्रस्थापित करणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. चला; आपली जबाबदारी पार पाडुया!!
जय आयुर्वेद।
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
Leave a Reply