राजकपूरना प्रथम “वाल्मिकी” चित्रपटात नारदाचा मेकअप करून हिंदी सिनेसृष्टीला शो मन देणारे, सुलोचना या हिंदी-मराठी चित्रपटसृष्टी गाजविणाऱ्या अभिनेत्रीला “करीन ती पूर्व” या रंगमंचावरील नाटकाद्वारे प्रथम अभिनय क्षेत्रात आणणारे आणि “जयभवानी” या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून प्रथमच त्यांना मुख्य नायिकेची संधी देणारे, “ ऐका हो ऐका” या नाटकातून गणपत पाटील यांना नाच्याची पहिली टाळी शिकविणारे व राजशेखर यांना रंगभूमीवर याच नाटकाद्वारे प्रथम दिग्दर्शन करणारे, चंद्रकांत, सुर्यकांत मांडरे, सोहराब मोदी, विक्रम गोखले, जयश्री गडकर, पद्मा चव्हाण, रत्नमाला, रमेश देव अशा कलाकारांना अभिनयाच्या पाउलवाटेवर प्रथम संधी देऊन सिने-नाट्य सृष्टीची कवाडे त्यांच्यासाठी खुली करणारे अशी जयशंकर दानवे यांची ओळख.
त्यांचा जन्म १ मार्च १९११ रोजी झाला. जयशंकर दानवे हे उत्कृष्ट खलनायक आणि नाट्य दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी एकूण ६५ चित्रपट आणि १३४ नाटके केली. त्यांनी सिनेसृष्टी उत्कृष्ट खलनायक व चरित्र अभिनेता म्हणून गाजवली तर नाट्यसृष्टीत ते उत्कृष्ट नाट्यदिग्दर्शक व खलनायक म्हणून प्रसिद्धीस आले. कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडीओत चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी बराच काळ व्यतीत केला. त्यांनी हैद्राबादला ‘हैम्लेट’ नाटकाचे असंख्य प्रयोग करून गाजवला होता. १९३५ मध्ये आलेल्या ‘नागानंद’पासून मा.जयशंकर दानवे यांची कारकीर्द सुरू झाली. १९३६ साली ‘सावकारी पाश’ या चित्रपटातून बाबूराव पेंटर यांनी त्यांना नायकाची संधी दिली. जयशंकर दानवे यांचा शेवटचा चित्रपट १९७५ साली आलेला ‘प्रीत तुझी माझी’. या काळात त्यांनी दहा हिंदी सिनेमांमध्येही काम केलं. गावची इज्जत, रंगू बाजारला जाते, आंधळा मारतो डोळा आदी सिनेमांमधल्या भूमिका गाजल्या.
उर्दू आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व असूनही मुंबईच्या अभिनय महासागरात न जाता कोल्हापुरात राहून त्यांनी अनेक कलाकार शिष्य घडविले. करवीर वाचन मंदिर, करवीर नाट्य मंदिर, देवल क्लब, मेडिकल असोसीएशन, पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, न्यू हायस्कूल अशा कोल्हापुरातील अनेक संस्थाना नाटकांच्याद्वारे उर्जितावस्था आणली. मा.जयशंकर दानवे यांचे चिरंतन स्मरण रहावे म्हणून दानवे परिवारातर्फे सन १९८७ पासून सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत आहेत.
असे कलाकर्तुत्व असणाऱ्या कलाकाराचे संपूर्ण चरित्र रसिकांसमोर यावे या उद्देशाने त्यांच्या आत्मचरित्राच्या आधारे १ मार्च २०१० रोजी जयश्री दानवे लिखित त्यांच्या कलाप्रवासाचा आढावा घेणारा चरित्रग्रंथ “ कलायात्री ” प्रसिद्ध कवी जगदीश खेबुडकर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. या चरित्रग्रंथाला आजपर्यंत एकूण १० पुरस्कार लाभले. २०११ सालापासून “नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार ” हा मानाचा पुरस्कार दानवे परिवारातर्फे प्रदान करण्यात येतो. आजपर्यंत रंगकर्मी श्री.दिलीप प्रभावळकर,डॉ.मोहन आगाशे,श्री.सदाशिव अमरापूरकर,श्री.शरद पोंक्षे, श्री.अरुण नलावडे ” असे पुरस्कार प्रदान करण्यात आले.सन्मानपत्र,सन्मानचिन्ह,शाल,श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असून सध्या हा कलायात्री पुरस्कार बहुमानाचा समजण्यात येत आहे. तसेच त्या दिवशी मान्यवरांच्या प्रकट मुलाखतीचा जो कार्यक्रम सादर होतो तो कोल्हापुरातील एक सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून गणण्यात येतो. जयशंकर दानवे यांचे ३ सप्टेंबर १९८६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply