नवीन लेखन...

“Nature Stay”, सफाळे (१००%निसर्ग सान्निध्यात)

यावर लिहावं असं मनापासून वाटण्यास कारण की, आम्ही नुकतेच दोन दिवसांसाठी एका रिसॉर्टला भेट देऊन आलो. आम्ही म्हणजे… माझी लेक, जावई, तिच्या सासूबाई आणि अस्मादिक पत्नी लेकासह. लेकिनेच सगळी आखणी, बुकिंग केलं होतं.

आजकाल रिसॉर्ट म्हटल्यावर जे चित्र तुमच्या डोळ्यांसमोर उभं राहिलं असेल, ते अगदी लगेचच पुसून टाका. अगदी स्वच्छ पुसून मनाची पाटी कोरी करून, इकडे जाल तरच इथली मज्जा, आनंद अनुभवता येईल.

आम्ही बोरिवलीहून लोकलने विरार आणि तिथून शटल पकडुन सफाळेला पोहोचलो. बाहेर येऊन टुकटुकने(सहा सिटर टेम्पो.) तिथून दहा बारा मिनिटांवर असलेल्या “Nature Stay” या हिरव्याकंच झाडीमध्ये विसावलेल्या रिसॉर्ट वर पोहोचलो.

हे रिसॉर्ट राहुल म्हात्रे आणि भक्ती राहुल म्हात्रे या सुशिक्षित आणि सुसंस्कारीत जोडप्याच्या मालकीचं आहे. साधारण पाच एकरवर हे “Nature Stay” उभं आहे. मुख्य गेटमधून आत शिरल्यावर पायांना फक्त हिरवळ किंवा माती याचाच स्पर्श जाणवत होता. सिमेंटचा रस्ता तर सोडाच पायवाटही नव्हती.आजकाल ऑनलाईन या प्रकारामध्ये बुकिंग वगैरे सगळं आधीच झालेलं असतं. त्यानुसार आपल्या राहण्याच्या जागेचा ताबा घ्यायचा इतकंच. मचाण हाऊस आणि टायनी हाऊस अशी आमची दोन घरं आरक्षित झालेली होती. ही घरं, घराचे कठडे, मुख्य प्रवेशद्वार, बसण्याच्या बाकांचे मागचे टेकण्याचे भाग, कुंपण हे झाडांच्या बुंध्यांचा, जाड फांद्यांचा कलात्मकतेने उपयोग करून बनवलेले दिसत होते. कुठेही भापकेपणा, चकचकीतपणा, दिखावा नव्हता , तर स्वच्छता, नम्रता आणि नियोजन जाणवत होतं. आत शिरल्यावर एका बोर्डने माझं लक्ष वेधून घेतलं. त्यावर लिहिलं होतं,
“Nature Stay, for family….. from family
Ladies Destination”.
हे रिसॉर्ट कदाचित अनेकांना न पटणाऱ्या पण आम्हाला मात्र मनापासून आवडलेल्या तीन ठाम गोष्टींवर उभं आहे.
No Loud Music, No Alcohol, No Gents Group.

हे दोन सूचना फलक वाचल्यावर Nature Stay चालकांच्या विचारपद्धतीची आणि मानसिकतेची कल्पना येऊ लागली होती. फक्त पैसा कमावणे हा उद्देश नसून, काही तत्व उराशी बाळगून, त्या तत्वांवर ठाम राहून आणि येणाऱ्या पर्यटक पाहुण्यांना सर्वतोपरी संतोष, समाधान आणि स्वास्थ्य देऊनच निरोप द्यायचा हा फंडा त्यांनी बाळगलेला आहे.
इथे राज्य संपूर्णपणे स्त्रीशक्तीचं आहे.(एक राहुल सोडले तर) मालकीणीपासून, स्वयंपाक करणाऱ्या मावशीपासून ते सेवा(service)देणाऱ्या मुलींपर्यंत संपूर्ण स्त्रियांचं राज्य आहे. आणि या मुली पुरुषांप्रमाणे किंबहुना त्यांच्यापेक्षाही उत्साहाने वावरत आणि उत्साहाने काम करत असतात. स्वयंपाकघरात वावरणारे ज्येष्ठ हात घरातलेच असल्यामुळे रांधलेल्या अन्नाला अन्नपूर्णेच्या हाताची चव आहे. या सगळ्यांवर भक्तीजींची प्रेमळ आणि चौकस नजर आहे. मालक मालकीणीच्या मनातले भाव सेवा देणाऱ्या मुलींमध्ये पुरेपूर उतरले आहेत हे त्यांच्या कृतीतून जाणवत रहातं.

आमच्या घराचा ताबा घेऊन आम्ही फ्रेश होतो तोच, वाफाळलेला चहा छानशा कपांतून आला. आणि चहा मनासारखा मिळाला ना की आपण पूर्ण फ्रेश होऊन जातो. चहापान आटोपून आम्ही रिसॉर्ट आवारात फिरायला बाहेर पडलो. हवेत थोडासा उष्मा जाणवत होता पण सोबतीला वाराही होता. जागोजागी चिकू, पांढऱ्या लाल रंगाच्या जामची झाडं, केळी, कैऱ्या लगडलेली झाडं दिसत होती. हाताला लागणारे जाम तोडून पहिला घास घेतला, तर अगदी गोड. मुंबईत मिळतात ते बहुधा पचपचीत चवीचे असतात. लाल जामनी डवरलेलं झाड इतकं सुंदर दिसत होतं आणि झाडाखाली हिरवळीवर तर लाल सडाच पडलेला होता. पक्षी मात्र फळांना चोच मारून आणि ते खाली टाकून त्याची नासाडी करतात. जागोजागी अशी फळं पडलेली होती. बॅडमिंटन खेळण्याची हौस भागवून, काळोख पडू लागला तसे आम्ही वास्तव्यस्थानी परत यायला निघालो.

“Nature Stay” चं स्वयंपाकघर प्रशस्त म्हणजे शब्दशः
प्र श स्त आहे. यामध्ये मोठ्या थोरल्या मातीच्या चुली सतत धगधगत असतात. गडबड गोंधळ न जाणवता चाललेली रात्रीच्या जेवणाची तयारी, चार पाच तरतरीत मुली हसतमुखाने आपापली कामं, दिलेल्या जबाबदाऱ्या लगबगीने उरकताना दिसत होत्या. या मुलींना पर्यटकांचं रात्रीचं जेवण झाल्यावर सगळी आवराआवर करून त्यांच्या घरी जबाबदारीने पोहोचवलं जातं.

गवतामधून कोंबडे आपला डौलदार तुरा मिरवत आपल्या परिवारासह क्लक क्लक करत मनसोक्त हिंडत होते. सारीकडे हिरवा रंग भरून राहिलेला होता. स्वयंपाकघराशेजारी म्हात्रे कुटुंबाचं वास्तव्याचं घर आहे. त्यापुढच्या मोकळ्या जागेत कुत्रे, गोरेपान लाल गुंजेसारख्या डोळ्यांचे ससे, गोमाता असे प्राणी आहेत. कुत्र्यांना मोकळं सोडू शकत नाहीत. कारण कोंबड्या, ससे फिरत असतात आणि अनेक पर्यटकही कुत्र्यांना घाबरतात.

आम्ही आमच्या निवासस्थानी परतलो, तेव्हा सगळे लाईट लागले होते. वातावरणात फुलांचा मंद सुगंध पसरलेला होता. इतक्यात आम्ही आधीच सांगितलेली बार्बेक्यू ची व्यवस्था दोन मुलींनी करून दिली. एकावर शाकाहारी (पनीर,टोमॅटो,सिमला मिरची) आणि दुसऱ्यावर मांसाहारी (चिकन) असे तुकडे सळ्यांमध्ये लावून आम्हाला आणून दिले. ते मस्त भाजून बार्बेक्यूचा आनंद घेत शांतपणे त्याचा आस्वाद घेतला. आमच्या घराच्या जवळ मधुमालतीचं लाल आणि पांढऱ्या फुलांच्या झुबक्यानी बहरलेलं झाड होतं. माना टाकलेली ही फुलं जसजशी रात्र होऊ लागली तसतशी तरारून उठली , आणि मग त्या फुलांचा नजारा जो दृष्टीला पडत होता, तो प्रत्यक्षात पाहाणं हा एक डोळ्यांना मनमुराद आनंद देणारा अनुभव होता.

“Nature Stay” मध्ये मचाण हाऊस, टायनी हाऊस, दहा माणसं राहू शकतील असं सुपारी हाऊस, ट्री हाऊस आणि रॉयल टेन्ट अशी वेगवेगळ्या प्रकारची घरं आहेत. या सगळ्या घराना बाहेरून नैसर्गिक स्थितीत ठेवलेलं आहे. रंग लावण्याऐवजी सारवल्याचा फील दिलेला आहे.

या रिसॉर्टची मला आणखी एक आवडलेली गोष्ट म्हणजे त्यांचा वक्तशीरपणा. सकाळच्या चहा न्याहारी पासून रात्रीच्या जेवणापर्यंत दिलेली वेळ कटाक्षाने पाळली जात होती. भुकेने कळवळायला होतंय, पण जेवण तयार व्हायला अवकाश आहे असं एकदाही झालं नाही. पहिल्या दिवशी रात्री जेवणात दोन भाज्या, डाळ, मस्त लोणचं, मऊसूत भाकऱ्या, खीर, भात आणि सामिष आहार घेणाऱ्यांना कोळंबीची आमटी आणि चिकन असा बेत होता. पनीर नावाचा मुंबईत येता जाता दृष्टीला पडणारा आणि कुठल्याही जेवणात प्रमुख भूमिका निभावून उच्छाद मांडणारा पदार्थ इथे अजिबात दिसत नव्हता, ही माझ्या दृष्टीने तरी फार आनंदाची बाब होती. संपूर्ण हिरवळीवर दव पडत होतं आणि दिव्यांच्या प्रकाशात गवताच्या टोकावर पडलेले दवाचे थेंब चमकत होते. टेबल खुर्च्या दवाने ओल्याचिंब झाल्या होत्या. वातावरणात थंडावा आला होता. उठावसं अजिबात वाटत नव्हतं,पण थकवा आणि वातावरण झोप आल्याची जाणीव देत होते. घरात येऊन दिलेल्या जाडजूड पांघरुणात शिरुन गाढ झोपी गेलो. पहाटे साडेसहा वाजता जाग आली. प्रातर्विधी, मुखमार्जन आटोपून आम्ही दोघं घराबाहेर पडलो. छान प्रसन्न सकाळ उजाडली होती. आज सगळ्यांसह फार्म व्हिजीटचा कार्यक्रम होता. मस्त चहा घेऊन आणि सकाळची प्रसन्न आणि स्वच्छ हवा फुफ्फुसात भरून घेत फिरायला सुरवात केली. मधून मधून जामचा फलाहार सुरू होताच.

म्हात्रे पती पत्नी आणि आलेल्या इतर पर्यटकांशी गप्पा मारून परतलो तेव्हा न्याहारीची मांडामांड सुरू झालेली होती. चमचमीत, चवदार आणि चटकदार मिसळ पाव, सोबत पिवळ्या सालीचं केळं, कलिंगडाचे काप आणि टोस्ट सँडविच असा मस्त बेत होता. सोबत फक्कड चहा. साडेअकराच्या सुमाराला आम्ही पंधराएक पर्यटक राहुलसहं फार्म व्हिजीटला निघालो, आणि ते देत असलेली माहिती ऐकताना अक्षरशः स्तीमित होऊन जात होतो. या त्यांच्या पाच एकरात जवळजवळ साडेतीनशे प्रकारची फुलं, फळं,भाज्या,औषधी वनस्पती प्रकारची झाडं आहेत. एक सव्वा तास आम्ही गच्च भरलेल्या झाडांमधून वाट काढत राहुलच्या मागून कान आणि डोळे उघडे ठेऊन फिरत होतो. उन्हाने घसा सुकला होता. पाण्याच्या बाटल्या रिकाम्या झाल्या होत्या. इतक्यात दोन मुली Nature Stayचं स्वत:चं बनवलेलं आवळ्याच्या थंड सरबताने भरलेले ग्लास घेऊन हजर झाल्या. सरबत पिऊन आलेल्या तरतरीसह आम्ही जेवणाच्या वेळेला परतलो. आज पुरणपोळीचा बेत होता. पुरणपोळी त्यावर तूप, अळूवडी, वालाचं बिरडं, चपाती, भात दही . जेवण अक्षरशः अंगावर आलं. संध्याकाळी केळवे बीचवर जायचं असल्याने आम्ही जरा लवंडलो. साडेचार वाजता चहा घेऊन सव्वापाचच्या सुमाराला आम्ही टुकटुक मधून केळवे बीचकडे प्रस्थान केलं. जत्रा सुरू असल्याने बीचवर भरपूर गर्दी होती. फिरणं, घोडागाडी सफर करून आणि ताडगोळे , शहाळयाचा आस्वाद घेऊन साडेसातच्या सुमाराला रिसॉर्टवर परतलो. रात्रीच्या जेवणात पोट भरलेलं असल्यामुळे कुणालाच फारशी भूक नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी न्याहारी करून आम्ही परत निघणार होतो. सकाळीच आदल्या दिवशीप्रमाणे जाग आली. आलेल्या समवयस्कर इतर पर्यटकांशी, म्हात्रे पती पत्नीशी गप्पा झाल्या, चहा झाला आणि निसर्गसान्नीध्यात पुन्हा एकदा मनसोक्त फिरून आनंद घेतला. आज न्याहारीमध्ये उपमा, मिसळ, फळं आणि फ्रेंच टोस्ट असा बेत होता.

सगळं आटोपून, आंघोळी उरकून आणि बॅगा भरून आम्ही परतीच्या प्रवासाला सज्ज झालो. निघण्यापूर्वी म्हात्रे पती पत्नी आणि त्यांच्या सगळ्या कर्मचाऱ्यांसह फोटो घेतले. राहुल भक्ती दोघांनीही पुन्हा येण्याचं मनापासून आमंत्रण दिलं. “Nature Stay” च्या प्रसन्न, हिरव्यागार वनश्रीचा जड अंतःकरणाने निरोप घेऊन आम्ही शहराच्या दिशेने निघालो.
फार्म व्हिजिट करताना राहुल म्हणाले होते,

“निसर्ग आपल्याला काय शिकवतो ? तर संयम, प्रेम आणि मेहनत करणं. आज आपण निसर्गाने सढळ हाताने भरभरून दिलेलं ओरबाडून घेत आहोत. घेताना संयम ठेवणं आपण विसरून गेलोय. झाडांची लागवड करायला हवी हे विसरून जंगलतोड करत सुटलोय. एक दिवस पश्र्चाताप करण्याची वेळ येईल तेव्हा कदाचित वेळ निघून गेलेली असेल. पण आज मात्र हे कुणीच लक्षात घेत नाहीय हीच खरी खेदाची गोष्ट आहे. म्हात्रे पती पत्नी सारखी काही निसर्गप्रेमी मात्र हे ओळखून आपल्या परीने हा समतोल साधण्याचा मनापासून प्रयत्न करतायत, आणि यामध्ये येणाऱ्या पर्यटकांनाही सामील करून घेतायत ही समाधानाची बाब आहे.
माझी लेक आणि जावयामुळे हा निसर्गानंद आम्हालाही घेता आला.
“Nature Stay” हा खरोखर एक नीसर्गसांनिध्यात जायला मिळणारा अनुभव आहे , एव्हढं मात्र नक्की.
मधु वाता ऋतायते मधु क्षरन्ति सिन्धव: |
माध्वीर्न: सन्त्वोषधी: ||

प्रासादिक म्हणे

— प्रसाद कुळकर्णी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..