नवीन लेखन...

नाट्य तपस्वी मामा पेंडसे

मामा पेंडसे १९७०-७१मध्ये ठाण्याच्या श्रीरंग सोसायटीत राहायला आले, तेव्हा मराठी रंगभूमीवरचा एक समर्थ अभिनेता आता ठाणेकर झाला, याचा ठाण्यातील रंगकर्मींना आणि नाट्यरसिकांना विलक्षण आनंद झाला.

२८ ऑगस्ट १९०६ रोजी जन्मलेल्या मामा पेंडसेंना शालेय शिक्षण व्ह. फा. म्हणजे सातवीपर्यंतच घेता आले. पुढे घरच्या परिस्थितीमुळे नोकरी शोधणे क्रमप्राप्त ठरले. ड्रॉइंग चांगले असल्याने बोर्ड्स रंगविणे, घरे रंगविणे अशी कामे सुरू झाली. त्यातच सांगलीच्या ‘सदासुख’ थिएटरमध्ये नाटकाचे पडदे रंगवणाऱया शंकरराव गायकवाडांशी परिचय झाला आणि त्यांचा मदतनीस म्हणून चापेकरांच्या ‘किर्लोस्कर संगीत मंडळीत’ त्यांची वर्णी लागली. तिथे आधी नाटकाच्या जाहिराती वाटण्याची कामगिरी सोपविली गेली, पण मानी स्वभावाच्या मामांनी नकार दिला. मग ‘संशयकल्लोळ’ च्या प्रयोगात एका प्रवेशात ‘स्त्राr पार्ट’ करायला सांगितले. मनात नसतानाही मामांनी स्त्राrचा वेश चढवला. पण बरोबरच्या कलाकारांनी जरा ‘आगाऊ’ चेष्टा केल्यावर, संतापाच्या भरात अंगावरचा स्त्राrवेश उतरवला. तसा मामांच्या तोंडाला अगदी पहिल्यांदा रंग लागला होता तो, मामा सांगलीच्या सिटी हायस्कूलमध्ये शिकत असताना. तेव्हा इंग्रजी पहिल्या इयत्तेत असताना, वर्गातल्या मित्रांनी हनुमान जयंतीच्या निमित्ताने ‘तेजोभंग’ हे नाटक बसवले होते. त्यात मामा झाले होते अर्जुन.

‘सिटी हायस्कूल’च्या संमेलनात ‘एकच प्याला’ चा प्रवेश सादर करताना सुधाकरच्या भूमिकेत मामांनी दाखवलेला प्रत्ययकारी अभिनय पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. नंतर चापेकरांच्या कंपनीत आयत्यावेळी पडेल ती भूमिका सफाईने सादर करीत मामांचा नाट्य प्रवास सुरू झाला. ‘ललित कला’मध्ये नानासाहेब फाटक काम करायचे तेव्हा त्यांच्या अंगावर एकदोन वुलनचे कपडे असायचे. त्याचवेळी त्या कंपनीच्या डोअरकीपर्सच्या अंगावर सतत वुलन आणि सिल्कशिवाय कपडे नसत. ‘किर्लोस्कर मंडळी’मध्ये नट होण्यापूर्वी मामांना साताऱयाच्या मुक्कामात डोअरकीपरचे काम दिले गेले. ते गॅलरीच्या प्रवेशद्वारानजीक उभे होते. नाटक सुरू होण्याअगोदर अनेकजण त्यांच्या हातावर पैसे ठेवू लागले. त्यांनी बजावलं, ‘तुम्ही मॅनेजरची चिठ्ठी आणा. हे पैसे त्यांना नेऊन द्या. मगच तुम्हाला आत सोडतो.’ परिणामी त्यांची बदली दुसऱया दिवसापासून खुर्च्यांच्या प्रवेशद्वारापर्यंत झाली. जेथे त्यांच्या मनाविरुद्ध घडले तिथे ते जास्त दिवस राहिले नाहीत. कारण त्यांची म्हणून काही तत्त्वे होती. तसेच ते वागले. अंधानुकरण करण्यापेक्षा आपल्याला शोभेल असाच अभिनय करावा, असे दात्यांनी औंधकरांच्या ‘समर्थ मंडळी’च्या ‘आग्य्राहून सुटका’ नाटकाच्या तालमीच्या वेळेला सांगितले. त्यानंतर फाटकांच्या अभिनयाचा प्रभाव त्यांच्या अभिनयातून कमी होत गेला आणि दात्यांच्या भूमिकांचा पगडा मनावर बसला. या नाटकात मामा उमरखान, तर केशवराव दाते औरंगजेबाची व्यक्तिरेखा साकारत होते. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयातर्फे श्री. ना. पेंडसे यांच्या ‘महापूर’ नाटकात काम करत असताना मामांनी त्यांच्या जबाबदारीवर पाच प्रयोग केले. परंतु यात तोटा झाला. श्री. ना. पेंडसे यांना कळल्यावर त्यांनी पुढच्या प्रयोगांची परवानगी त्यांना नाकारली आणि तोटा थोडाफार भरून निघावा म्हणून काहीएक रकमेचा चेक पाठवला. अर्थात मामांनी तो परत पाठवला.

१९२९ ते १९६९ अशी सलग ४० वर्षे मामांची रंगयात्रा व्यावसायिक रंगभूमीवर अव्याहत सुरू होती. या यात्रेमध्ये ‘आग्र्याहून सुटका’, ‘बेबंदशाही’, ‘तोतयाचे बंड’, ‘सवाई माधवरावाचा मृत्यु’, ‘भाऊबंदकी’, ‘दुरितांचे तिमिर जावो’, ‘खडाष्टक’, ‘एक होता म्हातारा’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘स्वामिनी’, ‘सन्यस्त खङ्ग’, ‘देव नाही देव्हाऱयात’, ‘सत्तेचे गुलाम’, ‘स्वर जुळता गीत तुटे’, ‘आंधळ्यांची शाळा’, ‘लोकांचा राजा’, ‘कुलवधू’, ‘महापूर’, ‘नाटककाराच्या शोधात सहा पात्रे’ इत्यादी पन्नासएक नाटकांमधून मामांनी आपल्या लक्षवेधी अभिनयाचे दर्शन प्रेक्षकांना घडवले.

ठाण्यात आल्यानंतर स्वतचे वलय बाजूला ठेवून मामा ठाण्यातील हौशी नाट्यसंस्थांमध्ये मिसळले. मित्रसहयोगचे तरुण रंगकर्मी नव्या प्रकारचं नाटक करतात म्हणजे काय हे बघायला मामा आवर्जून एकांकिका स्पर्धा पाहायचे. ठाण्याच्या नाट्य परिषदेच्या शाखेच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचे. मामांचा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे शाहू छत्रपती सुवर्ण पदक आणि विष्णुदास भावे नाट्यगृह, सांगलीतर्फे सुवर्ण पदक देऊन गौरव करण्यात आला. कल्याण येथे भरलेल्या ५३व्या आखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष पद मामा पेंडसे यांनी भूषविले होते.

— राजेश दाभोळकर – ९३२४९०१५८५
आधार – मामा पेंडसे यांचे आत्मचरित्र ‘केशराचे शेत’ (संपादन, शब्दांकन अशोक व शुभा चिटणीस)

(साभार – ठाणे रंगयात्रा २०१६)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..