इब्राहिम अल्काझी यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९२५ रोजी झाला.
इब्राहिम अल्काझी हे सेट झेवियरचे विद्यार्थी परंतु अर्धवट शिक्षण सोडून ते इंग्लंडला गेले. त्यानी रॉयल अॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्स या लंडनमधील प्रसिद्ध संस्थेतून नाट्यविषयक पदवी मिळवली. तिथल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना खास प्रमाणपत्र मिळाले. शिवाय इ.स.१९५० मध्ये त्यांना ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनचे एक पारितोषिक मिळाले. ग्रेट ब्रिटनमधील सरकारी नाट्यमंडळाशी ते काही काळ संबंधित होते . विदेशी नाटकांचा त्यांच्यावर खूप परिणाम झाला त्यातली बरीचशी नाटके त्यांनी भारतात आल्यावर बसवली.
लंडनहून परतल्यावर इब्राहिम अल्काझींनी त्यांनी इ.स.१९५४ मध्ये मुंबईत ’ थिएटर युनिट ’ नावाची संस्था स्थापन केली, आणि इथे त्यांच्या नाट्यक्षेत्रातील कामगिरीला सुरुवात झाली. या संस्थेच्या वतीने त्यांनी अनेक हिंदी आणि इंग्रजी नाटकांचे रंगभूमीवर प्रयोग केले. अल्काझींची पत्नी रोशन हिच्याबरोबर तिचे बंधू अॅलेक पदमसी व इतर भावंडे असत. त्याचप्रमाणे हमीद सयानी पण होते.
इब्राहिम अल्काझी हे दिल्लीत इसवी सन १९५९मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे म्हणजे एन् . एस् . डी . चे पहिले संचालक झाले. या नाट्यशाळेत त्यांनी तीन वर्षाचा एक नाट्य पदविका अभ्यासक्रम तयार केला. तो शिकवीत असताना त्यांनी विद्यार्थ्यांकडून संस्कृत आणि भारतीय भाषांतील उत्तमोत्तम नाटके हिंदीत रूपांतरित करून घेतली आणि त्यांचे प्रयोग केले. इ.स.१९६२ ते १९७७ या त्यांच्या नाट्यशाळेमधील कारकिर्दीत, त्यांनी रंगमंचावर नाट्यप्रयोग कराणाऱ्या नाट्य विद्यालयातील विद्यार्थ्यांची एक शाखा (Repertory) संस्थापित केली. भारतीय नाटकांबरोबरच इब्राहिम अल्काझींनी ग्रीक शोकांतिका, ऑस्बर्न, इब्सेन, चेकॉव्ह, बेकेट, ब्रेशश्ट, मोलियर, स्ट्रिंगबर्ग यांची नाटके, आणि शेक्सपियरची मुख्य नाटके विद्यार्थ्यांकडून बसवून घेऊन, दिल्लीत त्यांचे रंगमंचीय प्रयोग केले. इब्राहिम आल्काझीमुळे दिल्लीत जपानी ’ काबुकी ‘ या नाट्यप्रकाराचेही प्रयोग झाले. अशा प्रकारे, अल्काझींनी भारतात राष्ट्रीय नाट्याची संकल्पना अमलात आणली आणि पुढे रुजवलीही. उत्तम मार्गदर्शक, दिग्दर्शक आणि नेपथ्यकार म्हणून अल्काझी जगभर नावाजले गेले आहेत. अल्काझी यांनी कित्येक नाटकांचे दिग्दर्शन केले. शेक्सपिअरच्या नाटकांचे तसेच गिरीश कर्नाड याच्या तुघलक या नाटकांचे दिग्दर्शन केले. त्याचप्रमाणे त्यांनी विजय तेंडुलकर , बादल सरकार , गिरीश कर्नाड आणि मोहन राकेश याची नाटके बसवली.त्यांनी कित्येक पाश्चात्त्य नाटके हिंदीत बसवली आणि वेगवेगळ्या विभागीय शैलीतील प्रयोग रंगमंचावर आणले.
दिल्लीत खुल्या रंगमंचावर नाट्यप्रयोग करण्याची सुरुवात इब्राहिम अल्काझींनी केली. पुराना किल्ला आणि असेच खुले पटांगण असलेल्या ऐतिहासिक व अन्य इमारतींत अल्काझींचे नाट्यप्रयोग होत असत. अशा प्रकारे झालेल्या नाटकांमध्ये ‘ तुघलक ’ व ‘ अंधायुग ’ या नाटकांचे प्रयोग कायमस्वरूपी लक्षात राहणारे ठरले. त्याचा चित्रकलेचा अभ्यास गाढा होता. ते मुंबईत असताना त्यांनी जहांगीर आर्ट गॅलरीत आधुनिक चित्रकलेवर आधारलेली १३ प्रदर्शने भरवली होती. त्यात अनेक दुर्मिळ चित्रे होती. त्यात पिकासोची पण काही दुर्मिळ चित्रे होती. मला आठवतंय मी त्यांना १९९८ साली एका प्रदर्शनात मुंबईत पाहिले होते . त्यांनी त्यावेळी वेगळाच अरबांचा वेष परिधान केला होता . अनेक रंगकर्मी त्यावेळी होते ते अदबीने त्याच्याशी बोलत होते त्यावेळी जयदेव हट्टंगडी यांनी मला त्याची स्वाक्षरी घेऊन देण्यास मदत केली होती.
इब्राहिम अल्काझींचे शिष्य म्हणून प्रसिद्धीस आलेल्या अभिनेत्यांची आणि दिगदर्शकांची यादी खूप मोठी आहे. अमृता सुभाष, उत्तरा बावकर, एम.के.रैना, ओम पुरी, कमलाकर सोनटक्के, जयदेव हट्टंगडी, ज्योती सुभाष, नसरुद्दीन शाह, पंकज कपूर, रोहिणी हट्टंगडी, वामन केंद्रे, सई परांजपे, सुरेखा सीकरी, आणि सुहास जोशी हे त्या यादीतले कलाकार आहेत. सुप्रसिद्ध रंगकर्मि विजया मेहता म्हणतात अल्काझी नसते तर मी एक फक्त नटी म्ह्णून वावरले असते, दिग्दर्शक झालेच नसते. नाटक हा सृजनशील धर्म आहे ही शिकवण मला अल्काझीकडून मिळाली. अल्काझी म्हणजे नाट्यक्षेत्रातले एक मह्त्वाचे व्यक्तीमत्व आहे आणी त्याचा प्रभाव आजही अनेक रंग्कार्मीवर आहे. अल्काझीना १९५० मध्ये उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून रॉयल अॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्स या लंडनमधील प्रसिद्ध संस्थेचे खास प्रमाणपत्र मिळाले , १९५०मध्ये ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनचे एक पारितोषिक मिळाले , १९६२ सालचे दिग्दर्शनाचे अॅकॅडमी अॅवॉर्ड मिळाले , १९६६ साली पद्मश्री मिळाली , १९६७ साली राष्ट्रीय अकादमीचे सन्माननीय सदस्यत्व मिळाले, १९८८ सालचा कालिदास पुरस्कार , १९९१मध्ये पद्मभूषण तर २००४साली तन्वीर सन्मान मिळाला .
त्यांचे 4 ऑगस्ट 2020 रोजी निधन झाले.
अल्काझी हे खऱ्या अर्थाने ‘ नाट्यगुरू ‘ होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply