व्हॉटसऍपवरुन आलेली ही कविता. तिचा कवी माहित नाही पण कविता सुंदर आहे म्हणून शेअर केलेय..
आयुष्य म्हणजे नात्यांची मिसळ
आई वडील मूग मटकी कडधान्य
त्यांच्या शिवाय मिसळ ही कल्पनाच अमान्य
त्यांच्या मुळेच तर ती बनते सकस अन्न
बहीण भाऊ टोमॅटो बटाटे वाटाणे
मिसळतील एकमेकात सहजपणे
मिळून येईल मिसळ
मग छान दाटपणे
नातेवाईक म्हणजे
मीठ लिंबू मसाला
चव हवी मस्त तर
प्रमाणातच घाला
खारट आंबट मिसळ
उगाच हवी कशाला
मित्र मैत्रिणी म्हणजे
लाल मस्त तर्री
मिसळीला रसदार
तीच करते खरी
हवीहवीशी चटकदार
चव आणते भारी
जोडीदार कांदा
डोळ्यात आणे पाणी
पण मिसळीला मजाही
तोच तर आणी
फोडणीत हवाच शिवाय
वरून त्याची पेरणी
मुलं कुरकुरीत शेव
फरसाण चिवडा
त्यांच्यावीना मिसळ
हा विचारच सोडा
अधुरा राहील ना सारा
खटाटोप एवढा
शेजारी म्हणजे कोथिंबीर
हिरवी गार
असेल तर
मिसळीची वाढेल शोभा पार
नसली तरी काही
अडणार नाही फार
ऑफिस बॅास म्हणजे मलईदार दही
गोड असेल तरच
मिसळीला सही
नाहीतर ठेवा दूरच
घालू नका काही
मिसळ जमली चविष्ट तर
रंगत हमखास
पण सर्वांच्याच नशिबी,
नाती नसतात ना झकास
मग आयुष्यच सारे
होऊन जाते उदास
पण बिघडली चव तरी
प्रयत्न नाही सोडायचे
चवीनुसार पदार्थ
कमी जास्त करत रहायचे
मनाच्या समजुतदारपणाचे
पाणी थोडे घालायचे
हळूहळू मग जमेल मस्त भट्टी
मिसळीची चवीशी होईल
छान गट्टी
सुखाशी मग आपली
कायमची बट्टी..
Leave a Reply