नवीन लेखन...

नवलभूमीचा यक्ष… नरेंद्र बल्लाळ

ठाणे रंगयात्रामधील अरुणा जोगळेकर यांचा लेख.


खरं म्हणजे ते अभिनयाच्या क्षेत्रात आले असते तर त्यांनी धमाल उडवली असती. सावळाच पण देखणा चेहरा, गांभीर्य आणि स्मितहास्य याचं त्या चेहऱ्यावर विलसणारं मिस्कील अजब मिश्रण, संपूर्ण व्यक्तिमत्त्वात असलेली ऋजु उत्कटता आणि ती पेलण्याचं सामर्थ्य असलेला आंतरिक कणखरपणा. मला आठवतात ते नरेंद्र बल्लाळ असे होते. बालरंगभूमीला वेगळं परिमाण, नवी दृष्टी आणि नवी दिशा देऊन तरुणवयातच जगाचा निरोप घेणाऱ्या या उमद्या, हसणाऱ्या माणसाला ज्यांनी ज्यांनी जवळून पाहिलं ते सगळेच आणि त्यांची नाटकं पाहून, आपलं बालपण समृद्ध करणारी पिढी त्यांना खूप ‘मिस’ करत असेल याबद्दल मला अजिबात शंका नाही.

नरेंद्र बल्लाळ हा.. त्यांना आम्ही ‘बल्लाळकाका’ म्हणत असू… एक झपाटलेला, तरीही ज्याचे पाय जमिनीवर आहेत असा माणूस होता. बालरंगभूमी हे नेहमीच दुर्लक्षित राहिलेलं रंगभूमीच अंग. बल्लाळकाकांनी केलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या रंगभूमीला त्यांनी वर्तमानकाळाशी आणि भविष्यकाळाशी जोडलं. मुलांच्या मनात असलेल्या अद्भुतरम्य… पऱ्या, राक्षस, चेटकिणी या जगाला धक्का न लावता अलगद त्यांना एका नव्या विश्वाची सफर घडवली. ‘मंगळावर स्वारी’ या त्यांच्या नाटकानं बाल रंगभूमीची दिशाच बदलली. विज्ञानाच्या अद्भुतरम्यतेशी मुलांची ओळख करून देणाऱ्या या नाटकानं एका पिढीलाच नवा विचार, नवी कल्पनाशक्ती आणि विज्ञान यांच्याकडे अभिमुख केलं. एक प्रकारचा सळसळता उत्साह या नाटकानं निर्माण केला. बाल रंगभूमीचा काहीसा कुंठीत झालेला प्रवाह या नाटकामुळे जोमानं आणि खळाळून वाहू लागला.

‘मंगळावर स्वारी’ नंतर आलं ‘नवलभूमीचा यक्ष’. या नाटकाच्या निमित्तानं बल्लाळकाका आणि बल्लाळकाकी म्हणजे कुमुदिनी बल्लाळ, ज्यांना आम्ही सगळेच ‘बाई’ म्हणत असू. कारण त्या महिला संघ शाळेत शिकवत असत. यांच्याशी माझी ओळख झाली. ‘विझार्ड ऑफ ओझ’ या विख्यात कलाकृतीचं रूपांतर होतं ‘नवलभूमीचा यक्ष’. मी त्यावेळी सातवी आठवीत असेन. त्या वयातल्या अबोध जाणिवांवर बल्लाळकाका आणि बल्लाळबाई यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक नात्याचे फार सुंदर ठसे उमटले, जे आजही ताजे आहेत.

बल्लाळकाका त्यावेळी पार्ल्याच्या एका बैठ्या पण टुमदार घरात राहत असत. ती चाळ नव्हती. पण घर अगदी लहान होतं. तेवढ्याशा जागेत त्यांचा, बायको आणि दोन मुलांसह आपली आई आणि भाऊ असा संसार होता. त्यातच पुढच्या व्हरांड्याचं रूपांतर आपल्या संस्थेच्या ऑफिस-कम-प्रॉपर्टी ठेवण्याची जागा (गोडाऊन हा शब्द नाही वापरू शकत इथे. कारण त्या प्रॉपर्टीवर त्यांचं फार प्रेम होतं) केलं गेलं होतं. आज विचार करताना त्या सगळ्याबद्दल खूप भरून येतं. कारण बालरंगभूमीच्या या सगळ्या व्यवहारात नफा तर नव्हताच, असलीच तर पदरमोडच. शिवाय त्यातून प्रचंड प्रसिद्धी किंवा ग्लॅमर आणि कौतुक मिळेल असंही नव्हतं. तरीही या जोडीनं हा सगळा उपद्व्याप चालवला होता. मात्र आपल्या आवडीची गोष्ट करण्यात काय आनंद असतो हे त्या दोघांकडे पाहिल्यावर क्षणात जाणवत असे. दोघेही उत्साहाने मुसमुसलेले. दोघेही अनेक कामं एकाचवेळी करणारे. लेखन, दिग्दर्शन, कपडे, मेकअप, सेट्स, गाणी या सगळ्यांवर दोघांचीही स्वतंत्र मतं, त्यावरून उडणारे उत्स्फूर्त वाद, रुसवे आणि मग होणारं हसरं पॅचअप. हे सगळं अगदी नीट आठवतंय मला. रमणीय सहजीवनाचा एक वस्तुपाठच होता तो. त्यात प्रकर्षानं जाणवलेली एक गोष्ट म्हणजे बाईंचा ताठ कणा. त्यांच्या बोलण्या-चालण्यात, मतं मांडण्यात एक प्रकारची निर्भीडता असे. क्वचितप्रसंगी धारसुद्धा. बल्लाळकाका चेष्टेने पण खऱ्या आदरानं म्हणत की हिला मी घाबरतो. संस्थेचा गाडा चालवताना बाईंनी शाश्वत जीवनमूल्यांना नेहमीच अधोरेखित केलं.

एक प्रॉडक्शन हाऊस चालवणं म्हणजे काय कसरत असते याचा मला स्वत:ला अनुभव आहे. त्यामुळे कदाचित त्यावेळी नसेल कळलं. पण आज, बल्लाळकाकांनी केलेल्या कामाचं महत्त्व प्रकर्षानं जाणवतंय्. मला आठवतंय् आमच्या ‘नवलभूमीचा यक्ष’ या नाटकानं चक्क इंदूर-उज्जैन असा दौरा केला होता. इला भाटे, प्रिया तेंडुलकर, अशोक पावसकर, राजा नामजोशी आणि इतर सगळी मंडळी या नाटकाचा भाग होती. लहान मुलांच्या नाटकात सेट्स प्रॉपर्टीज् कपडे यांना खूप महत्त्व असतं. या नाटकातही तसंच होतं. चेटकीण, परी, गवत्या म्हणजे गवताचा माणूस, पत्र्या म्हणजे पत्र्याचा माणूस, सिंह, कुत्रा अशा मोठ्ठा कपडेपट लागणाऱ्या व्यक्तिरेखा होत्या. तर सेट्स प्रॉपर्टीज् आणि कपडेपटाचा हा लवाजमा मुंबईहून रेल्वेने इंदोरला कसा नेला असेल या कल्पनेने आज काटाच येतो अंगावर. इंदूरचे प्रयोग झाल्यावर आम्ही निघालो उज्जैनला. एकूण सगळ्या फ्रेमवर्कमध्ये फक्त एक लहानसा टेम्पोच बसत होता, हे सगळं लटांबर इंदूरहून उज्जैनला जायला. सगळ्या सामानासकट आम्ही सगळे त्या टेम्पोत मावणं केवळ अशक्य होतं. केवळ अशक्य. बाई, बल्लाळकाका आणि त्यांचे साहाय्यक यांच्यात काही काळ चर्चा झाली. सगळे जोशात खूप हसले आणि बल्लाळकाकांनी जाहीर केलं. ‘आपल्याला प्रचंड दाटीवाटी करावी लागेल. पण आपण सगळे सामानासकट याच टेम्पोतून जाणार आहोत. तुम्ही तयार आहात का?’ सगळ्यांनी ओरडून उत्तर, ‘दिलं होss’ आणि मग अक्षरश: बरणी हलवून हलवून त्यात काठोकाठ लाडू भरावेत तसे आम्ही आणि सामान एकरूप होऊन आणि हातापायांची जी अवस्था टेम्पेत कोंबले जाताना होती तसे शेवटपर्यंत पुतळे होऊन उज्जैनला गेलो. मात्र प्रचंड हसत. कोणत्याही संकटासमोर हार मानायची नाही आणि मार्ग काढायचा तो सकारात्मकच. शिवाय सगळ्यांना बरोबर घेऊन हा धडा आम्ही सगळेच शिकलो तेव्हा. तसाच प्रसंग ठाण्याच्या एका प्रयोगावेळी घडला. तिथला प्रयोग संपता-संपताच मुंबईत दंगल उसळली होती. कर्फ्यू लागला होता. ठाण्याहून पार्ल्याला परतणं अशक्य होतं. पण बल्लाळकाकांनी आपल्या मित्रांच्या घरांचे दरवाजे ठोठावून सगळ्यांची सोय केली. सगळ्यांना खाऊपिऊ घातलं. त्यावेळी मोबाइल नव्हते, लँडलाइन फोनही तुरळक घरी असायचे. तरीही बल्लाळकाकांनी खटपट करून हस्ते-परहस्ते सगळ्या मुलांच्या पालकांपर्यंत निरोप पोहोचवले की मुलं सुखरूप आहेत.
आज दुर्दैवाने प्रत्येक कलेच्या भोवती अनाठायी ग्लॅमर, बनचुकेपणा आणि अर्ध्या हळकुंडाने आलेल्या पिवळेपणाची चमक आहे. जीवनमूल्यं देणारं, स्वप्न बघायला शिकवणारं तरीही वास्तवाचं भान देणारं असं काहीतरी बल्लाळकाकांनी सुरू केलं होतं. पण पुढे त्यांच्या आयुष्यानं वेगळं वळण घेतलं. बालरंगभूमीइतकंच पत्रकारितेवर त्यांचं प्रेम होतं. त्यांनी पंख पसरले आणि ते पार्ल्याहून ठाण्याला गेले.

स्वतचं वर्तमानपत्र सुरू केलं. पण बालरंगभूमीसाठी आणखी काही करण्यापूर्वीच अगदी अकाली त्यांनी या जगाचा निरोप घेतला. सुधा करमरकर, रत्नाकर मतकरी आणि नरेंद्र बल्लाळ ही बालरंगभूमीचं शैशव सशक्त करणारी तीन नावं. पुढे सुलभा देशपांडे, विद्या पटवर्धन यांनी या रंगभूमीला नवा आकार दिला. साच्यातून बाहेर काढून मोकळा श्वास दिला. नवे प्रयोग करायला सुरुवात केली.

‘आज बल्लाळकाका असते तर?’ असा विचार नेहमी मनात येतो. त्या काळात ‘मंगळावर स्वारी’ करणाऱ्या, काळाच्या पुढचं पाहणाऱ्या त्या गुणी माणसानं चकित करणारी एक निराळी भरारी मारली असती हे नक्कीच. आणि आश्चर्याने पाहणाऱ्यांना नेहमीप्रमाणे मिस्कीलपणे हसून ते म्हणाले असते, ‘त्यात काही विशेष नाही, कुणीतरी हे करणं आवश्यकच होतं… ते मी केलं इतकंच!’

त्यांनी आपल्या नाट्यसंस्थेचं नावच मुळी ठेवलं होतं ‘नवल रंगभूमी’. लहान मुलांच्या कुतूहलानं भरलेल्या जगाला रंगभूमीवर घेऊन येणारी नवल रंगभूमी. नवलाईनं भरलेल्या जगातल्या विज्ञानाला आणि माणसातली स्वप्नाळू वृत्ती कायम ठेवणाऱ्या परिकथांना एकत्र गुंफणारा नरेंद्र बल्लाळ हाच खरं तर ‘नवलभूमीचा यक्ष’ होता, असं आज म्हणावंसं वाटतंय्. तो यक्ष त्याच्या जादूई हास्यासकट आजही आमच्या सगळ्यांच्या मनात आहे.

— अरुणा जोगळेकर.

(साभार – ठाणे रंगयात्रा २०१६)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..