२००६ हे वर्ष माझ्यासाठी नवीन आव्हाने घेऊन आले. डॉ. बेडेकर विद्या मंदिर ही माझी शाळा, तर बी.एन. बांदोडकर कॉलेज ऑफ सायन्स हे माझे बारावीपर्यंतचे कॉलेज! ही शाळा आणि कॉलेज ‘विद्या प्रसारक मंडळ’ या शैक्षणिक संस्थेतर्फे चालवण्यात येते. या व्यतिरिक्त कॉमर्स आणि आर्टस् कॉलेज, पॉलिटेक्निक, लॉ कॉलेज, इंग्रजी माध्यमाची शाळा तसेच मॅनेजमेंट कॉलेज असे या संस्थेचे खूपच मोठे कार्यक्षेत्र आहे. डॉ. विजय बेडेकर हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. विद्या प्रसारक मंडळाच्या सभेमध्ये डॉक्टरांनी मॅनेजमेंट कमिटीचा सदस्य (संचालक) म्हणून माझे नाव सुचवले. सभेत ते मान्यही झाले आणि मी या संस्थेच्या मॅनेजमेंट कमिटीचा सदस्य (संचालक) झालो. डॉक्टरांनी मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. मी आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली. माझ्यासाठी हा भावनिक क्षण होता. ज्या शाळेत आणि कॉलेजात मी शिकलो त्याच शाळेच्या आणि कॉलेजच्या मॅनेजमेंट कमिटीचा आता मी सभासद होतो, माझ्या शाळेशी आणि कॉलेजशी मी पुन्हा एकदा जोडला गेलो. असे काही घडले की मी स्तंभित होतो आणि विचार करायला लागतो की आयुष्याची ही निराळी, काहीशी अनपेक्षित वळणे काही आपण नियोजित केलेली नसतात. मग या घटना घडतात कशा? या सर्वांचे नियोजन नक्कीच कोणीतरी वेगळी शक्ती करत असते. आपण त्याला देव म्हणतो, आपला योग आहे असे म्हणतो, नशीब म्हणतो, काहीही म्हणतो. पण त्याचे उगमस्थान अजूनही अज्ञातच आहे. घटना चांगली घडली तर आपण आनंदित होतो. वाईट घडली तर आपण दुःखी होतो. पण हेसुद्धा फार काळ टिकत नाही. कारण आयुष्य काही काळाने वेगळे वळण घेते आणि आधीचे आपण हळूहळू विसरत जातो.
मुंबई महानगरपालिकेच्या संगीत स्पर्धेचे मी परीक्षण केले. माझ्याबरोबर संगीतकार अच्युत ठाकूर आणि प्राची देवस्थळी होत्या. हिंडाल्को स्टाफ फेडरेशनसाठी सिल्व्हासा येथे गझलचा कार्यक्रम केला. मराठी सुगम संगीताचे विविध प्रकार दाखवणारा ‘मराठी सुगम संगीत एक सुरेल लेणे’ हा नवीन कार्यक्रम मी तयार केला. ‘संस्कार भारती’ या संस्थेने गडकरी रंगायतन येथे हा कार्यक्रम आयोजित केला. समीरा गुजर आणि श्रीराम केळकर यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. नंतर इंडस्ट्रियल इंजिनीयरिंगच्या ऑल इंडिया कॉन्फरन्समध्ये हॉटेल फरियाज, लोणावळा येथे गझल नाईट सादर केली. कोमल करंदीकर आणि दर्शना घळसासी या माझ्या विद्यार्थिनी या कार्यक्रमात गायल्या. लायन्स क्लबच्या सुगम संगीत स्पर्धेचा परीक्षक म्हणून मी अहमदनगरला गेलो. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण माझे संगीतकार प्रभाकर पंडित यांच्या हस्ते झाले. पंडित सर आता पुण्याला राहायला गेल्यामुळे नेहमी त्यांची भेट घडत नसे. “अरे, तुला भेटण्यासाठी मुद्दाम पुण्याहून या कार्यक्रमासाठी आलो.” पंडित सर म्हणाले. ते माझ्याच हॉटेलात उतरल्यामुळे आमच्या भरपूर गप्पा झाल्या. त्यांनी सुगम संगीतावर एक पुस्तक लिहिले होते. त्याची प्रत सही करून मला देतांना ते म्हणाले, “या पुस्तकात तुझा उल्लेख केलाय. तुझ्याबद्दल लिहिले आहे. ते वाच आणि पुस्तक कसे वाटले याचा अभिप्राय द्यायला पुण्याला घरी ये.” “नक्की येतो.” मी म्हणालो. पण तो योग येणार नव्हता. पंडित सरांशी माझी ही अखेरचीच भेट ठरली. काही दिवसांनीच हा प्रेमळ संगीतकार रसिकांसाठी त्याच्या सर्व रचना मागे ठेऊन निघून गेला. माझ्या पहिल्या कार्यक्रमाचे, पहिल्या कॅसेटचे, पहिल्या रेकॉर्डिंगचे ते संगीतकार होते. ५००व्या कार्यक्रमालाही त्यांची उपस्थिती होती. मात्र या पुढील कार्यक्रमांसाठी माझ्याबरोबर त्यांची गाणी असणार होती.
-अनिरुद्ध जोशी
Leave a Reply