नवीन लेखन...

नवी अस्पृश्यता

सांगली जिल्ह्यात एड्स रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा जास्त असल्याच्या आशयाचे वृत्त नुकतेच एका बड्या मराठी दैनिकात उमटले. अशा तह्रेच्या बातम्यांचे आजकाल नावीण्य राहिलेले नाही. अधूनमधून अशा आशयाच्या बातम्या उमटतच असतात. दोन-तीन वर्षांपूर्वी तर आता अकोल्याहूनही प्रकाशित होणाऱ्या एका मराठी दैनिकाने एड्समुळे मृत्युमुखी (?) पडलेल्या एका व्यक्तीच्या नावासह बातमी प्रसिद्ध केली होती. आमच्या संपादकीय विभागाने मात्र त्या रुग्णाच्या नावाचा उल्लेख न करता बातमी प्रसिद्ध करण्याचे तारतम्य बाळगले होते. रुग्णाचे नाव प्रसिद्ध न करता बातमी छापल्यामुळे त्या गावचा आमचा वार्ताहर तणतण करीत कार्यालयात आला होता. मात्र जेव्हा त्याला हे समजावून सांगितले की, बाबा रे मरणारा तर मेला. एड्सने मेला की आणखी कशामुळे हे त्यालाच ठाऊक. पण तो एड्सने मेला ही बातमी त्याच्या नावासकट छापल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना समाजाकडून अस्पृश्यतेची वागणूक मिळेल. आपल्याला त्या पापात सहभागी व्हायचे नव्हते, म्हणून आपण नाव छापण्याचे टाळले, तेव्हा त्याची समजूत पटली.

देशाच्या काही दुर्गम भागात आजही स्पृश्यास्पृश्यता पाळल्या जात असली तरी अस्पृश्यतेचे देशातून मोठ्या प्रमाणात उच्चाटन झाले आहे, ही गोष्टही तेवढीच खरी आहे. विशेषत: आपल्या पुरोगामी राज्यात तरी अस्पृश्यता कुठे पाळल्या जात असेल, असे वाटत नाही. मात्र राज्यात जसजसे एड्सच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे, तसतशी नवी अस्पृश्यता फोफावण्याची भीती निर्माण झाली आहे. एड्स या रोगाच्या प्रसारामागे असुरक्षित यौनसंबंध आणि विशेषत: वेश्यागमन हेच प्रमुख कारण असल्याचा जोरदार प्रचार झाल्यामुळे एड्सचा रोगी म्हटला की तो वेश्यागमन करीत असावा, असे गृहीतच धरल्या जाते. भारतात वेश्यागमन ही वाईट गोष्ट समजल्या जाते आणि त्यामुळे आपोआपच एड्सच्या रोग्यांकडे घृणास्पद नजरेने बघितल्या जाते. मुस्लिम तसेच पाश्चिमात्य राष्ट्रे, अमेरिका वगैरे जेथे विवाह बाह्य संबंध निषिध्द मानले जात नाहीत, तेथे मात्र एड्सचा फारसा प्रचार, प्रसार, बाऊ नाही ही बाब येथे लक्षात घेतली पाहिजे. एड्स हा संसर्गजन्य रोग नसल्याचे डॉक्टर मंडळी ओरडून सांगत असली आणि विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन तशा जाहिरातीही केल्या जात असल्या तरी प्रसार माध्यमांनी जो भ्रम पसरवलाच त्यामुळे आमचा समाज मात्र ते मान्य करायला तयार नाही. आणि त्यामुळे एखाद्या घरात एड्सचा रुग्ण असल्याची कुणकुण जरी लागली तरी ते संपूर्ण कुटुंबच बहिष्कृत ठरते. एक नव्या प्रकारची अस्पृश्यता त्या कुटुंबाच्या वाट्याला येते. विशेषत: जर त्या कुटुंबात एखादी विवाहाचे वय झालेली मुलगी असेल तर मग त्या कुटुंबाला भोगाव्या लागणाऱ्या भोगांचे वर्णन करण्यासाठी शब्दही अपुरे पडतात.

वरच उल्लेख आला की, एड्स हा रोग संसर्गजन्य नसल्याचे कानीकपाळी ओरडून – ओरडून सांगितले तरी आमचा समाज मात्र ते मान्य करण्यास तयार नाही. पण काय मान्य करायचे आणि काय करायचे नाही या संदर्भातील आम्हा भारतीयांचे ठोकताळेच एवढे विचित्र आहेत की काही विचारता सोय नाही. एड्सचाच विषय घ्या. एड्स या शब्दाचा पूर्ण विस्तार असा आहे – अॅक्वायर्ड इम्युनो डेफिशिएंसी सिंड्रोम. म्हणजेच एड्स हा काही स्वतंत्र रोग नाही तर तुमच्या शरीराची रोग प्रतिबंधक शक्ती कमी झाल्याचे दर्शविणारे ते एक लक्षण आहे. शरीराची रोग प्रतिकारक शक्ती कमी झाली की विविध रोग तुमच्या शरीरावर आक्रमण करतील, तुमचे शरीर त्या रोगांना प्रतिबंध करु शकणार नाही आणि अखेरीस तुम्ही मृत्युमुखी पडाल. म्हणजेच अंतत: तुमचा मृत्यू होईल तो एड्समुळे नाही तर दुसऱ्याच कोणत्या तरी रोगामुळे! यामध्ये टी.बी. म्हणजेच क्षयरोग प्रमुख आहे. अशा तऱ्हेने एड्स हा स्वतंत्र रोगच नसल्यामुळे प्रत्यक्षात एड्स नावाचा रोग आहे की नाही, या संदर्भातच मतांतरे आहेत. जगात एड्स नावाचा कोणताही रोग अस्तित्वात नसून एड्स असल्याचे समर्थन करणारे लोक ज्या ‘एच.आय.व्ही.’ नावाच्या विषाणूमुळे एड्स होत असल्याचे सांगतात, तो विषाणूच प्रत्यक्षात अस्तित्वात नसल्याचा एक मतप्रवाह आहे. बरे हे कुण्या सोम्यागोम्याचे मत नाही तर काही नोबेल पारितोषिक विजेत्यांचाही त्यामध्ये समावेश आहे. मात्र तरी देखील हे मान्य करावेच लागते की, बहुतांश पाश्चिमात्य एड्स अस्तित्वात आहे या मताचे आहेत आणि पाश्चिमात्य सांगतील ते सारे खरेच, अशी एक विचित्र मानसिकता आम्हा भारतीयांमध्ये तयार झाली असल्यामुळे आमच्या देशात जर कुणी एड्स नावाचा रोगच प्रत्यक्षात अस्तित्वात नाही, असे सांगितले तर त्याला वेड्यातच काढले जाते.

नागपूरचे डॉक्टर शांतीलाल कोठारी गत काही वर्षांपासून हा वेड्यात काढल्या जाण्याचा अनुभव घेत आहेत. जगात एड्स नावाचा रोगच अस्तित्वात नाही तर अविकसित व विकसनशील राष्ट्रातील लोकांचे मानसिक खच्चीकरण व आर्थिक शोषण करण्यासाठी पाश्चिमात्यांनी रचलेला तो एक डाव आहे, असे ते गेल्या काही वर्षांपासून ओरडून ओरडून सांगत आहेत. मात्र त्यांचे म्हणणे मान्य करण्यास कुणी तयार नाही. कारण ते पाश्चिमात्य नाहीत आणि पाश्चिमात्य नसलेली व्यक्ती हुशार असू शकते यावर आम्हा भारतीयांचा अजिबात विश्वास नाही. तरी बरे की, डॉ. कोठारी यांनी लाखोळीच्या दाळी संदर्भात केलेले संशोधन व दिलेला लढा सर्वपरिचित आहे. एवढेच नाही तर एड्सच्या क्षेत्रातही त्यांनी केलेली कामगिरी उल्लेखनीय अशीच आहे. एड्स नावाचा रोगच अस्तित्वात नाही या, मताचा केवळ पुरस्कार करूनच ते थांबले नाहीत तर त्यांनी तसे सिद्धही केले आहे. प्रचलित वैद्यकशास्त्राने एड्स झाल्याचे प्रमाणीत केल्यामुळे केवळ हबकून जाऊन खंगायला लागलेल्या अनेक रुग्णांना त्यांनी नवे आयुष्यच बहाल केले आहे. त्यामध्ये माझ्या परिचयातीलही एकाचा समावेश आहे. माझ्या परिचयातील त्या व्यक्तीला एड्स झाल्याचे सांगण्यात आले होते. त्याची ‘एचआयव्ही टेस्ट’ ही ‘पॉझिटिव्ह’ आली होती. हे कळल्यानंतर साहजिकच ती व्यक्ती आणि त्याची पत्नी दोघेही हबकले आणि खंगायला लागले. कमावलेल्या पैशापैकी काही हजार रूपये दर महिन्याला औषधोपचार आणि डॉक्टरांवर खर्च करूनही हातापायाच्या काड्या झाल्या. दोघाही पती-पत्नीचे वजन अवघे 40-35 किलो झाले. मला हे कळल्यानंतर मी लगेच त्यांना डॉ. कोठारींची भेट घेण्यास सांगितले. त्यानंतर डॉ. कोठारींनी त्यांचे ”ब्रेनवॉश” केले आणि आज ते दोघेही पुन्हा सुदृढ झाले आहेत. वजन 40-35 किलोवरुन 55-45किलोवर गेले आहे. एवढेच नव्हे तर त्यांना एक मुलगाही; झाला आहे आणि माय, बाप व लेकरु तिघेही सुदृढ आहेत. एड्स अस्तित्वात नसल्याचा आणखी कोणता पुरावा हवा? मात्र एखाद्या भारतीयाने सांगितलेले पटले व मान्य केले तर मग आम्ही भारतीय कसे? बहुराष्ट्रीय कंपन्या देशाची लूट करीत आहेत, त्यांना बहिष्कृत करा, स्वदेशीची कास धरा, हे सांगत गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण देशभर भ्रमण करणाऱ्या राजीव दीक्षितांनी, पाश्चात्य देशांमध्येही जिच्या नावाचा दबदबा आहे अशा आयआयटीमधून एम. टेक. ची पदवी मिळवली आहे. मात्र आम्ही राजीव दीक्षितांची खुळचट म्हणून खिल्ली उडवतो. पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्राॅनिक्स व टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केलेले राम कळसपूरकर आमच्यावर टर्मिनेटर बियाण्याचे प्रयोग सुरु असल्याचे पुराव्यानिशी सांगत आहेत. मात्र आम्ही त्यांची खुळचट म्हणून संभावना करतो. अस्मादिकांनीही कापूस व ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि सरकारवरही अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार नाही, असे उपाय राज्य सरकारला सुचविले होते. त्याचप्रमाणे दूरचित्रवाणी संचावरील मनोरंजन कर वसूल करण्याची, महसुलात वाढ करणारी अतिशय सुटसुटीत अशी कर प्रणाली सुचवली होती. मात्र त्यावर विचार करण्यासाठी सरकारला वेळ नाही. त्याच उपाययोजना जर एखाद्या पाश्चात्य तज्ज्ञाने सुचविल्या असत्या तर त्या मोठ्या हर्षभरे मान्यही केल्या गेल्या असत्या आणि त्या तज्ज्ञाला नजराणाही मिळाला असता. तीच गोष्ट डॉ. वंदना शिवा, डॉ. रमेश ठाकरे अशा अनेक आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या तज्ज्ञांबाबत. पारजनुक (जेनेटिकली मॉडीफाईड) बियाण्यांमुळे एक दिवस हा देश रसातळाला जाईल, ही गोष्ट ते कानीकपाळी ओरडून-ओरडून सांगत आहेत. पण आम्ही मात्र ढिम्मच. कारण ही सगळी मंडळी पाश्चात्य नाही. ते पाश्चात्य असते तर त्यांचे हेच म्हणणे आम्ही आनंदाने मान्य केले असते, एवढा पाश्चात्यांच्या अंधानुकरणाचा पगडा आमच्यावर बसला आहे. एड्स आहे हे पाश्चात्यांचे म्हणणे मान्य करून आम्ही आमच्याच बांधवांना समाजातून बहिष्कृत करु शकतो, पण एड्स नाही हे सिद्ध करण्यासाठी स्वत:च्या शरीरात कथित एचआयव्ही बाधित रक्त टोचून घेण्यास तयार असलेल्या डॉ. शांतीलाल कोठारींची आम्हाला कदर नाही.

अशाप्रकारे, एड्स नावाचा रोग आहेच, त्याची बाधा ज्या व्यक्तीला झाली आहे त्या व्यक्तीचे नक्कीच अनैतिक संबंध असतील आणि जर मी त्या व्यक्तीच्या संसर्गात आलो तर मलाही तो महाभयंकर रोग होईल, असल्या खुळचट समजुतीमुळे आज आम्ही आमच्या देशात नव्या प्रकारचे अस्पृश्य तयार करीत आहोत. बहुराष्ट्रीय कंपन्या डॉक्टरांच्या माध्यमातून या नव्या अस्पृश्यांचे पद्धतशीरपणे आर्थिक शोषण करीत आहेत. आर्थिक शोषणाचा बहुराष्ट्रीय कंपन्यांचा हा नवा ‘फॉर्म्युला’ आहे. एखाद्या गोष्टीची प्रचंड भीती घालायची आणि समोरचा घाबरला म्हणजे भीती दूर करण्याची उपाययोजना आपल्याकडे असल्याचे सांगून त्या कथित उपाययोजनेची किंमत वसूल करायची, असे हे महाभयंकर षडयंत्र आहे. या षडयंत्रापासून वेळीच सावध होण्याची गरज आहे, अन्यथा फार उशिर झालेला असेल.

— प्रकाश पोहरे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..