आगमप्रणवपीठिकाममलवर्णमङ्गलशरीरिणीं
आगमावयवशोभिनीमखिलवेदसारकृतशेखरीम् ।
मूलमन्त्रमुखमण्डलां मुदितनादबिन्दुनवयौवनां
मातृकां त्रिपुरसुन्दरीं मनसि भावयामि परदेवताम् ॥ ८॥
ॐकार. प्रणव. वैश्विक शक्तीचा आद्यतम हुंकार. सगुना निर्गुणाची जणू काही सीमारेषा.लिखाणाचा एक आकार असल्यामुळे सगुण, साकार. नादब्रह्म हे स्वरूप असल्याने निर्गुण निराकार. आई जगदंबा अशी ओंकारस्वरूपिणी, प्रणवरूपिणी आहे. तिच्या त्याच स्वरूपाचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
आगमप्रणवपीठिकाम्- आगम अर्थात वेद, शास्त्र. तर प्रणव म्हणजे ओंकार. हेच जिचे पीठ अर्थात आसन आहे अशी. त्याच्या वर असणारी अर्थात निर्गुण निराकार.
अमलवर्ण- अत्यंत शुद्ध रंगाची. कोणत्याही स्वरूपातील मल नसणारी.
मङ्गलशरीरिणीं– अत्यंत पवित्र शरीर असणारी. सामान्य शरीर हे पंचमहाभूतांचे बनलेले असल्याने त्यात दोष असतातच. मात्र आई जगदंबेचे शरीरदेखील चैतन्याचे असल्याने ते पूर्णतः निर्दोष,पवित्र आहे.
आगमावयवशोभिनीम्– आगम अर्थात विविध शास्त्रे हीच जिचे अवयव आहेत अशी. अवयव पाहूनच माणूस कोण आहे? याचे ज्ञान होते. तसे आई जगदंबेचे ज्ञान शास्त्रानेच होते हा भाव.
अखिलवेदसारकृतशेखरीम्– सर्व वेदांचे सार मस्तकावर धारण करणारी. वेदांचे सार आहे निर्गुण निराकार ओंकार. तोच जणू आईचा मुकुट आहे.
मूलमन्त्रमुखमण्डलां– आई जगदंबेचा मूळ बीजमंत्र आहे ह्रीम् . तोच तिचे मुखमंडल आहे. अर्थात त्याच स्वरूपात तिला जाणता येते. तीच तिची ओळख आहे. मुदितनादबिन्दुनवयौवनां- अत्यंत आनंदाने उच्चार केलेला ओंकार जिचे यौवन आहे अशी. ओंकाराला अक्षरब्रह्म म्हणतात. त्यात कधीच कमतरता येत नाही. आई जगदंबेचे यौवन अर्थात सौंदर्य असेच आहे अ-क्षर आहे.
मातृकां– जगज्जननी.
त्रिपुरसुन्दरीं– त्रिपुरसुंदरी रूपात शास्त्राने वर्णन केलेल्या,
मनसि भावयामि परदेवताम्– परमदेवता आई जगदंबेचे मी मनाने ध्यान करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply