सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन आज एका महत्वाच्या व वादग्रस्त विषयाला स्पर्श करणार आहे. हिंदूच्या सणवारात हल्ली जी विकृती वाढीला लागली आहे त्या अनुषंगाने व पौरोहित्य करताना मातृवर्गाद्वारे ज्या समस्या मांडल्या जात आहेत त्याच कारणाने हा लेखन प्रपंच करावासा वाटतोय.
प्रसिध्द हिंदुत्ववादी लेखक तसेच भागवत व रामायणाचे अभ्यासक डॉ. सच्चिदानंद शेवडे व गणकप्रवर सिध्दांति ज्योतिषरत्न डॉ. गौरव देशपांडे या दोन मान्यवरांशी चर्चा करुनच आज हा विषय मांडत आहे.
परवा पासुन चार पाच महिलांनी दुरध्वनीद्वारे माझ्याशी संपर्क केला व एक विचारणा केली की “गुरुजी, नवरात्रात प्रत्येक दिवशी विविध रंगी साड्या नेसाव्यात आणि देवीची व नवग्रहांची कृपा प्राप्त करुन घ्यावी असे मेसेज सोशल मिडिया द्वारे प्रसारीत होत आहेत. हे सत्य आहे का?”
काही महिलांनी तर नऊ दिवस कोणत्या मँचिंग बांगड्या, कानातले – गऴ्यातले अलंकार हवेत व कोणते दागीने घालावेत व त्यांनी देवीची कशी कृपा होते याचेही मेसेज आपणास आले आहेत असे सांगीतले. धर्मशास्त्रात असे काही दिलय का? असे विचारले.
गरबा व दांडिया खेऴ हाच देवीला आवडतो व तो खेऴलात कि “लक्ष्मी प्राप्त” होईल अशाही चर्चा होताहेत.
यात सत्यता आहे का? गुरुजी धर्मशास्त्रात हे दिलय का? असा प्रश्न आज मातृवर्ग विचारतोय.
मुंबई येथील सौ. सावंत नावाच्या महिलेने सांगीतले कि त्यांच्या ऑफीस मध्ये नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या व त्याला अनुसरुन मँचींग बांगड्या कानातले वगैरे अलंकार घालावेत असं ठरतेय. “मी गरीब आहे. शिपाई पदावर काम करते. नवरा सतत आजारी असतो. मी एवढा खर्च करु शकत नाही तेव्हा मी काय करु ? देवीचा कोप होईल का माझ्या कुटुंबावर?” हा प्रश्न ऐकुन मात्र मी हादरलोच व मनाशी ठाम ठरवले की यावर एक लेख द्यावाच.
चार वेद, चार उपवेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे व उपपुराणे, भगवद्गीता, रामायण, महाभारत, दुर्गासप्तशती व दुर्गा उपासनेचे ग्रंथ, जवऴपास साठ स्मृतिग्रंथ यांत कोठेही नवरात्रात नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या परीधान करा अस दिलेले नाही. धुतलेले स्वच्छ वस्त्र परीधान करा. सकच्छ म्हणजे नऊवारी साडी असेल तर उत्तम असे दिले आहे. जे तुमच्या जवऴ अलंकार असतील ते घाला. त्यांत मँचींग हवंच अस नाही.
मार्केटिंग कंपन्यांनी विविध कल्पना वापरुन हल्ली प्रत्येक क्षेत्रात पाय पसरण्यास आरंभ केलाय व त्यामुळे सणांचे पावित्र्य जाऊन त्यात बिभत्सपणा आलाय.
प्रत्येक प्रांताची एक विशेष संस्कृती असते ती जपली गेली पाहिजे. उदा. महाराष्ट्रात “घटस्थापना ” ही प्रधान असते . त्याच सोबत अखंड नंदादिप, त्रिकाऴ पूजन, सप्तशती पाठ वाचन, सुवासिनी पूजन, कुमारीका पूजन व भोजन व माऴा बांधणे इत्यादी पध्दतीने नवरात्र होते. ललीता पंचमी, महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे), अष्टमीचे होम हवन, सरस्वती आवाहन पूजन असेही धार्मिक विधी महाराष्ट्र व गोवा प्रांतात असतात.
कर्नाटकात दसरा मोठा असतो.
कच्छ – सौराष्ट्र – गुजराथ प्रांतात देवीची प्रतिमा पूजन करुन रात्री जागरण, गरबा तसेच होम हवन वगैरे पध्दतीने हा उत्सव करतात.
प.बंगाल मध्येही हा उत्सव मोठ्या प्रमाणात होतो.
इव्हेंट मँनेजमेंट कंपन्या यात बरीच गडबड करतात – सरमिसळ करतात व नवीनच पध्दत निर्माण करतात. ज्याला कोणताही पाया नसतो, शास्त्रीय आधार नसतो व त्यात देवीची उपासना हा सर्वात महत्त्वाचा व मुख्य भागच नसतो.
प्रत्येक प्रांताचे एक वैशिष्ट असते – परंपरा असतात, त्या जपल्याच पाहिजे. अन्यथा काही वर्षांनी आपली मुले व नातवंडे नवरात्र याचा अर्थ डिजे लावून गरबा दांडिया खेऴणे एवढाच घेतील. मातृशक्तीचा उत्सव हा त्यांना कऴणारच नाही. मी हिंदू आहे म्हणजे माझे आचार, विचार, संस्कृती, माझ्या धार्मिक परंपरा याचा मला एकदा विसर पडला की गळ्यात क्रॉस घाला किंवा सुंता करा काहीच फरक पडणार नाही. माझे धर्मांतर करणे अगदी सहज सोपे व सुलभ होणार. नेमकी हिच नस या इव्हेंट व मार्केटिंग कंपन्यांनी जाणली आहे. यात काहीहि झाले तरी लाभ परधर्मीयांचाच आहे.
एखाद्या गरीब भगिनीला हे “हाय फाय” नवरात्र जमणार नाही. ती देवी पूजन करणार नाही. म्हणजे हऴुहऴु ती नास्तिक होईल. यांच धर्मांतर करण अगदीच सोपे.
श्रीमंती, धर्मशिक्षणाचा अभाव व मौजमजा करायला मिळाल्याने तरुण पिढी या “डिजे व गरबा दांडियाला” नवरात्र समजतील कारण यांनाही नवरात्र म्हणजे देवी उपासना हे माहितीच नाहीय. यांचेही धर्मांतर करणे सोपे जाईल.
थोडक्यात काय तर पराभव हा हिंदूंचाच होईल व याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हिंदू समाजच कारणीभूत आहे.
काही वर्षांपूर्वी “डे “संस्कृती भारतात नव्हती. जेव्हा “गिफ्ट वस्तुंच्या कंपन्या व ग्रिटिंग कार्ड कंपन्या ” आपल्या देशात आल्या तेव्हापासून हे “डे “च खूऴ डोक्यात शिरलय. चॉकलेट डे,वेलेंटाईन डे, रोज डे वगैरे. या दिवसांत करोडोंची उलाढाल या कंपन्या करताहेत. आज अशी अवस्था आहे कि मुलांना गणपती, गोकुळाष्टमी कधी आहे हे सांगाव लागते पण हे “डे ” मात्र ते पक्के लक्षात ठेवतात.
गोकुळाष्टमी ही राजकीय पुढारी मंडळींच्या कृपेने अशीच “डिजे व मद्यमय “झाली आहे. किमान आईचा उत्सव असा होता कामा नये असे वाटतेय.
चंड मुंड, शुंभ निशुंभ, रक्तबीज वगैरे राक्षसांना मारुन त्यांचा उत्पात शमन करुन जगदंबेने जी विश्रांती घेतली त्याचा काऴ हा नवरात्र आहे. या युध्दाचा शिण घालवण्याकरता देवीने नृत्य केले असा उल्लेख पुराणात आहे. (आपण युध्द करतच नाही – केवऴ नाचतो)
या काळात महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती या तिन्ही रुपांतील देवीची सेवा करणे. आपल्या परंपरेनुसार नंदादिप, माऴ बांधणे वगैरे आचार करावेत. मुलांकडुन सरस्वतीची उपासना ही विद्या व बुध्दि करता करुन घ्यावी. धनधान्य सुबत्तेकरता महालक्ष्मी उपासना करावी व शत्रू संहार सामर्थ्यप्राप्ती करता महाकालीची उपासना करावी.
मुलींनी दांडिया खेळण्याकडे अधिक लक्ष न देता विद्या मिऴवुन उत्तम मार्गाने धन जोडणे व छेडछाड करणार्या बदमाशांना चार फटके देण्याचे सामर्थ्य अंगी यावे या करता देवीचे माहात्म्य व पराक्रम वाचावेत तसेच ऐकावेत. आज काऴाची ही गरज आहे. हिरॉईनसारखे नाचण्यापेक्षा महाकाली सारखा, झाशीच्या राणीसारखा, कित्तुरच्या चिन्नमा, जिजाबाईं सारखा पराक्रम दाखवण्याची ही वेऴ आहे व आज गरज त्याचीच आहे. नाचणारे खूप झालेत पण पराक्रमी मात्र कमी होताहेत.
या दांडिया व गरब्याच्या काऴात “संतति नियमनाच्या साधनांची” विक्री दुप्पट होतेय व नंतर शालेय व कॉलेज तरुणींचॆ गर्भपात प्रमाणही वाढतेय. या बाबत काही सेवाभावी संस्थानी सर्व्हे करुन अहवाल सादर केलेत.
लव्ह जिहाद याच काऴात फोफावतो आहे. तेव्हा आपल्या मुला मुलींना या धोक्यांची जाणीव करुन देणे हे कर्तव्य आपले आहे.
तेव्हा या मार्केटिंग व इव्हेंट फंड्यांना बऴी न पडता सात्विकपणे आनंदाने आपल्या परिस्थितीनुरुप जगदंबेची सेवा करा व देवीची कृपा प्राप्त करावी हि विनंती.
वरील माहितीत काही चुकीचे असेल तर क्षमस्व!
— वेदभूषण दिगंबर जोशी,
वेंगुर्ले
9404170656
(वरील लेख लेखकाच्या नावागावा सहित अन्य समुहावर देउ शकता याने तात्विक समाधान लाभेल व चौर्यकर्म पातक लागणार नाहि)
Leave a Reply