नवीन लेखन...

नवरात्र …माळ आठवी

आज सक्काळपासून पाऊस कोसळतोय नुसता … सगळीकडे थंडगार झालंय … बाहेर फक्त पावसाचा आवाज … त्यात हा सुट्टीचा आळसावणारा मूड !
सकाळी मस्तपैकी गरम गरम आल्याचा चहा आणि भजी झालीत .. दुपारीचं ही असंच काहीबाही … आता बसलेय .. निवांत .. आपलं आपल्या मधेच गुंगून जाणं अनुभवायला !
हया कोसळणाऱ्या पावसाला ना नुसतं बघत रहावंस वाटतं .. सगळीकडे धूसर धूसर ! . आणि त्याचा एका लयीतला आवाज ! काहीच करु नये … त्याच्या समोर शांत बसावं .. त्याचं म्हणणं ऐकावं .. मग जणू त्यालाही बरं वाटतं आणि तो द्रुत लयीत बरसायला लागतो …
अशा पावसाळी हवेत कवितेची सोबत मला फार हवीहवीशी वाटते … काचांवर ओघळणारे थेंब पाहिले अन् शांताबाईच्या ओळी आठवल्या ..
“आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे ”

शान्ताबाईंचे शब्द त्या थेंबा थेंबावर कलाकुसर केल्यासारखे … चमकलेही ! वाचताही आले … पुन्हा नव्याने जाणवले अगदी आतपर्यंत …
कसं काय बरं हे असं ? दिसणं आणि जाणवणं हयातली प्रत्येकाची अनुभूती वेगवेगळी का असते ?
तीच सारखी असली तर मनाच्या तारा जुळतात ….
तीच कविता , तेच शब्द .. पण अर्थ का बदलत रहातो . . मागच्या वेळी मी वाचली तेव्हा ती वेगळीच आणि आता ?
हा स्नेह, वंचना कि, काहीच आकळेना
आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे !
काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी
मज फुल हि रुतावे हा दैवयोग आहे …

शब्द काळजात घुसले अक्षरशः ..

नकळत एक खोलवर निश्वास टाकून नजर दुसरीकडे वळवली .. .
गॅलरीत बसल्या बसल्या दूरवर दिसणारा हिरवा डोंगर जरा धूसरच झालाय !
…..

पावसाच पाणी पिऊन हिरव्यागार झालेल्या
डोलणाऱ्या झाडापानाफुलांकडे बघावं … तर त्यांच पावसाचं आनंदी गाणं मनात फेर धरु लागतं …

पावसाच्या धारा येती झरझरा
झांकळलें नभ, वाहे
सोंसाट्याचा वारा
रस्त्याने ओहोळ जाती खळखळ
जागजागीं खाचांमध्ये तुडुंबले
जळ
ढगावर वीज झळके सतेज
नर्तकीच आली गमे लेवुनिया
साज
झोंबे अंगा वारे काया थरथरे
घरट्यांत घुसूनिया बसली
पाखरें …

चक्क शाळेच्या दिवसात मन जातं सुद्धा ! मराठीच्या तासाला सगळ्यांबरोबर एका सुरात आणि सुंदर चालीत कविता म्हणणारी मीच मला दिसू लागते .
मग पुन्हा एकटीच त्याच चालीत मी ही पूर्ण कविता म्हणून घेते . आणि उगाचच खुप खुष होते .
मला आठवतं .. लहानपणी .. दूरदर्शनवर शांताबाईंचा रानजाई कार्यक्रम लागत असे … लोकसाहित्यावर आधारित हया कार्यक्रमात निसर्गाच्या सान्निध्यात रंगलेला कविता , गाण्यांचा सोहळा अजून आठवतो . त्यांनी गप्पा मारता मारता म्हटलेल्या कविता , गाणी बघणं म्हणजे पर्वणीच असायची तेव्हा …
घरी नुकताच आणलेला टीव्ही आणि त्यात हा सुंदर कार्यक्रम मग काय ! मी ,आई आणि आजी अशा तिन पिढया टीव्ही समोर बसून अगदी मन लावून हा प्रोग्राम बघायचो . गम्मत म्हणजे आम्हा तिघींनाही हा कार्यक्रम फार आवडे .
स्त्री भावना सुंदर , तरल पणे मांडणाऱ्या शांताबाईंच्या भावस्पर्शी कविता तेव्हापासूनच आवडायला लागल्या ….हृदयाशी जवळ असलेल्या शांताबाईच्या कविता ..प्रेम ,निसर्ग ,उत्साह ,भक्ती विरह ,व्याकूळता … सगळे रंग लेवून येणाऱ्या !
स्त्री हदयातल्या भावभावनांचा साक्षात्कार तेव्हापासूनच अचंबित करू लागला होता … जीवनात निरागस बाल्य .. कौमार्य ( काय उपमा द्यावी बरं या अवस्थेला ) ..आणि सळसळतं यौवन ह्या एकेक पायऱ्या आहेत म्हणून बरंय … असं एकदम स्त्री होणं सोप्प नसतं बरं ! आपण मोठं झाल्यावर हे सगळ आपल्याला कसं झेपणार असा माझ्या बालमनाला कधी कधी प्रश्न पडे .

त्यांची पैठणी कविता कित्येकदा वाचली असेन मी …! वाचून वाचून माझी किती लाडकी झाली ही कविता ?
फडताळात एक गाठोडे आहे
त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे
कुंच्या टोपडी शेले शाली
त्यातच आहे घडी करुन
जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर जरी चौकडी …

प्रत्येक वेळी वाचतांना आजीचं नवं रुप आणि लहानपणीच्या वेगवेगळ्या आठवणी बरोबर आणल्या ह्या कवितेनं .. केवढी कमाल !
….

शांत , समंजस आणि एकाकी मन … त्यात खळबळणाऱ्या भावनांचे इतके सुंदर शब्दचित्रण.. शब्द शब्द लेवून येतो बरोब्बर त्याच भावना आणि आपणही तशीच्या तशी अनुभूती घेऊ शकतो . …

गाढ स्नेह असला तरी
कधी येतात असेही क्षण,
दोघांच्याही मनामध्ये
दाटून येते एकटेपण
व्यक्तित्वाचा सुंदर मुखवटा
त्याच्यामागे विराट पोकळी
गर्द राने, एकाकी वारा
चांदण्यात न्हालेली तळी…

आपल्या कितीही जवळची व्यक्ती असो
पण कधीतरी नात्यामधे असे क्षणही येतात ! ते सूक्ष्मपणे तसेच्या तसे शब्दात बांधणे हे प्रतिभावंत मनाचेच काम !
अनुभवलेले मांडतांना काहीतरी सुटतेच नेहमी … मग ती हुरहुर लागून रहाते .. काही निसटत जातं तर काही गवसत जातं … जे मिळत जातं ते शब्दातून साकार होतांना मन मात्र रुणझुणतं आणि गुणगुणतं काहीसं असं ..

फिरत अंगुली वीणेवरती
मौनातुनी संवाद उमलती
स्वरास्वरांवर लहरत जाती भावफुले सुकुमार
जे शब्दांच्या अतीत उरते
स्वरांतुनी या ते पाझरते
एक अनामिक अर्थ घेतसे स्वरांतुनी आकार
आज मी आळविते केदार!
….

माणसाचं मन आणि निसर्ग किती एकसारखे ! एकमेकांचे प्रतिबिंब एकमेकांमधे पडलेले असते का ?

भग्न शिवालय परिसर निर्जन
पळस तरुंचे दाट पुढे बन
तरुवेली करतील गर्द झुला
जाईन विचारीत रान फुला
भेटेल तिथे ग सजण मला !

ह्या ओळी म्हणजे मला एखादं ठिकाण न वाटता मनाच्या वेगवेगळ्या अवस्था वाटतात …
विरक्त , उदास ,एकाकी झालेल्या मनामधे कधी कधी हिरवाईतली यौवनजाणीव जागी होते तर कधी लालबुंद पळस फुलतो …. अगदी दाट भरगच्च !मनभर आनंद लहरी !इतक्या की मन वेलींसारखे झुलु लागते आनंद हिंदोळ्यावर …. रानफुलासारखी फुलचं फुलं उमलतात वाटांवर … फुलांची पखरण असलेल्या त्या वाटेवर मनातला साजण , प्रियकर भेटणारच असतो … हा साजण म्हणजे प्रेम ? मुक्ती ?की शांतता ? की अजून काही ?
….

आयुष्य जगतांना , निरनिराळ्या प्रसंगाना सामोरं जातांना ह्या मनाला कधी कधी अगम्य प्रश्नही पडत रहातात …
फक्त शांताबाईच त्या प्रश्नांची कविता करू शकल्या …

कोणत्या असतात
फुलांच्या जन्मवेळा ?

कळ्या फुलताना …
कि पाकळ्या गळताना ?

अथांग निळाई
प्राण एकवटून बघताना ,
कि निमूटपणे …

खालच्या मातीत ..
मिसळताना ?

ते फुल म्हणजे आपलं मनच! हे आता हळूहळू कळू लागलेय … फुल नेमकं फुलतं कधी ?त्या फुलाच्या रूपकातून ती एक तर मनाची अवस्था वाटत रहाते … जसं शरीर एकदाच जन्मतं तसं मनाचं नसतं … ते अनेकदा जन्माला येतं … अनेकदा मरतं ही !

ह्याच ओळी आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिल्या तर … मानवी जीवनातील उत्पत्ती , स्थिती आणि लय या तीन अपरिहार्य अवस्था त्यात कुठेतरी जाणवतात …
अजून काही वेगळा अर्थ ही लागू शकतो .

कवितेच्या राज्यात पाऊल टाकलं रे टाकलं की कित्ती पायवाटांनी खुणवावं ?
शांताबाईंचे शब्द आपले बोट धरतात आणि
शब्द , अर्थ ,नाद ,जाणिवा , या सर्वांबरोबर झालेल्या मनाच्या अद्वैताला अनुभवात …. एक एक पाऊल पुढे टाकत
आपल्याला घेऊन जातात …

विजनामधले पडके देऊळ
ओशट ओला तो गाभारा
काळोखातील शिवलिंगावर
अभिषेकाची अखंड धारा

विजनवासातले पडके देऊळ म्हणजे शरीराचं म्हातारपणं का ?… विजनवास म्हणजे मनाची विरक्त अवस्था बहुतेक ….. पण पूर्ण विरक्त नाही मन … मनाच्या गाभाऱ्यात थोडा ओशटपणा ,ओल ,
आसक्ती शिल्लक आहेच अजून … नजरेला दिसतोय पुढचा काळोख … अंताकडे चाललेला हा प्रवास … उत्पत्तीच्या पाहिल्या अवस्थेकडून सुरू झालेला प्रवास … जवळ जवळ संपायला आलेली स्थिती …. आणि आता काळोखात दिसणारं शिवलिंग म्हणजे लय ! ह्या सर्व अवस्था माहित झाल्यात … आता मन पूर्णपणे रिक्त होऊन जायला हवंय म्हणजे जाता जाता सर्व गुंत्यातून मुक्त होतांना डोळ्यातून वाहणारं पाणी अभिषेकाच्या शुद्ध जलासारखं होईल …..

असा असावा का अर्थ ? की अजून काही वेगळा ?
या ओळींचा अर्थ लागेपर्यंत चाचपडायला होईल पण शोधावा लागेलच …
कवितेच्या साथीनं होणारा प्रवास आपल्याला आवडतोय खरा !
आज दिवसभर कोसळलाय पाऊस …आभाळातून , आठवणीतून .. पण एक खरंय … तो कविता वाचण्याचा मूड सदैव घेऊन येतो आपल्या बरोबर !

कवितेचं पुस्तक चिंब भिजलंय .. पुस्तकाच्या पानांवर ओलसर नक्षी उमटून गेलाय हा पाऊस ! …

…..

संध्याकाळचे पाच वाजून गेलेत … पाऊस थांबल्यासारखा !
पण आभाळ अजून भरलेलेच !

……

©️®️ दिपाली भावसार -ज्ञानमोठे

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..