पहाटे जाग आली की कधी कधी दिवसाची सुंदर सुरवात होते तुमच्या देखण्या , दैवी सुरांच्या सोबतीने !
आणि मग आपण जे प्रत्येक काम करतोय त्यात आनंद वाटू लागतो …. तुमच्या शाश्वत सुरांचे बोट धरून मन लांबवर डोंगरदऱ्यात खळाळणाऱ्या झऱ्याकाठी फिरूनही येतं .. ताजंतवानं होतं .!
पंचमहाभूतांवर विजय मिळवू शकणारी ही अद्भूत कला अवगत करण्यासाठी लहानपणापासूनच तुमची खडतर तपश्चर्या सुरू झाली … शब्दाशब्दांच्या गाभ्यापर्यंत तुमच्या सुराचा जादुई स्पर्श पोहोचला आणि ते शब्द मग सुरांची आभा लेवून आले … तेजल ,तेजस्वी प्रभेने निथळत … सारा आसमंत भारून टाकायला … सदैव … काळाच्या अंतापर्यंत !
जयपूर घराण्याची गायकी शिकतां शिकता तुमचं स्वःताच शास्त्रीय गायनाचं कौशल्य तुम्ही विकसित करत गेलात तुमच्या अंतस्फुर्तीच्या जोरावर .. साक्षात मोगुबाई आई म्हणून लाभणं आणि पाहिला गुरु म्हणून लाभणं हे तुमचं अहो भाग्य किशोरी ताई !
गुरु म्हणून कडक शिस्तीत वाढवतांना तुमचं सुरांचं विश्व अजून समृध्द ,व्यापक व्हावं यासाठी वेगवेगळ्या गुरूंकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण देण्याची तजवीज मोगूबाईनी केली …. आणि सुरांची दैवी शक्ती तुमच्यात सकारात्मक उर्जेच्या रूपाने वास करू लागली …त्यातुनच निर्माण झाल्या खास तुमच्या शैलीतल्या ठुमऱ्या , गजल , भजन …
जेव्हा तुम्ही म्हणता …
अवघा रंग एक झाला ।
रंगि रंगला श्रीरंग ॥१॥
मी तूंपण गेले वायां ।
पाहतां पंढरीच्या राया ॥२॥
नाही भेदाचें तें काम ।
पळोनि गेले क्रोध काम ॥३॥
देही असोनि विदेही ।
सदा समाधिस्त पाही ॥४॥
पाहते पाहणें गेले दूरी ।
म्हणे चोखियाची महारी ॥५॥
तेव्हा अभंगातले शब्द केवळ शब्द उरत नाही … त्यांना परीसस्पर्श होतो ! मन भक्तीरसात न्हाऊन निघतं .्कृतकृत्य होतं … सगळे विचार ,विकार लोप पावून ते निर्मम निखळ होत जातं ! फक्त स्वरमंडल आनंदाने फेर धरतात मनात ..
कैकदा ध्यानधारणेने किंवा योगाभ्यास करतांनाही इतकं मन शांत आणि स्वस्थ होत नाही … ती जादू तुमच्या स्वरात आहे किशोरी ताई !
कधी … मन आनंद जगयो रे
मन आनंद तन आनंद
आनंद आनंद उमगत रे …
म्हणत तुम्ही आनंदाच्या लहरी आमच्या तन मनात निर्माण करत जाता … सुरांशी खेळत आनंद , दुःख , विरह , उदासी … सगळ्या भावभावनाची अनुभूती नव्यानं करून देता ..
कधी पाऊस पडतांना … गौड मल्हार रागातलं
बरखा बैरी भयो सजनीया
जाने न दे मोहे पी की नगरीया ..
ऐकावं आणि या सुंदर पण वैरीण झालेल्या वर्षाऋतू वर आपणही किती रुसावं !
आणि गौड सारंगातलं
कजरारे गोरी तोरे नैना
पियु पलन लागी मोरी अखियाँ
पिया बिन मोरा जीया घबराये ..
ऐकतांना आपणही विरह व्याकूळ व्हावं !
एखादया हुरहुर लावणाऱ्या संध्याकाळी
*मेहा झर झर बरसत रे*
ऐकायला घ्यावं अन् ‘मेहा ‘ ला लागलेला आर्त सूर आपल्या हृदयात झिरपून डोळ्यातून कधी वाहू लागवा ते समजू नये …
कधी …सजनीयाँ बलमा बैरी भयो ऐकतांना
त्यातल्या हळूवारपणे पेश केलेल्या सुरांच्या कलाकुसरीनं अभिसारिकेची व्यथा , तिचं रुसणं हृदयाचा ठोका चुकवत जातं .. आणि
तुमच्या सुरांच्या साथीनं अजून एक संध्याकाळ सोनेरी किरणांत निथळून बावनकशी सोन्यासारखी लखलखते … अन् माझे डोळे दिपतात !
मग मिटल्या डोळ्यांनी मी जागेपणी एक स्वप्न रंगवते …
मनाचा शुभ्र संगमरवरी देव्हारा अन् त्यात तुमची सरस्वती रूपातली धवल मुर्ती …. केशरी देठाच्या शुभ्र पाकळ्यांची ओंजळभर … देखणी प्राजक्तफुलं तुमच्या चरणी अर्पावी … सुगंधी धुप , दिपांच्या साथीनं तुमची पुजा करावी … तुमच्या दैवी स्वरांचा माझ्या मनाच्या गाभाऱ्यात घुमणारा नादमय आवर्त … सुर आणि शब्द यांच अद्वैत …या कुडीनं अनुभवावं ..
आणि शांतपणे नतमस्तक व्हावं
©️®️ दिपाली भावसार -ज्ञानमोठे
Leave a Reply