माझा जन्माच्या वेळी …आपल्या मुलाला दुसरी पण मुलगीच झाली म्हणून रुसलेल्या यमुना आजीचा राग ,रुसवा .. तिच्या जवळ राहिल्यानंतर हळूहळू विरघळत गेला … आणि नंतर तिचं खूप प्रेम वाटयाला आलं …मी तिच्याबरोबर राहिले अन् तिला माझा लळाच लागला …
बुरहानपूरच्या मोठया घरात आजीबरोबर घालवलेला काळ माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ …आम्हा नातवंडांचं बालपण अतिशय सुंदर सांभाळलं ,जपलं यमू आजीनं !
आमच्या यमूआजीचा दिवस अगदी भल्या पहाटे सुरु होई .. त्यात घर छान सारवणं , लाकडं एकसारखी फोडून चुल पेटवणं .. मग त्यावर चहापाणी , भाजी ,भाकऱ्या उरकणं .. विहीरीच पाणी काढणं , एकीकडे बंब पेटवून सगळ्यांच्या अंघोळीच्या पाण्याचं बघणं .(तेव्हा आमच्या घरातच मागच्याच बाजूला मोठया न्हाणीघराजवळच असलेल्या विहीरीच्या पाण्यात सगळ काम चाले ). …
मग तिची साग्रसंगीत पुजा चाले ..
सगळ्या देवांना घासून पुसुन लख्ख करून लाल वस्त्र अंथरून त्याच्यावर देव्हाऱ्यात ठेवणं ..निरांजन …उदबत्ती .. नैवेदयाला छोटया वाटीत साखर .. . नंतर तुळशीला पाणी ..
एका हातात पाण्याने भरलेला तांब्या, एका हातात हळदीकुंकवाची कुयरी अश्या सर्व जाम्यानिम्यासहीत ती पहिल्या मजल्यावरच्या मागच्या गॅलरीत जात असे . अंघोळीनंतर स्वःतच धुतलेलं आपलं लुगडं झटकून झुटकून तिथे वाळत टाकी मग .. तोंडाने श्लोक म्हणत तिथे तुळशीला मोठया प्रेमाने पाणी घालून हळदीकुंकू लावित असे. सुर्यालाही नमस्कार करत असे .
त्यानंतर न्याहारीची तयारी करणं ..सुनांच्या जोडीनं तीही तेवढयाच उत्साहानं सगळ पाहात असे … उरलेल्या भाकरीचा चविष्ट मीठकाला , बिबडया( ज्वारीचे पापड ) भाजून देणं ..
लोणचं पोळी , कधी गरम पोळ्या आणि गुळाचा चहा असं काहीतरी साधंसच न्याहारीत असे … कधी तिच्या हातच्या सांजोऱ्या ( गुळाच्या करंज्या ) ही !
आपल्या मुला नातवंडांनी खाल्ल्यावर मगच ती तोंडात घास घेत असे .
दुपारच्या जेवणात तिच्या हातची शेपू- पालकाची दाण्याचं वाटण लावून केलेली मिक्स भाजी , दशम्या चटणी , डाळमेथ्या , पापडाचा खुडा , फुणकं- आमटी , मुगाच्या सांडग्यांची भाजी , शेंगदाणे बटाटे घालून केलेली फोडणीची खिचडी , बाफले .. तिच्या हातची पाटयावर वाटलेली शेंगदाण्याची ओली चटणी तर सगळ्यांना आवडत असे .
सणासुदीला तिने केलेली शेवयांची खीर , तळलेल्या पापड कुरडया यांची चव जीभेवर अजून रेंगाळतेय .. चुलीवर केलेल्या या स्वयंपाकाची आणि मुख्य म्हणजे तिच्या हातची चव अफलातून असे . सगळे जण जेवणावर चांगला ताव मारत असत .
उन्हाळ्याच्या दिवसात ती बाजारात जाऊन कलिंगड , डांगर ,छोटे छोटे आंबे आणून टोपलीत ठेऊन देई मग आम्ही जाता येता त्या आंब्यांचा फडशा पाडत असू … आणि दुपारचं जेवण झाल्यावर बाकीची फळं कापून खात मोठी मंडळी गप्पा मारत असत … कधी कधी तिखट जेवणानंतर
विड्याचं पान खाण्याचा प्रोग्रॅम चाले ..मग आम्हालाही एक एक छोटं पान ती करून देत असे.. ते खाल्यावर एकमेकांना जीभा दाखवत आपलं तोंड किती रंगलय याचा खेळ चाले . …
दुपारभर वरच्या मजल्यावर टांगलेल्या बंगळीवर मोठे मोठे झोके घेणे …जोर जोरात गाणी म्हणणे …. जिन्यावरून धडाधड उडया मारत खाली वर पळणे आणि दिवसभर घरात खेळत रहाणे … मस्त मस्त खात रहाणे हा आम्हा नातवंडांचा सुट्टीतला कार्यक्रम ती मन लावून आनंदाने पार पाडत असे … आम्हाला कुणीही ओरडलेलं तिला खपत नसे … आमच्या आनंदात तिचा सगळा आनंद सामावलेला होता .
कधी कधी संध्याकाळी आम्हा नातवंडांना ती दत्त मंदीरात घेऊन जात असे .अजूनही तो रस्ता मला जसाच्या तसा आठवतो .
त्या रस्त्याला लागून गाई म्हशींचे मोठे मोठे गोठे . .. छोटीशी सुबक सारवलेली घरं होती ..आजीचा हात धरून ते बघत बघत आम्ही देवळात जात असू .. देवळाजवळ मोठ वडाचं झाडं …त्याला खूप पारंब्या !देवळाजवळच दुसऱ्या बाजूला असलेल्या आंब्याच्या झाडाला बांधलेल्या पारावर आम्ही बसत असू … देवळात संध्याकाळची आरती झाली की कधी कधी भजनाचा कार्यक्रम असे . मग आम्ही आजीबरोबर तिथे बसत असू
ती स्वतःही भजनं खूप छान म्हणत असे ..
श्रावणात दर सोमवारी ,गुरुवारी , शुक्रवारी तिच्या मैत्रिणी आमच्या घराच्या मोठ्या ओट्यावर जमत मग सगळ्या मिळून छान भजनं म्हणत असत ..
आमची कुलदेवी रेणूका !
तिला कधीही गाणं म्हणायला सांगितलं की तिचं
ठरलेलं गाणं एकच .. रेणूकेचं भजन! सुंदर चाल लावून ती ते म्हणत असे
माहूर गडावरी ग गडावरी तुझा वास
भक्त येतील दर्शनास …
…..
मला आठवतं … आजीचं सगळं काम आवरुन झालं की ती थोडी निवांत होई आणि मग कधी कधी आमच्या बरोबर बंगळीवर टेकत असे … तिला आपले लहानपण आठवत असेल का तेव्हा ? डोळे मिटून शांतपणे हळूहळू झोके घेणारी आजी मला तेव्हा एखादया लहान मुली सारखी वाटत असे …. तिच्या मनात त्यावेळी छोटी यमू पिंगा घालत असावी …
सहा बहिणींमधली आमची यमू आजी तिच्या आईची तिसऱ्या नंबरची मुलगी .. नवव्याच वर्षी तिचं लग्न झालं आणि ती सासरी बुरहानपूरला आली ..
तिचं लहानपण फार लवकर संपलं ..म्हणून ती आमचे सगळ्यांचे खूप खूप लाड करी… तिला शक्य असेल ते सर्व काही न बोलता करत राही . आजोबा गेल्यानंतर ती खूपशी अबोल झाली .फक्त आम्हा नातवंडांमध्ये, आणि देवपुजेतच खूप वेळ रमायची …. काही काही करुन आम्हाला खाऊ घालायची..थोडं शिकली असल्यामुळे कधी कधी पुस्तकं वाचायची …. लेकी माहेरपणाला आल्या की त्यांच्याशी सुखदुःखाच्या चार गोष्टी करायची… कुणाकडून कुठलीही अपेक्षा न करता आला दिवस चांगल्या पद्धतीने घालवावा असा तिचा जीवनाविषयीचा दृष्टीकोन!
…
लग्नानंतर आजीचा सहवास मिळेनासा झाला . कधी नाशिकला काकांकडे जाणं झालं की आजी भेटत असे . .. तेव्हा आमचं खूप बोलणं होई … माझ्या वाढत्या व्यापामुळे हळूहळू तिला भेटणं ही कमी होत गेलं ..
मी जेव्हा शेवटी शेवटी तिला भेटायला गेले
तेव्हा आजारानं ती खूप कृश झाली होती थकली होती … हळूहळू तिला विस्मरण ही फार होऊ लागले होते …
काकांकडे तिला भेटायला गेले तेव्हा इतकी बारीक आणि खंगलेली आजी बघून माझ्या डोळ्यात पाणीच आले . .. तिचा हात हातात घेऊन मी तिला हाक मारली .. तिला चाहूल लागली असावी तिने हलकेच डोळे उघडले पण त्या डोळ्यात ओळख दिसलीच नाही मला … आजारपणामुळे माझ्या लाडक्या यमू आजीने मला … तिच्या लाडक्या नातीला ओळखलंच नाही .. खूप वाईट वाटलं तिच्या या अवस्थेचं . त्यानंतर थोडेच दिवसात ती गेली … माझी आणि तिची ती शेवटचीच भेट ..
आयुष्यभर भरभरून प्रेम देणाऱ्या माझ्या यमू आजीनं माझा असा निरोप घेणं मला अपेक्षितच नव्हतं … फार वाईट वाटलं .. एकदम पोरकं झाल्या सारखं वाटलं !
डोळ्यासमोरून तिच्या बरोबर घालवलेले दिवस आठवले .. तिचा प्रेमळ स्पर्श आठवत राहिला …
….
किती काळ निघून गेलाय मधे …. आता यमूआजी आठवणीमधेच उरलीये एखादया सुंदर मोरपिसासारखी ….
कधी कधी निवांत वेळी आयुष्याचं पुस्तक चाळायलां घ्यावं .. आणि त्यातलं एखादं मागचं पान उघडावं.. अवचित बालपणाचं ‘ते’ पान सामोरं यावं …. तिथे ओळखीचं हे मोरपिस सापडावं …. आणि मन आनंदाने भरून यावं…. डोळ्यातून आसवं दाटावी …. आणि मनाच्या खोल गाभाऱ्यात साठवलेल्या , जपलेल्या माझ्या यमू आजीच्या ह्या सुंदर आठवणी दिवसभर मनात पिंगा घालत रहाव्यात … मला सोबत करत …
©️®️ दिपाली भावसार -ज्ञानमोठे
Leave a Reply