तसं बघायला गेलं तर तिचा माझा काहीच संबंध नाही दूर दूरपर्यंत .. पण तरीही माझ्या मनाचा एक कोपरा तिने व्यापलाच आहे .
तिच्या माझ्यात जवळ जवळ एका पिढीचे अंतर ..
ती कुणा दुसऱ्या देशातली , दुसऱ्या धर्माची , वेगळ्या संस्कारात …वेगळ्या चालीरीतीत वाढलेली .. ..
रितीरिवाज , परंपरांच्या बेडया , पिढयानपिढया चालत आलेले संस्कार .. सगळ्या सगळ्याची बंधन तोडून आपल्या लेखनाच्या माध्यमातून खुल्या आसमंतात श्वास घेण्याची .. मुक्त विहरण्याची
जबरदस्त किंमत चुकवणारी … आपल्या मायभूमीला पारखं होऊन दुसऱ्या देशात आश्रयाला जाऊन रहाणं तिच्या प्राक्तनात लिहीलंय ….
जिथं ती जन्मली ,वाढली ,लहानपणीचे निरागस सुंदर क्षण जगली त्या गावात , त्या नदीकिनारी , त्या शेतांमधे , त्या माणसांमधे ती परत जाऊ शकणार नाही इतकी व्यवस्था करून ठेवलये तिच्या आपल्या देशातल्या माणसांनी …. मातृभूमीपासून दुरावली ती .. तिच्या लेखनातून व्यक्त होण्याच्या बंडखोरीला ही शिक्षा ? तिच्या सच्च्या , वर्मावर बोट ठेवणाऱ्या शब्दांनी घायाळ झालेले तिला फासावर लटकवायला टपलेत …
तसं बघायला गेलं तर तिचं माझं सगळच भिन्न , काही म्हणजे काही जुळणारं नाही अगदी काही बाबतीत विचारही … पण शब्दांतून व्यक्त होण्याची तिची पद्धत … तिचं आपल्या विचारांवर ठाम रहाणं .. लिहीतांना एक एक शब्द फक्त तिचाच .. तिच्या मालकीचा .. तिचा दास … जस वाटेल अगदी तसंच व्यक्त होणं …. पारदर्शी ! हेच कुठेतरी मला फार भावतं … मनानं तिच्या जवळ नेऊन पोहोचवतं …
कुठ्ला खोटेपणा नाही की लपवाछपव नाही … दांभिकता नाही … मनात येणाऱ्या नैसर्गिक भावभावनांना जाणून त्या लिहून व्यक्त करणे म्हणजे त्यांना योग्य न्याय मिळणे … अभिव्यक्त स्वातंत्र्य तिने स्वःताचं स्वःताच पुरेपुर मिळवलंय …. मी आहे ही अशी आहे … माझे विचार असे आहेत माणि मी ते मांडत रहाणार … तुम्हाला आवडो वा ना आवडो …
तिच्या लेखनाचा झंझावात माझ्या विचारांची बैठक कधी कधी मुळापासुन हादरवून टाकतो … गदागदा हलवतो …. सोशिकतेच्या
सीमांविषयी पुन्हा पुन्हा विचार करायला भाग पाडतो .. माझ्या पासून शेकडो मैल लांब कुठेतरी असलेली ती पार कब्जा घेते माझ्या मनाचा … झिम्मा घालत रहाते माझ्या मनाच्या अंगणात … मला थोडीशी चिडवत … मी मात्र तटस्थ रहाण्याचा प्रयत्न करत रहाते ..
तसलिमा अग .. मी आखून घेतलेल्या सीमारेषांच्या अलिकडे खुष ( ? ) राहून जगत (? )होते की चांगली .. सुरक्षित … अगदी सेफ … सरळ रेषेत चालणार आयुष्य ..
भावनिक उलथापालथींच्या जास्त भानगडीत न पडण्याचा माझ्या स्वभावाविरुद्ध ,तत्वांच्या चौकटीत न बसणारं असं काही तुझं वाचतांना मी आधी थबकलेच …. पण मग … ते न पटण्याआधी मी आपल्या दृष्टीकोनाचा कोन बदलून आधीचा परफेक्ट 90 अंशाचा साधासमंजस काटकोन जरा 360 अंशाचा होईपर्यंत विस्तारला … म्हणजे विस्तारायला तू भाग पाडलंस …
त्या विस्तारलेल्या दृष्टीकोनाच्या लांबवर पसरलेल्या माळरानावर ,डोंगरदऱ्यांमधे , झऱ्याकाठी मनसोक्त हिंडले तुझा हात धरून …
अस करावंसं वाटलंच शेवटी …
वाटलं …शब्दांना फुलु दयाव माळरानावरच्या wild फुलांसारखं आपोआप …
कुठल्याही रंगाने , गंधाने …
माजलेल्या गवतावर उठून चोहीकडून दिसेल असं एक सुंदर शब्दफुल
हे एक शब्दफुल
उमललं , फुललं ना की मग …
मग त्यामागून उमलतीलच असंख्य फुलं …
फुलंच फुलं …
मग आंजारून गोंजारून …
तीच माळून घ्यावीत केसात दिमाखात …
माझ्या सरळसोट साध्या जगण्याच्या कल्पनांच्या सीमारेषेपलिकडे तुझ्या स्वप्नांची दुनिया सुरू होते …
तुझे शब्द न् शब्द तिथे एखादया कुशल कारागिराने विणलेल्या गालिचासारखे अंथरलेले …. !
तू दूर भिरकावलेत कसे ग वाटेवरचे काटे ? आणि फक्त फुल निवडून अंथरलीस स्वःताच्या वाटेवर … काट्याना स्थानच नाही तुझ्या वाटेवर ! कारण तू मानलंसच नाही स्वताला दुय्यम कधी … स्त्री असण्याचा सार्थ अभिमान बाळगलास …
माझ्या काटयाकुटयातून घाबरत संभाळत होणाऱ्या प्रवासात मात्र तुझ्या कविता , कथा एकदाच ओढत घेवून आल्या मला त्या मोकळ्या माळरानात … विशाल आकाशाखाली आणि खुशाल ढकलून उभं केल त्यांनी मला एका निसरडया कठीण कातळावर …. जिथून .. तू तर कैकदा घसरलीस ,चढलीस , चढतांना पडलीस .. !रक्तबंबाळ ही झालीस पण बिनधास्त हा खेळ खेळत राहिलीस …. शब्दांचा हा खेळ खेळतांना मन नावाची काहीशी नाजूक वस्तू खुशाल भिरकावून दिलीस दऱ्याखोऱ्यांच्या अफाट जंगलात … आणि मोकळी झालीस सगळ्या पाशातून ! मला जमेल का हे ?
तुझं स्पष्ट , बिनधास्त लिखाण … कधी प्रस्थापिताविरुद्ध बंड उभारणारे जळजळीत शब्द ..कधी कोमल …कधी तापट ….कधी गोड , कधी शृंगारानं रंगलेले … कधी केविलवाणे ,हळवे दुःखी …कधी अगतिक !
तुझी लेखणी चुरुचुरू बोलतेय ना मग ती कशी तोडून मोडून टाकायची ? नेस्तनाबूत करायची ?
मग तुझ्यावर झाले शारिरीक हल्ले … समाजातल्या सो कॉल्ड चांगल्या लोकांना पुन्हा पुन्हा तुझी कविता , कथांच्या वास्तवाच्या जळजळीत निखाऱ्यानं पोळत होती …. तुझ्या परीनं तू दिलेलं उत्तर ! तुझ्या खच्चीकरणाचा प्रयत्न करतांना अजूनच वाढलेलं तुझं असामान्य धैर्य .. उगारलेल्या प्रत्येक तलवारीच्या धारेला बोथट करत आलीय तुझ्या लेखणीची धार …
तुझे शब्द कधी कधी मिटल्या डोळ्यासमोरही येत रहातात .. चिंतन करायला भाग पाडतात … भौगोलिक सीमा ओलांडून एका समान धाग्यानं कुठंतरी मी तुला स्वतःशी बांधून घेते …. फार जवळची वाटू लागतेस तू मला ….
आपल्या लेखणीवर असणारा तुझा अपरंपार विश्वास म्हणजे तुझ्या स्त्रीत्वाचा तूच केलेला सन्मान …. तो मला तितकाच माझाही वाटतो ग नासरीन !
©️®️ दिपाली भावसार -ज्ञानमोठे
Leave a Reply