12 जुलै 2004 (सोमवार)
सकाळी साडेचार वाजताच जाग आली. दोन-तीन कारणे असतील, एक तर छान हवा, शांतता आणि लवकर उजाडणे. तिथे दहा वाजेपर्यंत व्यवस्थित उजेड असतो आणि पहाटे साडेचारला वगैरे उजाडते. तरी सहा वाजेपर्यंत मी झोपले. शेवटी सहाला उठले, खिडकीचे पडदे बाजूला केले आणि माझ्या खिडकी समोरच एका चर्चचा उंच सुळका हवेत घुसलेला दिसला. लगेच मी फोटो काढला. स्वतःच आवरून सव्वा आठ वाजता घरून आणलेला खाऊ काढून खाल्ला. आता कुठे जरा डोके चालायला लागले. फ्रीज उघडून पाहिल. त्यात मिल्क कोन मिळाले. मस्त गरम कॉफी करून घेतली आणि परेशची वाट बघत बसले. परेश साडेआठ वाजता मला घ्यायला येणार होता. तर तो सव्वा नऊ वाजता पोहोचला. कारण काय तर ट्रेनचा गोंधळ होता. मला गम्मत वाटली. इथेही ट्रेनचे गोंधळ होतात वाटते मुंबईसारखे!
मग आम्ही दोघे हॉटेलमधून बाहेर पडलो. काल येताना आम्ही डाव्या बाजूने आलो होतो. आता आम्हाला उजव्या बाजूने बाहेर पडायचे होते.
पॅडिंग्टन स्टेशन डाव्या हाताला पाच मिनिटावर होते तर लॅंकेस्टर गेट हे स्टेशन आमच्या उजव्या हाताला पाच मिनिटात होते. मला आत्तापर्यंत ठाणे- मुलुंड हे सगळ्यात कमी डिस्टन्स वाटत होते. हे तर त्याच्याहीपेक्षा कमी निघाले.
इकडे तिकडे इकडे तिकडे बघत मी चालले होते. हवा ही सुंदर होती, त्यामुळे चालायला काही वाटत नव्हते. सकाळची ऑफिसची वर्दळ जाणवत होती. ब्रिटिश माणसे पटापट चालत होती. सगळं काही सिग्नलच्या इशाऱ्यावर चालत होतं. ग्रीन सिग्नल झाल्यावरच रस्ता क्रॉस करत होती आणि गाड्या सुद्धा माणसे असो वा नसो, जर का ग्रीन सिग्नल फोर वॉकिंग ऑन असेल तर क्रॉस करत नव्हत्या. प्रचंड शिस्त पाळली जात होती. कधी कुठून बॉबी झडप घालेल आणि फाईन करेल या भीतीपोटी कदाचित नियम पाळले जात होते किंवा त्यांच्या नसानसामध्ये ही शिस्त भिनली होती.
थोडसं चालले थोडसं चालल्यावर आम्ही लॅंकेस्टर गेट या स्टेशनला पोहोचलो. आता इथून पुढे माझ्या ऑफिससाठी मला याच ट्यूब स्टेशनहुन ट्रेन पकडायची होती. इथली ट्रेन सिस्टीम आणि टिकीट सिस्टीम परेशने व्यवस्थित समजावून सांगितली. इथे झोन वाइज तिकिटे मागायची असतात. स्टेशनचे नाव किंवा लाईनच्या नावाने तिकिटे मिळत नाहीत. आपल्यासारख्या तिथेही वेगवेगळ्या लाइन्स आहेत. आम्ही होतो आत्ता ती सेंट्रल लाईन. माझं ऑफिस ग्रीन पार्क ला होते. ते जुबिली लाईन वर येते असं मला परेशने सांगितले.
लंडन शहराचे सहा झोन्स् मध्ये वर्गीकरण केले होते. झोन 1, जिथे मी आत्ता रहात होते. झोन 1 हे लंडनच्या प्राईम लोकेशन मध्ये येते. हा सेंटर धरला तर झोन 2 पासून झोन 6 पर्यंत वर्तुळाकार आकारात झोन पसरत होते. बहुतेक पर्यटन स्थळे ही झोन 1 मध्येच होती. झोन 4,5,6 हा रेसिडेंशियल एरिया होता.
आता मला माझ्या ऑफिस साठी तिकीट काढायचे होते परेशने तिकीट सिस्टीम समजावून सांगितली इथे तिकिटाचे अनेक प्रकार आहेत.
Zone 1 day pass – any time any where within zone 1 to-fro journey
Zone 1 single ticket – you can travel only once with this ticket with no return journey
Zone 1 Return ticket – you can travel only once with this ticket with return journey
Zone 1 peak hours – journey between 9 to 5
Zone 1 off-peak hours – travelling on non office hours
Zone 1 week end pass- Week end travel
Zone 1 weekly pass
Zone 1 monthly pass
Zone 1 extension journey extension – if I have to go any station beyond zone 1, the add-on charges from last station of zone 1 to that station outside zone 1.
एवढे सगळे तिकिटाचे प्रकार ऐकून मला खूप आश्चर्य वाटले. कारण यात कितीतरी परमुटेशन कॉम्बिनेशन होऊ शकतात. ही सगळी कॉम्बिनेशन्स कॉम्प्युटरला फीड केलेली असतात. त्यामुळे तुम्ही लबाडी करू शकत नाही. तुम्ही कुठल्या स्टेशनहून कुठे गेला, किती वाजता गेला, किती वेळा गेला या सगळ्याची नोंद होऊन त्याप्रमाणे तुमचे तिकीट त्या प्रवासाला व्हॅलिड आहे का नाही हे चेक केले जाते आणि जर व्हॅलिड नसेल तर बाहेर पडण्याचे गेट ओपन होत नाही. मग तुम्ही तिकीट विंडो वर जाऊन जो काही डिफरन्स असेल तेवढ्या पौंडचे तिकीट घ्यायचे. जर तुम्ही फसवण्याचा प्रयत्न, पळायचा प्रयत्न केला तरच फाईन केला जातो. स्वतः जाऊन जर का सांगितलं मला एक्सटेंशन हवा आहे. माझ्याकडे Zone1 पास आहे तर तो आपण होऊन पुढच्या प्रवासाचे तिकीट तुम्हाला देतो. हे मी स्वतः वीकेंडला एक्सपिरीयन्स केले.
बरं ही टिकीट किंवा पास हा लंडन बस साठी सुद्धा चालतो. हे माझ्यासाठी खूप नवीन आणि खूप आश्चर्यकारक होतं! किती व्यवस्थित प्लॅनिंग करून लोकांचे त्रास कसे कमी होतील याची पुरेपूर काळजी घेतली गेली होती.
अर्थात पहिल्या दिवशी मला हे सगळं कळायला थोडा कठीण गेलं. पण एक दोन दिवसातच मला लगेच सगळं लक्षात आलं. मला तर असं वाटतं कि ते नियमाप्रमाणे होतं त्यामुळे लवकर आत्मसात केलं गेलं.
माझं ऑफिस आणि घर एकाच झोन मध्ये असल्यामुळे आणि पहिलाच दिवस असल्यामुळे मी Zone 1 day pass – तिकीट काढलं. म्हणजे एका दिवसात कितीही वेळा या आणि किती वेळा जा! आता आम्ही लिफ्टने खाली गेलो. प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शक बोर्ड होते. ट्रेन मॅप, ट्रेन स्टेशन्स सर्व ठिकाणी लावलेली दिसते.
प्लेटफार्मवर स्टेशनचे नाव, लाईनचे नाव आणि ट्रेनला किती वेळ आहे हे कुठूनही पाहिले तरी दिसू शकत होते. मला उगीचच भारतीय रेल्वे ची आठवण झाली.
‘रिझर्वेशनचा चार्ट कुठे लावला आहे हो?
तो काय पंधराव्या डब्यापाशी! आपण असणार पहिल्या डब्यापाशी! म्हणजे आपली वरात धडपडत पंधराव्या डब्यापाशी पोचणार आणि तिथे चार्ट बघायला ही मोठी गर्दी.आपला नंबर बघायला कसरत करावी लागणार!! असो.
हा अनुभव खूपच वेगळा होता. तुम्ही जिथे उभे आहात तिथे तुमच्या समोर, तुमच्या मागे, तुमच्या आजूबाजूला तुम्ही कुठेही मान फिरवली तरी तुम्हाला तुम्ही कुठल्या स्टेशनवर आहात, कुठल्या लाईन वर हे स्टेशन आहे आणि वे आऊट आणि ट्रेन यायला किती वेळ आहे हे कुठूनही कळत होते.
तसेच ट्रेन मॅप सुद्धा गाडी मध्ये प्रत्येक दाराच्या वर होता. रेल्वे लाईन क्रॉस करणे हा प्रकार नाही. कारण रेल्वे लाईनच्या मधल्या लाईन मधून इलेक्ट्रिक करंट असतो.
एवढी लोक ये-जा करतात पण गप्पा मारत बसले आहेत असे दिसले नाही. आपल्या विश्वात मग्न! गडबडीत जात असतात. नेहमीच्या मार्गात अडथळा आला की, फक्त सॉरी, एक्सक्युज मी, बेग युवर पार्डन असे शब्द वापरून पुढे निघतात. फार कटकट नाही आणि गप्पाही नाहीत.
आम्ही बॉन्ड स्ट्रीटला जाणारी ट्रेन पकडली. मधे एकच स्टेशन होतं ‘ मार्बल आर्च. बॉन्ड स्ट्रीटला उतरून आम्हाला जुबिली लाईनला ग्रीन पार्ककडे जाणारी ट्रेन पकडायची होती. जागोजागी मार्गदर्शक खुणा होत्याच! त्याप्रमाणे आम्ही जुबिली लाईन कडे जाण्यासाठी फिरत्या जिन्याजवळ आलो. जुबिली लाईन अजून एक लेव्हल खाली आहे. समोर मला पाताळ नेणारा प्रचंड मोठा फिरता जिना दिसला. पुलंनी अपूर्वाई मध्ये केलेल्या पिकॅडली स्टेशनची आठवण झाली. इंडियामध्ये सुद्धा असे जिने वापरले आहेत. परंतु इथे थोडे बिचकायला झाले.
आठवणीने उजव्या हाताला उभी राहिले. कारण डाव्या हाताला उभे राहून झालेल्या मागच्या लोकांच्या खोळंब्याचे साग्रसंगीत वर्णन अपूर्वाई मध्ये होतच. कुठल्या वर्षी गेले होते पुलं कोण जाणे? पण नक्कीच वीस एक वर्ष झाली असतील किंवा जास्तच! पण तेव्हापासूनची सिस्टीम अजूनही तशीच एफिशियंटली चालू होती. आपल्याकडे नाही का शंभर वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी बांधलेल्या ब्रिज आणि इमारती तेवढ्याच तगड्या आहेत. ह्याच्यात त्यांच्या कामाची क्वालिटी आणि मेन्टेनन्स या दोन गुणांची प्रकर्षाने जाणीव होते.मगाशी म्हटल्याप्रमाणे जुबिली लाईन सेंट्रल लाईनच्या एक लेव्हल खाली आहे. इथून आम्ही नेक्स्ट स्टेशन ‘ग्रीन पार्क’ ला उतरलो आणि दोन लेव्हल वरती रस्त्यावर आलो. जिथून आम्ही बाहेर पडलो त्याच्या समोर रस्त्याने पाच मिनिटे गेले की ‘बकिंगहॅम पलेस’ आहे असे परेशने मला सांगितले. मला तर बघायची खूप इच्छा होती. परेशने हेही सांगितले की कधीकधी लंच टाइम मध्ये आपण फिरायला तिथे जाऊ शकतो. ‘ग्रीन पार्क’ ही इथेच आहे. लंडनमध्ये खूप सुंदर सुंदर वेल मेंटेन्ड पार्क्स आहेत. रॉयल कोर्ट अपार्टमेंटच्या जवळच ‘हाइड पार्क’ आणि ‘केन्सिंग्टन गार्डन’ असे दोन मोठे सुंदर गार्डन्स आहेत. ‘लॅंकेस्टर गेट’ स्टेशनला जाताना मला दिसल्या होत्या. कधीतरी तिथे फिरायला जाऊया असे मी स्टेशन मध्ये शिरतानाच ठरवले होते.
आता तर ‘ग्रीन पार्क’ ही ऑफिसच्या रस्त्यावर! वा ! किती मज्जा!
— यशश्री पाटील
Around RCA…
Leave a Reply