गडचिरोली जिल्ह्यातील अनेक खेड्यातून ६० एक कुटुंबाना नक्षलवादींनी घराबाहेर काढून देशोधडीला लावलेले आहे. त्यांचे परतीचे मार्ग कायमचे बंद करून टाकलेले आहेत. सधन कुटुंबातील मंडळी साधे रोजी पगार मिळणारे कामगार म्हणून जीवन कंठीत आहेत.
६७ वर्षाचे मन्साराम कोले तावातावात आपली कथा सांगत होते “ माझा मुलगा पोलीसात भरती झाला आणी आमच्या घराचे वासेच फिरले.रोज नक्षलवादी वेळी अवेळी घरात घुसत, माझ्याशी वादविवाद करत, आणी शेवटी मला काठीनी झोडझोड मारले , तुझा मुलाने पोलीस दल सोडले नाही तर तुझा गळा चिरून टाकू अशी धमकी दिली, तो तर पोलीस दल सोडणे शक्य नव्हते, तेंव्हा माझी बायको शांताबाई, व मुले प्रल्हाद आणी हिरालाल रातोरात दूरवरच्या खेड्यात राहण्यास गेलो, माझी १० एकर जमीन, २० गाई म्हशी या सर्व गोष्टी वर पाणी सोडले, घरातील मालमत्ता आमच्या गावातील गरीब कुटुंबात वाटून टाकली, अशीच दु:खद कहाणी या परिसरातील ६० एक कुटुंबांची झाली , त्यातील काही तरुण मुलांना पोलिसांचे खबरे म्हणून नक्षलीनी त्यांना ठार मारून टाकले, तर काही घरे स्वताच्या ताब्यात घेऊन १० हजार रुपये दंड नक्षलींनी वसूल केला. ताडगुडा खेड्यातील राओजी हिचामीच्या जीवनाची शोकांतिका अंगावर शहारे आणणारी आहे. त्याचा पोलीस ठाण्याशी काडीमात्र संबंध नव्हता, पण नक्षलींच्या म्हणण्याप्रमाणे जवळच्या पोटेगाव पोलीस स्टेशनशी त्याचा घनिष्ठ संबंध होता, व तो त्यांचा मुख्य खबऱ्या म्हणून त्याला पकडून नेऊन त्याची निघृणपणे हत्या केली, काही दिवसा नंतर त्याचे गळा चिरलेले प्रेत जंगलात मिळाले, ५ महिन्यापुर्वीच त्याचे लग्न झाले होते. या अघोरी घटनेने चिडून त्याची बहीण सुनीता पोलीस दलातच सामील झाली, घरावर वेगळेच संकट कोसळले, सुनीताला सोडून घरातील सर्वजण दुसऱ्या गावात कायमचे राहण्यास गेले, ४ एकर कसलेल्या जमिनीवर पाणी सोडले, परतीचा रस्ता कायमचा बंद झाला आहे. घरातील सर्वांचे आयुष्य हलाखीचे झालेले आहे.
हिराराम एडामी ५० वर्षाचे नादेक्ल खेड्यातील सुखवस्तू शेतकरी कुटुंब,हाच शाप, एक दिवस नक्षली त्यांना पकडून घेऊन गेले, ५ दिवस मरमर पिटून काढले, भुके ठेवले, त्यात त्यांचा मृत्यू झाला, एक दिवशी २५ एकर जागा, घरदार, शेतीची मोठी अवजारे दागदागिने सर्व सोडून घरातील मंडळी अज्ञात जागी पळून गेली.
अशा अनेक कुटुंबीयांची दयनीय अवस्था असून सरकारनी त्यांना वाऱ्यावर सोडले आहे, नक्षली कडून मारले गेल्यास सरकार कडून ४ लाख रु. अनुदान मिळते, पण जे नागरिक हद्दपार झाले आहेत त्यांना कोणतीही मदत मिळण्याची तरतूद नाही, अशा निर्वासितांना कशाचाच आधार नाही ही त्यांची शोकांतिका आहे.
— डॉ. अविनाश वैद्य.
Leave a Reply