पुष्कळ वेळा पुरेसे पाणी वापरूनही कपड़े स्वच्छ होत नाहीत. आपण त्या वेळी साबणाचा उपयोग करतो. कपडे स्वच्छ करण्यामध्ये साबण नेमकं काय करतो? आपल्या शरीरातून व केसांमधून घामाबरोबर तेलकटपणा किंवा स्निग्धांश बाहेर पडतो. शिवाय आपण तेल, व्हॅसलिन वापरतो. आपल्या खाण्यामध्ये लोणी, तूप, तेल हे पदार्थ असतातच.
शरीरावरील व हवेतील मळ आपण वापरलेल्या कपड्यांच्या धाग्यांमध्ये अडकून बसतो. तेल व पाणी यांच्या परस्परविरोधी गुणांमुळे ती एकजीव होत नाही, त्यामुळे पाण्याबरोबर तेलांश वाहून जात नाहीत. शरीर व कपडे स्वच्छ करावयाचे तर मळावर बसलेला तेलांशाचा सूक्ष्म थर काढून टाकणे आवश्यक आहे. म्हणजेच तेलांश पाण्यात मिसळला पाहिजे.
काहीशा परस्परविरोधी गुणांच्या या द्रव्यांना एकजीव करण्यासाठी एखाद्या मध्यस्थाची गरज असते. मध्यस्थाचे काम साबण करतो. पण साबण म्हणजे काय आहे? तेल किंवा चरबी सोडिअम किंवा पोटॅशिअम हायड्रॉक्साइडच्या जलीय द्रावणाबरोबर उकळली असता कार्बोक्सिलिक आम्लाचे सोडिअम किंवा पोटॅशिअम क्षार तयार होतात. या क्षारांनाच ‘साबण’ असे म्हणतात. तेल किंवा चरबीच्या आम्लारीयुक्त जलअपघटन प्रक्रियेस (Saponification) असे साबणीकरण म्हणतात.
साबण पाण्यात घातल्यावर पाण्याचा पृष्ठीय ताण कमी होतो. त्यामुळेच साबणाच्या पाण्यामध्ये कपड्याच्या प्रत्येक तंतूमध्ये पाणी प्रवेश करून कपडे लवकर भिजून ओले होतात. साबणातील रेणू म्हणजे सोडिअम किंवा पोटॅशिअम कार्बोक्सिलिक आम्लाच्या मोठ्या शृंखलेचे क्षार आहेत. साबणाच्या रेणूच्या एका टोकास हायड्रोकार्बनची शृंखला असते. म्हणजेच ते पाण्यात अद्रावणीय असून तेलात द्रावणीय आहेत. साबणाच्या दुसऱ्या टोकास कार्बोझायलेट आयन असतात ते जलाकर्षक असतात. ते पाण्यात द्रावणीय असून तेलामध्ये अद्रावणीय आहेत. साबणाच्या रेणूतील लांब अध्रुवीय बंध असणारी टोके ही पृष्ठभागावरील मळ व धूळ शोषून घेण्याचे कार्य करतात. कार्बोझायलेट आयनचे ध्रुव पाण्याला धूळ किंवा मळ यांपासून दूर सारण्याचे कार्य करतात. अशाप्रकारे साबणाचा रेणू मळास पाण्यामध्ये विरघळण्यास मदत करतो, त्यामुळे आपण आपले कपडे स्वच्छ धुऊ शकतो.
शुभदा वक्टे, (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply