काश्मीरवरून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात तणावाचं वातावरण असताना भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अण्वस्त्र वापराबाबत अत्यंत मोठं विधान केले. अण्वस्त्रांबाबत ‘नो फर्स्ट यूज’ हेच भारताचं धोरणं राहिलं आहे, मात्र पुढे काय होईल हे परिस्थितीवर अवलंबून आहे, असं राजनाथ सिंह 16 औगस्ट्ला म्हणाले.
स्वतःला जागतिक शांततेची काळजी आहे, हे दाखवण्यासाठी पाकच्या पंतप्रधानांनी १९ औगस्ट्ला भारताच्या अण्वस्त्रांकडे बोट दाखवले आहे. खान यांच्या मते भारतात ‘फॅसिस्ट’ सरकार सत्तेत असल्यामुळे ही अस्त्रे असुरक्षित आहेत. काही दिवसांपूर्वी ‘भारत प्रथम अण्वस्त्रांचा वापर करणार नाही’, या धोरणात पालट करेल’, असे विधान भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले होते. यामुळे पाकचे धाबे दणाणले . पाक आणि पाकपुरस्कृत आतंकवादी यांच्या विरोधात भारत घेत असलेले कठोर धोरण त्याला झोंबले आहे. पाकच्या विरोधात भारत आणखी कठोर भूमिका घेईल, याआधी त्याच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव आणण्यासाठी पाकने खटपट चालू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाकने ‘फॅसिस्ट हिंदु सरकारच्या हातात अण्वस्त्रे सुरक्षित नाहीत’, असे म्हटले आहे. पाकने असे वक्तव्य करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा होय. इम्रान खान यांची ही भीती खरी असती, तर मागील ५ वर्षांतच पाकचा निःपात झाला असता. पाकचे सरकार तेथील सैन्य चालवते. हे सैन्य तेथील जिहादी आतंकवाद्यांच्या तालावर नाचते. पाकमधील अण्वस्त्रे ही कधीही या आतंकवाद्यांच्या हातात पडू शकतात, ही स्थिती आहे. असे झाले, तर संपूर्ण जगात अशांती नांदेल. पाक हे ‘फॅसिझम’चे चालते बोलते उदाहरण होय. तेथील सैन्य हुकूमशाहीप्रमाणे वागत असून बलुचिस्तान आदी भागात नागरिकांवर अत्याचार करत आहे. पाकमध्ये लोकशाही नावाची काही गोष्ट अस्तित्वात तरी आहे का ? त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा वगैरे प्रश्नच उद्भवत नाही. ही गोष्ट इम्रान खान यांनाही ठाऊक आहे; मात्र भारतद्वेषाची एकही संधी न सोडणे हे पाकच्या इतक्या अंगवळणी पडले आहे.
भारताचे सध्याचे अण्वस्त्रविषयक धोरण
तीन अण्वस्त्रधारी देश शेजारी शेजारी असणे ही वस्तुस्थिती आहे. 2003 साली जाहीर झालेले भारताचे अण्वस्त्रविषयक धोरण समजून घेतले पाहिजे. यातील महत्वाचा मुद्दा जरी `नो फर्स्ट युज’ हा असला तरी याच्या जोडीला इतरही मुद्दे आहेत. ते इतर मुद्दे असे आहेत .जे देश अण्वस्त्रधारी नसेल त्याविरूद्ध भारत कधीही अण्वस्त्रं वापरणार नाही.भारतावर जर अण्वस्त्रांचा हल्ला झाला तर भारत इतके कडक प्रत्युत्तर देईल की शत्रूराष्ट्राचे प्रचंड नुकसान झाले पाहिजे.भारत स्वरक्षाणार्थ योग्य पण कमीतकमी अण्वस्त्रांचा साठा ठेवेल.अण्वस्त्रांचा वापर करण्याबद्दलचा अंतीम निर्णय देशातील राजकिय नेत्रुत्वाचा असेल. भारतावर जर मोठा रासायनिक किंवा जैविक हल्ला झाला तर भारत अण्वस्त्रं वापरून प्रत्युत्तर देईल.भारत जरी अण्वस्त्रधारी देश असला तरी सर्व जग अण्वस्त्रमुक्त व्हावे या दिशेने भारत प्रयत्न करत राहील. हे भारताच्या अण्वस्त्रविषयक धोरणाची ठळक वैशिष्टये होत.
कणखरपणे वागलो, तर पाक नमतो
भाजपने लोकसभा निवडणुकीत सत्तेवर आल्यास देशाच्या अण्वस्त्र धोरणाचा फेरविचार करु असे जाहीरनाम्यात म्हटले होते. २०१६ मध्ये भारताचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले की, ‘आम्ही अण्वस्त्र प्रथम वापरणार नाही. हे आपण का म्हणतो, कारण आम्ही जबाबदार देश आहोत व आम्ही अण्वस्त्रांचा जबाबदारीने वापर करू. असे विधान करुन आपण एक प्रकारे आपल्यालाच मर्यादा घालून का घ्यायच्या’? आम्ही कोणाच्याही विरोधात प्रथम अण्वस्त्रांचा वापर करणार नाही’ (नो फर्स्ट यूज डॉक्ट्रिन) हे भारताचे अण्वस्त्र वापरासंबंधीचे गेल्या अनेक दशकांचे धोरण आहे. जगातील पहिला अणुबॉम्ब हा जपानवर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात टाकला गेला होता. त्यानंतर जगात एकदाही अणुबॉम्ब वा अण्वस्त्रांचा वापर झालेला नाही. पर्रिकर म्हणाले, जर तुम्ही आधीपासूनच्या अण्वस्त्र धोरणाचे पालन कराल किंवा पूर्वीच्याच भूमिकेवर ठाम असाल तर तुम्ही अण्वस्त्र शक्ती कमी करत आहात असे मला वाटते. आम्हाला कोणीही ग्राह्य धरु नये हीच आमची रणनिती आहे. देशावर जेव्हा कधी संकट येईल त्यावेळी मी आपल्या धोरणात बदल करण्यास मागेपुढे पाहणार नाही .आपण कणखरपणे वागलो, तर पाक नमतो.
नो फर्स्ट युज या धोरणाचा फायदा पाकिस्तानला
भारताच्या नो फर्स्ट युज या धोरणाचा भारताला अजिबात फायदा झाला नाही. फायदा हा फक्त पाकिस्तानलाच झाला. पाकिस्तानकडे अणुशस्त्रे असल्यामुळे पाकिस्तान कश्मीर मध्ये आणि इतरत्र दहशतवादी हल्ले करत राहिला, मात्र भारताची असलेली सैन्याची ताकद युध्दामध्ये भारत कधीही वापरू शकला नाही. म्हणजेच आम्ही दहशतवादी हल्ले करत राहू परंतु तुम्ही आमच्या विरुद्ध युद्ध सुरु करायचे नाही असे पाकिस्तान म्हणायचा, आणी आपण मुकाट्याने ऐकायचो.
पाकिस्तानने छोटे अणुबॉम्ब तयार केले आहेत. जर भारतीय सैन्य लाहोर पर्यंत पोहोचले, किंवा ईछोगिल कॅनॉल पार केला किंवा सियालकोट मध्ये प्रवेश केला तर पाकिस्तान त्यांच्याकडे असलेले अणुबॉम्ब वापरेल म्हणुन युध्द नको .
काश्मीरच्या पार्श्वभूमीवर अणुधोरणाचा आढावा घेण्याची गरज
पाकिस्तान आणि चीनचे संयुक्त आव्हान भारतासमोर उभे राहिले आहे. पाकिस्तान आणि चीन यांच्यातील मैत्री आणि दोघांचेही भारताच्या विरोधातील वागणे पाहता भारताने सुरक्षेच्या आणि प्ररोधनाच्या दृष्टीने आपल्या अणुधोरणावर पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे, असे वाटते. पहिल्यांदा अणुहल्ला करणार नाही. मात्र, भारतावर अणुहल्ला झाल्यास प्रतिहल्ला करून शत्रूचे अधिकाधिक नुकसान करण्याचे भारताचे सध्याचे धोरण आहे. या धोरणानुसार पहिला हल्ला शत्रुराष्ट्राकडून अपेक्षित आहे. प्रतिहल्ल्याच्या भीतीतून शत्रूदेश आपल्यावर हल्ला करणार नाही, असे या धोरणातून अनुस्यूत आहे. मात्र, अस्थिर पाकिस्तान हा भारतासाठी धोक्याची घंटा आहे. दहशतवाद्यांच्या हातामध्ये अशी संहारक शस्त्रे पडली, तर काय होईल, यावर तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू असते. तांत्रिकदृष्ट्या दहशतवाद्यांना अशी शस्त्रे डागणे एखाद्या देशाच्या परिपूर्ण पाठिंब्याशिवाय शक्य नसले, तरी सध्याच्या काळात दहशतवादाचे हे आव्हान सर्वांसमोर उभे ठाकले आहे. अशा अराष्ट्रीय घटकांकडून मोठा हल्ला झाला, अणुहल्ल्याची अथवा इतर रासायनिक, जैविक हल्ल्याची शक्यता निर्माण झाली, तर भारत त्याचा सामना कशा पद्धतीने करील, याचे उत्तर सध्याच्या अणुधोरणातून आपल्याला मिळत नाही.
धोरणामुळे जर देशाचे रक्षण होत नसेल पुनर्विचार जरुरी
काश्मीरच्या पार्श्वभूमीवर अणुधोरणाचा आढावा घेण्याच्या मुद्द्यावर पुन्हा चर्चा होण्याची गरज आहे.चीनचे हे अणुधोरण पाहता चीनकडून भारतावर महासंहारक हल्ले होण्याची शक्यता कमी वाटते. मात्र, चीनची राजकीय व्यवस्था पाहता चीन कधीही आपली भूमिका बदलू शकतो. अण्वस्त्रप्रसाराबाबतही चीनची ख्याती चांगली नाही. पाकिस्तानने अण्वस्त्रे कशी मिळवली, याचीही माहिती जगाला आहे. अस्थिर आणि दहशतवादाने पोखरलेला पाकिस्तान, चीनसारख्या देशाची पाकिस्तानला असलेली साथ, काश्मीरमधील हिंसाचार, काही स्थानिकांची त्याला असलेली फूस पाहता अणुधोरणात्मक पातळीवरील बदल गरजेचा वाटतो.
मात्र अनेक वर्षानंतर पहिल्या वेळा उरी नंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये जाऊन आठ ठिकाणी सर्जिकल स्ट्राइक केला आणि त्यानंतर पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोट मध्ये जाऊन हवाईदलाने स्ट्राइक केला. म्हणजे पाकिस्तानच्या अणुबॉम्बला न घाबरता आपण ही कारवाई करु शकलो.
देशाची मोठी शस्त्रे ही केवळ 26 जानेवारीला परेडमध्ये दाखवण्याकरता नसतात. त्यांचा वापर सुद्धा केला पाहिजे. देशाच्या धोरणामुळे जर देशाचे रक्षण होत नसेल तर अर्थातच त्यावर पुनर्विचार करण्याची गरज आहे.
— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
Leave a Reply