समुद्रसपाटीपासून निळकंठेश्वर साधारण तीन-साडेतीन हजार फूट उंचीवर हा डोंगर आहे. हा चढ पाहून अत्यंत सोपा असे प्रथमदर्शनी वाटत असले तरी प्रत्यक्ष ही चढण छ्यातीमध्ये दम भरवणारी अशीच आहे. पायथ्यापासून तासाभरात माथ्यावर पोहचता येते. सभोवतालचा परिसर आणि थंड वाऱ्याची झुळुक यामुळे क्षणार्धात थकवा नाहीसा होतो. डाव्या बाजुला असलेले पानशेत व वरसगाव धरण, ती खोल दरी आणि क्षितीजापर्यंत पसरलेली शेते ह्यांचे दृष्य फारच मोहक दिसते. माथ्यावर निळकंठेश्वराचे प्रशस्त मंदिर आहे, पण मुख्य आकर्षण आहे ते इथल्या रेखीव पुतळ्यांचे देखावे! दोन रेखीव हत्तीं पुतळ्याच्या स्वागत कमानीतून आपण आत शिरताच एकापाठोपाठ एक असे असंख्य सुंदर पुतळे आपणांस दिसु लागतात. निळकंठेश्वराच्या मुख्य मंदिरापर्यंतची वाट आणि संपूर्ण परिसर या आणि अशा सुंदर पुतळयांनी भरला आहे. दशावतार, इंद्राचा दरबार, सत्यवान-सावित्री, अमृत मंथन, कृष्ण्लीला, बकासुर वध, अष्टविनायक, नवनाथ जन्मकथा, शिवाजी महाराज, विविध जाती धर्मातले देव देवता, ऋषी-मुनी आणि रामायण-महाभारतातल्या प्रसंगांनी संपुर्ण परिसर सजीव झाल्यासारखे वाटते. १५-२० एकराच्या या परिसरांत एक हजाराच्या आसपास पुतळे आहेत. संपुर्ण पुतळयांचे दर्शन घेत आपल्या नकळतच आपण निळकंठेश्वराच्या मुख्य मंदिरात पोहचतो. त्याच भारावलेल्या अवस्थेत आपण त्याचे दर्शन घेतो.
वनसंरक्षक व शिवभक्त शंकरराव सर्जे ऊर्फ सर्जेमामा निळकंठेश्वर मंदिराचे मुख्य विश्वस्त, १९६० साली निळकंठेश्वराच्या डोंगरावर असलेल्या वनात वनरक्षक म्हणुन काम करीत होते. एके दिवशी स्वतः भगवान शिवशंकरांनी त्यांना स्वप्नात येऊन सांगितले की मी व माझा नंदी सदर डोंगरावर एका विशिष्ट ठिकाणी जमिनीखाली गाडला गेलो आहे. मला बाहेर काढ. सर्जेमामांनी त्वरीत सांगितलेल्या ठिकाणी खणुन पाहिले असता त्यांना तेथे नंदी तसेच भगवान शिवशंकरांचे लिंग आढळले. त्यांनी त्याला बाहेर काढुन त्याची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली. स्वःकष्ट आणि भक्तांकडुन मिळविलेल्या मदतीच्या जोरावर सर्जेमामांनी सदर डोंगराला आज नंदनवनाचे स्वरुप प्राप्त करवून दिलेले आपणास पहावयास मिळते. सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून सर्जेमामा यांनी येथे दारु व्यसनमुक्ती अभियान सुरू केले आहे. देवळात लावलेल्या कात्रणानुसार सर्जेमामांनी सुमारे ४ ते ५ लाख लोकांना दारुच्या व्यसनातून मुक्त केले आहे. खरोखर त्यांचे कार्य खुप थोर आहे. त्रिपुरारी पौर्णिमेच्या वेळी याठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. आपल्या महाराष्ट्रात कितीतरी प्रसिद्ध व पवित्र तीर्थक्षेत्र आहेत. त्यातील काहींची ख्याती त्या त्या प्रदेषापुरतीच मर्यादित असली तरी त्याचे महत्त्व त्यामुळे जराही कमी होत नाही. निळकंठेश्वर डोंगरावर अल्पोपहाराची सोय होऊ शकते. पानशेतला बर्यापैकी हॉटेलमध्ये जेवणाची सोय उपलब्ध आहे.
पुण्याहून खडकवासला धरण – डोणजे फाटा – खानापुर मार्गे पानशेत गावी जायचं. पानशेत धरणाच्या भिंतीखालून एक रस्त्ता आपल्याला निळकंठेश्वरच्या पायथ्यापर्यंत घेउन जातो. पण पानशेत धरण ते निळकंठेश्वर पायथ्या पर्यंतचा हा रस्त्ता बराचसा खराब स्थितीतला आहे किंवा खानापुर आणि पानशेत दरम्यान रुळे नावाचे एक छोटेसे गाव आहे. गावात आल्यावर आपल्याला दिसते ते मुठा नदीचे सुंदर पात्र. नदीच्या पलीकडच्या तीरावर जांभळी नावाचे गाव आणि गावाच्या पाठीमागे असलेल्या उंच डोंगरावर वसले आहे “निळकंठेश्वर”. नदी पार करण्यासाठी होड्या तयार असतात. जांभळी गावापासून निळकंठेश्वर पायथ्यापर्यंत जाण्यासाठी ४ किमी पायी जावे लागते. अश्या या सुंदर परिसराला आपण एकदा जरूर भेट द्यायलाच हवी.
(सौजन्य: महान्यूज)
Leave a Reply