सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे निदान पुण्यासारख्या ठिकाणी तरी नीरा हे थंड पेय घेतल्याशिवाय अनेकांना चैन पडत नाही. सांगून गंमत वाटेल, पण पूर्वीच्या काळात नीरा हे पेय निषिद्ध मानले जात असे. याचे कारण नीरा म्हणजे दारू असते असेच मानले जात असे. त्यामुळे काही लोक लपूनछपून नीरा पीत असत.
हेच पेय परदेशात असते तर त्यांनी त्याचे सोने केले असते. अजूनतरी आपल्याकडे त्याचे हवे तेवढे मार्केटिंग झालेले नाही. ते नाशवंत असस्याने त्याला मर्यादा आहे. नीरा ही आरोग्याला अत्यंत उपकारक असते, असे आता संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. त्याबाबतचे संशोधन पहिल्यांदा कमला सोहनी यांनी काही मुलांवर त्याचे काय परिणाम होतात याच्या आधारे केले होते.
शंभर मिली नीरेमध्ये साधारण १२ ग्रॅम साखर, २२ मिलिग्रॅम स्फुरद, २५ मिलिग्रॅम लोह, ०.०३ मिलिग्रॅम जीवनसत्त्व बी-१, ०.०२४ मिलिग्रॅम जीवनसत्त्व बी- २, २२ मिलिग्रॅम नायसिन, १० मिलिग्रॅम क जीवनसत्त्व, १२० मिलिग्रॅम प्रथिने असतात व त्यात उष्मांक म्हणजे कॅलरी केवळ ६५ असतात. शिंदी, ताड, माड, भेर्ली या पाम गटातील वृक्षांपासून नीरा काढली जाते. या झाडांना फुलोरा आल्यावर त्यांच्या टोकावर छेद घेतला जातो व त्यातून जो गोड रस स्रवतो त्याला नीरा म्हणतात. ती रात्री मडके लावून गोळा करतात. आता तर पुणे जिल्ह्यात जिथे नीरा तयार होते तिथेच ती झाडाखाली बसून पिण्याची सोय करण्यात आली आहे.
नीरा रात्री जास्त निघते. नरापेक्षा मादी वृक्षातून ती जास्त निघते. नीरा अल्कधर्मी ठेवण्यासाठी मडक्यात कॅल्शियम ऑक्साईडचा (चुना) थर देतात, त्यामुळे ती आंबत नाही. सकाळी नीरा झाडावरून उतरवून त्यात सुपर फॉस्फेट टाकतात. त्यामुळे कॅल्शियम सल्फेटचा थर खाली बसतो. नंतर नीरा गाळली जाते. नीरा थंड राहिली नाही तर किण्वन क्रियेने त्यात यीस्ट तयार होऊन ती आंबते व तिची ताडी बनते. ती मादक पेय असते.
नीरेला रंग नसल्याने ग्राहक तिच्याकडे आकर्षिले जात नाहीत. एका झाडापासून ३० ते १००० लीटर नीरा मिळते. ग्लुकोज व फ्रुक्टोज यांच्या मिश्रणातून बनलेल्या सुक्रोज साखरेमुळे तिला गोडवा असतो. फॉस्फरस, मँगेनीज व लोह ही आवश्यक खनिजे त्यात असतात. नीरेपासून ताडगूळही तयार करतात व तो पोटॅशियम, कोबाल्ट, तांबे या खनिजांनी परिपूर्ण असतो.
Leave a Reply