नेली ब्लाय ही पराकोटीची धाडसी, जगप्रसिद्ध अमेरिकन पत्रकार ! बातमी मिळवून तिची ‘स्टोरी’ करण्यासाठी ती कोणतीही भूमिका करीत असे. ही भूमिका करताना ती कोणतेही धाडस करीत असे. तिच्या धाडसाला सीमा नव्हती. समाज काय म्हणले याची भीती तिने कधीच बाळगली नाही. वाचकांना सत्य जाणण्याचा अधिकार आहे आणि तो त्यांना मिळवून देण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तिच्या मनाची तयारी असे. अनेक गुपितांना तिने आपल्या लेखणीने वाचा फोडली. तिचे लेखनाचे विषयही सनसनाटीपूर्ण असत. परंतु ती लिही ते प्रत्यक्ष अनुभूती घेऊन लिही. त्यामुळे भडक विषयावरही तिचे लेखन सत्यस्वरूप असल्याने तिच्या ‘स्टोरीज’ परिणामकारक आणि वाचनीय ठरत. समाजात हलकल्लोळ उठविणाऱ्या ‘स्टोरीज’ नसतील तर त्या लिहिण्यात नेलीस स्वारस्य नव्हते.
लोकांपासून लपलेल्या-छपलेल्या काही गोष्टी उघड करण्यासाठी नेली ब्लायने पॉकेट मारणाऱ्या मुलीची कधी भूमिका केली तर कधी वेश्या, कधी कारखान्यातील कामगार तर कधी समूहगीत गायिकेचीही भूमिका केली. तिचा स्वभाव बंडखोरीचा होता. बातमी मिळविण्यासाठी जग उलथेपालथे करण्याची तिची वृत्ती होती. बातमी मिळविण्यासाठी जग उलथेपालथे करण्याची तिची वृत्ती होती. वेड्यांच्या इस्पितळात वेडी म्हणून ती घुसली होती. कारखान्याच्या प्रांगणात ती जशी शिरली तशी तुरुंगातही ती हिंडून आली. जगप्रवासही अवघ्या ७२ दिवसांत करून त्या काळचा विक्रम तिने मोडला होता. १८८९ मध्ये तिने केलेला हा जगप्रवास अमेरिकीतील सर्वच वृत्तपत्रांना दखलपात्र वाटला होता. अशक्यप्राय वाटणारा हा ७२ दिवसांतील तिचा प्रवास तिने वाफेच्या जहाजांनी, रेल्वेने आणि घोडागाडीने केला होता. त्या वेळचा हा तिचा प्रवास यत्किंचितही सुखाचा वा आनंदाचा असा नव्हता. ‘अराऊंड दि वर्ल्ड इन एटी डेज’ या ज्युल्स व्हर्न (Jules Verne) च्या प्रवासाविषयी नेलीने वाचले होते. ८० दिवसांत केलेल्या प्रवासाचा विक्रम आपण ७२ दिवसांत जगप्रवास करून मोडून काढू असा निर्णय नेलीने जाहीर केला होता. आपला निश्चय तिने पूर्ण केला हे विशेष!
इ.स. १८६५ मध्ये एलिझाबेथ कोचरन (Elizabeth Cochran) म्हणून नेलीचा जन्म झाला होता. लहानपणीच तिने माणसांचे क्रौर पाहिले होते. रस्त्यांवर भीक मागणारी मुले, दारिद्रयाशी झगडणारे नागरिक आणि अगदी मूलभूत हक्कही ज्यांना नाकारलेत अशा स्त्रियांचा लढा किंवा जगण्याची धडपड नेलीने पाहिली होती. सर्वत्र होणाऱ्या अन्यायांमुळे नेली खूप अस्वस्थ झालेली होती. केव्हातरी आपण परिस्थितीत बदल घडवून आणू असे तिला वाटत होते. वयाच्या विसाव्या वर्षी तिला हवी तशी पहिली संधी प्राप्त झाली. पिटसबर्गमध्ये घटस्फोटित महिलांच्या कथा चित्रित करून स्थानिक वृत्तपत्रास विकल्या. त्या काळात तो विषयच धक्कादायक होता. लोकांची प्रतिक्रिया अतिशय प्रक्षोभक होती. संमिश्रही होती. काही वाचकांना बौद्धिक खाद्य देणाऱ्या त्या कथा वाटल्या, तर काहींना त्या असभ्य वाटल्या. कोणाचे कितीही दुमत असले तरी सर्वांचे एकमत असे होते की, नेलीच्या कथांमुळे वृत्तपत्रांची तडाखेबंद विक्री झाली! त्या वेळी बाजारात इतर कोणत्याही वस्तूपेक्षा त्या वृत्तपत्रांची विक्री जास्त झाली होती, हे सत्य होते!
एलिझाबेथ कोचरनला तिच्या वृत्तपत्र संपादकांनीच ‘नेली ब्लाय’ हे त्या काळातील लोकप्रिय गीताचे शीर्षक असलेले टोपणनाव दिले आणि आपल्या वृत्तपत्राची पहिली महिला पत्रकार म्हणून नोकरीत ठेवले. नेलीच्या पत्रकारितेचा प्रारंभ अशाप्रकारे झाला.
आपल्या वाचकांचा मानभंग होईल या भीतीने इतर वृत्तपत्रांनी तत्कालीन ङ्गगरमफ विषयांकडे दुर्लक्षच केले होते. उलट नेलीने अशा विषयांना प्राधान्य दिले होते. आपल्या लेखनामुळे वाचकवर्गात होणारी खळबळ पाहायला तिला आवडत होते.
स्थानिक वृत्तपत्राचे क्षेत्र नेलीच्या प्रतिभेस फार लहान वाटू लागले होते. देशातील सर्वात मोठ्या वृत्तपत्रात काम करावे असे मनाशी ठरवून ती ‘न्यूयॉर्क वर्ल्ड’ या वृत्तपत्राच्या जोसेफ पुलित्झर या संपादकास भेटली. राज्यातील वेड्यांच्या इस्पितळांबाबतच्या परिस्थितीवर त्या वर्षातील सर्वात मोठी अशी विलक्षण ‘स्टोरी’ आपण भूमिगत राहून मिळवून देऊ, असे नेलीने संपादकास सांगितले होते.
वेड्यांच्या इस्पितळात मनोरुग्णांना रुग्ण म्हणून वागण्याऐवजी प्राण्यांप्रमाणे वागविले जाते हे नेलीला ठाऊक होते. त्यामुळे तेथील एकूण सत्य परिस्थितीवर प्रकाश टाकून त्या दशकातील एका ङ्गस्टोरीफला जन्मास घालण्याची नेलीची इच्छा होती. नेली ब्लायची ती सुप्रसिद्ध अशी गुपित फोडणारी ‘स्टोरी’ ठरणार होती. म्हणूनच नेली वेड्यांच्या इस्पितळाच्या बोर्डिंग हाऊसमध्ये दाखल झाली. तिला तिथे कुणी ओळखत नव्हते. आलेल्या पाहुण्यांसमोर तिने वेडाचे खोटे चाळे केले. त्यामुळे तिला वेड्यांच्या इस्पितळात दाखल केले गेले. तिथे तिने दहा नरक यातना देणारे महाभयानक दिवस घालविले. शेवटच्या काही दिवसांत ती तेथील संरक्षकांना आपण वेडे नसल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न करीत होती. शेवटी ‘न्यूयॉर्क वर्ल्ड’च्या वकिलाने तिला वेड्यांच्या इस्पितळातून मुक्तता मिळवून दिली.
मनोरुग्णांना त्या इस्पितळात मारहाण केली जात असताना, भुकेले ठेवले जात असताना आणि कठोर स्वरूपाची शारीरिक श्रमांची कामे त्यांच्याकडून करवून घेतलेली पाहत असताना नेलीचे मनही व्याकूळ झाले होते. तेथील काहीजणांच्या बोलण्यात सदोषता निर्माण झाल्यासारखे शारीरिक व्याधी होते; परंतु वैद्यकीय उपचारार्थ पैशाची तरतूद नव्हती.
मनोरुग्णांच्या इस्पितळातील व्यवस्थेवर लिहिलेल्या नेलीच्या स्टोरीने खळबळच माजविली! वेड्यांच्या इस्पितळातील गजाआड (Behind Asylum Bars) ही तिची स्टोरी वृत्तपत्रांच्या सर्व स्टॉल्सवर विकली गेली. सर्वच वृत्तपत्रांनी धाडसी महिला पत्रकार असलेल्या नेलीची कथा देशभर उचलून धरली होती. अल्पावधीतच सुप्रसिद्ध पत्रकार म्हणून संपूर्ण देशात नेलीचा नावलौकिक झाला. त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे नेलीच्या भूमिगत राहून केलेल्या आश्चर्यजनक कामामुळे न्यूयॉर्कच्या वेड्यांच्या इस्पितळाच्या व्यवस्थेत तात्काळ सुधारणा केल्या गेल्या !
नेली ही अशाप्रकारे प्रसिद्धीस आली होती. परंतु एखाद्या सुपरस्टार नटाला वा नटीलाच मिळते अशी प्रसिद्धी नेलीने केलेल्या ७२ दिवसांच्या जगप्रवासाने तिला मिळाली. केवळ प्रसिद्धीच नव्हे, तर लोकप्रियताही तिला मिळाली. भारतातच काय, अमेरिकेत आणि जगातही कुणा पत्रकाराच्या भाग्यात नसेल अशी लोकप्रियता नेलीस लाभली. नेली जगप्रवास करीत असताना तिच्याविषयी सर्व प्रसारमाध्यमांतून चर्चा होत होती. देशातील सर्व वृत्तपत्रे तिच्या प्रवासमार्गाचा मागोवा घेत होती. ‘नेली ब्लाय गेसिंग गेम’ नावाची खेळ स्पर्धा नेली जगप्रवास करून परत येईपर्यंत वृत्तपत्रातून चालू राहिली.
नेली जगप्रवास करीत असताना तिच्यावर गाणी लिहिली गेली. ती वापरीत होती त्या डिझाईनचे कपडे मुली घालू लागल्या होत्या. नेलीची ‘ट्रॅव्हल कॅप’ सर्वच वयाच्या लोकांना आकर्षक वाटू लागली. तशा तऱ्हेच्या टोप्या लोक वापरू लागले होते. नेलीच्या हेअरस्टाईलची कॉपीही तरूणी करू लागल्या होत्या!
अशी प्रसिद्धी आणि दुर्मीळ लोकप्रियता लाभलेल्या नेलीने आपल्या पत्रकारितेची शैली कधी सोडली नाही. गौप्यस्फोट करणे तिने चालूच ठेवले. तिच्या भावनांना हात घालणाऱ्या विषयांवर ती लिहीतच राहिली.
नेलीने मेक्सिकोतही काही काळ प्रवास केला आणि लोकांना माहीत नसलेल्या मेक्सिकोतील बदलांसंबंधातील गोष्टी लिहून आपल्या संपादकांकडे पाठविल्या. सरकारची स्तुती करणाऱ्या ‘स्टोरीज’ नेली नेहमीच लिहीत नसल्याने तिची त्या देशातून प्रासंगिक स्वरूपाची हकालपट्टी झाली.
पत्रकारितेच्या क्षेत्रात पत्रकांराना सांगितले जाते की, “जेव्हा तुमची देशातून हकालपट्टी होते तेव्हा एक चांगले वार्ताहर असता, हे ध्यानात ठेवा!”
या दृष्टीने पत्रकारितेच्या क्षेत्रातील नेली ही एक जागतिक पातळीवरील चांगली वार्ताहर होती! अशा या अलौकिक पत्रकार असलेल्या नेली ब्लायने आपल्या वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.
–प्रा. अशोक चिटणीस
(व्यास क्रिएशन्स् च्या ‘जगावेगळ्या’ ह्या पुस्तकातील प्रा. अशोक चिटणीस ह्यांचा हा लेख)
Leave a Reply