नवीन लेखन...

नेत्र लागता पैलतीरी

नोकरीच्या किंवा घराच्या जबाबदार्यांत गुंतल्यामुळे काही छंद जोपासता आले नसतील तर ते आता जोपासता येतील. तेही काही कारणांनी आता शक्य नसेल तर नवीन छंद लावून घ्यावेत. आपल्यात एखादी कला असेल तर ती एखाद्या इच्छुकाला शिकवावी. आपल्यापेक्षा वृद्ध, असाहाय्य आणि गरजू व्यक्तींसाठी, शेजार्यांसाठी काय करता येईल, ह्याचा विचार करून तसा मदतीचा हात त्यांना द्यावा.

ह्या लेखाच्या निमित्ताने कॉलेजमध्ये शिकत असतानाचा एक प्रसंग आठवला. एकदा एका मैत्रिणीच्या घरी जाण्याचं काही तरी महत्त्वाचं कारण घडलं. एरव्ही आमच्यापैकी कुणीच तिच्या घरी जात नसू. कारण तिच्या आजीचा दराराच तसा होता. आम्ही गेलो तरी बाहेरच्या बाहेर बोलून घाईघाईत तिथून निघत असू. पण त्या दिवशी गेले तर समोरच्या व्हरांड्यातच आजी त्यांच्या नेहमीच्या खुर्चीत बसलेल्या दिसल्या. त्यांचं तोंड अंगणाकडे असल्याने त्यांना मी दिसलेच. त्यांच्याकडे मी आश्चर्याने बघतच राहिले. कारण त्यांनी त्यांचे लांबसडक शुभ्र केस कापून बॉयकट केला होता. अंगावर नेहमीसारखी शुभ्र साडी नव्हती. त्याऐवजी रंगीत, बारीक फुलं असलेला शर्ट-पायजामा होता.

मला बघून त्या म्हणाल्या, “काय, आजी तुमच्यापेक्षा मॉडर्न दिसते की नाही? अगं, ह्या वयात मला केस विंचरणं जमत नाही. दुसऱ्याला रोज त्रास का द्यायचा, म्हणून कटकटच मिटवून टाकली! आयुष्यभर साडी वापरली. आता चालताना तोल जातो. पायात साडी अडकून पडायची भीती वाटते. ह्या वयात पडले तर कायमचं अंथरुणावर पडावं लागेल. त्यामुळे कंबरेला इलॅस्टिक असलेला साधा पायजामा आणि जरा ढगळ शर्ट हे वापरण्याच्या दृष्टीने सोयस्कर वाटलं.”

आजींचं म्हणणं पटलं तरी त्यांच्या त्या लांबसडक केसांचं काय केलं ही मला उत्सुकता होती. तर त्या म्हणाल्या, “नाती म्हणत होत्या, त्या केसांची वेणी करून भिंतीवर लटकवून ठेवू म्हणून. मी म्हटलं, एखाद्या गोष्टीचा त्याग केला की पुन्हा तिच्या आठवणीच्या मोहातसुद्धा पडू नये. जाळून टाकले. संपला विषय! लोकांच्या आठवणीत माझी लांबसडक वेणी आहे, तेवढं पुरे. चांगल्या आठवणी आठवायच्या.”

त्याच काळात सासरी गेलेली आमची एक मैत्रीण माहेरी आल्यावर सासूविषयी सांगत होती, तिचा नवरा आणि सासरे घरी आले की, चहा देतादेता सासूबाई त्यांच्याजवळ आपल्या दिवसभराच्या कामाचा तपशील देत सांगतात, ‘आज ना, मी पंचवीस कपडे धुतले!’

हे एक वाक्य नव्या नवरीला गोत्यात आणायला पुरेसं होतं. मग भांड्याला भांडं वाजायला सुरुवात होणारच. घरातल्या पुरुषांनी चौकशी केली असती तर त्यांना कळलं असतं की, त्या पंचवीस कपड्यांत होते फक्त मोजे आणि रुमाल!

आधीच्या दोन पिढ्यांतल्या दोन स्त्रियांचे हे दृष्टिकोन  आणि वागण्याची रीत माझ्या विशीतच मला बरंच काही शिकवून गेली. एका आजींनी ‘लोक काय म्हणतील?’ ह्या विचाराला भीक न घालता किती सहज विषय संपवून स्वतःला आणि दुसऱ्यालाही सोयीस्कर होईल असा पर्याय काढला होता! स्वतःकडे पाहताना दुसऱ्याचा विचार करण्याचा  सत्तरीतल्या आजींचा दृष्टिकोन मनात कायम ठसला. नंतरच्या पिढीतल्या आईने कसं वागू नये, मुलांच्या संसारात अनावश्यक लुडबुड करू नये हे लक्षात आणून दिलं आणि तेव्हाच मी ठरवलं की, आपण ह्या स्त्रियांच्या वयात येऊ तेव्हा आपल्या पूर्वज स्त्रियांनी ज्या चुका केल्या, त्यांची पुनरावृत्ती आपल्याकडून होऊ द्यायची नाही. साठी आली की, आपल्या आयुष्याकडे नव्याने पाहायचं. ‘साठी बुद्धी नाठी’ हा ठपका आपल्यावर लागायला नको.

 साठावं वर्ष
मागंपुढे धुकं

पावलागणिक धाकधुक

साठीपर्यंत साथ देऊन शरीर थकलेलं असतं. गुडघे ऊठबस करायला हट्टीपणा करतात. स्मरण कमी होतं. व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात त्याप्रमाणे वेगवेगळे त्रास सुरू होतात. ह्यातूनही आपला त्रास कमी व्हावा आणि घरच्यांना आपलं करण्याचा त्रास शक्यतो होऊ नये म्हणून आपणच दक्षता घेतली पाहिजे. आपल्याला काही औषधं-गोळ्या चालू असतील तर त्यांचं वेळापत्रक आपणच नीट पाळायला हवं. आपल्या हातात कुणी ते आणून देईल वा आपल्याला आठवण देईल अशी अपेक्षा करू नये. आपल्या आजारपणाचं रडगाणं गात बसू नये, आपण किती कष्ट केले ह्याचं तुणतुणंही वाजवत बसू नये. जीवनसाथीची सोबत नसल्याची खंत आपल्यापुरती ठेवावी. त्याचं सावट कुटुंबाच्या आनंदावर पडू देऊ नये.

दिवेलागण झाली की

आठवणींना पूर येतो
पहाटपर्यंत समुद्र कोरडाक्षार होतो

हे वास्तव असलं तरी सतत निराशेचा सूर न काढता सकारात्मक विचार करत कार्यरत राहिलं पाहिजे. बसल्या बसल्या कपड्यांच्या घड्या घालणं, भाजी निवडणं, घराची टापटीप राखणं ह्यांसारखी घरातली आवश्यक आणि आपल्याला झेपतील ती कामं पुरुषांनीसुद्धा जरूर करावीत. त्यात कमीपणा मानू नये. किंवा हे माझं नाही, सुनेचं काम आहे, तिनेच केलं पाहिजे, आम्ही नाही का केलं सगळं सांभाळून असं म्हणता कामा नये. तिने केलेल्या कुठल्याच कामाला नावं ठेवू नयेत. ‘भाजी खूप छान झाली होती बरं का गं’, ‘तू अमुक एक गोष्ट छानच करतेस’, अशी प्रशंसा करता आली पाहिजे. तिलादेखील थकवा येऊ शकतो, तिचीही दुखणी वगैरे असू शकतात, ह्याची जाणीव ठेवावी. फोनवर नातेवाईकांना घरातल्या तक्रारी सांगू नयेत. आपण घरात असतो म्हणून आपल्या मुलांनी त्यांच्या सुट्टीच्या दिवशी तरी घरात असावं अशी अपेक्षा करून त्यांचा कोंडमारा करू नये. आपणही यावं ना जमेल तितका फेरफटका मारून किंवा समवयस्कांबरोबर एखादी सहल करून. फुलपाखरू जसं लहानलहान फुलांतून मध चोखून घेतं, तसा लहानलहान गोष्टींमधला आनंद निरागस मनाने घेता आला पाहिजे.

थोडक्यात काय, तर आपल्या अपेक्षांचा पसारा आता आवरायला घेतला पाहिजे. नोकरीच्या किंवा घराच्या जबाबदार्यांत गुंतल्यामुळे काही छंद जोपासता आले नसतील तर ते आता जोपासता येतील. तेही काही कारणांनी आता शक्य नसेल तर नवीन छंद लावून घ्यावेत. आपल्यात एखादी कला असेल तर ती एखाद्या इच्छुकाला शिकवावी. आपल्यापेक्षा वृद्ध, असाहाय्य आणि गरजू व्यक्तींसाठी, शेजार्यांसाठी काय करता येईल, ह्याचा विचार करून तसा मदतीचा हात त्यांना द्यावा. आपण बाहेर फिरायला जात असू तर त्यांच्यासाठी ब्रेड-फळं, दूध आणायचं असं काही आणायचं असेल तर ते आणून देता येईल. त्यासाठी शेजार्यांशी संवाद मात्र हवा. हल्ली घरं लहान असतात. बगिच्याला जागा नसते. एखाद्या कुंडीत एखादं रोपटं लावून त्याची जोपासना करण्याचा, टीव्हीवर कार्टून फिल्म बघण्याचा आनंद नातवासह घेता येईल. कुठल्याही नात्यांमध्ये आपल्याकडून सुसंवाद  राखला जाईल, निदान विसंवाद होणार नाही, हे जपलं पाहिजे.

आपल्यात अजून काय करता येण्यासारखं शिल्लक आहे, ह्याचा शोध घेऊन आपली बुद्धी, कार्यशक्ती कामाला लावली पाहिजे आणि ह्याचा शोध ज्याने त्याने आपला आपण घेतला पाहिजे. आपल्या शक्यतांचा शोध एकदा का लागला की, नैत्र पैलतीरी लागले असले तरी तीर गाठेपर्यंतचा प्रवास स्वतःसाठी आणि दुसर्यांसाठीही सुखकर होईल. माझं उत्तरायुष्य मी कसं जगणार आहे, ह्याविषयी मी एका कवितेत म्हटलं आहे

मी माझ्या हिश्श्याचे

जगायचे ठरवले

तेव्हा ते म्हणाले,

‘आता काय, गोवर्या पोहचवायची वेळ झाली!’

हत्तीचे बळ आणून

सगळे नेले निभावून

तेव्हा ते म्हणाले,

‘त्यात काय, जाते एकेकाला जमून!’

घासातला घास भरवून

कधी पदराखाली तर

कधी पाठीशी घालून

वेळोवेळी जपले

तर म्हणाले,

‘त्यात काय, कर्तव्यच तर केले!’

आता मात्र हे थांबवले आहे

मनाशी काही ठरवले आहे…

एकदा शीळ घालून बघेन म्हणते,

वाऱ्यावर नाव सोडीन म्हणते,

जाईल तिथवर जाईल

यथावकाश

निवांत निळाईत विसावा घेईल..

 

-डॉ. अनुपमा निरंजन उजगरे

(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व / ज्येष्ठत्व साजरा करणारा  दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..