रविवार २३ जुलै २०१७ रोजी दिव्यांची अमावस्या आहे. राजकारणी आणि व्यावसायिक प्रायोजक यांच्या प्रभावाखाली आपण आपल्या सणांचे खूपच विकृतीकरण केले आहे. सण साजरे करताना आधी आपणच त्यात अनेक विकृती येऊ देतो आणि नंतर “ आम्हाला आमचे सण साजरे करू द्या “ म्हणून न्यायालयाच्या दारात जातो. म्हणूनच दिव्यांच्या या अस्सल मंगल मराठी सणाला आपण गटारात नेण्याचे पाप करू नये असे मला वाटते. व्यक्तिगत पातळीवर गटारी साजरी करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. पण दीपपुजेऐवजी केवळ गटारी म्हणून याला वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे, SMS, फेसबुक, whatsapp इत्यादींवर कुप्रसिद्धी मिळू नये. या वाईट गोष्टी आपण कटाक्षाने टाळाव्यात
पूर्वी या अमावास्येला मांसाहार केल्यावर तो गौरी जेवणापर्यंत बंद ठेवला जाई. कारण–
१) या कुंद पावसाळी वातावरणात मांसाहार पचत नाही.
२) हा काळ बहुतेक प्राण्यांचा प्रजनन काळ असतो. याच काळातच जर प्राण्यांची हत्या केली तर त्याचा निसर्गचक्रावरच विपरीत परिणाम होतो. त्यामुळे निसर्गपुत्र कोळीबांधव या काळात मासेमारी बंद ठेवतात. सरकारी पातळीवरूनही मासेमारीवर बंदी घालण्यात येते.
३) बाहेरच्या वातावरणामध्ये प्राण्यांच्या शरीरावर आणि शरीरात अनेक घातक जीवजंतू असण्याची शक्यता असते. शिजवतांना त्याचा पूर्ण नाश न झाल्यास त्याचाही खाणाऱ्याला त्रास होऊ शकतो.
४) वातावरणात ओलावा असतो. मांस आणि मासे नीट न ठेवल्यास ते हवेतील वाढलेल्या संख्येतील जंतूंमुळे कुजण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होते.
या काळातील मांसाहार बंदीला धार्मिक कारण दिले की तो अधिक कसोशीने पाळला जाई. साहजिकच वर्षभरात केवळ याच काळात उगवणाऱ्या आणि प्रकृतीला अत्यंत पोषक आणि दुर्मिळ भाज्या, शाकाहारामुळे आपोआपच खाल्ल्या जातात. आपला जुना धर्म आणि त्यामागील नवीन विज्ञान लक्षात घेऊन आपण आपल्याच सणांची विकृत थट्टा टाळायला हवी.
— मकरंद करंदीकर
Leave a Reply