काल नुकताच रिलिज झालेला ‘न्युटन’ हा हिन्दी चित्रपट पाहिला. आज २४ तासानंतरही या चित्रपटाने माझ्या मनात निर्माण केलेली अस्वस्थता कायम आहे, नव्हे, ती आणखी वाढते आहे.
“क्या आप निराशावादी हो?”, चित्रपटातील नायक, नायीकेला विचारतो. ती जे उत्तर देते, ते अवघं चार शब्दांचं पण त्यात चारशे पानांच्या पुस्तकाचा ऐवज आहे. ती म्हणते, “नही, मै अदिवासी हूं..!” वरवर विनोदी वाटणारं परंतू अतिशय खोल आणि गंभिर आशयाच्या त्या चार शब्दांच्या उत्तराचा मी अजुनही विचार करतोय, तरी मला काही सापडलंसं वाटत नाही. काहीतरी गवसतंय पण थोडक्यात निसटतंय, अशी काहीशी अवस्था झालीय माझी. असे अनेक छोटे, परंतू आशयाने मोठे, आणि विचार करण्यास प्रवृत्त करणारे अनेक संवाद या चित्रपटात आहेत.
नक्षलवादी प्रभावाखाली असलेल्या एका अदिवासी पाड्यात लोकसभा निवडणूकीची प्रक्रीया कशी चालते दाखवणारा हा चित्रपट आपली महान आणि पवित्र लोकशाही, ती निवडून देणारी निवडणूक व्यवस्था आणि प्रक्रिया, अदिवासी व शहरी यांमधील लोकांचा विचार करण्यातील फरक, पुस्तकी शिक्षणव्यवस्था, नागरी प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांतील मतभेद व त्यांचा एकमेकांवर कुरघोडी करायचा सततचा प्रयत्नआणि त्यात बळी पडणारा सामान्य माणूस इत्यादी मनात चीड निर्माण करणाऱ्या अनेक गोष्टींवर हा चित्रपट प्रभावी भाष्य करून आपल्याला विचार करायला भाग पाडतो. मोजकेच परंतू अर्थपूर्ण संवाद, ठराविक पात्र, ती ही बहुतेक नविनच, वास्तववादी चित्रीकरण या बाबीतर चित्रपट पुन्हा पुन्हा पाहून पुन्हा पुन्हा अनुभवाव्या अशा.
हा चित्रपट आपल्या ‘परिपक्व(?)’ लोकशाहीवर व आपल्या एकुणच सर्व ववस्थेवर पुनर्विचार करायला प्रवृत्त करतो हे नक्की. सर्वांनी हा चित्रपट मुद्दाम पाहावा असा आग्रह मी करेन..!!
— नितीन साळुंखे
Leave a Reply