नवीन लेखन...

नायगारा … निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार !

नायगाराधबधबा भुगोलात वाचला होता, वर्गात शिकविला होता. तेंव्हापासून मनात हुरहूर होती …. निसर्गाची ही चमत्कृती पहायची ! इच्छा असेल तर मार्ग सापडतो म्हणतात; पण ही म्हण झाली. प्रत्यक्षात इच्छित गोष्टी साध्य होतातच असे नाही. परिस्थितीच्या काटेरी सापळ्यात अडकलेल्यांना तर ते शक्यच नसतं. माझी परिस्थिती कांही वेगळी नव्हती. सातासमुद्रापार असलेल्या नायगाऱ्याला जायचा योग येईल हा विचारच स्वप्नवत होता. स्वप्न आणि वास्तव यात फार मोठे अंतर आहे. पण माझ्या कन्येने माझे हे स्वप्न वास्तवात आनले.

जेष्ठ कन्या – संतोषी सॉफ्टवेअर अभियंता म्हणून कॅनडाला गेली नि माझ्या इच्छेला बळकटी आली. माझ्या सेवानिवृत्तीनंतर तिने आम्हा उभय पती-पत्नीचे कॅनडाचे तिकीट बुकही केले. वाटले नायगाराने घातलेली भुरळ आता पूर्ण होईल आणि नेमके तसेच घडले. तिचा कॅनडाला येण्यासंदर्भात फोन आला नि मी तिला जणू अटच घातली ………. नायगारा दाखवायची !

हॅलिफॅक्सहून फ्लाईटने टोरेंटोला आलो. तेथून नायगाराला जाणाऱ्या यात्रीबसचे आधीच आरक्षण केले होते. सुमारे 121 किलोमीटर अंतरावरचे हे पर्यटन स्थळ गाठण्यासाठी साधारण दोन तास वेळ गृहीत धरला होता; पण माझे मन त्यापेक्षा अधिक वेगाने तिथे धाव घेत होते. कल्पनेच्या मनोराज्यात नायगाराचे चित्र रंगवित होतो. त्यामुळे वाटेतील कोणत्याच गोष्टीत लक्ष लागत नव्हते. केंव्हा एकदा धबधब्याच्या या राजाला पहातो असे झाले होते. आपणाला हवी असलेली गोष्ट लगेच मिळाली, तर त्याचे महत्व वाटत नाही. नायगाऱ्याच्या बाबतीत तसे घडले नाही. कित्तेक वर्षानंतर ही संधी आली होती. आनखी कांही वेळ थांबण्यास काय हरकत आहे, अशी मनाची समजूत काढली. वाटेत आनखी कांही स्थळे पहात गेल्याने नायगाराला पोहोचण्यास अडीच तासाहून अधिक वेळ लागला.

बस चालकच गाईडचे काम करीत होता. कांही महत्वाच्या ठिकाणी गाडी आली की त्यांची इंग्रजीत माहिती देत होता. नोव्हास्कोशिया किंवा न्यु ब्रुन्सविक प्रांतात फिरतांना रस्त्याच्या दुतर्फा हिरवी गर्द जंगले पाहिली होती. शेती कुठे दिसते का ? यासाठी नजर भिरभिरत होती. नायगाराला जाताना ही इच्छा पूर्ण झाली. टोरेंटो – नायगारा  रस्त्याच्या दोन्ही बाजुला विस्तीर्ण सुपिक व सपाट जमीन नि त्यात हिरवीगार पीके दिसली. युएस (अमेरिके) च्या सीमेलगतचाच हा भाग. गहू, ओट, बार्ली, द्राक्षे, चेरी यासारखी पीके प्रामुख्याने येथे घेतली जातात.

वाटेतल्या हेलिकॉप्टर तळावर आमची बस कांही वेळ थांबली. हौशी प्रवाशाना येथे (अर्थात तिकिटाने) हेलिकॉप्टरमधून नायगाराचे दर्शन घडविले जाते. आमच्यापैकी कांहीनी आपली ही हौस पूर्ण करून घेतलीही. पुढे कांही अंतरावर वाईन टेस्टींगचा एक अनोखा प्रकार आहे. हौशी यात्रेकरूना इथे वाईनची मोफत चव चाखावयास मिळते. अर्थात हा एक जाहीरातीचाच प्रकार असल्याचे लक्षात येण्यास वेळ लागला नाही. विविध प्रकारच्या वाईनची माहिती व चव चाखवून ती विकत घेण्यास यात्रेकरूना प्रवृत करण्याचा यामागे उद्देश असतो. वाईन टेस्टींगचा प्रकार पूर्ण होईस्तोवर आम्ही शेजारीच असलेल्या चेरीच्या बागेत मौज लुटली. आमच्या यात्रीबसमध्ये दोन भारतीय जोडप्यांची भेट झालीएक होते नागपूरचे मराठी नि दुसरे बंगळूरचे कानडी. विदेशात सुमारे दोन महिने राहून होम सिकझालो होतो. या दोन्ही कुटूंबांची भेट होताच त्यांच्याशी बोलून मन हालके नि प्रसन्न झाले. भाषाभेदापलिकडे ही कुटूंबे आपली असल्याची मनात भावना निर्माण झाली.

आम्ही नायगाराऑनदीलेक या ओंटारिओ सरोवराच्या काठावरील शहरात येऊन पोहोचलो. इथे नायगारा नदी ओंटारिओ सरोवराला येऊन मिळते. एक ऐतिहासिक स्थळ म्हणूनही याची ख्याती आहे. नायगारा धबधब्याचे जणू हे प्रवेशद्वारच ! नैसर्गिक सौंदर्याने नटलेली ही एक उद्यान नगरीच ! इथली विविध रंगी टुलिफची फुलझाडे पाहून मन प्रसन्न झाले. प्रवासाचा कंटाळा कुठल्या कुठे निघून गेला. आकाशातील ताऱ्यांनाही लाजविणारी सुंदर फुले वाऱ्याच्या झुळूकीबरोबर झुलतांना पाहून मनही आनंदाने डोलू लागले. बाहेरचं निसर्ग सौंदर्य नि दुकांनांची आकर्षक सजावट पहातच रहावी अशी होती. आवडीच्या वस्तूंची खरेदी, अल्पोपहार व सुंदर निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यात एक तास केंव्हा निघून गेला समजलेच नाही.

धबधब्याच्या दर्शनाची ओढ नि हुरहूर होतीच. नदी काठावरील सुंदर पार्कच्या शीतल सावलीतून आमची गाडी पुढे निघाली. धबधब्याच्या आधी दर्शन घडले ते नायगारा नदीचे. एका वळणावर आमची गाडी आली नि समोर गेट बंद असलेले दिसले. गेटच्या पलिकडे अमेरिकेचा व अलिकडे कॅनडाचा ध्वज फडकत होता. दोन्ही देशांची ही सीमा असल्याचे लक्षात येण्यास वेळ लागला नाही. आमची गाडी वळण घेऊन धबधब्याच्या दिशेने पुढे निघाली. अमेरिकेत जायची ओढ होतीच पण व्हीसाचे बंधन होते. दूरून का असेना निदान अमेरिकेच्या भुमीचे दर्शन घडले, यातच समाधान मानून पुढे निघालो. नायगारा वीज प्रकल्पाच्या स्वागत स्तंभाशेजारी आमची गाडी थांबली. वीज प्रकल्प पहायला मिळाला नाही, मात्र स्वागत स्तंभाची छायाचित्रे घेऊन आम्ही धबधब्याच्या दिशेने कुच केली.

***
कांही अंतरावर असतानाच धबधब्यांच्या या राजाची हाक ऐकू आली. कड्यावरून खाली उडी घेतांना मोठ्या आवाजात जणू तो साऱ्यांना बोलावित होता. आम्ही कान टवकारून ऐकू लागलो व डोळे एकवटून पाहू लागलो. दृष्टीपथात येताच पाण्याचे तीन प्रचंड प्रवाह तीन ठिकाणी खाली कोसळतांना दिसले. गाडीचा चालक वजा गाईड ध्वनीक्षेपकावरून म्हणाला,

नाऊ वुई रीचड टू दी वंडर ऑफ दी नेचर – दी नायगारा !’

त्याच्या म्हणण्या प्रमाणे निसर्गाची ही आश्चर्यकारक किमयाच होती. पार्किंगवर गाडी थांबली नि घाईघाईने ते स्वर्गीय सौंदर्य पहाण्यासाठी आम्ही जणू धावतच गेलो. समोरच अमेरिकेच्या हद्दितील दोन धबधबे कोसळत होते. उजव्या बाजूला कॅनडाच्या हद्दितील प्रचंड पाण्याचा झोत खाली उडी घेत होता. डाव्या बाजूला धनुष्याकृती पूल कॅनडा व अमेरिकेला जोडीत होता. तिन्ही धबधब्यांचे विलोभनिय दृश्य नजरेत मावत नव्हतेगाईडच्या मार्गदर्शनावरून आम्ही लिफ्टमधून कृत्रीम बोगद्यात गेलो व नदीपात्रातील होडीत बसलो. अमेरिकेचे दोन्ही धबधबे समोरच होते. उंच कड्यावरून नदी पात्रातील खडकावर ते कोसळत होते. आमची होडी तरंगत त्यांच्या अगदी जवळ गेली. धबधब्यातून उडणाऱ्या तुषारांचा अंगावर जणू वर्षावच झाला. पुढे होडीने वळण घेतले नि कॅनडाच्या हद्दितील हॉर्स शूधबधब्याच्या अगदीच जवळ नेले. धबधब्याने हॉर्स शू नाव सार्थ बनविले होते. सुसाट उधळलेल्या घोड्याप्रमाणे पाण्याचा झोत प्रचंड वेगाने खाली कोसळत होता. घोड्याच्या टाचानी उधळलेल्या धूळीने आकाशाला गवसणी घालावी त्याप्रमाणे उधळलेल्या तुषारांची आमच्यावर मुसळधार वृष्टीच होऊ लागली. धबधब्याच्या व्यवस्थापनाने होडीत बसण्यापूर्वी दिलेल्या प्लॅस्टीक रेनकोटमुळे आम्ही भिजलो नाही. परंतु नजरेसमोर अचानक गडद धुके दाटल्यासारखे झाले. धुके जितके दाट, तितकेच सुंदर; जितके निळसर, तितकेच निर्मळ. त्या धुक्यातून सूर्य दिवाळीतल्या आकाश दिव्यासारखा मोहक दिसत होता. परंतु धबधबा समोर असूनही ढगाआड लपल्यासारखा वाटला. त्यातूनही त्याचे न दिसणारे दृश्य कॅमऱ्यात टिपण्याची साऱ्यांची धडपड सुरू होती.

नदी पात्रातील त्या आगळ्या अनुभवानंतर आम्ही परत नदी काठावर आलो. तेथूनच धबधब्याचे जगावेगळे सौंदर्य डोळेभरून पाहू लागलो. एव्हाना आकाश ढगाळले नि सूर्य नजरेआड झाला. स्वच्छ सूर्यप्रकाशात धबधब्याचे दृश्य रमणीय असते असे कुणीसे म्हणाले. त्यामुळे आम्हाला प्रतीक्षा होती ती स्वच्छ सूर्य प्रकाशाची ! तोवर भोजन करण्याचे ठरवून नदी किनारीच असलेल्या हॉटेलमध्ये गेलो. हॉटेलच्या खीडकीतूनही धबधब्याचे दृश्य स्पष्ट दिसत होते. पोटाच्या भुकेपेक्षा नेत्रांची तृष्णा भागविण्याचाच आमचा प्रयत्न सुरू होता.

एव्हाना सायंकाळचे चार वाजून गेले. आकाश पुन्हा निरभ्र झाले. सूर्य पश्चिमेकडे झुकला होता. आम्ही नदी काठावरून ‘हॉर्स शूच्या अगदी जवळ गेलो. सूर्यकिरण धबधब्याच्या प्रवाहावर थयथयत होते. आकाशात झेपावणाऱ्या तुषारावरून परावर्तीत होत होते. त्यामुळे जे दृश्य पहायला मिळाले, त्याचे वर्णन शब्दात करणे कठिणच ! वर उडणाऱ्या तुषारातून सप्तरंगांच्या छटा उमटू लागल्या, जणू स्वर्गातली इंद्रधुनुष्ये त्या धुक्यात मिसळून एकरूप होऊन गेली होती. हे अपूर्व अद्भुत दृश्य पाहून मी मुग्ध झालो, तासभर पहातच राहीलो; परंतु ते विलोभनीय दृश्य डोळ्यात मावत नव्हते. ते अलौकिक सौंदर्य पाहून मन भरून आले.

‘नायगारा’…… एक नैसर्गिक चमत्कार !

श्वास रोखूनच त्याच दृश्य न्याहाळावं लागतं. उन्हाळा असो वा हिवाळा …. इंद्रधनुष्याच्या सप्तरंगात त्याच्या दिसणाऱ्या विविध छटा कल्पने पलिकडच्याच होत्या. पाठ्यपुस्तकात जगातलं हे आश्चर्य वाचल होतं. आज प्रत्यक्ष पाहिलं नि अनुभवलही ! जादुगार आपल्या पोतडीतून विविध चिजे बाहेर काढून प्रेक्षकांना थक्क करून सोडतो, त्याप्रमाणे; निसर्गरुपी गारूडीने आपल्या पोतडीतून बाहेर काढून सर्वाना थक्क करून सोडलेली ही अजब किमयाच होती; नव्हे आहेच!  माणसाच्या बुध्दीपलिकडचाच हा चमत्कार !

जुलैच्या मध्यावर आम्ही नायगारा पहाण्यासाठी आलो होतो. कॅनडा, अमेरिकेत हा काळ उन्हाळ्याचा. त्यामुळे हिवाळ्यातील गारठा किंवा पृथ्वीचे गोठलेले रूप पहाण्याचे भाग्य आम्हाला लाभले नाही. दुपारच्या ढगाळ वातावरणामुळे धबधब्याच्या सौंदर्याने मनाला तशी मोहीनी घातली नव्हती; परंतु चारच्या सुमारास सुर्याचे तेजस्वी किरण पाण्यावर पडू लागताच धबधब्याच्या सौंदर्याची जी उधळण झाली ती अवर्णनीय होती. नायगाराचा प्रचंड झोत उंचवट्यावरून खाली कोसळत होता. पात्रातील खडकावर आदळून निर्माण झालेले त्याचे असंख्य तुषार वरच्या प्रवाहापेक्षाही अधिक उंच झेप घेत होते. त्यांच्या मोहाने अतूर झालेले सूर्य किरण अवेगाने त्या तुषारांचे चुंबन घेत आणि त्यातून रंगांची उधळण होई. प्रेक्षकांच्या डोळ्याच पारणं फेडणारं हे दृश्य होतं. एखाद्या लावण्यवतीने आपला लांब केशसंभार खाली सोडावा नि तिच्या सौंदर्याने मोहीत झालेल्या सुर्यनारायणाने तिच्या केसात सप्तरंगी इंद्रधनुष्याची माळ माळावी असेच ते दृश्य ! त्यामुळेच धबधब्याला ‘रेनबो सिटी’ म्हणून ओळखले जात असावे.

रात्रीच्यावेळी धबधब्याचे सौंदर्य यापेक्षाही आकर्षक असते असे कुणीसे म्हणाले. त्यामुळे आमच्या सोबत असलेले नागपूरचे जोडपे मुक्कामास राहीले. आम्ही टोरॅंटोहून संध्याकाळचेच फ्लाईटचे तिकिट बुक केल्याने थांबता येणार नव्हते. पण रात्रीच्या प्रकाश झोतात नायगाऱ्याला पहायची हुरहूर मात्र मनात कायम होती. रात्री घरी आल्यावर वेबसाईटवर, प्रकाश झोतातील धबधब्याचे चित्रिकरण शोधून काढले. दुधाची तहान ताकावर भागविण्याचाच हा प्रकार होता. पण जे पाहिले त्याने थक्क झालो. विविधरंगी प्रकाश झोत धबधब्याच्या पाण्यावर सोडल्याने सप्तरंगी इंद्रधनुष्यच खाली कोसळत असल्याचे दृश्य दिसत होते. व्हीडिओत असे तर प्रत्यक्षात ..? मन कल्पना राज्यात गढून गेले.

मेड ऑफ दी मिस्ट – एक लोककथा

भारतातील सर्वच प्रमुख नद्यांच्यामागे एखादी लोककथा (दंतकथा) दडलेली आहे. अशीच लोककथा नायगारा धबधब्याच्या बाबतीत असेल का याचा मी विचार करीत होतो. अमेरिका, कॅनडा ही प्रगत राष्ट्रे ! विज्ञान क्षेत्रात त्यांची प्रगती उल्लेखनिय ! त्यामुळे अशा निराधार दंत कथांवर त्यांचा विश्वास नसावा, अशीच माझी भावना! त्यामुळे नदी किंवा धबधब्याबाबत अशी एखादी लोककथा प्रचलित असेल असे मला वाटले नाही. परंतु बोटीत बसून धबधब्याजवळ जाताना कुणीतरी ‘मेड ऑफ दी मिस्ट’ असा शब्दोच्चार  केल्याचे मी ऐकले. ही मेड ऑफ दी मिस्टकाय भानगड आहे हे जाणून घ्यायची ओढ लागली; अधिक चौकशीअंती ती एक लोककथा असल्याचे समजले.

लिलवल नावाच्या अमेरिकेच्या सुंदर युवतीने तारुण्यातच आपला पती गमविला. ती दु:खी झाली. एकामागून एक येणाऱ्या संक़टांमुळे ती त्रस्त झाली. आपल्या जीवनाला अर्थ नसल्याची तिची भावना झाली. एक दिवस होडीत बसून दु:खी गीत गात ती प्रवाहाबरोबर जात होती, अचानक तिची होडी एका मोठ्या लाटेची शिकार बनली. लाटेबरोबर हेलकावे खात ती धबधब्याच्या दिशेने फेकली गेली. धबब्याच्या प्रवाहाबरोबर ती खाली कोसळणार; तोच वीजेचा देव (गॉड ऑफ थंडर) हिनमने तिला अलगद झेलले. तो तिला नदीच्या तळाशी असलेल्या आपल्या घरी घेऊन गेला.

हिनमदेव आणि त्यांच्या पुत्राने तिचे सांत्वन केले. त्यांच्या सहवासात ती आपलं दु:ख विसरली नि आनंदाने राहू लागली. दरम्यान देवपुत्रावर तिचे प्रेम बसले. त्या दोघांनी लग्नही केले. पुढे त्यांना एक गोंडस पुत्र झाला. त्यामुळे हिनमदेवाला अत्यानंद झाला. आपल्या नातवाला घेऊन देव पाण्याच्या प्रवाहाबरोबर सर्वत्र फिरू लागला. त्याला पाण्यातील व पाण्याबाहेरील चमत्कार दाखवू लागला.

एक दिवस एक विषारी सर्प नदीच्या पात्रात आला. नदीचे पाणी त्याने विषारी बनविले. त्यामुळे परिसरात रहाणारे लोक विषारी पाणी पीऊन आजारी पडले आणि कांहीजण मरणही पावले. लोकांना ठार करून त्यावर सापाला आपली उपजिविका चालवायची होती. हिनमदेवाने ही वार्ता आपल्या सुनेला (लिलवलला) दिली. त्यामुळे ती पुन्हा दु:ख़ी झाली. लोकांना या संकटातून वाचविण्याचा ती विचार करू लागली. त्यांना धीर देण्यासाठी, या संकटातून त्यांची सुटका करण्यासाठी ती पुन्हा नदीकाठावर जाण्याचा  विचार करू लागली. तसा हिनमदेवाकडे तिने आग्रहच धरला.

एक दिवस हिनमदेवाने तिला पाण्याबाहेर नेले आणि तिच्या लोकांत नेऊन सोडले. तिने आपल्या लोकांची भेट घेतली व विषारी सर्पाची माहिती दिली. विषारी पाणी शुध्द होईपर्यंत दुसरीकडे रहाण्याचा तिने सल्ला दिला. लोक दुसरीकडे रहावयास गेले. हिनमदेवाने तिला परत आपल्या घरी नेले.

कांही दिवसानंतर तो विषारी सर्प परत गावात गेला. निर्मणुष्य झालेले गाव पाहून त्याला राग आला. क्रोधाने फुत्कारत लोकांच्या शोधार्थ तो नदीच्या काठावरून जात होता. हिनमदेवाने त्याचा आवाज ऐकला. धबधब्याच्या तुषारातून वर जाऊन कडकडाटासह त्याने सापावर वीजेचा मारा केला. त्यात सर्प गतप्राण झाला नि त्याचा मृतदेह वरच्या भागात अर्धवर्तुळाकार पडला. त्याबरोबर नदीच्या पात्रातील कांही पाणी अडवले जाऊन दुसऱ्या बाजूने वाहू लागले. एका उंच कड्यावरून ते खाली कोसळू लागले. यालाच हॉर्स शू धबधबा म्हणतात.

या प्रचंड प्रवाहात आपले घर व मुले वाहून जातील या भितीने देवाने आपल्या सुनेला व मुलाला आपल्याबरोबर येण्यासाठी हाका मारल्या. मुलगा आपली पत्नी व मुलासह देवाच्या मागून आकाशात गेले व तेथेच राहू लागले. धबधबा खाली कोसळताना जो मोठा आवाज करतो, तो आवाज म्हणजे हिनमदेव व त्याच्या कुटूंबाला परत येण्यासाठी धबधब्याने मारलेली हाक आहे, असे लोक मानतात.

‘नायगाऱ्या’चा भुगोल

सुपेरिअर, मिशीगन, ह्युरन, एरी या सरोवरांचा उपसा म्हणजेच नायगारा नदी. एरी सरोवरापासून ओंटेरिओ सरोवरापर्यंत 35 मैल (56 किलोमीटर) ही नदी उत्तरेला वाहत जाते. कॅनडा व अमेरिका देशांची सीमा नायगारा नदीच्या मध्यातूनच आहे. कॅनडातील ओंटेरिओ व अमेरिकेतील न्युयॉर्क राज्ये या नदीमुळे वेगळी झाली आहेत. उत्तर अमेरिका खंडातील जलविद्युत निर्मितीचे ही नदी मुख्य स्त्रोत बनली आहे ! नदी आपल्या प्रवाहाच्या अर्ध्या वाटेत आल्यानंतर उंच कड्यावरून खाली झेप घेते व नायगारा धबधबा तयार होतो. याच ठिकाणी नदीच्या दोन्ही काठावर नायगारा शहरे वसली आहेत.

कॅनडा व अमेरिकेच्या अंतरराष्ट्रीय सीमेवरील हॉर्स शू फॉल्स, अमेरिका फॉल्स, ब्रिडल व्हेल फॉल्स या तीन धबधब्याना एकत्रितपणे नायगारा धबधबा असे नाव आहे. हॉर्स शू फॉल्स कॅनडाच्या सीमेत आहे, अमेरिका फॉल्स पूर्णपणे अमेरिकेच्या हद्दीत असून तो गोट आयलॅंड बेटाने वेगळा झाला आहे. ब्रिडल व्हेल फॉल्स सुद्धा अमेरिकेच्याच भूभागात आहे. लुना आयलॅंड बेटामुळे तो इतर धबधब्यापासून वेगळा झाला आहे.

—   मनोहर (बी. बी. देसाई)

बी. बी. देसाई
About बी. बी. देसाई 23 Articles
लेखन : पुनर्वसन कादंबरी, ‘मला भावलेला कॅनडा’ प्रवास वर्णन प्रकाशनाच्या वाटेवर, दैनिक "सकाळ' व "बेळगाव वार्ता'मधून विविध विषयांवर 20 वर्षे लेखन, ज्वाला, जिव्हाळा, अमरदीप दिवाळी अंकातून कथा, लेख व कविता प्रसिद्ध, अमरदीप दिवाळी अंकाचे सात वर्षे संपादक म्हणून कार्य हव्यास : लेखन, वाचन, विविध विषयांवर व्याख्याने, सामाजिक कार्यात सहभाग
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..