ऑन सायनींग सेकंड इंजिनियर अमेरिकेच्या फिलाडेल्फिया पोर्ट मध्ये जहाज पोहचल्या पोहचल्या जॉईन झाला. ऑफ सायनिंग सेकंड इंजिनियर जहाज निघायच्या तासभर अगोदर हँडींग ओव्हर करून जहाजावरुन उतरला. संध्याकाळी डिनर झाल्यावर स्मोक रूम मध्ये गप्पा मारत असताना कॅप्टन ने सेकंड इंजिनियरला विचारले तुम्ही मिसेसला सोबत आणणार होते असा मेसेज आला होता नंतर पुन्हा एकटेच येतायत असा मेसेज आला, असा कोणता प्रॉब्लेम आला ऐनवेळी की मिसेस जॉईन नाही करू शकल्या.
सेकंड इंजिनियर म्हणाला की सर तिला यू एस विजा नाही मिळू शकला. विजा इंटरव्यू च्या निर्धारित वेळेत ती पोचू शकली नाही, पण ऑफिस ने सांगितले की पुढल्या पोर्ट मध्ये तिला आम्ही पाठवून देऊ. कॅप्टन म्हणाला की आपण इथून नायजेरियाला जाणार आहोत, आणि मला नाही वाटत की कंपनी तिकडे तुझ्या मिसेसना पाठवेल. तसंही महिनाभर आता कोणाचे साइन ऑफ किंवा जॉइंनिंग नाहीये त्यामुळे एकटीला पाठवण्याची शक्यता कमीच आहे. कॅप्टन च्या अशा बोलण्याने सेकंड इंजिनियर थोडासा नाराज झाला.
वयाची पन्नाशी गाठलेल्या थर्ड इंजिनियरने सेकंड इंजिनियर कडे बघून समजुतीच्या सुरात सांगितले की सेकंड साब तुम्ही तुमच्या मिसेस ना नायजेरियातील पोर्ट मध्ये जहाजावर येण्यासाठी आग्रह करू नका. थर्ड इंजिनियर पुढे सांगू लागला की, 2007 साली जेव्हा मी दुसऱ्या कंपनीत काम करत होतो तेव्हा आमच्या जहाजावर एकोणतीस वर्षाचा तरुण चीफ ऑफिसर होता. चीफ ऑफिसर चे लग्न झाल्यावर दोन महिन्यातच त्याला जहाजावर जॉईन करायला सांगितले, जिब्राल्टर पोर्ट मध्ये त्याने त्याच्या बायकोसह जहाज जॉईन केले. चीफ ऑफिसरची बायको अत्यंत देखणी आणि सुंदर तर होतीच पण स्वभावाने सुद्धा खूप नम्र व सालस होती. जहाजावर चीफ इंजिनियरची बायको आणि त्याची पंधरा वर्षाची मुलगी आणि दहा वर्षाचा मुलगा अगोदर पासूनच असल्याने चीफ ऑफिसरची बायको पहिल्यांदा जहाजावर येऊन सुद्धा दोन एक दिवसातच रमून गेली. चीफ इंजिनियरची बायको वयाने मोठी तर होतीच पण स्वभावाने सुद्धा चांगली होती चीफ ऑफिसरला मुलाप्रमाणे आणि त्याच्या बायकोला सुनेसारखी वागवतेय असं सगळ्यांना वाटायचे. चीफ इंजिनियर मद्रासी तर चीफ ऑफिसर बंगाली. जहाजावर पहिल्यांदाच एकमेकांना भेटले होते. कोणतेही नाते नाही की काही अगोदरची ओळख नाही पण एकाच कुटुंबातील असल्यासारखे दोन्हीही फॅमिली एकमेकांशी जहाजावर वागत होते.
जहाज फ्रान्स आणि स्पेनच्या पोर्ट मध्ये त्यावेळेस आलटून पालटून ये जा करत होते. सुमारे दोन महिने जहाज पोर्ट मध्ये गेल्यावर चीफ इंजिनियर आणि चीफ ऑफिसर दोघांचीही बायका मुलं तिथल्या शहरात जाऊन फिरून यायचे, ड्युटी अड्जस्ट कधी चीफ इंजिनियर त्यांच्या सोबत जायचा तर कधी चीफ ऑफिसर. चीफ इंजिनियर च्या मुलांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होणार असल्याने स्पेन मधील एका पोर्ट मधून चीफ इंजिनियरने त्याची बायको आणि दोन्हीही मुलांना घरी पाठवून दिले. चीफ ऑफिसरच्या बायकोच्या डोळ्यातून त्या तिघांना निरोप देतांना अश्रु तरळत होते. तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत चीफ इंजिनियरची बायको जहाजावरून उतरून खाली उभ्या असलेल्या लहानशा बोट मध्ये जाऊन बसली. लहानशी बोट दिसेनाशी होईपर्यंत चीफ ऑफिसरची बायको तिच्याकडे बघत बसली.
पुढील आठ दिवसांनी जहाज नायजेरियाच्या दिशेने निघाले. चीफ ऑफिसरची बायको तिचा लहान भाऊ अपघातात मरण पावल्याने तिच्या आईवडिलांसाठी एकमेव आसरा होती. फ्रान्स आणि स्पेन च्या पोर्ट मध्ये गेल्यावर तिथल्या सायबर कॅफे मध्ये जाऊन स्काईप किंवा याहू मेसेंजर वर ती तिच्या आईवडिलांशी व्हिडिओ कॉल वर संपर्क करायची. जहाजावर असलेल्या ई – मेल सिस्टीम वरून मेल करून अधून मधून मेसेज करायची. आठवड्यातून दोन तीन वेळा जहाजावरील सॅटेलाईट फोन वरून आई वडिलांशी चार पाच मिनिटे बोलायची. जहाजावरील इतर अधिकारी किंवा खलाशी तिच्याशी कसे सौजन्याने व आदराने वागतात. जहाजावरील वयाने लहान तसेच मोठे व्यक्तीसुद्धा तिच्याकडे नजर वर करून पाहात नाहीत असं सगळं सगळं ती तिच्या आईवडिलांना सांगत असे.
नायजेरियन पोर्ट चार दिवसाच्या अंतरावर असताना एके दिवशी सकाळी तीने तिच्या घरी फोन लावला असताना पलीकडून आईच्या हुंद्क्याचा आवाज ऐकल्यावर तिच्या पोटात गोळा आला ब्रिजवरून फोन लावला असल्याने चीफ ऑफिसर तिथेच होता त्याने तिच्या चेहऱ्यावरील भाव ओळखले आणि लगेच फोनचा रिसिव्हर हातात घेतला. त्याच्या सासूने त्याला सांगितले की आताच पंधरा मिनिटांपूर्वी त्याच्या सासऱ्यांना हार्ट अट्याक आला आहे, शेजारच्यांनी लगोलग गाडीची व्यवस्था करून त्यांना हॉस्पिटल मध्ये नेले आहे.
चीफ ऑफिसरने कॅप्टनला कॉल केला आणि कंपनीला पुढील पोर्ट मधून घरी पाठवण्याची व्यवस्था करण्याची विनंती केली. कॅप्टन ने कंपनीत मेसेज करून फोन सुद्धा केला आणि जहाज पुढील चार दिवसात नायजेरियातील पोर्ट मध्ये पोहचणार आहे त्याचे सर्व डिटेल्स केले. नायजेरियातील पोर्ट मध्ये पोहचे पर्यंत चीफ ऑफिसरची बायको दिवसातून चार वेळा घरी फोन करायची पण तिच्या वडिलांची तब्येत फारशी समाधानकारक नाहीये असं ऐकून रडत बसायची. जहाज पोर्ट वर पोहचायच्या एक दिवस अगोदर कंपनीकडून मेसेज आला, की चीफ ऑफिसर साठी रिलिव्हर उपलब्ध नाहीये त्यामुळे त्याला सोडता येणार नाही. चीफ ऑफिसरला त्याच्या बायकोला एकटीने नायजेरियन पोर्ट वरून घरी पाठवण्याचा निर्णय घेण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता.
जहाज सकाळी पोर्ट मध्ये पोहचले, रात्रीची फ्लाईट असल्याने दुपारी एक लहानशी बोट चीफ ऑफिसरच्या बायकोला घेण्यासाठी जहाजाच्या जवळ येऊन उभी राहिली. लहानशा बोटी मधून जवळच्या जेट्टीवर चीफ ऑफिसरच्या बायकोला नेण्यात येणार होते आणि तिथून तीन तास ड्राइव्ह केल्यानंतर जवळच्या एअरपोर्ट वर सोडण्यात येणार होते. खाली आलेल्या बोटीत चार काळे कुट्ट नायजेरियन उभे होते त्यापैकी दोघे जण पोलीसचा युनिफॉर्म घातलेले होते एकजण बोट चालवणारा तर एकजण कंपनीचा एजंट होता. चीफ ऑफिसर ने कॅप्टन ला विचारले रायफलधारी पोलीस कशासाठी आले आहेत त्यावर कॅप्टनने सांगितले सुरक्षिततेसाठी कंपनीने तशी सोय केली आहे, एजंट आणि तुझी मिसेस एअरपोर्टला पोहचेपर्यंत ते सोबत असतील. चीफ ऑफिसरची बायको रडत रडतच जहाजवरून उतरली. चीफ ऑफिसर ने तिला दिल्ली एअरपोर्ट वरून कोलकात्याला जाणाऱ्या फ्लाईट मध्ये बसण्यापूर्वी दिल्लीतून ई – मेल करायला सांगितला तसेच दिल्लीला पोचल्याबरोबर भारतातील सिमकार्ड फोनमध्ये टाकून फोन चालू ठेवण्यास सांगितले. फ्लाईट लॅन्ड झाल्यावर तो तिला फोन करणार होता. कॅप्टन ने एजन्ट कडून त्याचा नंबर घेतला व जमल्यास चीफ ऑफिसर च्या बायकोला नायजेरियातील स्थानिक सिमकार्ड घेऊन द्यायला सांगितले. कॅप्टन ने चीफ ऑफिसर च्या बायकोला स्थानिक सिमकार्ड मिळाल्यास फ्लाईट डिपार्चर व्हायच्या पहिले जहाजावर फोन करण्यास सांगितले.
दुपारी साडे तीन वाजता चीफ ऑफिसरची बायको जहाजावरुन गेली तिची कनेक्टिंग फ्लाईट रात्री अकरा वाजता दिल्लीकरिता दुबई मार्गे होती तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सात वाजता दिल्लीला पोहचून पुढे रात्री दहा वाजता कोलकात्याकरिता पुढली फ्लाईट होती. संध्याकाळी साडे सात वाजता एजंट चा कॅप्टनला फोन आला की त्याने मॅडमना एअरपोर्ट वर सोडले, कॅप्टन ने एजंटला सांगितलं की मॅडम चे आणि माझे बोलणे करून दे. त्यावर एजंट म्हणाला की शहरातील ट्राफिक मुळे उशीर झाल्याने त्याला मॅडम करिता सिमकार्ड घेऊन देता आले नाही तसेच मॅडम एअरपोर्ट मध्ये चेक इन काउंटर पर्यंत पोहचली असल्याने आता त्यांच्याकडे फोन देता येणे शक्य नाही. कॅप्टन ने चीफ ऑफिसर ला एजंट च्या फोन बद्दल कल्पना दिली आणि उद्या दिल्लीला फ्लाईट पोचण्याच्या वेळेनंतर मिसेस ला कॉल करायला सांगितले.
दुसऱ्या दिवशी भारतीय प्रमाण वेळेनुसार विमान लँड होईल त्या वेळेपासून चीफ ऑफिसर जहाजावरील मेल सिस्टीम वर बायकोचा मेल येईल याकडे डोळे लावून बसला होता आणि दर पाच मिनिटांनी तिच्या मोबाईलचा नंबर डायल करत होता दर अर्ध्या तासाने कॅप्टन सुद्धा चीफ ऑफिसरला बायकोशी संपर्क झाला की नाही हे विचारत होता. दिल्लीला विमान पोहचून कोलकात्याला जाणाऱ्या फ्लाईट ची वेळ झाली तरी बायकोचा मेसेज नव्हता की तिचा फोन सुद्धा लागत नव्हता. रडकुंडीला आलेल्या चीफ ऑफिसर ला कॅप्टन ने समजावले की कदाचित तिला एअरपोर्ट वर मेल करण्याची सुविधा नसेल मिळाली तसेच फोन मधील सिमकार्ड काही महिने रिचार्ज आणि वापरल्याविना बंद झाले असावे. कोलकात्याला तिचे काकांना कळविले आहेस त्यामुळे आणखी एक दीड तासाने त्यांना कॉल कर.
दीड तासाने चीफ ऑफिसरने त्याच्या बायकोच्या सासऱ्यांना कॉल केला त्यावर त्यांनी फ्लाईट आताच लँड झाले आहे तिला बाहेर यायला अर्धा तास जाईल तेव्हा पुन्हा अर्ध्या तासाने कॉल करा. एक एक क्षण कसाबसा घालवल्यावर चीफ ऑफिसरने पुन्हा एकदा त्याच्या चुलत सासऱ्याला फोन केला. पलीकडून घाबऱ्या घुबऱ्या आवाजात रिप्लाय आला की, त्याची बायको फ्लाईट मध्ये दिल्लीहून चढालीच नाही.
कॅप्टन चीफ ऑफिसर च्या मागेच उभा होता, चुलत सासऱ्याचे शब्द ऐकून चीफ ऑफिसरचे अवसान गळाले. कॅप्टन ने त्याच्या हातातून रिसिव्हर काढून घेतला आणि पलीकडे त्याच्या सासऱ्यांना एअरपोर्ट पोलीस कडे जायला सांगितले. कोलकाता दिल्ली, दुबई ते दिल्ली आणि नायजेरियातून दिल्लीला येणाऱ्या फ्लाईट चे डिटेल्स देऊन चौकशी करायला सांगितले.
कॅप्टन ने अगोदर एजंट आणि नंतर तिथल्या स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला तर त्यांनी एवढीच माहिती दिली की एजंट ने चीफ ऑफिसर च्या बायकोला एअरपोर्ट वर नेऊन सोडले. परंतु या सर्वांची खातरजमा करण्यासाठी तिथल्या एअरपोर्ट वर cctv कॅमेरे नसल्याची धक्कादायक बातमी कॅप्टन ला समजली. नायजेरियातील एअरपोर्ट हे लहान तसेच त्यांच्या मागास देशाप्रमाणे अत्यंत अविकसीत असल्याने cctv किंवा इतर सुविधा ह्या अभावानेच दिसून येतात.
चीफ ऑफिसर ची बायको भारतात पोहचली नसल्याची बातमी संपूर्ण जहाजभर पसरली. चीफ ऑफिसर ने तिला एकटीला जाऊनच नको द्यायला पाहिजे होते. नायजेरियात खूप गरिबी आहे, रस्त्यावर गुंड आणि माफिया शस्त्र आणि बंदुकीच्या धाकावर खुलेआम लूटमार करतात, अपहरण करतात अशी कुजबुज व्हायला लागली. एवढी देखणी आणि सुंदर स्त्री अशा देशात बघून तिचे कोणीही अपहरण करेल आणि पैशांच्या मोबदल्यात तिचं काहीही बरेवाईट करतील. ज्या देशात त्यांच्याच महिला सुरक्षित नाहीत तिथे परदेशातील एकट्या स्त्रियांची काय अवस्था करतील इथले गुंड.
चीफ ऑफिसर हवालदिल होऊन स्वतःला दोष देत रडायला लागला होता. कॅप्टन ने काही वेळाने त्याच्या चुलत सासऱ्याला पुन्हा फोन केला असता त्यांनी सांगितले की त्यांची पुतणी दिल्लीला पोहोचलीच नाही. नायजेरिया मध्ये तिने चेक इन केलेच नाही.
तेवढ्यात सेकंड मेट कॅप्टन जवळ आला आणि म्हणाला सर जहाजाच्या दिशेने एक लहान बोट येत असून त्यांना जहाजावर प्रवेश पाहिजे असा निरोप तुटक्या फुटक्या इंग्रजी मध्ये त्यांनी पाठवला आहे. कॅप्टन ने दुर्बिणीतून खाली बोटी कडे पाहिले असता त्याला काल दुपारी चीफ ऑफिसर च्या बायकोला घेऊन जाणारा तोच बोट वाला दिसला. कॅप्टन ने त्याच्यावर दुर्बीण रोखली आहे ते लांबून दिसल्यावर त्याने बोटमध्ये असणाऱ्या अंधुक प्रकाशात एका दिशेकडे बोटाने इशारा केला. कॅप्टन ने त्या दिशेकडे दुर्बीण वळवली त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. त्याने गंभीर स्वरात चीफ ऑफिसरला बोलावून त्याच्या हातात दुर्बीण दिली. चीफ ऑफिसर ने डोळे पुसून दुर्बिणीतून पाहिले, एक काळी कुट्ट स्त्री बसली होती आणि तिच्या बाजूला त्याची गोरी पान बायको झोपलेल्या अवस्थेत एका खुर्चीवर निपचित पडून होती.
कॅप्टन आणि चीफ ऑफिसरला हे काय घडतंय ते कळेनासे झाले, दोघेही ब्रिजवरून खाली गॅंगवे आणि शिडीकडे पळत निघाले. चीफ ऑफिसरला तर शिडी उतरण्याऐवजी पाण्यात उडी घेऊन बोटीत चढू की काय अशी अवस्था झाली होती. ती जिवंत आहे का, तिला काय झाले आहे असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात उठले होते.
चीफ ऑफिसर आणि कॅप्टन दोघेही खाली बोट मध्ये उतरले. चीफ ऑफिसर त्याचे भान हरपून बसला होता. पण कॅप्टन ने त्याच्या बायकोच्या हाताची नस पकडून ती जिवंत असल्याची खात्री केली आणि चीफ ऑफिसरच्या पाठीवर आनंदाने थोपटले. नायजेरियन बोट चा तांडेल आणि उभी असलेली स्त्री दोघेही भावुक झाले होते. कॅप्टन ने त्या नायजेरियन बोट चालकाला काय घडले असे विचारले, पण बाजूला उभी असलेली नायजेरियन स्त्री बोलू लागली. काल संध्याकाळी ती जेट्टीवर तिच्या नवऱ्याला डबा देण्यासाठी आली असता तिची दोन पोलिसांसह असणाऱ्या एका व्यक्ती कडे आणि एकट्या सुंदर स्त्री कडे लक्ष गेले. दोन पोलीस आणि तो एजंट त्या स्त्रीला गाडीत बसवून गाडीबाहेर त्यांच्या भाषेत जे काही बोलले ते तुटक पणे तिच्या कानावर आले. त्यातच त्या एजंट ने दोन्ही पोलिसांना अमेरिकन डॉलर्सच्या काही नोटा दिल्या. गाडीत बसलेल्या स्त्रीला त्यांनी थंडगार सॉफ्ट ड्रिंक प्यायला दिले आणि काही मिनिटांनी ते तिथून निघून गेले. पुढे काही अंतरावर सुनसान रस्त्यावर ती गाडी उभी असलेली दिसली. दोन नायजेरियन पोलिसांसह असलेला तिसरा व्यक्ती गाडी रस्त्याच्या कडेला लावून आरामात दारू पीत बसले होते. ते तिघंही दारू पिण्यात मग्न आहेत हे बघून त्या नायजेरियन स्त्रीने जेट्टीवर असलेल्या तिच्या नवऱ्याला फोन करून बोलावले. तिने नवऱ्याला तिची कल्पना सांगून गाडी पळवून न्यायला सांगितली, रस्ता सुनसान असल्याने आणि तिघांना पण दारूची नशा चढल्याने तिच्या नवऱ्याला गाडी पळवून न्यायला फारशी अडचण आली नाही.
तिला कॅप्टन ने विचारले जर तू कालच तिला त्या तिघांच्या तावडीतून सोडवून नेले मग कोणाला कळवले का नाही किंवा आजच्या सारखीच काल का नाही घेऊन आलीस. पोलिसांच्याच हातावर तुरी देऊन त्यांचे सावज पळवून नेल्यावर तिघांची नशा एकदम उतरली आणि ते चवताळून जाऊन जिकडे तिकडे शोध घेत आहेत. त्यात हा बोट चालक पण त्यांच्यात सामील आहे की नाही याची खात्री पटल्यानंतरच रात्रीच्या अंधारात आम्ही कसेबसे जेटीवरून जहाजापर्यंत पोहचलो आहोत. इथं अपहरण नित्याचेच आहेत मग त्याची तक्रार दाखल असो वा नसो. या मॅडम च्या अपहरणात तुमच्या कंपनीचा एजंटच सामील असल्याने साधी तक्रार सुद्धा दाखल झाली नाहीये खरं म्हणजे तुम्हालाच काय कोणीसुद्धा अशी कल्पना केली नसेल कारण एजंटने मॅडमला एअरपोर्ट ला सोडले असंच तुम्ही समजून चालले होते.
अशक्तपणा आणि उपाशी पोटी असल्याने तसेच लहान बोट समुद्रातल्या लाटांवर हिंदकळत असल्याने चीफ ऑफिसरच्या बायकोला ग्लानी आली होती. जहाजावर पुन्हा आल्यावर काही वेळाने तिने डोळे उघडले आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
कॅप्टन ने कोलकात्याला तिच्या काकांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला तसेच पलीकडून काकांनी सुद्धा तिच्या वडिलांची प्रकृती सुधारली असल्याची माहिती दिली.
थर्ड इंजिनियर कडून हे सर्व ऐकून झाल्यावर नाराज झालेला सेकंड इंजिनियर उठला आणि म्हणाला थँक यू तीन साब नायजेरिया मधून नो साईन ऑफ आणि नो जॉइनिंग. माझे डोळे उघडले आता मिसेसला नायजेरियातून जहाज निघून पुढील पोर्ट मध्ये पोहचे पर्यंत समजावतो.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
B. E. (Mech), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply