धावपळीच्या आठवड्यानंतर हव्याहव्याशा वाटणाऱ्या वीकेन्डची प्रसन्न अशी शनिवार दुपार….. अर्थात आज “मॉल”ला “सदिच्छा भेट” देण्याचा प्लॅन असल्यामुळे सगळेच उत्साहात… ठरल्याप्रमाणे “हम दो हमारे दो” कुटुंब गाडीत धमाल करत करत अखेर मॉलमधल्या गर्दीत सामावून गेले….. थोडं फिरणं, चांगलासा पिक्चर, मुलांचं गेमिंग, मग भरघोस शॉपिंग, मस्तश्या रेस्टॉरंटमध्ये “उदर भरण” असा सगळा कसा अगदी “आखीव रेखीव कार्यक्रम” सुरु होता…. जेवता जेवता लक्षात आलं की इतकी खरेदी केली आणि मुलांचे “नाईट ड्रेस” घ्यायचेच राहिले… मग डिनर संपताच सगळा लवाजमा पुन्हा दुकानांत… कुठे रंग आवडत नव्हते, कधी डिझाईन खास नाही, त्यात भावा बहिणीला एकसारखे नकोत, मग यात थोडा गुलाबी रंग आहे तो मुलींचा वाटतो म्हणून मुलगा नको म्हणतो; तर हे डिझाईन फारच लहान मुलींचं वाटतं म्हणत ताई नाक मुरडते…. जेव्हा दोघानांही आवडायचं तेव्हा नेमकं आईच्या मते “मटेरीयल” चांगलं नसायचं…. अशा सगळ्या परीक्षा उत्तीर्ण करत करत “ आत्ता हेच घ्या, मग दोन महिन्यांनी पुन्हा घेऊ नवीन, तोपर्यंत नवीन कलेक्शन येईल अशी “मांडवली” करत शेवटी मुलांनी नाईट ड्रेस घेतले. “लगे हाथो” आई बाबांनी सुद्धा स्वतःसाठी नाईट ड्रेस घेऊन टाकले….. आणि अखेर तिथून बाहेर पडत शेजारच्या दुकानातून ठरलेल्या ब्रॅण्डचं आईस्क्रीम घेत “मॉलदिना”ची सांगता केली. दिवसभर “जीवाचा मॉल” करून बिचारं दमलेलं -भागलेलं कुटुंब पार्किंग कडे रवाना झालं… आणि घराच्या दिशेनी निघालं…
काही वेळानी गाडी चालवता चालवता बाबांनी आरशातून मागे बघितलं… तर दोन्ही मुलं कंटाळून झोपलेली… आईस्क्रीममुळे चिकट झालेली दोघांची तोंडं, खेळून मळलेले कपडे, हातात धरून ठेवलेली नाईट ड्रेसची पिशवी आणि चेहऱ्यावर निरागस भाव… ते बघून कसल्याश्या विचारानी तो गालातल्या गालात हसला…. बाजूच्या सीट वर बसलेल्या बायकोनी लगेच विचारलं..
“काय रे ? काय झालं ?”… असं म्हणत तिनेही मागे मुलांकडे बघितलं आणि म्हणाली..
“कसली गोड दिसतायत न ??? म्हणून हसलास होय असा खुदकन”…
“हाहा… ते तर आहेच गं !!… पण मला त्या नाईट ड्रेसची गंमत वाटली म्हणून हसू आलं !!”
“म्हणजे रे ??”
“बघ ना… आपण त्या नाईट ड्रेससाठी पाऊण तास आणि काही हजार खर्च केले… आपल्या वेळी “नाईट ड्रेस” अशी काही वेगळी संकल्पनाच नव्हती आणि असलीच तरी हा सिनेमातला किंवा उच्चभ्रू कन्सेप्ट किमान आपल्यापर्यंत तरी पोचला नव्हता… जे बनियान-टी शर्ट आणि हाफ चड्डी दिवसभर घालायचो तेच रात्री सुद्धा… दिवसभरात खेळून जर खूपच मळले असतील तर रात्री दुसरे कपडे… पण तेही तसलेच… किंवा कधीकधी “चांगले असूनही थोडे तोकडे होतायत” म्हणून एरव्ही बाजूला काढलेले कपडे “रात्रीचं कोण बघतंय“ म्हणत बिनधास्त घालायचो… तोच आमचा “नाईट ड्रेस”…..
तिलाही तिचे जुने दिवस आठवले आणि हसू आलं…
“हो रे…. आमच्याकडे सुद्धा असंच… बरेचदा तर ताईचे जुने फ्रॉक हाच माझा “नाईट ड्रेस”… कधीकधी तर मी माझा आधल्या वर्षीचा युनिफॉर्म सुद्धा वापरायचे……. आजी असेपर्यंत ती शिवायची रे मस्त कॉटनचे फ्रॉक आम्हा दोघी बहिणींसाठी… उन्हाळ्यात तर इतके मस्त वाटायचे ते !!…. अरे एकदा गंमत झाली… बाबांनी पडदे शिवायला म्हणून कापड आणलं… पण त्यांचा अंदाज बराच म्हणजे अगदी बराच चुकला…. त्यात आई आणि आजीनी पडदे तर शिवलेच… उशांना आभरे झाले… आम्हा दोघींना फ्रॉक… आणि वर दोन तीन रुमाल सुद्धा…. आई गं SS…एकदम “वागळे की दुनिया” सारखं…. आठवतेय न सिरीयल??…तसंच विचित्र वाटायचं… म्हणून ते फ्रॉक दिवसा घातलेच नाहीत कधी आम्ही… पण आम्ही दोघींनीही ते फ्रॉक कितीतरी महिने वापरले….. “नाईट ड्रेस” म्हणून….. आमचंही कारण तेच “रात्रीचं कोण बघतंय”… हाहाहाsssss..”
“हो होss.. येस्स….. उन्हाळ्यावरून आठवलं… आई बाजारातून मलमलची पांढरी कुडती आणायची आम्हाला तेव्हा…. रस्त्यावर बसलेले असायचे विकायला…. धुतल्यावर आटायची म्हणून एक साईझ मोठीच आणायची…कितीतरी उन्हाळी सुट्ट्या त्या कुडत्यांवर घालवल्या आम्ही… आणि नाईट ड्रेस म्हणून सुद्धा एकदम सुटसुटीत वाटायचं… त्यात “लेंगा” म्हणजे आताच्या भाषेत “पायजमे” सुद्धा मिळायचे पण आम्हाला मात्र हाफ पँट नाही तर बर्म्युडाच आवडायच्या… त्यातल्या त्यात ज्याला “नाईट ड्रेस” असं म्हणता येईल ती ही मलमलची कुडतीच… म्हणजे “मलमली तारुण्य”” यायच्या आधी त्या कुडत्यामुळे “बालपणसुद्धा मलमली” होतं बर का !!”…. तो उगाच लाडीकपणे तिच्याकडे बघत म्हणाला..
“हो हो… पुरे पुरे… कधी काय बोलशील तू ????”
“हाहाss…. गंमत जाऊ दे… पण त्या त्या परिस्थितीत, त्या त्या काळात ते ते योग्यच होतं… आता मुलांच्या नशिबानी त्यांना सगळं मिळतंय तर तेही चांगलंच आहे ना !!… पण खरं सांगतो…. आज ते नाईट ड्रेस घेतल्यावर मुलांच्या चेहऱ्यावर जितका आनंद होता ना अगदी तितकाच आनंद आम्हाला अशी कुडती किंवा एखादा नवा टी शर्ट घेतल्यावर व्हायचा”….
“…….आणि आम्हाला फ्रॉक मिळाल्यावर !!”… असं म्हणत तिनी त्याचं वाक्य पूर्ण केलं…
अशा छान गप्पा चालू असताना ३-४ मिनिटांचा लांबलचक सिग्नल लागला… त्यानी गाडी थांबवली… आणि आजूबाजूची भव्य होर्डिंग बघता बघता त्याचं लक्ष बाजूलाच पुलाखाली बसलेल्या एका दाढीवाल्याकडे गेलं……. त्याच सिग्नलवर तो नेहमी काहीतरी विकत असायचा; त्यामुळे तसा ओळखीचा चेहरा होता… आता ती देखील तिकडेच बघू लागली…. त्या दाढीवाल्याची रात्री झोपण्यासाठी पथारी पसरून झाली होती… स्वतःच्या अंगात त्यानी एक जाडसा सदरा घातला आणि मग एका पुठ्या मागून एक ब्रॅण्डेड पण फाटकं, जीर्ण झालेलं जॅकीट काढून आपल्या मुलाला दिलं…. थंडीसाठी किंवा डासांसाठी असेल कदाचित….त्यांचा संवाद काही ऐकू येत नव्हता…. पण दृष्य नक्कीच बोलकं होतं….. मुलाच्या चेहऱ्यावर अगदी तसंच समाधान… तोच आनंद…. ते बापलेक त्यांचा त्यांचा “नाईट ड्रेस” घालून आता झोपण्यासाठी सज्ज होत होते…..
गाडीत नुकत्याच झालेल्या विषयामुळे हा प्रसंग खूपच अधोरेखित होत होता…. नवरा बायकोनी एकमेकांकडे बघितलं… बोलायला शब्दच नव्हते….नुसतंच स्मित हास्य केलं….पण दोघांना तितकंच दाटूनही आलं…. इतक्यात मागच्या गाडीचा हॉर्न वाजला आणि “सिग्नल ग्रीन” झाल्याचा साक्षात्कार झाला.. त्यानी गाडी पुढे नेली…. पुढच्या प्रवासात गाडीत पूर्ण शांतता…. ती डोळे मिटून शांत टेकून बसली होती…. आणि हा “आपल्या वेळचा नाईट ड्रेस, आपल्या मुलांचा नाईट ड्रेस आणि त्या पुलाखालच्या बापलेकांचा नाईट ड्रेस” या सगळ्याची सांगड घालत बसला…. त्या त्या परिस्थितीनुरूप योग्य असूनही वेगवेगळ्या दिशांना असणारे आणि कधीही न जोडता येणारे असे हे “तीन बिंदू” जोडण्याचा प्रयत्न करत राहिला…..
मनाच्या अशा “त्रिकोणावस्थेत” असतानाच घर आलं… मुलांना कसंबसं उठवत घरी नेलं…… हात पाय वगैरे धुवून झाले.. सगळं आटपलं… झोपण्याची तयारी झाली…..आणि मग “मनातला कप्पा” तसाच आवरत, पावलं आपसूकच “कपाटाच्या कप्प्या”कडे वळली….. “नाईट ड्रेस” च्या शोधात…..
©️ क्षितिज दाते.
Leave a Reply