इस्लामपूरला “आंटीने वाजविली घंटी !” नामक चित्रपटाचे (स्थानिक मंडळीं हा चित्रपट निर्माण करीत होती.) चित्रिकरण सुरू होते. (माझ्या पत्नीनेही या चित्रपटात छोटीशी भूमिका केली होती. हा चित्रपट इस्लामपूरला प्रदर्शित झाल्यावर साहजिकच स्थानिकांनी खूप गर्दी केली होती, इतकी की आम्ही हा चित्रपट पाहायला गेल्यावर चक्क हाऊसफुल असल्याने माझी पत्नी तिकीट न मिळाल्याने घरी परतल्यावर विनोदाने म्हणाली होती – ” चित्रपटातील कलावंताला त्याच्याच चित्रपटाचे तिकीट न मिळणे हे जगातील पहिलेच उदाहरण असेल.”)
निळू फुले त्यात महत्वाच्या भूमिकेत होते. प्रतिमेशी विसंगत असा हा साधा -सुधा माणुस ! गावातल्या साध्या गेस्ट हाऊस मध्ये एका खोलीत ते मुक्कामाला होते. साखर कारखान्याच्या गेस्ट हाऊस मध्ये चित्रिकरण सुरू होते.
आमच्या प्राचार्यांना (जोगळेकरांना ) वाटले -निळूभाऊंना महाविद्यालयात बोलवावे. त्यांनी सुचविले -एखादा कार्यक्रम ठेवा. नुक्तेच महाविद्यालयात एक रक्तदान शिबीर झाले होते. त्याच्या प्रमाणपत्रांचे वितरण निळूभाऊंच्या हस्ते रक्तदात्यांना करावे अशी रूपरेषा ठरली.
मी गेस्ट हाऊसवर त्यांना निमंत्रण द्यायला गेलो. त्यांनी पटकन संमती दिली. मी एक बॉक्स महाविद्यालयात ठेवला आणि कार्यक्रमाची जाहिरात केली- ” निळूभाऊ, उत्तर द्याल ! ” असे टायटल दिले आणि अपील केले – ” तुमचे प्रश्न टाका आणि निळूभाऊ उत्तर देतील.”
कार्यक्रमाच्या दिवशी विनासंकोच ते माझ्याबरोबर रिक्षेने महाविद्यालयात आले. सगळेजण,विशेषतः विद्यार्थी खूप excite झाले होते. निळूभाऊंच्या “कूली”मुळे त्यांना भेटण्याची /पाहण्याची इच्छा आमच्या परप्रांतीय /हिंदी भाषिक विद्यार्थ्यांमध्ये होती. प्रमाणपत्रांचे त्यांच्या हस्ते वितरण झाल्यावर मी माईक हाती घेतला आणि प्रश्नांना वाट करून दिली . मिश्किल पण संयत स्वरात त्यांनी इतकी सुंदर उत्तरे द्यायला सुरूवात केली की दर उत्तरानंतर टाळ्यांचा कडकडाट व्हायला लागला.
“आजच्या तरुणांबद्दल तुमचे मत काय?” या प्रश्नाला त्यांनी समर्पक उत्तर दिले.
हसत म्हणाले -” काही विरुद्ध नाही. तुमच्या वयाच्या मुलांनी जसे असायला (या वयात) हवे तसेच तुम्ही आहात. आम्हीही तुमच्या वयाचे असताना असेच होतो. तेव्हा आहात तसेच राहा.” पुन्हा टाळ्यांचा कडकडाट ! मुले (असा सपोर्ट) मिळाल्यावर चेकाळले.
‘चित्र-नाट्य व्यवसायात काय तयारी करून तुम्ही भूमिका साकारता?”
या प्रश्नावर त्यांच्या प्रतिमेशी विसंगत पण विचार करायला लावणारे उत्तर त्यांनी दिले -” जगातील/कोठल्याही भाषेतील नाट्य विषयाशी संबंधित पुस्तक माझ्या संग्रही आहे. मला वाचनाचे वेड आहे. माझी व्यक्तिगत लायब्ररी संपन्न आहे. नाटकाविषयी जे जे नवे लेखन प्रकाशित होते ते ते मी कोठूनही मिळवून माझ्याजवळ बाळगतो.”
आता आम्हाला कळलं- हे किती खोल /समृद्ध व्यक्तिमत्व आहे. म्हणून “सिंहासन “, “सोबती ” सारख्या चित्रपटात ते सहजसुंदर ,काळजाचा ठाव घेणाऱ्या भूमिका करु शकतात. ” सूर्यास्त ” सारखे नाटक साकारू शकतात.
आम्ही फक्त त्यांना “झेले अण्णा , सरपंच ,पाटील ” अशाच चौकटीत बद्ध ठेवलंय.
आजही त्या अभिजात कलावंताशी झालेला हा संवाद काळीजकुपीत जपून ठेवलाय.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply