कथा, कादंबरी, नाटक,कविता… साहित्य प्रकार कुठलाही असो त्यातील शब्द हेच महत्वाचं हत्यार असतं. या हत्याराला वाक्यांची दमदार मूठ लावली की साहित्यातली शब्दकळा फुलू लागते. प्रतिभावान लेखक कवी मग एक ओघवती भाषशैली निर्माण करतो आणि आपण त्यात गुंतून जातो. मात्र चित्रपटात फक्त अशी भाषा असून चालत नाही कारण ते दृकश्राव्य माध्यम आहे. चित्रपटात कथा कादंबरी सारखे हवे तितके वा हवे तसे वर्णन पडद्यावर दाखविणे शक्य नसते. अशावेळी अभिनेत्याने म्हटलेले संवाद आणि कॅमेऱ्याने टिपलेल्या हालचाली या चित्रपट कथेला पूढे नेत रहातात. चांगले संवाद हा चिपटाचा प्राण असतो. कारण आपण ते ऐकत असतो, बाकी तर डोळ्यानां दिसतच असतं……..आपल्या चित्रपटसृष्टीत एक मोठी समस्या आहे ती म्हणजे कलावंताना फारच लवकर “टाईपड्” केले जाते. मग या प्रभावातून बाहेर यायचे कसे? हा मोठा प्रश्न असतो. शेवटी चित्रपट व्यवसायाचा अंतीम घटक प्रेक्षकच असतो. यामुळे अनेकदा अनेक कलावंताची अभिनय क्षमता असूनही त्याच त्याच भूमिका कराव्या लागतात.
“बाई” आणि “मास्तर”…तसे सामान्य वाटणारे हे दोन शब्द आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. मात्र हे शब्द जेव्हा या अभिनेत्याच्या मुखातून बाहेर पडत तेव्हा या शब्दांची भयावह सूचकता लक्षात येत असे. ओठांची विशिष्ट हालचाल करून डोळ्यांचा तिरपा कटाक्ष समोर फेकत काहीशा बसक्या पण घोगऱ्या आवाजात जेव्हा निळू भाऊ हे शब्द उच्चारत तेव्हा हा माणूस किती पाताळयंत्री असेल याची कल्पना प्रेक्षकानां येत असे. मला तरी आज पर्यंत त्यांच्या सारखी बेरकी नजर असणारा दुसरा कलावंत डोळ्या समोर येत नाही. खरं तर तमाशा प्रधान मराठी चित्रपटातील खलनायकाची छबी पण टाईपड् झालेली होतीच. तेच ते गुरगरने, भुवया उंचावून बोलणे, मिशीवर ताव देत संवाद म्हणणे यात खलनायक अडकून पडला होता. मात्र अनंत माने यांच्या १९६८ मधील ‘एक गाव बारा भानगडी’ या तमाशापटाने एक नवा खलनायक दिला “झेल्या अण्णा”. किडकिडीत अंगकाठी, हातात धोतराचा सोगा धरून चालण्याची एक खास ढब, अंगात जाकिट अन् डोक्यावरची कपाळवर झुकलेली तिरकस टोपी. मग थेटरात होणारी काहीशी मस्तवाल एंट्री….. चित्रपटाच्या सलामीच्या दृष्यात दिसणारा हा माणूस नेमका कसा असेल याचा थांगपत्ताच लागत नाही. किंबहूना हा माणूस खल नायक असू शकेल याच्या सुतराम शक्यता वाटत नाही. त्यातील दादा साळवी, बर्ची बहाद्दर वा गुलाब मोकाशी यांच्या समोर निळू भाऊ खूपच किडकिडीत दिसले पण शेवटी बाजी मारली झेल्या अण्णाने. लोक नाट्यातुन रंगभूमि गाजवणाऱ्या कलावंताची ही पहिलीच दमदार एंट्री होती. ‘झेले अण्णा’ या नावाला निळू भाऊ व्यतिरिक्त कुणी कलावंत इतका चपखल बसू शकला असता काय?
निळू भाऊनी मराठी चित्रपटातील जुना खलनायक मोडून एक नवीनच खलनायक जन्माला घतला. त्याचे शिक्षण मॅट्रीक पर्यंतच झाले होते. गार्डनिंगचा कोर्सही केला होता. तरूणपणी पूण्यातील ‘आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज’च्या उद्यानात माळी म्हणून काम केले. याच काळात त्यांचा राष्ट्रसेवा दलाशी संपर्क आला. याच काळात त्यांना वाचनाची गोडी लागली. राष्ट्रसेवा दलाचे कला पथक हे त्यावेळी चळवळीचे मूख्य शस्त्र होते. या कला पथकात त्यांना त्यांच्या आवडीचा अभिनय करण्यास वाव होता. याच काळात त्यांनी उद्यान नावाचे एक नाटक लिहले.
नंतर १९५७ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकासाठी ‘येरा गबाळ्याचे काम नोहे’ हे वगनाट्य लिहले. या वगनाट्यात त्यांनी पहिल्यांदाच अभिनयाची चूणूक दाखविली. नंतर पुलंच्या ‘’पूढारी पाहिजे’’ या नाटकातील रोगें या व्यक्तीरेखेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नतंर ‘कथा अकलेच्या कांद्याची’ हे वगनाट्य आले आणि मग ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचले. दोन हजाराच्यावर प्रयोग झालेल्या या वगनाट्यातील भूमिकेने त्यांना चित्रपटसृष्टीची दारे खुली करून दिली.
गावोगाव हे वगनाट्य सादर करतानां निळूभाऊना आलेल्या अनुभवामुळे त्यांचा अभिनय एकीकडे समृद्ध होत गेला तर दुसरीकडे सेवादलातील संस्कारामुळे सामाजिक जाणीवेचा पिंड पोसला जाऊ लागला. उतर आयुष्यातील त्यांनी केलेल्या सामाजिक कामाचा मूळ स्त्रोत हा असा होता. १९७२ मध्ये खळबळ उडवून देणाऱ्या ‘सखाराम बाईडंर’ने त्यांना प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर नाव लौकीक मिळवून दिला. समिक्षकांनी देखील निळूभाऊच्या आशयाचे स्वागत केले. नंतरच्या चित्रपटातील व्यस्ततेमुळे रंगभूमीवरील जंगली कबूतर, बेबी, रण दोघांचे, सूर्यास्त त्यांची काहीशी मोजकीच पण दर्जेदार नाटके आली आणि त्यांच्या अभिनयाने गाजली. सत्ताधऱ्यांचा माज आणि रगेल व रंगेलपणा निळूभाऊनी असा काही उभा केला की प्रत्यक्षात ही असेच असतील का? असा सभ्रंम निर्माण व्हावा. अर्थात सत्याची किनार असलेल्या बहुतांश अशा व्यक्तीरेखा काल्पनीकच असतात. त्यांचा खलपणा त्या शिवाय स्पष्टपणे लक्षात येत नाही. हे करतानां त्यानी राजकारणी सत्ताधिशांचे खरे पैलूही नजरे समोर आणून दिले. स्त्री लंपटपणा तर ते असे अभिनीत करायचे की कधी एकदा नायक याला झोडपून काढतो याची प्रेक्षक वाट बघायचे. राम नगरकरांनी एकदा त्यांच्या विषयी आठवण सांगताना म्हटले होते की- त्यांना एकदा त्यांचे मित्र घरी जेवायला घेऊन गेले. जेवण वगैरे पार पडले. त्यांची ओळख करून द्यावी म्हणून ते बायको मुलींना बोलवायला आत गेले तर सगळेच रागात !!!! आई तर म्हणाली- कोणत्या घाणेरड्या माणसाला घरी बोलावले तू…. ‘मेला किती वाईट आहे तो तुला माहित तरी आहे का?’ ही तर त्यांच्रा कामाख्ची पावती होती. असाच प्रसंग प्राणने देखिल एका मुलाखती प्रसंगी सांगितला होता. निळू भाऊ मला मराठी चित्रपटातले प्राणच वाटतात. निळूभाऊनी ग्रामीण जीवन खूप जवळून अनुभवले असल्यामुळे त्यांचे निरीक्षणही सूक्ष्म होते. या निरिक्षणांचा चपखल वापर ते आपल्या व्यक्तीरेखेत करीत असत.
निळूभाऊनां अशा प्रकारच्या खलनायकानं बऱ्याच अंशी लपेटून घेतेले खरे पण त्यातही त्यांचा वेगळपणे ठसठशीतदिसत असे. अजब तुझे सरकार, आघात, आयत्या बिळावर नागोबा, एक गाव बारा भानगडी, एक रात्र मंतरलेली, एक होता विदुषक, कडकलक्ष्मी, कळत नकळत, गणानं घुंगरू हरवलं, गल्ली ते दिल्ली, चटक चांदणी, चांडाळ चौकडी, चोरीचा मामला, जन्मठेप, जिद्द, जैत रे जैत, दिसतं तसं नसतं, दीड शहाणे, पटली रे पटली, पिंजरा, पैज, पैजेचा विडा, फटाकडी, बन्याबापू, बायको असावी अशी, बिन कामाचा नवरा, भन्नाट भानू, भालू, भिंगरी, भुजंग, मुक्काम पोस्ट ढेबेवाडी, राघुमैना, शापित, सर्वसाक्षी, सहकारसम्राट, सामना, सोबती, सोयरीक, सिंहासन, सेनानी साने गुरूजी, सोंगाड्या, हर्या नार्या जिंदाबाद, थापाड्या अशा विविध चित्रपटातुन विविध भूमिका साकारल्या..विनोदी बाजही त्यांनी सुंदर साकारला. “पिंजरा” मध्ये तर डॉ. लागूशी टककर होती…त्यातल्या “मास्तर” एका शब्दाने त्यांनी काय काय सांगितलं होतं. यातील निळू भाऊच्या सोंगाड्याने प्रत्यक्षातल्या लोक कलावंताचे दु:ख अत्यंत प्रभावीपणे अधोरेखीत केले. मास्तच्या हातात दारूची बाटली सोपवतानांचा त्यांचा अभिनय मन हेलावून टाकणारा होता. “सामना” मध्येही दोघांचा सामना असाच रंगला. सत्ता आणि बुद्धीचा यात जबरदस्त सामना होता. यातला हिंदू धोंडेराव पाटील हा मस्तवाल व मुजोर बागायतदार निळूभाऊनी असा विलक्षण उभा केली की पूढे अनेकजण या व्यक्तीरेखेच्या प्रभावाखाली आले. याच भूमिकेसाठी त्यांना राज्य शासनाचा उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला होता. १९८२ आलेल्या “शापित” मधली छोटी पण प्रभावी भूमिका लक्ष वेधून घेते. “सिंहासन” मधला पत्रकार त्यांच्या सर्व भूमिकेपेक्षा सर्वस्वी वेगळा होता. कूली, जरा सी जिंदगी, दिशा, दुनिया, नरम गरम, प्रेम प्रतिज्ञा, मशाल, सारांश, सौ दिन सासके अशा हिंदीतही केलेल्या मोजक्याच भूमिका लक्षवेधी ठरल्या. कुली मध्ये अमिताभ समोर तितक्याच ताकदीने ते उभे राहिले.
पडद्यावरचा हा खलपुरूष व्यक्तीगत आणि सामाजिक जीवनात मात्र आदर्श नायक होता. सेवा दलाच्या संस्कारामुळे ही जाणीव त्यांनी आयुष्याच्या अखेर पर्यंत निष्ठेने जपली. रंगभूमीवरील कलावंताचा उत्तरार्ध अत्यंत क्लेशदायक असतो हे ओळखून त्यांनी व डॉ. लागू यांनी मिळून एक मोठा निधी संकलीत करून या कलावंताना दिलासा दिला.अंधश्रद्धा निर्मल्न समितीच्या कार्यात ते आवर्जून सहभागी होत. अभिनेते म्हणून दिग्दर्शकांच्या सर्व सूचना पाळणाऱ्या निळू भाऊचे स्वत:चे ही असे एक स्वंतत्र मत आणि विचारधारा होती. आणि त्यावर ते आयुष्यभर ठाम पण राहिले. त्यांचा हा गूण आभावानेच अभिनेते वा कलावंतात आढळून येतो. अतुल कुलकर्णी सारखा अभिनेता सोडता सध्या मला तरी अशी स्वत:ची ठाम वैचारिक भूमिका असलेला अभिनेता दिसत नाही. अन्ननलिकेच्या कर्करोगाने अंथरुणाला खिळून असलेल्या निळू फुले यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. याच ठिकाणी १३ जुलै २००९ रोजी पहाटे २ च्या सुमारास आपल्या सलग ४० वर्षांच्या कला प्रवासाला त्यांनी शेवटचा प्रणाम केला. त्यांची कन्या गार्गी आता त्यांचा वसा पूढे नेत आहे.
दासू भगत (१३ जुलै २०१७)
Leave a Reply