व्हिडिओतील ‘ ते ‘ आणि आपण …!
अतर्क्य घटनांनी मन सुन्न होण्याचे दिवस आले आहेत असं हल्ली सारखं वाटत राहतं .
गोष्ट कालची .
सोशल मीडियावर रेंगाळत असताना दोन व्हिडीओ पाहण्यात आले . दोन छायाचित्रे पाहण्यात आली .
आता यात अतर्क्य काय असं कुणालाही वाटेल . रोज शेकडो व्हिडीओ आणि हजारो छायाचित्रे सोशल मीडियावर धुमाकूळ असतात . त्यापैकी हे व्हिडीओ , छायाचित्रे असतील असं वाटत असेल तर ते तसं नाही .
कारण आता मी जे सांगणार आहे ते वाचून संवेदनशील असाल तर तुम्हीही अस्वस्थ व्हाल , तुमचं अंतर्मन ढवळून निघेल आणि कदाचित अंतर्मुख व्हाल .
एक छायाचित्र होतं :
झोपडीजवळ अपुऱ्या कपड्यातील एक लहान मुलगा , काहीतरी अपूर्व पहायला मिळाल्याच्या आनंदात समोर उभ्या असलेल्या सैनिकाला सॅल्युट करतो आहे . आणि समोरचा लष्करी जवान उत्सुकतेनं त्याच्याकडे पाहतो आहे .
दुसरं छायाचित्र होतं :
-५० अंश इतक्या हवामानात सीमेचं रक्षण करणारा जवान काही क्षणापुरता विश्रांती घ्यायला बसला आहे आणि बूट काढल्यानंतरचे त्याचे प्रचंड भेगाळलेले , सुजलेले तळवे असूनही चेहऱ्यावर आत्मिक समाधान आहे . होणाऱ्या वेदना त्यात झाकल्या गेल्या आहेत .
एक व्हिडिओ :
सुशिक्षित आणि मॉडर्न स्त्री , लष्करातील एका जवानाला थोबाडून काढताना दिसत आहे .
त्याचा गुन्हा काय , तर अडथळ्याच्या रस्त्यावर त्या स्त्रीला त्याने ओव्हरटेक करू दिले नाही , तिची गाडी पुढे येऊ दिली नाही याचा राग येऊन ती स्त्री त्या जवानाला मारत होती . बाकीचे जवान तिची समजूत काढत असताना ती बेमुवर्तपणे निघून जात होती .
आणखी एक व्हिडिओ :
शाळेतील लहान मुल शिस्तीत उभी आहेत . त्यांच्या हातात , त्यांच्या गावातील अठरा वर्षांपूर्वी शहीद झालेल्या जवानाला श्रद्धांजली वाहणारा बॅनर आहे . इतक्यात नऊवारी साडी नेसलेली , वय झाल्यानं कमरेत वाकलेली एक म्हातारी, त्यांना थांबवते .बॅनर वरील जवानाच्या छायाचित्राला पाण्याने धुवून पुसून काढते आणि त्याची पूजा करून निरांजन ओवाळते .
अस्वस्थ झाला असाल ना ?
काल दिवसभर मीसुद्धा त्या दोन छायाचित्रांमुळे आणि व्हिडिओमुळे अस्वस्थ झालो होतो .
निरागस मुलाना जे समजतं ,
आयुष्य संपत आल्याची जाणीव बाजूला ठेवून ,सीमेचे रक्षण करताना हौतात्म्य पत्करलेल्या जवानाला श्रद्धांजली वाहणाऱ्या त्या खेडेगावातील म्हातारीला जे समजतं,
ते त्या स्मार्ट दिसणाऱ्या स्त्रीला का समजलं नाही ?
वेग महत्वाचा ? पुढे जाण्याची भ्रामक प्रतिष्ठा महत्वाची ? की समजूतदारपणा दाखवून जवानांना पुढे जाण्यासाठी दिलेला सन्मान महत्वाचा ?
सगळं अतर्क्य वाटतं मित्रानो .
रेल्वेत पत्ते खेळण्यासाठी जागा अडवून बसलेल्या तरुणांना , शेजारी खूप समान सांभाळत उभा असलेला, अवघडलेला लष्करी जवान का जाणवत नाही ?
पूरपरिस्थितीत मदत करणाऱ्या जवानाला आपणही मदत करावी असं व्हिडीओ करणाऱ्यांना का वाटत नाही ?
भूकंपामुळे होणाऱ्या पडझडीत मदत करणारे , नैसर्गिक आपत्तीत धावून येणारे , वेळ येताच कसल्याही हवामानाची पर्वा न करता सीमेचं रक्षण करायला धावून जाणारे सैनिक आपल्या खिजगणतीत का नसतात ?
त्यांच्या बद्दल , त्यांच्या कुटुंबियांबद्दल आपल्या हृदयातला एक कोपरा जपून का ठेवत नाही ?
या प्रश्नांची उत्तरं प्रत्येकाला माहीत असतात .
ती उत्तरं सतत सजग राहावीत म्हणून या अतर्क्यतेचा प्रपंच !
खरं म्हणजे छायाचित्रं किंवा व्हिडीओचं वर्णन करताना मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला कळलंय .
खरं ना ?
चला तर , एक संवेदना जागवूया आपल्या प्राणप्रिय सैनिकांसाठी ! ?
———–
डॉ. श्रीकृष्ण जोशी ,
रत्नागिरी .
———–
नावासह शेअर करायला हरकत नाही .
KHAROKHARCH VICHAR KARANYA JOGE AAHE. AAMHALAHI JAGARUK KELET DHANYAWAD.