नवीन लेखन...

निपटारा – भाग  5

लेण्यांची उंची आणि खोलवर उतरणाऱ्या पायऱ्यांकडे आता कुठे मनोजसरांचे लक्ष गेले आणि त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्यांची चलबिचल सुरू झाली, ते परतायची घाई करू लागले, म्हणाले, “अरे, तो भत्ता बित्ता राहू द्या आता, आपण आधी खाली उतरू. मग निपट निरंजनच्या मठात हवं तर खाऊ भत्ता, पण आता निघायचं. चला चला!’

“सर, तोपर्यंत फार उशीर होईल. आम्हाला फार भूक लागली आहे. शिवाय इथे बसून भेळ खाण्यात जी मजा आहे ती खाली जाऊन त्या मठात नाही. पहा ना सर, इतक्या उंचावरून आसपासचा परिसर किती छान दिसतोय. थोड्या वेळाने अंधार पडेल, मग या आकाशातल्या चांदण्या आणि लांऽऽब, खोऽऽलवर (खोल शब्दावर मी मुद्दाम जोर दिला) पसरलेले दिवे यामधे आपण अगदी अधांतरी तरंगतोय असे वाटेल नाही? किती छान वाटतोय हा एकांत! शांत! उंचावर! सर, ‘कुणी नाही तिथं’ या नाटकाच्या तालमीसाठी आपण किती छान जागा शोधली नाही?”

सरांची आधीच घाबरगुंडी उडाली असे दिसत होते. त्यात माझ्या बोलण्याने तर ते जास्तच टरकले. पण सर्वांसमोर आपली शोभा नको म्हणून काही झालेच नाही असा उसना आव आणून ते भेळ खात होते, खात होते म्हणण्यापेक्षा ते खाण्याचे नाटकच करत होते.

एवढ्यात पायऱ्या चढून दोन गोसावडे वर आले. वळणावरून आल्यामुळे ते आम्हला आधी दिसलेच नव्हते. जणू एकदमच पुढे उभे ठाकले.

गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, कमरेला लुंगी, बाकी उघडे बंब. कपाळावर, दंडावर, हातावर, पोटावर गोपीचंदनाचे टिळे, पट्टे, कपाळावर तांबडेभडक मोठे कुंकू, हातात कमंडलू आणि त्रिशूल. काखेत कुबडी, पायात खडावा अशा अवतारात ते एकदम समोर आल्याबरोबर तर आमची दातखिळीच बसली. एक गोसावडा म्हणाला, “अरे भाई, आप लोग इस वक्त यहाँ क्या कर रहे हो? चलो भागो यहाँसे! इस वक्त ये अच्छी जगह नहीं!”

‘बाबा, आप ऐसा क्यूं कहते हो? क्या है इस जगह में? हम तो यहाँ हर रोज आते थे। दिनभर काम करते थे। आप इस वक्त यहाँ आतें हो और हमे यहाँसे जाने को कहते हो? क्यूं?’ मी म्हणाले.

“बेटी, यहाँ रुहें याने के प्रेतात्मा, भूत पिशाच्च रातको भटकते है। हम बाबाके चेले है। हमें वो कुछ नहीं करते । लेकीन आपकी बात अलग है। हम निपट निरंजन बाबाकी यात्रा में आये हैं । अब रातको यहाँही ठहरेंगे गूफामें । चलो जल्दी करो, भागो यहाँसे।”

हे ऐकून मनोज सर तर थरथर कापायलाच लागले. आमच्या ग्रुपचीही बोबडी वळली. एवढं बोलून ते गोसावी झपाट्याने निघूनही गेले.

‘अरे घाबरताय काय असे, हे गोसावडे गांजा, अफू, चरस ओढण्यासाठी अशा निर्जन जागी येतात. कुणी इकडे फिरकू नये म्हणून अशा भुताखेतांच्या अफवा पसरवतात. आपण एवढं संपवू आणि निघूच.’ मी म्हणाले.

एखादे कुत्रे मागे लागावे तसे सगळ्यांनी बका बका बोकणे भरले, पिशव्या गळ्यात अडकवल्या आणि पायऱ्यांकडे पळत सुटलो, एवढ्यात लेण्यांच्या बाजूने कुणीतरी स्त्री चा खदखदून हसण्याचा आवाज आला; तसे सगळे जागीच थबकले. सरांनी एकदम चमकून तिकडे पाहिले. तिकडे लेणीच्या पायरीवर पांढरे पातळ नेसलेली, पांढऱ्या फटक केसांची आणि पांढऱ्या फटक चेहऱ्याची एक बाई, हातात एक पांढरेफटक मूल घेऊन उभी होती. “ये रे माझ्या लाडक्या ये, मी तुझीच वाट पाहते आहे रे! ये ये. म्हणून पुढे पुढे येत होती. हळू हळू!!

मनोज सरांचा थरकाप उडाला! “कोण? कोण आहे ते?” असे ते घाबरतच म्हणाले.

“सर, काय बोलताय? तिकडे तर कुणीच नाही. कुणी नाही तिथे! तुम्हाला काहीतरी भास झालेला दिसतोय”. मी म्हणाले. त्यांनी माझ्याकडे आश्चर्याने पाहिले आणि परत आपली नजर लेण्याकडे वळवली. पण तिथे कुणीच नव्हते.

“चला! चला!! निघा पटकन!” आमची वाट न पाहता ते पायऱ्या उतरायला लागले सुद्धा! पुन्हा तोच आवाज आला आणि तीच स्त्री पुन्हा त्याच जागी! मुलाला घेऊन हात पसरून पुढे पुढे येऊ लागली. सरांचा उरला सुरला धीरही आता सुटला आणि ते पायऱ्यांवरून सुसाट पळत सुटले. त्यांच्या मागून आम्ही!!

पुढच्या वळणावर पुन्हा तोच आवाज! तीच ‘स्त्री’ आणि कडेवर तेच पांढरे मूल! सरांनी पळता पळताच ते पाहिले आणि त्यांचे भान हरपले जणू! एक तर प्रचंड उंचावरून ते धावत होते आणि अरू मागे लागली होती. ते ठेचकाळले. पडले, पुन्हा उठले आणि जीव खाऊन पळत सुटले. त्यांचा पळण्याचा वेग ऑलिंपिक वीराला मागे टाकेल असा होता. पुढच्या वळणावर पोहोचतात न पोहोचतात तर पुन्हा तेच खदखदून हसणे आणि तीच पांढरीफटक स्त्री आणि तेच मूल! प्रचंड धक्क्याने सर हादरले. आता त्यांचे विमान वाऱ्याशी स्पर्धा करु लागले. पुढच्या वळणावर एक मोठा धोंडा होता. त्याला त्यांचे विमान धडकले आणि चाळीस पन्नास फूट खोल खाली कोसळले. कपाळमोक्षच! विमानाचे बहुधा तुकडे झाले असावेत!

आम्ही धावत पळत खाली आलो. आमच्या मोटर सायकली, स्कूटर्स घेतल्या आणि तडक निपट निरंजन बाबांचा मठ गाठला. यात्रेच्या निमित्ताने तिथे दोनतीन हवालदार होते बंदोबस्ताला. आम्ही त्यांना मनोज सर पडल्याचे सांगितले. मी, प्रकाश आणि आणखी एक दोघे आणि दोन हवालदार असे आम्ही अपघाताच्या ठिकाणी आलो. आता चांगलाच अंधार झाला होता. हवालदारांच्याकडे मोठे टॉर्च होते. त्यांनी टॉर्चच्या उजेडात पाहणी केली. जिथून सर पडले तिथे खाली तीस चाळीस फुटांवर खोल खड्डा होता. त्यात मोठ मोठे दगडगोटे पडले होते. मनोजसर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. टॉर्चच्या उजेडात रक्त चमकत होते.

पंचनामा वगैरे सर्व पोलीसी प्रकार झाले. बॉडी घाटी हॉस्पिटलला पाठवली. (औरंगाबादच्या सरकारी हॉस्पिटलला लोक घाटी हॉस्पिटल म्हणूनच त्यातच असे कारण ओळखतात) आमचे सगळ्यांचे, प्रिन्सिपॉल, मालशे मॅडमसकट सगळे जाबजबाब झाले. काहीच संशयास्पद नव्हते. आम्ही रीतसर परवानगी काढूनच गेलो होतो. मालशेमॅडमनीही जबाबात सर्व तालमी आनंदाच्या, खेळीमेळीच्या वातावरणात होत होत्या आणि कोणाचेही काही भांडण तंटे नव्हते याचा निर्वाळा दिला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सिव्हील हॉस्पिटलच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये उंचावरून खाली पडल्यामुळे हृदय विकाराचा झटका येऊन मृत्यू देण्यात आले. प्रकरण अपघाती मृत्यू म्हणून दस्त झाले.

सर्व स्थिरस्थावर झाल्यावर आम्ही म्हणजे आमचा ग्रुप परिंदा मध्ये जमलो. सेलेब्रेशनसाठी!

“मधू, लेण्यांच्या पायरीवर पांढरा मेकप करून, पांढरी बाहुली घेऊन, अंधार पडू लागल्यावर आणि आपला भत्त्याचा कार्यक्रम आटपू लागल्यावर, शोभाने लेणीच्या पायरीवर येऊन खदखदून हसायचे आणि पुढे वळणावळणावर अंजू आणि अवंतिकानेही तसाच मेकप करून यायचे, वळणावळणावर मोठे धोंडे ठेवायचे हे सगळे आपल्या योजनेप्रमाणे झाले पण ते दोन भयानक गोसावडे अचानक कुठून आले? का तो केवळ योगायोग होता? काय जाम टरकलो होतो आम्ही!” शैला म्हणाली.

मी खूप हसले. नानाजींना हाक मारली. तेही हसत आले. तशी मी म्हणाले, “हा पहा गोसावी आणि हा त्याचा चेला!” आमच्या टेबलावर सर्व्ह करणाऱ्या शौकतकडे मी बोट दाखवले. दोघेही पोट धरून हसले. “अगं, दोघांना मीच आयत्या वेळी आपल्या नाटकात घेतलं. अर्थात शपथ घेऊन. तुम्हाला मुद्दामच काही बोलले नाही. कारण नाटकात थोडी जान आणण्यासाठी ते आवश्यकच होतं. काय तुमची पण उडाली की नाही घाबरगुंडी?

‘ ‘अरू’च्या दुर्दैवी मृत्यूचा काटा आम्ही असा खुबीने निपटला.

“जय निपट निरंजन!” नानाजी म्हणाले तसा हास्याचा स्फोटच झाला.

त्या वर्षीच्या राज्य नाट्य स्पर्धेत नाटकाला पहिलं पारितोषिक मिळालं. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं पारितोषिकही शैलाने पटकावलं, कॉलेजने नाटकाचं पारितोषिक मनोजसरांच्या स्मृतीस अर्पण केलं. अरूच्या स्मृतीस अर्पण करा असं आम्ही कसं सांगणार? असो.

कधी औरंगाबादला गेलात तर सगळं पहा. बिबीका मकबरा पहा. जवळच निपट निरंजन बाबांचे दर्शन घ्या पण पुढे निपट निरंजन लेण्या पहायला जाऊ नका. काही फारसे बघण्यासारखे नाही तिथे. पण उंच डोंगरावर चढायची हौस असेल तर जरूर जा, पण दिवसा उजेडी जा! फार अंधार करू नका! रात्री मनोजसर आणि अरूची रूहे तिथे भटकतात म्हणे!

-विनायक अत्रे

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 91 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..