नवीन लेखन...

निरंजन – भाग ११ – अंत अहंकाराचा

अहंकार….

अहंकार म्हणजे गर्व, गर्विष्ठपणा, स्वतःच्या श्रेष्ठत्वावर वाटणारा एक उन्मत भाव, एक वाईट स्वभाव, इतरांना कमी लेखणारे विचित्र वागणे.

कोणतीही भावना जेव्हा एखाद्या मर्यादेचे उल्लंघन करते तेव्हा ती आपल्या अखंड जीवनशैलीला असंतुलित करते. कधीकधी आपण आपल्या श्रेष्ठत्वावर असलेल्या गर्वामुळे दृष्टी असतानाही दृष्टीहीन होतो आणि आपल्या जीवाभावाच्या व्यक्तींना, जवळच्या नातेसंबंधाना क्षणात विसरतो. आपल्यातली कृतज्ञतेची जाणीव ही परिपूर्ण लोप पावलेली असते. अहंकाराच्या भावनेमुळे आपण गरज असताना इतरांकडून घेतलेली मदत, आपल्यासाठी कळत नकळत केलेले उपकार परिपूर्ण विसरुन जातो आणि आपल्या कृतघ्न भावनेमुळे इतरांचे मन दुखावतो.

प्रत्येक व्यक्ती ही कोणत्या ना कोणत्या गुणांनी, कलांनी श्रेष्ठ ही असतेच. ‘अखंड भूतलावर माझ्याइतके श्रेष्ठ कुणीच नाही’ ही भावना म्हणजे अहंकार आणि हा अहंकार तेव्हाच खंडित होतो जेव्हा आपल्यासमोर आपल्या पेक्षाही अधिक श्रेष्ठ अशी व्यक्ती उभी राहते.

एकदा असाच हा अहंकार पाच पांडवांपैकी कुंतीपुत्र भीमला झाला. भीमला आपल्या शारिरीक बळाचे फार मोठे कौतुक होते. भीमला शारिरीक ताकदीनुसार पाचही पांडवांमध्ये श्रेष्ठ मानले जात होते. इतर पाचही पांडवांमध्ये भीमचे शारिरीक बळ हे अधिकच होते. शरिरीक बळामुळे भीमचे सदैव कौतुक होत असे आणि सतत त्यांची प्रशंसा होत असे. जसजशी प्रशंसा वाढली, कौतुक वाढले तसतशी श्रेष्ठत्वाची भावना देखील वाढली आणि यामुळे मनामध्ये एक वेगळाच अहंकार निर्माण झाला.

एकेदिवशी असेच एकदा एका जंगलातून वनविहार करत असताना भीम एका मार्गाने चालत होते. त्या पाऊलवाटेमध्ये आपली शेपटी आडवी ठेवून एक वयोवृद्ध वानर आराम करीत होतं. ते वानर फार वृद्ध असल्याकारणाने शारीरिक बळाने कमकुवत देखील दिसत होते. भीमला आपल्या मार्गात आडवी आलेल्या त्या वानराच्या शेपटीची फार अडचण वाटते आणि रागही येतो. म्हणून भीम त्या वानराला अतिशय उर्मट पद्धतीने हाक मारतो आणि म्हणतो, “माझ्या वाटेतली तुझी ही आडवी आलेली शेपटी बाजूला घे, मला इथून पुढे जायचे आहे. वानर हे सर्व शांत पणे ऐकुन घेते आणि शांतपणे भीमला म्हणते “मला क्षमा करा, मी फार आजारी आहे आणि त्यामुळे माझ्यात इतकी देखील शक्ती नाही कि मी माझी ही शेपटी उचलून बाजुला घेऊ शकेन, आपली काहीही हरकत नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे कि आपणच ती बाजूला करुन निघून जावे”, यावर भीमला पुन्हा एका क्षणासाठी अतिशय राग येतो. पण आपल्या शक्तीवर असलेल्या गर्वामुळे आपल्या समोर घडत असलेल्या या प्रकाराबद्दल कोणतीही जाणीव, कोणतीही कल्पना त्याला होत नसते.

आपल्याही जीवनात कधीकधी असेच घडते. भीमदेखील आपल्या शक्तीमुळे गर्विष्ठ झालेला असतो. त्यामुळे त्यालाही कसलीही जाणीव होत नाही. तो त्या वानराची शेपटी उचलण्यासाठी पुढे सरसावतो. आपली गदा खांद्यावरून खाली उतरवतो. आणि त्या वानराच्या शेपटीला त्या गदेवरती घेतो. पण त्यावेळेला ती शेवटी भीम ला फारच जड वाटते. तो पुन्हा ती उचलण्याचा प्रयत्न करतो पुन्हा तेच घडते ही शेपटी भीमला जड भासते कारण शेपटी खरोखरच जड असते. कारण वानर हे काही साधेसुधे नव्हते वानराचे रूप घेणारे भगवंत हे साक्षात श्री राम भक्त हनुमान होते आणि ते भीम च्या गर्विष्ठपणा चा नाश करण्यासाठी आलेले असतात. आपल्या शारीरिक शक्ती वर झालेला अहंकार मोडून टाकण्यासाठी भग्वंत या अवतारामध्ये भीमच्या समोर आलेले असतात. भीमची परीक्षा घेण्यासाठी आलेले असतात. भिम शेपटी उचलण्याच्या प्रयत्नांमध्ये फार घामाघूम होतो. पण शेपटी मात्र किंचीतशी देखील हललेली नसते. भिमला यावर फार राग येतो आणि या रागामुळे त्याचे प्रयत्न देखील वाढतात. पण त्या प्रयत्नांना यश मात्र येत नाही. परंतु भीम ने आपले संपूर्ण शारीरिक बळ एकवटून यासाठी लावलेले असते. थोड्यावेळाने भीम दमतो. तो त्या वानराकडे बघतो आणि खाली बसतो. कोणत्यातरी विचाराने तो त्याच्याकडे एकटक पाहतच बसतो. आपले चहू दिशेला कौतुकास्पद असलेले शारीरिक बळ इथे कमी पडले याची त्याला जाणीव होते आणि त्याचा मनोमन असलेला अहंकार हा मोडून पडतो. त्याला याचीही जाणीव होते की हे वानर काही साधेसुधे नसून परम शक्तिशाली आहे. भीम त्या वानरापुढे हात जोडून उभे राहतात, त्यांची क्षमा मागतात आणि नम्र भावनेने त्याला म्हणतात, “भगवंत, तुम्ही कोणती शक्ती आहात हे मला दर्शवावे,  माझी फार मोठी चूक झाली आहे,  मला माझ्या अहंकाराची जाणीव झाली आहे. मला माझ्या शक्तीचा गर्व होता आणि तीच शक्ती आज कमी पडली आहे,  तुमच्यामुळे मी माझ्या या अवगुणाला ओळखू शकलो,  तुम्ही मला आता आपले दर्शन द्यावे. हे ऐकून श्री राम भक्त हनुमान आपल्या सिद्ध अवतारात प्रकट होतात.

भीम हे सर्व पाहत असतात. त्यांना खूप मोठे आश्चर्यही वाटते. आणि मनोमनी प्रसन्नता सुद्धा….., भीम त्यांचे सद्भावनेने दर्शन घेतात आणि वचन देतात की यापुढे मी कधीही आपल्या शक्तीचा गर्व बाळगणार नाही. मला क्षमा करावी भगवंत… यावर तथास्तु बोलून श्री राम भक्त हनुमान अंतर्धान पावतात.

अहंकारामुळे आपण फक्त नातेसंबंध नाही तर आपल्यातली माणुसकी सुद्धा संपवतो. अहंकार हा व्यक्तीमध्ये क्रोध निर्माण करतो. ईर्ष्या निर्माण करतो. सूड भावना निर्माण करतो. या भावनांमुळे आपण मनाने सबल बनत नाही तर दुर्बल बनतो. आणि दुर्बल मनाची व्यक्ती काय योग्य आहे आणि काय योग्य आहे हे समजण्यासाठी सक्षम नसते. सबल मनाची व्यक्ती ही सदैव आपल्या मनामध्ये आदर, नम्रता, संवेदनशीलता, सहानुभूती, सहनशक्ती, क्षमा भाव बाळगून असते.

अशी ही कथा आपल्याला शिकविते की कधीही गर्व करू नये. अहंकार बाळगू नये.

— स्वाती पवार

Avatar
About स्वाती पवार 57 Articles
मी स्वाती... स्वतःला आनंद मिळतो म्हणुन लिहिणारी....... माझे "निरंजन" या लेखसंग्रहातुन दैनंदिन जीवनातल्या वेगवेगळ्या विषयांवर लेखन... या लेखनामधील निवडक लेखरचना या "|| ॐश्री ||" या ध्यानकेंद्रातील व्याख्यानमालेमधल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..