आलोकनाथ नावाची एक श्रीमंत व्यक्ती एका शहरात राहत होती. ठिकठिकाणी व्यापाराने जोर धरल्यामुळे संपत्ती विषयी कोणतीही चिंता नव्हती. आलोकनाथांवर लक्ष्मीचा परिपुर्ण आशिर्वाद होता. स्वभावानेदेखील ते परोपकारी आणि साधे होते. पण एक मात्र गोष्ट होती की, त्यांना स्वतःचं कौतुक ऐकायला फार आवडे. नावलौकिक कसा होईल यासाठी ते सदैव प्रयत्नात असत. भविष्यासाठी कुठेतरी संपत्तीला जपणं देखील फार महत्त्वाचं आहे हे त्यांना कधी महत्वाचे वाटत नसे असे हे आलोकनाथ एका विद्वान अश्या महाराजांना आपले गुरु मानत असत. त्या गुरूंनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचे ते पालन करीत, प्रत्येक निर्णय विचारुन अमलांत आणत. सोबतच कोणत्याही समस्येला दुर करण्यासाठी ते गुरुंकडुनच मार्ग घेत असत.
माता लक्ष्मीची आपल्यावर एवढी कॄपा असल्यामुळे ही संपत्ती आपण सत्कार्यी लावावी अशी त्यांची इच्छा झाली. म्हणुनच आपल्या नगराबाहेर त्रिमातेचे एक मंदिर बंधायचे असे त्यांना मनोमन वाटले, जेणेकरून त्याच्याजवळच अगदी कमी मोबदल्यात सामन्यांना अन्न-पाण्याची तसेच राहाण्याची सोय होईल. तसेच या निमित्ताने ठिकठिकणांहुन दर्शनासाठी आलेल्या साधुसंतांची देखील सेवा करता येईल. तेथेच लोकांना उपचारासाठी एक प्रथोमोपचार केंद्र सुरू करावे जेणेकरून पुण्याईचा वाटाही तयार होईल. अशी सुंदर कल्पना घेऊन आलोकनाथ आपल्या गुरूंकडे गेले आणि त्यांनी याविषयी आपल्या गुरूंकडे आपल्या मनातले सर्व विचार मांडले.
गुरुजींनी सर्व काही ऐकुन घेतले आणि सांगितले की एकच मंदिर का? अरे नाथा दोन मंदिरे उभी कर. एक नगराबाहेर आणि एक तुझ्या राहत्या नगराच्या केंद्रस्थानी. जेणेकरून तुला सुध्दा मातेचे दर्शन जवळच होईल. आणि तू अश्याच प्रकारे परोपकार करण्याची प्रवृत्ती कायम ठेवशील. गुरुजींनी सांगितलेल्या कल्पनेला त्याने सत्यात उतरवण्याचे ठरवले आणि त्यांनी गुरुजींना नमस्कार केला आणि आशीर्वाद घेऊन ते तेथून निघून घरी आले. दोन्ही ठिकाणी मंदिराच्या बांधकामाच्या तयारीला सुरुवात झाली. नगरातील लोकांना हे कळल्यावर त्यांनाही अतिशय आनंद झाला. काही महिन्यांतच मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले, दोन्ही ठिकाणी त्रिमातेंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. दोन्ही मंदिरात पुजाऱ्यांची नेमणूक सुध्दा केली गेली.
काही दिवसांच्या कालावधीनंतर दोन्ही मंदिरे लोकांच्या श्रद्धेचे ठिकाण बनले, परंतु काही दिवसानंतर आलोकनाथांच्या निदर्शनात आले की नगरातील मंदिरापेक्षा लोक नगराबाहेरील मंदिरात खुप मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. वास्तवत: नगराबाहेरील मंदिरात जाण्याचा मार्ग खूप कठीण आणि वळणाचा होता. तरी सुध्दा लोक दुर असलेल्या मंदिराला मोठ्या प्रमाणात भेट देत होते. ही सर्व स्थिती आलोकनाथांच्या मनात घर करुन गेली. ते विचार करु लागले. इथल्या नगरातील मंदिरापेक्षा, नगराबाहेरील मंदिरात असे काय वेगळेपण असावे. दुसऱ्यादिवशी सकाळीच आलोकनाथ आपल्या गुरुंकडे गेले. आणि ही सर्व स्थिती त्यांनी गुरुंजींना सांगितली.
गुरूंजींनी शांततेने सर्व प्रकार ऐकून घेतला आणि आलोकनाथांना एक गोष्ट करायला सांगितली, त्यांनी आलोकनाथांना सांगितले की नगराबाहेरील मंदिराच्या पुजाऱ्याला नगराच्या मंदिरात सेवेसाठी बोलावून घे आणि नगराच्या मंदिराच्या पुजाऱ्याला नगराबाहेरील मंदिरात पाठवून दे.
हा उपदेश ऐकुन आलोकनाथांना आश्चर्य वाटले पण गुरुंना प्रश्न करणं हा त्यांचा अनादर होईल या विचाराने ते तेथून निघून गेले, गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आलोकनाथांनी आपल्या सहकाऱ्याला सांगुन दोन्ही पुजाऱ्यांची अदलाबदल केली.
आता इथे काही काळ निघुन गेला आणि पुन्हा काही दिवासातच आलोकनाथांच्या निदर्शनात आले की काहीसा फरक पडला आहे. ज्या मंदिरात लोकांचा जमाव मोठ्या प्रमाणात होत होता त्या मंदिरात आता लोक फार कमी प्रमाणात दिसत होते, आणि नगरातील मंदिरात नगराबाहेरील लोक सुद्धा दर्शनाला यायला लागले होते, हे पाहून त्यांना अतिशय नवल वाटले. आणि त्यांनी हा काय प्रकार असावा म्हणून पुन्हा गुरूंना भेट दिली. गुरुंजवळ आल्यानंतर त्यांनी सांगितले की गुरूजी पहिले लोक नगराबाहेरील मंदिरात गर्दी करायचे पण आता मात्र नगरात असलेल्या मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. असे का होत आहे? तेव्हा गुरुजी आलोकनाथांना म्हणतात की, “यामध्ये काही विशेष गोष्ट नाही नाथ, नगराच्या मंदिरात असलेल्या पुजाऱ्याचा स्वभाव चांगला आहे आणि त्यामुळे लोक त्याच मंदिरात जाण्यासाठी गर्दी करतात, ज्या मंदिरात तो पुजारी असतो. पुजारी आपल्या मधुरवाणीमुळे लोकांना आकर्षित करतो आणि लोक सुध्दा त्याच्याजवळ जाण्यासाठी उत्सुक असतात.
हे ऐकून आलोकनाथांना सर्व परिस्थिती लक्षात आली होती. जर आपला स्वभाव चांगला असेल आणि लोकांना आकर्षित करणारा असेल, तर लोक आपल्याजवळ येण्यासाठी उत्सुक होतील, म्हणून दुसऱ्यांना जिंकण्यासाठी मोठमोठ्या गोष्टींची आवश्यकता नसते, आवश्यक असतो तो आपला स्वभाव. जो दुसऱ्यांच्या दुःखात त्यांच्या सोबत राहतो, सुखात सहभागी होतो, अश्याच व्यक्तींना लोक आपलेसे करतात.
— स्वाती पवार
खूप छान mam आज स्वभाव किती मोठा विषय आहे याची जाणीव करून दिली .लहानच गोष्ट आहे पण मुद्देसूद आणि प्रामाणिक सरळ गोष्ट आहे
आज तुमच्याकडून नवीन काय तरी शिकायला मिळालं thank u mam