माता सरस्वतीची, आपल्या कुलदेवतेची मनापासून ध्यानधारणा करणाऱ्या एका सुखी दाम्पत्याच्या घरी पुत्रसुख नव्हते. सुखाचा संसार हा सुरूच होता. आणि एके दिवशी मातेच्या ध्यान-आशीर्वादामुळे पती-पत्नी कैलासनाथ आणि उमा यांना कन्यारत्नाचा लाभ झाला. साक्षात देवीचा प्रसाद म्हणुन या कन्येचे खूप लाडामध्ये संगोपन झाले. तिचे नामकरण झाले. नाव ठेवले शिवानी…
शिवानी आपला जास्तीत जास्त वेळ आपल्या घरापासून जवळच असलेल्या एका महादेवाच्या मंदिरात घालवत असे. हळूहळू तिथे रमण्याची तिची ओढ ही वाढू लागली. शिवानी मोठी होत गेली. दररोज पहाटे न खंड पाडता शिवानी महादेवांच्या मंदिरात येत असे आणि अगदी मनापासून त्या मंदिराची स्वच्छता करीत असे. मंदिर दिव्यांनी फुलांनी सजवत असे. आणि घरी जसे आई-वडील मातेचे ध्यान करीत, तसेच ती मंदिरात महादेवाचे ध्यान करी. महादेवांच्या भक्तीमध्ये तल्लीन असलेल्या शिवानीने आपले संपूर्ण जीवन महादेवांना समर्पण केले होते. आई-वडिलांना नेहमी वाटे की शिवानीचे सुंदर थाटामाटात लग्न करावे. पण आपल्या लाडक्या मुलीच्या मनाच्या विरुद्ध निर्णय घेणे, हे आई-वडिलांना अवघड वाटत होते. दिवसांमागून दिवस जात होते. शिवानी आपली मंदिराप्रति असलेली जबाबदारी एखाद्या पुजाऱ्याप्रमाणे सांभाळत होती.
एके दिवशी सकाळीच मंदिर स्वच्छ करून झाल्यावर मंदिराच्या गाभार्यामध्ये शिवानी महादेवाच्या पिंडीवर पाणी सोडणाऱ्या कळसामधील पाणी बदलत होती. तोच मंदिराच्या प्रवेशद्वारावरून एक अनोळखी आवाज आला. “आत कोणी आहे का?”, शिवानीने हे ऐकले आणि हातातले काम पूर्ण करून ती बाहेर आली. सामान्य माणसाच्या वेशात, पण कावरी-बावरी नजर असलेल्या त्या इसमाने हा आवाज दिला होता. शिवानी येताच पुन्हा विचारले, “मंदिरामध्ये पुजारी कुठे आहेत?” व्यवसायाने चोर असलेल्या या इसमाची, प्रश्न विचारता विचारतात, शिवानीने परिधान केलेल्या दागिन्यांवर नजर खिळली आणि डोक्यात हिशेब सुरू झाला….
आपली धूर्त योजना मनात तयार करता-करता तो इसम म्हणाला, “मला प्यायला थोडे पाणी हवे आहे, मला पाणी मिळेल का?”, शिवानी चटकन हो म्हणून आज जायला निघाली, तोच त्या इसमाने तिला थांबवले आणि म्हणाला मला त्या महादेवाच्या पिंडीवर पाणी सोडणाऱ्या कळसामधील पाणी प्यायचे आहे असे बोलल्यावर शिवानी यावर विचारात पडली शेवटी चोर असल्यामुळे एखाद्याला आपण करण्यार्या दुष्कर्मावरून दुर्लक्षित कसं करावं आणि एखाद्याला आपल्याच विचारात गुंग कसं करावं या कल्पनेनुसार हा सर्व प्रकार तो इसम मुद्दामहून घडवत होता. पण शिवानी म्हणाली त्या कळसामधील पाणी मी तुम्हाला प्यायला कसे देऊ. तरी त्या चोराने मात्र जिद्दच केली आणि म्हणाला मी जर प्यायलो तर याच कळसामधील पाणी पीयेन नाहीतर असाच तुमच्या मंदिरातुन पाणी न पिता व्याकूळ निघून जातो. शिवानीने त्याच्या या बोलण्यावर थोडा विचार केला. कदाचित आपण चुकीचं तर वागत नाही ना? साक्षात भगवंताने घेतलेली ही परीक्षा तर नसावी? अशा विस्कळीत विचाराने तिने जाऊन तो कळस आणला. त्या चोर इसमाने तो कळस हाती घेतला नाही आणि त्याआधीच पुन्हा तेच विचारले. या मंदिराचे पुजारी कुठे आहेत? शिवानी म्हणाली या मंदिराचे संपूर्ण संगोपन मी करते. चोर असलेला इसम म्हणाला, तुम्ही??? मग तुमचे गुरु कोण? शिवानी म्हणते…. गुरु??? माझे गुरु तर कोणीच नाही.
हे ऐकुन तो इसम यावर थोडा विचार करतो, आणि फसवणुकीकरीता आपल्या मधुर वाणीचा उपयोग करुन म्हणतो, “गुरु नाही मग तुम्ही केलेल्या, तुमच्या भक्तीला, तुमच्या सेवेला, संपूर्णतः कशी येईल. गुरुंशिवाय हे सर्व काही अर्धवट आहे, “साधकाच्या भक्तीला, परमेश्वराच्या शक्तीमध्ये विलीन करण्यासाठी साक्षात गुरूच मध्यस्ती घेतात. योजना आखलेल्या त्या इसमाच्या जिभेवरून गुरुतत्व सांगता-सांगता साक्षात माता सरस्वती बोलू लागली व तो पुढे म्हणू लागला गुरु म्हणजे जीवनाचं मांगल्य… जीवनाला मिळालेला अर्थ… गुरुंशिवाय जीवन क्रम म्हणजे दिशाहीन असा मार्ग… जन्मापासून मृत्यूपर्यंत गुरु हे लागतातच. त्या इसमाकडून गुरूंचे महत्त्व ऐकता ऐकता शिवानीला त्याच्यामध्ये जणू गुरुंचं अस्तित्व भासवु लागलं. शिवानी भक्तीभावाने त्या इसमाला नमस्कार करते आणि म्हणते आजपर्यंत मी आयुष्यात गुरु कधीच केले नाही. पण तुमच्या या वाणीने मला गुरूंचे महत्त्व सांगितले. म्हणून आज पासून तुम्हीच माझे गुरु आहात. आणि मी तुमची शिष्या.. मला सदैव तुमचे मार्गदर्शन लाभो अशी माझी विनंती.
ज्या संधीची मागचा एकदीड तास वाट पाहत होता. ती संधी या चोराकडे चालून आली होती. थोडाही वेळ न घालवता त्याने लगेच शिवानीला म्हटले की, “मी तुमचा गुरु आहे ना? मग आजपासून जे मी सांगेल तेच करायचं असं म्हणून त्या चोराने शिवानीला स्वतःसोबत जंगलात यायला सांगितले, जंगलामध्ये शिरता शिरता वाटेतच त्याने लगेचच विचारले, “गुरु तर मी तुझा झालो, पण तू मला गुरुदक्षिणा काय देणार”, यावर शिवानी म्हणाली, “जे तुम्ही सांगाल ती गुरुदक्षिणा मी देईन”. तेव्हा चोर मात्र आपली संधी साधून घेतो. तो म्हणतो हे तुझे सर्व दागिने मला गुरुदक्षिणा म्हणून हवेत. ते तू मला दे. असे म्हणून तो शिवानीला एका झाडाला बांधून ठेवतो आणि म्हणतो मी येईपर्यंत इथेच थांब. मीच येऊन इथून तुला सोडेन. मात्र तिथपर्यंत कुठेही जाण्याचा अथवा काहीही करण्याचा प्रयत्न मात्र करू नकोस. असे म्हणून तो चोर ते सर्व दागिने एका पिशवीत भरून अती घाईघाईने तिथून निघून जातो. बराच वेळ निघुन जातो. शिवानी तिथेच वाट पाहत असते.
इथे घरी नेहमीच्या वेळेनुसार शिवानी मंदिरातून घरी न आल्यामुळे आई-वडील आणि भाऊ चिंतेत येतात. इतका उशीर घरी येण्यासाठी का झाला असावा. या विचाराने तिचे भाऊ तिला घेण्यासाठी मंदिरामध्ये जातात. मुलीच्या काळजीने सोबत आई-वडीलही जातात. सगळे तिथे पोहोचल्यावर त्यांना कळते की शिवानी तिथे नाही. सर्वजण भीतीमुळे मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात शोध घेतात. वेळ तिन्हीसांजेची असते. पुढे थोडे जंगलाजवळ आल्यावर त्यांना दूरवर काहीशी हालचाल जाणवते. पाहतात तर काय, शिवानीला तिथे एका झाडाला बांधून ठेवलेले असते. ते तिला सोडण्याचा प्रयत्न करतात तोच ती त्या सर्वांना अडवते. आणि म्हणते मला इथून सोडू नका कारण मला माझ्या गुरूंनी इथे बांधलं आहे. जोपर्यंत ते येणार नाहीत तोपर्यंत कोणीही मला सोडू नका. मला माझे गुरु स्वतः येऊन सोडवतील. तोपर्यंत मला त्यांच्या आज्ञेचं पालन केलंच पाहिजे. तिच्या या बोलण्याचं त्यांना नवलच वाटते. तेव्हा सर्वजण तिला विचारतात नेमकं घडलं तरी काय? तेव्हा घडलेला सर्व प्रकार शिवानी त्यांना सांगते. त्यावर तिचं पूर्ण कुटुंब तिला समजावतं कि ती व्यक्ती चोर होती. पण शिवानीच्या मनाला पटायला तयार नव्हते. कोणी कितीही सांगितले तरी आपण आपल्या गुरूंच्या आज्ञेचं पालन करायचं असा पक्का निर्धार शिवानीने आपल्या मनाशी केला होता. म्हणून ती जराही आपल्या निर्णयापासून विचलित झाली नव्हती. मला माझे गुरु येऊन सोडवतील. म्हणून कोणीही इथून मला सोडवणार नाही.
ना जेवण, ना पाणी असे दोन दिवस निघून गेले. नेहमीच्या मंदिरापासून दूर शिवानी आली होती. ते मंदिर मात्र पालापाचोळयाने भरले होते. थोडी धूळ जमली होती. भक्ताने परमेश्वराजवळ यायचे सोडले, तरी परमेश्वर मात्र भक्तांची सदैव वाट पाहत असतात. महादेवांच्या पिंडीवरील पाण्याचा कळस फार सुकून गेला होता. त्यातले पाणी संपले होते. शेवटचे लावलेले दिवे देखील विझले होते. रांगोळीतील फुलेदेखील सुकली होती. कित्येक वर्षे मंदिरात केलेल्या सेवेला या दोन दिवसात अचानक खंड पडला होता. आपली जवळची भक्त आता मंदिरात नाही म्हणून कुठेतरी महादेव देखील चिंतेत आले. त्यांनी नारदमुनींना आपल्याजवळ बोलावून घेतले. पृथ्वीतलावर पाठवले. जाताना त्यांना सांगितले माझ्या परम सेवेत असलेली माझी भक्त शिवानी गेले दोन दिवस माझ्या मंदिरात नसते. तुम्ही तिचा शोध घ्या. नारद मुनी लगेचच प्रभूंच्या आज्ञेप्रमाणे अंतर्ध्यान पावतात आणि साक्षात शिवानीच्या समोर प्रकट होतात. ती तो लख्ख प्रकाश पाहून अचंबित होते. आणि त्यांना नमस्कार करते. तेव्हा नारदमुनी तिला म्हणतात. बाळ शिवानी तुझी ही अवस्था कोणी केली? का केली? तेव्हा शिवानी म्हणते “माझ्या गुरूंनी मला इथे बांधलय… “, असे बोलून घडलेला सर्व प्रकार शिवानी नारदमुनींना सांगते. नारदमुनींना कळते. की तो चोर होता. नारदमुनी शिवानीला समजावण्याचा खूप प्रयत्न करतात. बांधलेल्या अवस्थेतून मुक्त करण्याचा प्रयत्न करतात. पण शिवानी त्यांनादेखील अडवते. ती म्हणते मला माझ्या गुरूंनी इथं बांधलं आहे आणि त्यांनीच मला सांगितले की मी येईपर्यंत इथून कुठेही जायचं नाही. मला माझ्या गुरूंच्या आज्ञेचे पालन करायचं आहे. त्यामुळे मला कोणीही सोडवु नका. अशी मी विनंती करते. नारद मुनी हे सर्व काही शांतपणे ऐकून घेतात आणि प्रभु महादेवांकडे परततात. पृथ्वीतलावर शिवानीसोबत घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगतात. शेवटी महादेवांना खूप काळजी वाटते आणि ते स्वतः नारदमुनींसोबत शिवानीच्या समोर प्रकट होतात. शिवानी महादेवांना नमस्कार करते. तिला मनोमन खूप आनंद होतो. इतके वर्ष सेवेत असलेली मूर्ती आज जागृत झाली याचा तिला परमानंद होतो. महादेव शिवानीला मुक्त करण्याचा प्रयत्न करतात. पण येथे काहीसे वेगळे घडते. शिवानी महादेवांना देखील थांबवते आणि म्हणते “हे प्रभू कृपा करून मला इथून सोडू नका, मला माझ्या गुरूंच्या आज्ञेचे पालन करू द्या” शेवटी आपल्या ध्यानस्थ भक्तापुढे महादेव थांबतात. तिने गुरु मानलेल्या त्या चोराला समोर उभं करतात. चोर असलेल्या इसमला हे सर्व पाहून अतिशय आश्चर्य होते. तो शिवानीला तात्काळ सोडवतो. मनोमन कुठेतरी त्यालाही आपल्या कृतीचा खेद होतो. बांधलेल्या अवस्थेतून मुक्त झाल्यानंतर शिवानी लगेचच गुरु मानलेल्या त्या व्यक्तीला नमस्कार करते. हे पाहून नारदमुनींना मात्र विचित्र वाटते. शिवानीच्या या कृतीबद्दल त्यांना प्रश्न निर्माण होतो. ते लगेचच शिवानीला म्हणतात की, “समोर साक्षात देवांचे देव महादेव उभे असताना तू या व्यक्तीला नमस्कार करतेस ज्याने तुला अन्नपाण्याशिवाय येथे एकट्याला बांधून ठेवले, तुझी अशी दुर्दशा केली”. तेव्हा शिवानी शांत स्वरांमध्ये नारदमुनींना म्हणते की, “इतके वर्ष मंदिरसेवा, ध्यान-तपस्या केल्यानंतर आज कितीतरी वर्षांनी हा प्रकार घडल्यामुळे मला महादेवांचे दर्शन घडले. हा प्रकार घडून येण्याचे निमित्त माझे गुरु आहेत आणि मी त्यांना मनापासून गुरू मानलं आहे. त्यांनी मला परमेश्वराच्या जवळ आणलं माझ्या गुरुंनीचं मला म्हटलं होतं कि साधकाच्या भक्तीला परमेश्वराच्या शक्तीमध्ये विलीन करण्यासाठी साक्षात गुरूच मध्यस्थी घेतात आणि त्याचप्रमाणे हा सर्व प्रकार घडला. तिच्या या बोलण्यावर महादेव साक्षात प्रसन्न होतात आणि त्या इसमाला त्याच्या दुष्कर्मापासून मुक्त करून एक चांगले आयुष्य देतात. ज्यामुळे शिवानीला तिथे महादेवांच्या कृपेने सद्गुरु लाभतात.
अशाप्रकारे शिष्याच्या परमेश्वरावरील अखंडीत श्रद्धेमुळे आणि गुरूतत्त्वावरील विश्वासामुळे, शिष्याला साक्षात सद्गुरूंचा सहवास आणि त्यांची सोबत मिळते.
||ॐ श्री||
— स्वाती पवार
Leave a Reply