नवीन लेखन...

निरंजन – भाग ५३ – शिकवण

एका गुरुकुलातील हि कथा…

जिथे शिष्यांना ध्यान, ज्ञान आणि दैनंदिन जीवनातल्या गोष्टींना अनुसरून विद्या मिळत होती. नेहमीप्रमाणे गुरु, शिष्यांबरोबर ज्ञानचर्चा करण्यापूर्वी काही काळ ध्यान धारण करीत असत. आज शिष्यांना काहीतरी नवीन शिकवावे, अशा विचारांनी त्यांनी ध्यानधारणेपुर्वी आपल्या जवळ उपस्थित असलेल्या काही शिष्यांना वनातून ओल्या लाकडाची मोळी आणून ठेवायला सांगितली. त्याप्रमाणे सर्व तयारी झालेली होती. गुरूंचे ध्यान पूर्ण होईलच, अशा विचाराने सर्व शिष्यांनी आपले स्थान ग्रहण केले होते. सर्वांच्या मनात एकच प्रश्न, ही ओल्या लाकडाची मोळी इथे काय कामाची?….पण गुरूंचे ध्यान झाल्यावर आपल्या शंकांचं समाधान होईल, असा सर्वांचाच विश्वास होता.

थोड्याच वेळात गुरूंनी ध्यान धारणा पूर्ण केली. आणि त्यांनी समोर बसलेल्या एका शिष्याला ती लाकडाची मोळी बाजूला आणून, मोकळी करून ठेवायला सांगितली. आणि म्हणाले, “शिष्यांनो, जसे रोज तुम्ही मला प्रश्न विचारता आणि मी त्यांचं समाधान करतो, तसेच आज मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आणि तुम्ही त्यांची तुमच्या अनुभवानुसार उत्तर द्यायची.

गुरूंनी बाजूला मोकळ्या करून ठेवलेल्या लाकडांमधून एक हलकं लाकुड उचललं, शिष्यांना दाखवुन ते पुढे म्हणाले की, “सांगा पाहू, याचं वजन काय असावं? त्यावर कोणी म्हणाले १०० ग्रॅम तर कोणी म्हणालं ५० ग्रॅम…त्यानंतर गुरुंनी अजून एक लाकूड उचललं आणि विचारलं आता सांगा पाहू या दोन्ही लाकाडांचं एकूण वजन किती? त्यावर शिष्यांनी त्यात वाढ करून, कोणी दोनशे ग्रॅम म्हणालं तर कोणी म्हणालं तिनशे ग्रॅम… पुन्हा गुरूंनी अजून एक लाकूड उचललं आणि त्याच हाती धरलं, आणि विचारलं आता सांगा पाहू या तीन्ही लाकाडांचं एकूण वजन किती? शिष्यांनी पुन्हा वजनात वाढ करून, कुणी चारशे ग्रॅम म्हणालं, तर कोणी पाचशे ग्रॅम… असे करता करता पूर्ण एक किलोच्या दरम्यान गुरूंच्या हाती वजन झालं होतं. आता तो हात समोर धरून गुरूंनी शिष्यांना विचारलं, “सांगा पाहू, जर मी हे वजन एखादा तास असेच धरुन ठेवले…. तर काय होईल? सर्व म्हणाले की नक्कीच हात दुखू लागेल आणि दोन तास धरलं तर”…. “तर मग हात जड होईल, कदाचित सुन्न ही पडू शकतो. यावर गुरु म्हणाले असे जर मी हे वजन एखाद-दुसरा प्रहर असेच धरून ठेवले तर…. ? त्यावर शिष्य म्हणाले मग नक्कीच हात सुन्न होईल आणि हात सुन्न पडल्यामुळे रक्तवाहिन्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि त्याचा आरोग्यावर परिणाम होईल. आरोग्यावर परिणाम झाल्यामुळे कुठेतरी मनस्थिती देखील विस्कळीत होऊ शकते.

हे ऐकून गुरूंनी लगेचच ती लाकडं बाजूला ठेवली आणि म्हणाले, “अगदी बरोबर, जर आपल्याला या गोष्टीची जाणीव आहे की, हे वजन जास्त काळ धरून ठेवले, तर त्याचा त्रास आपल्यालाच होणार आहे. त्याप्रमाणेच जीवनात कित्येकदा असे दुःख आपल्या वाट्याला येत राहते. मग ते किती लहान किंवा ते किती मोठे हे महत्त्वाचे नसते, ते आपण किती काळ आपल्याकडे धरून ठेवतो यावर आपली मनस्थिती आणि परिस्थिती अवलंबून असते. ते दुःख धरून न राहता लगेचच आपल्याला सोडता आलं पाहिजे. आपल्यापासून मोकळं करता आलं पाहिजे. कारण जितका वेळ आपण आपल्या विचारांवर त्या दुःखाचं वजन ठेवणार, तेवढेच आपले विचार सून्न होणार. आणि आपण दुर्बल होणार. म्हणूनच जे दुःख आपण काही कालांतराने सोडणारच आहोत, ते मग आज किंवा उद्या का नाही? सबल मनाला दुर्बल करून, आपल्या जागृत चेतना क्षमतेला सुन्न करून, मग ते दुःख सोडणं… हे कितपत योग्य आहे?

शिष्यांना हे ऐकून सर्व काही लक्षात आलं. एका सुंदर उदाहरणातून गुरूंनी जीवनाला उपयुक्त अशी एक मोठी शिकवण दिली आहे. सर्वांनी आदराने गुरूंना नमस्कार केला आणि नेहमीप्रमाणे आपल्या दिनचर्येला सुरुवात केली.

— स्वाती पवार

Avatar
About स्वाती पवार 57 Articles
मी स्वाती... स्वतःला आनंद मिळतो म्हणुन लिहिणारी....... माझे "निरंजन" या लेखसंग्रहातुन दैनंदिन जीवनातल्या वेगवेगळ्या विषयांवर लेखन... या लेखनामधील निवडक लेखरचना या "|| ॐश्री ||" या ध्यानकेंद्रातील व्याख्यानमालेमधल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..