जीवनामध्ये प्रत्येक वेळी यश प्राप्त केल्यानंतर एका ठराविक पायरीवर आपल्या ज्ञानाची परीक्षा होते. आपण ज्ञान कितपत योग्य पद्धतीने आत्मसात केले, याची नियतीनुसार टप्प्याटप्प्याने पडताळणी होते. अशीच एक परीक्षा गुरुंनी आपल्या तीन शिष्यांची घेतली….
एकदा एका विद्यालयामधून गुरुंचे तीन निपुण शिष्य शिक्षण पूर्ण झाल्यानंतर घरी परतण्यासाठी निघणार होते. नेहमीपेक्षा सकाळी लवकर उठून तिघेही जण गुरूंचा आशीर्वाद घ्यायला आले. गुरूंनी तिघांना आशीर्वाद दिला आणि इतर काही शिष्यांना त्यांच्या परतीच्या प्रवासाची व्यवस्था करायला सांगितले. काही वेळानंतर तिघेही शिष्य विद्यालयामध्ये सर्वांची शेवटची भेट घेऊन घरी जायला निघाले. त्यावेळी विद्यालयापासून काहीसे दूर गेल्यावर त्यांना एका ठिकाणी परतीच्या वाटेवरच खूप सारे काटे पसरलेले दिसले. त्यातून मार्ग काढून वाटेमधून पुढे जाणे. तसे फारच कठीण होते. पण पहिल्या शिष्याने कसातरी प्रयत्न करून एकही काटा आपल्या शरीराला न स्पर्श करु देता त्यातून वाट काढण्याचा प्रयत्न केला आणि तो पुढे पोहोचला. कितीही प्रयत्न केले तरी शरीराला काटे बोचण्यापासून तो काही स्वत:ला वाचवू शकला नाही. त्यानंतर दुसर्या शिष्यानेही आपल्या परीने त्या काट्यांमधून वाट काढली आणि तो ही पुढे पोहोचला. पण त्याचेही प्रयत्न निष्फळ ठरले. त्याच्याही शरीराला बर्यापैकी काटे लागले.
त्यानंतर शेवटी तिसऱ्या शिष्याने मात्र त्या काट्यांना बाजूला सारण्यासाठी बाजूच्या झाडीमधली एका झाडाची फांदी घेतली आणि त्याने तिथे पसरलेल्या सर्व काट्यांना क्षणात झाडीमध्ये लोटले. आपले कमीतकमी प्रयत्न करून त्याने सर्व वाट काट्यांपासून फार कमी वेळात मोकळी केली. हे सर्व दृश्य दूरवर उभे राहून त्याचे गुरु पाहत होते. त्याने स्वतःलाही योग्यरीतीने काटयांपासून वाचवले आणि त्याच्या हातून घडलेल्या या योग्य रीतीचा लाभ इतरांसाठीही घडुन आला. हे पाहुन त्याचे गुरु त्याच्याजवळ आले आणि आपल्या बरोबरच्या इतर शिष्यांना, त्या घरी परतणाऱ्या दोन शिष्यांसाठी बोलावणे पाठवले. ते शिष्य समोर आल्यानंतर, गुरु तिसऱ्या प्रयत्नशील शिष्याकडे पाहून म्हणाले की, तुझे संपूर्ण प्रयत्न लावून तु या वाटेवरचे काटे फक्त स्वतःसाठीच नाही तर, इतरांसाठीही मोकळे केलेस. तुझे ज्ञान तू सत्कार्यामध्ये लावलेस. विद्या ही विनयशीलतेने शोभते. म्हणून आज खऱ्या अर्थाने तुझे शिक्षण पूर्ण झाले आहे.
हे ऐकून आधीचे दोन शिष्य, गुरूंचे चरण धरु लागतात आणि त्यांच्याकडे क्षमा मागतात. गुरूंनी घेतलेल्या परीक्षेमध्ये आपण अनुत्तीर्ण झालो आहोत, याचीही त्यांना मनोमनी खंत वाटते.
— स्वाती पवार
Leave a Reply