कल्याणजी आनंदजी हे निर्मात्यांचे संगीतकार होते.असे म्हणण्याचे कारण ते निर्मात्याला हवे आहे तसे देत असत.थोडक्यात ते बनिया वृत्तीचे होते.आणि स्वताला बनिया म्हणवून घेण्यात त्यांना कमीपणा वाटत नसे.कल्याणजी यांचा जन्म ३० जून १९२८ला आणि आनंदजी यांचा जन्म २ मार्च १९३३ला गुजराथ कच्छ मधील कुन्द्रोडी गावी जैन कुटुंबात झाला.वडील वीरजी शाह यांची मुंबईच्या गिरगावात किराण्याची दुकाने होती. कल्याणजी यांना पहिल्यापासून गाण्याची आवड होती.तरुणपणात त्यांनी एक संगीत मेळा काढला होता.त्यात मराठीचे गीतकार व संगीतकार यशवंत देव सुद्धा होते. कल्याणजी गणेशोत्सव व नवरात्रीत गाणी सादर करीत. कल्याणजी इतर संगीतकाराकडे वाद्य वाजवीत.पण त्यांना खरी ओळख मिळाली ती नागीन चित्रपटात “ मन डोले मेरा तन डोले” बिन वाजवल्याने.ती बिन नव्हतीच. त्यांनी क्ले व्होयोलीन वाद्यावर बिनचा आवाज काढला होता.
त्यांची कला पाहून निर्माते सुभाष देसाई (मनमोहन देसाईचे थोरले भाऊ) यांनी एक चित्रपट दिला सम्राट चंद्रगुप्त.त्यांनी गाणे कंपोज केले “चाहे पास हो चाहे दूर हो मेरे सापनोकी तुम तसबीर हो” चाल ऐकवायला ते देसाई कडे गेले.खूप चाली ऐकवल्या तरी देसाईचे समाधान होईना ते सारखे म्हणत “ चाल नौशाद सारखी लाव”. कल्याणजी घरी निघून आले.त्यांना मिळालेला मोका सोडायचा नव्हता.त्यांनी एका भिकाऱ्याला पकडले त्याच्याकडून चाल पाठ करून घेतली त्याला देसाईच्या घरासमोर उभे केले आणि सांगितले घरासमोर एक आलिशान कार येईल मी खुण केली कि गाणे गायला सुरुवात करायची. त्याप्रमाणे भिकाऱ्याने केले. ते ऐकून देसाई खूप खुश झाले.त्यांनी कल्याणजी यांना बोलावले व सांगितले “अरे आपले गाणे खूप फेमस झाले आहे” कल्याणजी म्हणाले “होणारच शेवटी निर्माता कोण आहे?”.आता जे गाणे रेकोर्ड झाले नाही चित्रपट रिलीज झाला नाही त्याचे गाणे फेमस कसे होणार ?. कल्याणजीना देसाई यांचा अंदाज होता.म्हणून हे धाडस केले.त्यांनी चित्रपटासाठी नाव घेतले.”कल्याणजी वीरजी” या नावाने त्यांनी ६ चित्रपट केले.पुढे त्यांना आनंदजी साथ करू लागले.ज्यांना हे माहिती नव्हते,ते म्हणू लागले “ देखो इसने तो बापका नाम भी बदल दिया.”त्यांच्या चित्रपटाना यश मिळत होते पण खरे यश मिळाले त्यांच्या २५साव्या चित्रपटाला “जब जब फुल खिले.”त्या चित्रपटाने आनंद बक्षी यानाही यश दिले. कल्याणजी आनंदजी यांनी अनेक गायकाबरोबर काम केले तरी त्यांचा आवडता गायक होते मुकेश.मुकेश म्हटले कि आपल्या समोर राज कपूर,शंकर जयकिशन येतात.पण कल्याणजी आनंदजी बरोबर मुकेशनी ९९ गाणी गायली आहेत.एकदा एक शास्त्रीय गायक कल्याणजी आनंदजी ना म्हणाले “ काय तुम्ही मुकेशला गाणी देता?त्याच्या आवाजाला किती मर्यादा आहेत” त्याचवेळी सरस्वती चंद्र प्रदर्शित झाला होता. कल्याणजी आनंदजी म्हणाले “गाणे साध सोप आणि लोकांच्या हृदयात राहणारे हवे.तुम्ही चंदनसा बदन गाणे अतिशय साध्या पद्धतीने गाऊन दाखवा.त्यांना ते जमेना कल्याणजी आनंदजी तेव्हा म्हणाले”कळले आम्ही मुकेशला गाणी का देतो” दोघेही अतिशय व्यावसायिक होते एकदा त्यांच्या कडे गीतकार अंजान (गीतकार समीरचे वडील) आले व विचारले मी कश्या पद्धतीची गाणी लिहू. ते म्हणाले “ हे बघ सध्या मार्केट मध्ये तीन संगीतकाराची चलती आहे एक आम्ही दोघे,दुसरे लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि आर.डी.बर्मन यांच्या गाण्याचा अभ्यास कर तुला कोणासाठी कशी गाणी लिहायची ते बरोबर कळेल “ आनंदजीना एका मुलाखतीत विचारले तुमच्या संगीतावर कोणाचा प्रभाव आहे? ते म्हणाले सचिनदा यांचा मुलाखतकार म्हणाले “ काहीतरी काय मला वाटते शंकर जयकिशन यांचा. आनंदजी म्हणाले आम्हाला पहिले चित्रपटच राज कपूर “ छलिया” शम्मीकपूर “ब्लफ मास्टर “ मिळाले त्यामुळे निर्माता म्हणाला तसे संगीत द्यावे लागले.फलक चित्रपट मिळाल्यावर निर्मात्यांनी सांगितले कि खैयाम साहेबांनी आपले नाव सुचवले तेव्हा कल्याणजी आनंदजी यांनी खैयाम साहेबाना फोन केला व विचारले हे खरे आहे का, तुमचे आणि निर्मात्याचे भांडण तर झाले नाही ? खैयाम म्हणाले नाही पण या पद्धतीची गाणी मी देऊच शकत नाही म्हणून तुमचे नाव सुचवले आनंदजी गिरगावात राहिल्याने उत्तम मराठी बोलतात. त्यांना मराठी कार्यक्रमात जज म्हणून बोलावले जाते.एकदा त्यांना विचारले तुमचे मराठीतील आवडते गाणे कुठले.ते म्हणाले “संत तुकाराम चित्रपटातील “ आधी बीज एकले” हल्लीच्या पिढीतील अनेकांना हे गाणे माहिती सुद्धा नसेल.१९७६मध्ये कल्याणजी आनंदजी यांना वाटले आपण संगीत अकादमी काढावी म्हणून त्यांनी नवोदित गायिकांना प्रशिक्षण देण्याचे ठरवले त्यातूनच आपल्या चित्रपटातून अलका याग्निक , सोनाली वाजपेयी,साधना सरगम या गायिकांना पुढे आणले.२४ ऑगस्ट २००००ला कल्याणजीनी जगाचा निरोप घेतला.
कल्याणजी आनंदजी यांना सुमारे ११ वगवेगळी पारितोषिके मिळाली.त्यांनी सुमारे 250 चित्रपटाना संगीत दिले.
— रवींद्र शरद वाळिंबे
Leave a Reply