जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे अठरा
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा•
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
निरोगी रहाण्यासाठीचे हे पथ्यापथ्य मोजक्या दिवसासाठी नसून कायम स्वरूपी आहे, हे लक्षात घ्यावे.
आपण नेहमी निरोगी राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ते सोडून आमच्या धारणाच आम्ही बदलून टाकल्या आहेत. आयुष्य हे अनमोल आहे, हे विसरून आयुष्य हे चुलीवरच्या कांद्यापोह्या एवढे स्वस्त करून टाकले आहे. गॅसपेक्षा चुलीवरचे जरा खमंग लागतात, एवढेच काय ते !
निरोगी रहाण्यासाठी अमुक पथ्य पाळा, असे सांगितले की, रुग्णाच्या कपाळावर डाव्या कानापासून उजव्या कानापर्यंत आठ्याच आठ्या दिसू लागतात.
बंधनात रहायला कुणालाच आवडत नाही. आणि जर ते बंधन दुसऱ्याने घातलेले असेल तर अजिबात नकोसे वाटते.
मी मला हवे तसे वागेन, मला कोण अडवणार ? अशा बेगुमान मनाला लगाम तर हवाच. हा लगाम आप्तांनी घातला तर त्याला तप म्हणतात. आई वडीलांनी सांगितले तर शिस्त म्हणतात, आणि डाॅक्टरनी सांगितले तर पथ्य म्हणतात. आणि दुसऱ्या कुणीतरी सांगण्यापेक्षा स्वतःचे स्वतःला आवरणे आणि सावरणे आवश्यक आहे.याला संयम म्हणतात.
हे कुणा दुसऱ्यासाठी नसून स्वतःच्या भल्यासाठी आहे, एवढे तरी लक्षात ठेवावे. शरीर मन आणि आत्मा या तिघांच्या चिरंतर कल्याणासाठी हे करावेच लागेल.
पहिल्या ओळीतील हितकर असा आहार विहार हा शरीरासाठी. दुसरी तिसरी ओळ मनावरील संयमासाठी आणि चौथी ओळ आत्मरक्षणासाठी आहे. हे भान असावे. असे ग्रंथकार सांगतात.
या संयमाची सवय पहिल्यापासूनच लावून घेतली तर लागते. संयम आतून यावा लागतो. संयम येण्यासाठी मनाला मुरड कशी घालावी, आवर कसा घालावा, हे समर्ध रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकात लिहून ठेवले आहे.
मना वासना दुष्ट कामा नये रे,
मना सर्वथा पापबुद्धी नको रे ।
मना धर्मता नीती सोडू नको हो,
मना अंतरी सार विचार राहो ।।
संत असो वा आप्त. सर्वजण आतून एकच विचार करीत असतात, हेच यावरून सिद्ध होते. आयुष्य असो वा आरोग्य. ते नीट सांभाळायचे असेल तर काही पथ्य तर करावेच लागणार.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
०७.०८.२०१७
Leave a Reply