जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे एकवीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
आईच्या सततच्या नको असलेल्या सूचनांचा अर्थ काय ? त्यामागे नेमके कोणते सूत्र दडलेले आहे, ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. ग्रंथकारांनी जे सूत्र वर दिलेले आहे , त्याच सूत्राचा हा व्यावहारिक विस्तार आहे. बदलत्या काळानुसार त्यात मला जे सुचतंय, ते लिहितोय.
उतु नको मातू नको
घेतला वसा टाकू नको.
चातुर्मासात कहाण्या वाचायची पद्धत आहे. या कहाण्यांची सुरवात, एक आटपाट नगर होते….. अशी असते, मधेच कुठेतरी एखादी देवी किंवा मैत्रिणीच्या तोंडी हे वाक्य असते, उतु नको मातु नको, घेतला वसा टाकू नको… आणि पाचागावची कहाणी पाचा उत्तरी सफल संपूर्ण असा शेवट असतो.
त्यात तुझ्यातील अहंकार सोडून दे. अहंकार हा फार मोठा शत्रू आहे. असा उपदेश केलेला असतो. जे व्रत तु स्विकारलेले आहेस, ते टाकू नकोस. तेच तुझे कर्तव्य आहे. ते पूर्ण करण्यासाठी तू प्रयत्न केला पाहिजे. अशी समज दिलेली असते. म्हणून आई सांगते उतु नको मातू नको. घेतला वसा टाकू नको.
उष्टे खाऊ नये.
एकमेकांच्या उष्टे खाल्ले की, जंतुसंसर्गामुळे होणारे व्याधी वाढतात, असे आधुनिक विज्ञान पण सांगते. पाश्चात्य संस्कारामुळे आणि टीव्ही वर दाखवल्या जाणाऱ्या प्रेमाच्या उदात्तीकरणामुळे, वेगवेगळ्या कुकरी शो मधे केक किंवा अन्य पदार्थ एकमेकांना हाताने भरवणे, किंवा त्याच उष्ट्या चमच्याने इतर सर्वांना भरवणे, या किळसवाण्या प्रकारामुळे, चलता है यार! उष्टे खाणे गैर नाही, असा चुकीचा संस्कार नकळतपणे होत जातो. आज असं चुकीचं का केलं जातं माहिती नाही, पण एकमेकांच्या उष्ट खाण्याची चुकीची प्रथा रूढ होत जातेय. यावेळी आईने किंवा बाबांनी आपल्या मुलामुलींना समजावून सांगितले पाहिजे, की उष्टे खाऊ नये. जंतुसंसर्गाचा पुढे धोका आहे.
घटाघट पाणी पिऊ नये.
पाणी सावकाश प्यावे. नाहीतर ठसका लागण्याचा संभव असतो. उगाचच बाटली लावली तोंडाला आणि संपवूनच तोंडातली काढली असं करू नये. पाणी वरून पिऊ नये. भांड्याला तोंड लावूनच प्यावे किंवा स्वतःच्याच ओंजळीने प्यावे.म्हणून पूर्वीच्या काळी पाणी पिण्याचे स्वतःचे भांडे स्वतःबरोबर नेणारी मंडळी होती.
उगाच आरश्यात पाहू नये.
नटण्या मुरडण्याला पण मर्यादा असतात. सतत आरशासमोर उभे राहाणे, सतत चेहेरा पाहाणे, यात वेळ किती जातो, हे लक्षातच येत नाही. हे ज्या काळात सांगितले गेले, त्यापेक्षा आताचा काळ फार बदलला आहे. इतरांना आपण सुंदर दिसावे, ही विशिष्ट वयातील धडपड चुकीची नाही, पण सतत आरशासमोर उभे राहाणे चुकीचे आहे, हे मुलीला सांगितले तर आईचे काय चुकले ?
आता तर सेल्फीचा जमाना आहे. सेल्फी काढताना तोंडाचे चंबू, गडू करून, ओठांची तोंडली नि आवळे करत, डोळ्यावरच्या भुवयांची धनुष्ये वाकवित, जेवढा विचित्र चेहेरा करता येईल तेवढा विदूषकी चेहेरा करण्याचा फंडा आला आहे. या काळानुसार बदलणाऱ्या फॅशन्स आहेत. हे आयुर्वेदात कुठुन येणार ? पण मूळ सूत्र सांगितलेले आहे, त्यात विस्तार करायला हवाच. जसा भाव चेहेऱ्यावर असतो, तसा तो मनी रूजतो. म्हणून चेहेऱ्यावर कधीही आठ्या नकोत. काही जणांना आठ्या पाडल्याशिवाय बोलताच येत नाही. आठ्या पाडून बोलू नकोस. असं आईने सांगितले आणि चेहरा नीट ठेऊन सेल्फी काढ, असे बाबा ओरडले तर काही चुकले का ?
परवाच एकाने प्रश्न विचारला, माझ्या चेहेऱ्यावर काळे डाग आहेत, मी काय करू ? विचारणाऱ्याने नाव सांगितलेले नाही, वय माहिती नाही, म्हणून सहज त्याचा डीपी पाहिला. तर डीपीवरच एवढा भेसूर चेहेरा ठेवलेला होता. आणि त्या चेहेऱ्यावर काळ्या रंगाचे पट्टे. मी सहज बापाच्या भूमिकेतून त्याला मेसेजलो, “अरे, आधी डीपी बदल. चेहेऱ्यावर काळे पट्टे ओढलेला हा भयानक डिपी कशाला ठेवलायस ?” त्यावर तो उत्तरला, “मी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायचे तर द्या. नसत्या चौकशा कशाला ? ”
आता याला काय उत्तर देणार. ?
माझेच चुकले म्हणा. मी कर्तव्य भावनेने त्याच्या प्रश्नाला एका वाक्यात उत्तर द्यायला हवं होतं. पण जळ्ळं बापाचं काळीज बाहेर पडलं. आणि हे असं उत्तर ऐकून घ्यावं लागलं.
बदलत्या काळानुसार पालकांनी पण बदलणं आवश्यक आहे. आपल्या स्वतःच्या मुलाशी संवाद करताना पण त्यांना रूचेल अशा भाषेत बोलायला हवे, हे पालकांनी समजून घ्यायला हवं.
केसांना हात लावू नये.
हे वाक्य म्हणजे सरळ सरळ आरोग्य जपणारा सल्ला आहे. केसांवर धुळ माती, बसत असते. त्यावर अनेक प्रकारचे जंतु चिकटलेले असतात. उगाचच केसातून हात फिरवायची सवय असणारी अनेक मुलगे मुली दिसतात. केसांवरून फिरवलेला हात न धुताच, बर्गर पिझ्झ्याला पण लागतोच. तोही शेयरींग मधे. म्हणजे अर्धा मी अर्धा तू. म्हणजे तिथेही स्वतःबरोबर दुसऱ्यालाही जंतुसंसर्गाचा धोका.
केसांची मुळे नाजूक असतील तर ती सतत हलत रहातात. आणि गळतात. इतरत्र उडतात.
आधी डोक्यावर तेल घालत नाहीत, त्यात स्टाईल म्हणून उडत्या भुरूभुरूत्या केसातून बोटे फिरवीत राहिले, तर लवकरच गाॅन केस व्हायला वेळ लागणार नाही.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
१०.०८.२०१७
Leave a Reply