जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे सत्तावीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग एकवीस
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
कुणाचे वर्म काढू नये
कुणाच्या वर्मावर बोट ठेवू नये.
बऱ्याच वेळा माणसे दुखावली जातात, ती चुकीचे शब्द, चुकीच्या पद्धतीने उच्चारल्यामुळे. वर्म काढू नये म्हणजे अपमान होईल असे बोलू नये. परिस्थिती कोणावर कशी येईल, रावाचा रंक कधी होईल ते कधीच सांगता येत नाही. आंधळेपणा, पांगळेपणा ह्या वर्मावर बोट ठेवून कधी कोणाला दोष देऊ नये. हेच आई शिकवित असते. बाबा पण कधीतरी ओरडत असतात.
पण काहीही म्हणा हं आईचं शिकवणं आणि बाबांचं शिकवणं यात फरक असतोच. अगदी नव्वद टक्के मुलं सांगतील, आई शिकवित होती तेच बरं होतं. फक्त ओरडाच खायला लागायचा, मार तर नाही.
वर्म काढू नये. घालून पाडून बोलू नये. भांडणाची पण एक शैली असते. त्या शैलीतच भांडता आलं पाहिजे. अहो, हल्ली मुलांना नीट भांडतासुद्धा येत नाही. त्या वाॅटसप मुळे भांडण होतात, ती सुद्धा ऑनलाईनच ! समोरासमोर.
भांडायला शब्द सुचावे लागतात. आणि शब्द सुचले नाही की थेट हल्लाबोलच.
आणि भांडायचं असतं ते मातृभाषेत. आणि शिक्षण होतं पूतना मावशीच्या भाषेत ! त्यामुळे भांडायला जे इरसाल शब्द भांडार लागतं, ते असतं मातृभाषेत! म्हणून तरी मातृभाषेत शिका !
बोलताना जशी भाषा समृद्धता असणं आवश्यक आहे, तशी भांडताना सुद्धा ही भाषा समृद्धता दिसणं आवश्यक आहे.
तुटे वाद संवाद तो हितकारी असे समर्थांचे बोल आहेत.
संवादाचे रुपांतर विवादात होऊ नये, यासाठी हितकर असणारे शब्द योजावे लागतात. अर्थात शहाण्याला शब्दांचा मार, बाकीच्यांची पूजा कशानी करायची ते, आपल्या मराठी वाड़मयात तेपण सांगितलेले आहे.
वर्म म्हणजे दुर्गुण, कमीपणा. कुणाचा दुर्गुण कुणाला सांगू नये, कारण त्यावरून आपलीच परीक्षा होत असते. आपले दुर्गण शोधावे आणि इतरातील सद्गुण.
हे उपदेशात्मक लिखाण फार गांधीगिरीचे वाटत नाही ना ?
वर्म म्हणजे वेदनेचे ठिकाण. नेमके इथे बोट ठेवले तर दुखणारच ना ! पण जिथे पूय साठून साठून जमा झालेला असतो, तिथे वेदना निर्माण होणारच ना. ? असणारच. आणि जिथे जिथे पूयसंचिती तिथून तो बाहेर काढावा, असे वैद्यक शास्त्र सांगते. जखमेतील वेदना कमी होण्यासाठी काहीवेळा ऑपरेशन करावेच लागते, मग ती जखम प्रत्यक्षात शरीरावरील असो, वा मनावर आघात करणारी. हेपण आईकडूनच शिकायचे असते.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
Leave a Reply