जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे अठ्ठावीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
दिलेले दान कळू नये
दान करणे ही भारतीय संस्कृती चा पाया म्हटले तरी चालेल. पण या दानाचा सर्वात मोठा धोका म्हणजे अहंकार वृद्धी. मी दान दिले. यातील मी म्हणजे अहंकार. अहंकार हा नेहेमीच सूक्ष्म असतो. पण केव्हाही मोठे रूप घेऊ शकतो. हीच वेळ धोक्याची असते. म्हणून तर आई म्हणते, उजव्या हाताने दिलेले दान डाव्या हातालादेखील कळू नये. ते गुप्त असावे.
आणखी एक दान सत्पात्री असावे, असे बाबापण म्हणतात. ज्याला दान देणार तो त्यासाठी लायक आहे, की नाही, हे तपासून मगच दान द्यावे, नाहीतर त्याच्या पापात आपल्यालाही सहभागी व्हावे लागते. अगदी चौकातल्या देवळासमोरील भिकाऱ्यांना दान देताना, या दान मिळालेल्या पैशातून तो जर दारू पिणार असेल, आणि गुटका खाणार असेल तर असे दान पाप वाढवेल. म्हणून दान सत्पात्री असावे असे बाबा म्हणतात. एकदा दान दिले की आपला त्यावरचा हक्क संपला असे होत नाही. कर्माचा सिद्धांत इथेही काम करतो.
विशेषतः सामाजिक क्षेत्रात वावरताना एखाद्या संस्थेला जेव्हा दान द्यायची वेळ येते, तेव्हा तिचा विनियोग योग्य ठिकाणी होणार आहे का, हे आधी पहाणे जरूरीचे असते.
कोणावर कृपा, उपकार म्हणून मी दान देत नाहीये, तर “त्याने” देण्याची ऐपत दिली, म्हणून मी दान देऊ शकतोय. दान करताना हा भाव मनात असावा.
हेची दान देगा देवा, “तुझा” विसर न व्हावा, हा भाव मनात ठेवला तर अहंकाराची बाधा होण्याची भीती उरत नाही. असे तुकाराम महाराजांनी देखील मागितले आहे.
धर्मशाळेत जेवू नये
अनेक ठिकाणी ज्या अन्नछत्रातून जेवण मिळते, ते कोणासाठी असते ? तिथे आलेल्या भाविकांसाठी ज्यांची भोजनाची सोय त्यांना स्वतःला करणे शक्य नसते, अशाकरीता असते. ज्यांना शक्य असते, त्यांनी असे अन्नछत्रातील भोजन घेणे टाळल्यास, अत्यंत गरजू लोकांना तिथे जेवता येईल.
प्रसाद म्हणून अन्न स्विकारले जावे, पण पोट भरण्यासाठी म्हणून धर्मशाळेतील अन्नछत्रात जेवू नये.
समजा अशा ठिकाणी जेवल्यास, तिथे तेवढेच यथाशक्ती आर्थिक दानही द्यावे, म्हणजे दोष लागत नाही.
धर्मशाळा म्हणजे जिथे दान दिले जाते, त्यातून अन्नदान चालते. अशा ठिकाणी जेवल्याने, दान देणाऱ्याचा संकल्प जसा असेल तसे फळ मिळते. किंवा जेवण बनवणाऱ्याच्या मनातील संकल्प जसे असतात, तशी स्पंदने तयार होत असतात. आईने केले जेवण आणि बाईने केलेले जेवण यात फरक पडतोच ना !
म्हणून शक्यतो माहिती नसलेल्या ठिकाणी जेवायला जाऊ नये. आपली पत, प्रतिष्ठा कमी होण्याची शक्यता जिथे असेल, अशा ठिकाणी सुद्धा भोजन घेऊ नये.
दुसऱ्या अर्थाने पाहायचे झाल्यास, कोणाचे फुक्कटचे खाऊ नये. जे खायचं ते श्रम करून खावे. देणारा आहे, म्हणून त्याच्या जीवावर चैन किती दिवस करणार ना ! एक दिवस देणे बंद झाले की, पुढे काय, याची भ्रांत पडू नये. थोडक्यात परावलंबी राहू नये. स्वतः कष्ट करून खावे. असे आईला सांगायचं असतं.
आणि सार्वजनिक ठिकाणी जेवल्याने जंतुसंसर्गामुळे आजार वाढण्याची भीती असते ती वेगळीच.
म्हणजेच शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि सामाजिक परिणामांचा विचार केला तर, फायदा होण्यापेक्षा नुकसान होण्याची शक्यता जास्त असते.
थोडे तारतम्य बाळगून, विवेक वापरून, आई बाबांनी सांगितलेल्या या काही गोष्टीतून काही नवीन गोष्टी निश्चितच शिकता येतात.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
१७.०८.२०१७
Leave a Reply