नवीन लेखन...

निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग तेवीस

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे एकोणतीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग तेवीस

नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

अंथरूणातून सूर्य बघू नये
अर्थ सरळच आहे. सूर्योदयानंतर अंथरुणात राहू नये. म्हणजेच ग्रंथात सांगितलेला नियम ब्राह्म मुहूर्तावर उठावे. “लवकर निजे लवकर उठे, त्यास धन आरोग्य संपदा मिळे” असं एक सुभाषित शाळेतील लाकडी खांबावर लिहिलेले आठवते.

पण आता जमाना बदल गया है.
आता आम्ही फार उशीर करत नाही, बारा साडेबाराला झोपतो. (झोपतो म्हणजे बाकीच्यासाठी ! डोक्यावरून पांघरूण घेऊन आत माझ्यासकट वाॅटसप जागा असतो. जास्त नाही दीड दोन वाजताच झोपतो. )

लवकर उठायला ज्यांना जमत नाही, त्यांचे पचन बिघडते. लवकर झोपणे होत नाही, याची अनेक कारणे असतील. पण लवकर उठणे होत नाही याला कोणताही युक्तीवाद नको. किमान सहा साडे सहाला उठलेच पाहिजे. रात्रीच्या जागरणाचे संयुक्तिक कारण असेल तर ती झोप दुपारी घ्यावी. पण जेवणानंतर नको. त्याने पुनः आम निर्माण होणार. इथे युक्ती वापरावी. दुपारची झोप आधी घ्यावी आणि उठून नंतर जेवावे. म्हणजे कफ प्रकोप होणार नाही. अर्थात ही पळवाट आहे. नियमाला पळवाट असावी पण पळवाट हा नियम बनू नये.

एवढ्या लवकर उठून करायचे काय, असाही प्रश्न काही जणांना पडेल. काही जण म्हणतील, आम्हाला जाग येते पण उठवत नाही. उठलो तरी ताकद असत नाही. उठायचं असतं, पण पाय दुखतात, पायाची टाच दुखते, गुडघे दुखतात, लवकर उठले तर म्हणे पित्त वाढते, चक्कर येते, डोके दुखते इ. इ. अनेक तक्रारी सक्काळी सकाळी सुरू होतात. या सर्व तक्रारींवर एकच रामबाण उपाय आहे, तो म्हणजे रात्रीचे जेवण सायंकाळी सातला संपलेच पाहिजे. अन्यथा जेवूच नये. जेवण नाहीतर फळ, ज्युस वगैरे वगैरे. नाही चालणार. पोट हलके सैल, रिकामे करूनच तर झोपायचे आहे.

आणि समजा उशीरा झोपणे झाले आणि सकाळी जाग आली तरी
गादीवर जास्त लोळू नये
असे आई सांगते.

मस्त बेड टी प्यावा, बायकोने हातात टीव्ही चा रिमोट आणून द्यावा, तिथूनच योगाचे चॅनेल सुरू करावे. आणि चकली वेफर्स खात खात योगा करणाऱ्यांना बघण्याचा व्यायाम करावा. नाहीतर साखरझोप अनुभवावी, पहाटेची स्वप्न म्हणे खरी होतात, म्हणून आपल्याला हवी तशी सुंदर सुंदर स्वप्ने पहावीत. आणि कानावर गोड हाक यावी,
“मोऽहऽअऽन्ऽ”, जागो प्यारेऽऽऽऽऽ”
डोळे उघडून पहावे तर नेहेमीचीच……

सकाळी लवकर उठावे, आह्निक उरकावे, जमल्यास स्नानसंध्या करावी. ज्ञानमार्गाने जाणारे असू तर काहीबाही वाचन करावे, भले ते ज्ञान दै. लोकसत्ता, मटा किंवा वाॅटसप महाराजांकडून आलेले का असेना !
काही लेखन करावे. वाॅटसप वर लेखन करावे.ट्विटरवर टिवटिव करावी. मराठी इंग्लिश अथवा हिंग्लीश भाषा वापरावी. फेसबुकवरील असंख्य मित्रांना तत्वज्ञानाचे डोस पाजावेत. (आपण कोरडे पाषाण रहावे.)

ज्ञान ग्रहणाची आवड नसेल तर कोणतेही आवडीचे काम करावे. बागेत जावे, व्यायम करावा, जेवण बनवावे, टीव्ही मात्र पाहू नये.

कर्ममार्ग पण नको असेल तर सरळ साध्या सोप्या भक्तीमार्गाने जावे. देवळात जावे, तुळशीला, वडा पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात. घरातच राहायचे असेल तर लोटांगणे घालावीत, नाहीतर खुर्चीवर बसून नामस्मरण करीत राहावे, पण झोपून राहू नये. हे झोपणे मधुमेहाकडे नेणारे आहे. हे पक्के लक्षात ठेवावे. ( मी स्वतः रात्री एक वाजेपर्यंत जागा असतो, पण सकाळी सहा साडेसहाला नक्कीच उठतो. आणि रात्रीचे जागरण झाले तरी आम निर्माण होतच नाही, कारण माझे रात्रीचे भोजन सायंकाळी आटपलेले असते. )

आई जे सांगते त्यामधे काहीतरी अर्थ नक्कीच दडलेला असतो, कारण अनुभवाचे चार पावसाळे तिने जास्ती पाहिलेले असतात. भले त्यामागील शास्त्र, विज्ञान तिला माहिती नसेल. कारण तिला तिच्या आईने तसेच सांगितले होते.

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..