नवीन लेखन...

निरोगी राहण्यासाठी रोज नियमाने हे करा

शीर्षक वाचून यू ट्यूब वरचा एखादा व्हिडिओ समोर आल्यासारखे वाटले का ? यू ट्यूब म्हणा किंवा इतर कोणतेही सोशल मिडियाचे माध्यम असेल , सगळीकडेच काही मिनिटात काही तासात किंवा काही दिवसात एखादा आजार दूर करण्यासाठी सांगितलेल्या हजारो अफलातून कल्पना सुचवलेल्या आढळतील . आजपर्यंत केसगळतीपासून ते कर्करोगापर्यंत हरेक समस्येवर जालीम उपाय म्हणून सुचविल्या जाणाऱ्या या उपायांची जागा कोरोनाच्या साथीपासून एक गोष्ट बळकावू लागली आहे ती म्हणजे ‘ इम्युनिटी ‘ किंवा ‘ रोगप्रतिकारशक्ती ‘ ! पण गंमत अशी आहे की , आजार होऊ नये यासाठी लागणारी जी शरीराची शक्ती , ती मिळवणे हे अशा प्रकारे काही मिनिटे , तास किंवा आठवड्यात साध्य करता येण्यासारखे नाही ‘पी हळद अन् हो गोरी ‘ हे रोगप्रतिकारशक्तीबाबतही खरे होत नसते . त्यामुळे ही शक्ती वाढवायची तर त्यासाठी करायच्या प्रयत्नातही सातत्य हवेच .

एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती ही त्या व्यक्तीला आजारांपासून दूर ठेवणे आणि एखादा आजार झालाच तरी तो फारसा त्रासदायक न ठरता लवकरात लवकर बरा व्हावा या दोन्हीसाठी कार्यरत असते . याचाच अर्थ असा की , रोगप्रतिकारशक्ती ही स्वास्थ्य निर्माणाचे कार्य करीत असल्याने स्वास्थ्य मिळविण्यासाठीचे , टिकविण्यासाठीचे जे उपाय तेच रोगप्रतिकारशक्ती मिळविण्यासाठी आणि वाढविण्यासाठीचेही मूलभूत उपाय आहेत .

कोणताही रोग तुमच्या शरीर , मन आणि इंद्रियांवर कितपत कब्जा करेल हे तुमचे शरीरातील तीन योद्धे किती ताकद आणि सामग्री बाळगून आहेत यावर अवलंबून असते . त्यामुळे एखाद्या रोगाशी सामना करताना आपला विजय व्हावा आणि स्वास्थ्य मिळावे असे हवे असेल तर या तिन्ही योद्ध्यांना सुयोग्य आहार , विहार आणि उपक्रमांच्या आधारे योग्य ती रसद पुरवून , नित्य प्रशिक्षण देऊन सक्षम बनविणे गरजेचे असते . याकरिताच , स्वास्थ्यवर्धक उपायांमध्ये नित्यक्रमातील गोष्टींना महत्त्वाचे स्थान दिलेले आहे .

आयुर्वेदात या सर्व घटकांचा समावेश ‘ स्वस्थवृत्त ‘ या विषयांतर्गत केला जातो . रोजच्या रोज , दिवसरात्रीनुसार वातावरणात घडणाऱ्या बदलांचा स्वास्थ्य वाढवण्यासाठी वापर करून घेता यावा यासाठी दिनचर्या नावाने काही विशिष्ट नियम आणि स्वास्थ्यवर्धक उपाय आयुर्वेदात सांगितलेले आहेत . दिवसभरात एखाद्या व्यक्तीने काय करायला हवे , कधी करावे , किती प्रमाणात करावे या सर्वांबाबत सखोल विचार आयुर्वेद करतो . दिनचर्येचा भाग असणारे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणारे हे उपक्रम पुढे थोडक्यात पाहू .

• सकाळी उठण्याची वेळ – आयुर्वेदानुसार ब्राह्म मुहूर्त ही सकाळी उठण्याची सुयोग्य वेळ आहे . हा मुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वी साधारण दीड तास . भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे साधारण ४.३० ची वेळ .
• शौचविधी – सकाळी झोपेतून उठल्यावर सर्वप्रथम आदल्या दिवशीच्या पचनातून निर्माण झालेला मळ बाहेर टाकावा . वर सांगितलेल्या वेळेत उठण्याची सवय केल्यास हा मल बाहेर टाकण्यासाठी अधिक जोर किंवा उपाय करण्याची वाट बघण्याची वेळ सहसा येत नाही आणि शरीर खऱ्या अर्थाने फ्रेश होण्यास मदत होते .
दंतधावन आणि जिव्हानिर्लेखन – म्हणजेच दातांची , जिभेची आणि संपूर्ण तोंडाची स्वच्छता . दातांच्या स्वच्छतेसाठी कडुनिंब , खैर अशा वेगवेगळ्या वनस्पतींच्या काड्यांचा वापर करण्यास सांगितलेला आहे . दात व संलग्न अवयवांची स्वच्छता ज्याने करायची त्या वस्तूची चव ही कडू , तिखट , तुरट यापैकी असणे गरजेचे आहे . म्हणूनच वनस्पतींच्या काड्या जरी नाही वापरल्या तरी , रोज वापरायची टूथपेस्ट ही किमान गोड , आंबट किंवा खारट असू नये याची काळजी आपण घ्यायला हवी . जिभेच्या स्वच्छतेसाठी धातूच्या पट्ट्यांचा वापर करावा .
अंजन – दात व जिभेच्या सफाईनंतर सुरम्यासारखे अंजन डोळ्याला लावल्यास बाहेर पडणाऱ्या पाण्यासोबत डोळ्यात साठून राहिलेले मळ सहज बाहेर पडतात आणि
निर्मळ , स्पष्ट व तीक्ष्ण दृष्टी प्राप्त होते.

नस्य – डोळ्यांनंतर येते ती नाक व नाकाशी संलग्न अवयवातील कफप्रधान मळ बाहेर काढण्याची क्रिया . यासाठी अणुतेलासारख्या औषधी तेलाचे काही थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये सोडावयाचे असतात . असे औषधी तेल साठलेल्या मळाला बाहेर काढण्यासोबतच नाक , कान , डोळे अशा सर्व इंद्रियांची ताकद उत्तम राखण्यास मदत करते .
गंडूष – मुखातील दात ,हिरड्या , जीभ , ओठ , घसा , गालांचा आतील भाग हा अन्न पचविण्याच्या , बोलण्याच्या रोजच्या कामात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारा असतो . या सर्व प्रक्रियांमध्ये रोजच्या रोज त्याची होणारी झीज भरून काढून या सर्व भागांचे बळ वाढवायचे असेल तर सदर उपक्रम अतिशय उपयुक्त ठरतो . यामध्ये तीळतेल , वनस्पतींचे काढे किंवा दूध असे औषधी द्रव पदार्थांना काही विशिष्ट कालावधीकरिता तोंडात धरून ठेवायचे असते . निर्धारित कालावधी पूर्ण झाला की ते पदार्थ बाहेर टाकून द्यायचे .
धूमपान – विशिष्ट औषधींपासून तयार केलेल्या विडीसारख्या धूपन कांडीच्या साहाय्याने तयार झालेला औषधी धूर नाकावाटे व तोंडावाटे आत घेणे आणि तोंडाने बाहेर सोडणे अशी प्रक्रिया यात असते . अशा धूमपानामुळे डोक्यातील जडपणा , शूळ , शीर प्रदेशातील त्रासदायक कफासारखे स्राव हे सर्व नाहीसे होऊन सर्व इंद्रियांना उत्तम बळ मिळते आणि अनेकविध आजारांपासून संरक्षण प्राप्त होते.

तांबूल सेवन – वरील सर्व उपचारांतून बाहेर पडणाऱ्या मलस्वरूप द्रव्यामुळे मुखदुर्गंधी होऊ नये व तजेला वाटावा याकरिता तांबूलसेवन उपयुक्त ठरते . विड्याचे पान किंवा जायफळ , लवंग यासारख्या सुगंधी द्रव्यांपासून बनलेला मुखवास सेवन करावा

अभ्यंग- अभ्यंग म्हणजे संपूर्ण शरीराला कोमट तिळाच्या तेलाने मालिश करणे . रोज केलेल्या अभ्यंगाने शरीर लवकर म्हातारे दिसत नाही , त्वचा तजेलदार बनते , वाताचे आजार दूर ठेवता येतात , डोळ्यांची शक्ती वाढते आणि सर्व शरीराला पुष्टी प्राप्त होते .

व्यायाम – व्यायाम म्हणजे शरीराची अशी हालचाल ज्याने शरीर अधिकाधिक स्थिर होण्यास मदत होईल आणि बळ वाढेल . अन्यथा याचा पूर्णतः विपर्यास होऊन शरीराला दमवणारा , थकवणारा असा व्यायाम सध्या केला जातो . परंतु हे शास्त्रीय तत्त्वाच्या विरोधी असल्याने दमवणाऱ्या व्यायामाने स्वास्थ्य वाढेल ही अपेक्षाच करणे खरे तर चूक ठरते . टीव्ही किंवा सिनेमात एखाद्या पैलवानाला अंग रगडून घेत असल्याचे तुम्ही पाहिले असेल , यालाच अंगमर्दन असे म्हणतात . व्यायामाने दमलेल्या शरीराला आलेले श्रम नाहीसे होण्यासाठी , आपल्याच हाताने सुखावह ठरेल इतकासा दाब देऊन अंगमर्दन करावे .
उद्वर्तन – विशिष्ट औषधींची चूर्णे सर्व शरीरावर घासून लावणे याला उद्वर्तन असे म्हणतात . व्यायामानंतर उद्वर्तन केल्यास शरीर दृढ होण्यास मदत होते , त्वचेचे सौंदर्य वृद्धिंगत होते आणि सोबतच शरीरातील अनावश्यक मेद पातळ होण्यास व झडण्यास मदत होते.

व्याधिक्षमत्व
स्नान – अभ्यंग , व्यायाम व उद्वर्तनानंतर क्रमाने स्नानाची वेळ येते . मानेच्या खालील शरीरावर गरम पाण्याने , तर वरील भागावर मात्र किंचित कोमट किंवा थंड पाण्याने स्नान करावे . डोक्यावरून गरम पाण्याने स्नान केल्यास ते डोळे आणि केसांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करते .
भोजन / अन्नसेवन – स्नानाने शुद्ध व स्वच्छ झाल्यावरच आता क्रमाने भोजन किंवा अन्नग्रहण याचा विचार येतो . याचाच अर्थ वरील सर्व गोष्टी या सकाळी उठल्यापासून क्रमाने करून झाल्याशिवाय खरे तर काहीही खाणे योग्य नाही . आदल्या दिवशी ग्रहण केलेल्या अन्नपाण्याच्या पचनातून तयार झालेला मल , अस्वच्छता , आळस , जडत्व हे सगळे गेल्यानंतरच आजच्या दिवसासाठी ऊर्जा मिळावी म्हणून ज्याला यज्ञकर्माची उपमा दिली आहे असे अन्न सेवनाचे कार्य करावे . अशाप्रकारे आधीच्या अन्नाचे पचन पूर्ण झाल्यावर , चांगली भूक जाणवल्यावर , शरीर वाढण्यासाठी उपयुक्त ठरेल अशाप्रकारचा आहार योग्य प्रमाणात सेवन केल्यास अन्न सुलभतेने पचते आणि बलदायी ठरते .

दिवसाच्या इतर सर्व कामांची सुरुवात वरील उपक्रम झाल्यानंतर करणे हे आदर्श आहे . अशाप्रकारे दिनचर्येत नमूद केलेल्या वरील गोष्टींना जीवनशैलीचा भाग बनविल्यास नक्कीच उत्तम स्वास्थ्य आणि रोगप्रतिकारशक्ती मिळविणे शक्य होईल . तसेच थोड्याथोडक्या आजारांनी शरीराला हानी न पोहोचता शरीर आजारांना दूर ठेवू शकेल व यदाकदाचित झालेल्या आजारांचा समर्थपणे सामना करण्यायोग्य बनेल.

वैद्य. देवश्री फाटक
श्रीगजानन महाराज मेडिकल सेंटर ,
शिवाई नगर , ठाणे ,
७३०४७९०३५८

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..