श्रीमत् आदिशंकराचार्यरचित निर्वाणषटक (आत्मषटक) मराठी अर्थासह
श्रीमद् आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारले, “तू कोण आहेस?” त्यावर त्यांनी दिलेले उत्तर म्हणजे हे अर्थगर्भ षटक होय. सहा श्लोकांचे हे काव्य अद्वैत वादाचा गाभाच म्हणावयास प्रत्यवाय नसावा. त्याला ‘निर्वाणषटकम्’ किंवा ‘आत्मषटकम्’ असेही म्हणतात. या स्तोत्रात आचार्यांनी सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव व स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी प्रथम मी (म्हणजे आत्मा) काय नाही हे सांगून शेबटी थोडक्यात मी कोण आहे ते मांडले आहे. अद्वैत सिद्धांतानुसार ‘मी नित्य आनंदस्वरूपी शुद्ध चैतन्य आहे’ असे त्यांनी प्रतिपादन केले आहे. एका विद्वानांनी या स्तोत्राचे वर्णन Song of Self Realization असे केले आहे. शेवटच्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे आत्मा हे वैश्विक तत्त्व परमेश्वरस्वरूप असून आनंदाने परिपूर्ण आहे. भुजंगप्रयात वृत्तात रचलेले हे षटक अत्यंत गेय व समजण्यासही सोपे आहे.
मनोबुद्ध्यहंकारचित्तानि नाहं
न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे ।
न च व्योमभूमिः न तेजो न वायुः
चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥ १॥
मराठी– मी मन नाही, प्रज्ञा नाही, मीपणा नाही, विचार नाही. मी कान, जीभ नाही, नाक, डोळे ही नाही. मी आकाश वा जमीन नाही. मी प्रभा नाही, वाराही नाही. मी नित्य आनंदस्वरूपी शुद्ध चैतन्य आहे.
टीप- येथे ‘मी’ म्हणजे आत्मा अंतःकरणापासून वेगळा असल्याचे म्हटले आहे. मन,बुद्धी,अहंकार व चित्त हे अंतःकरणाचे चार घटक आत्म्यापासून भिन्न आहेत. पंचेद्रियांपैकी चार इंद्रिये (कान, जीभ,नाक व डोळे) ही वेगळी आहेत. (पाचवे-स्पर्श त्यात अंतर्भूत आहे.) ज्यापासून सूक्ष्म व स्थूल शरीर बनते ती पृथ्वी,आप,तेज,वायू व आकाश ही पंचमहाभूतेही आत्म्यापासून भिन्न आहेत.
मती चित्त ना मान बुद्धी नसे मी
जिभा कान डोळे नसे नासिका मी ।
न आकाश पृथ्वी न वारा प्रभा मी
सदा मोदरूपी खरी चेतना मी ॥ १
न च प्राणसंज्ञो न वै पंचवायुः
न वा सप्तधातुर्न वा पंचकोशः ।
न वाक् पाणिपादौ न चोपस्थपायू
चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥ २॥
मराठी– मला (शरीरातील) ऊर्जा म्हणत नाहीत, तसेच मी पाच प्रकारच्या श्वासांपैकी, सात धातू पैकी नाही की पाच कोषांपैकीही नाही. मी वाचा, हात, पाय आणि पुनरुत्पादन वा उत्सर्जन इंद्रियही नाही. मी नित्य आनंदस्वरूपी शुद्ध चैतन्य आहे.
टीप:
पंचवायू– वेगवेगळी कार्ये करणारे ‘प्राण,उदान,समान,व्यान आणि अपान असे पाच प्रकारचे श्वास योगशास्त्रात वर्णिलेले आहेत.
सप्तधातू- आयुर्वेदानुसार शरीरधारणेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण रस,रक्त,मांस,मेद,अस्थी,मज्जा व शुक्र असे सात धातू असतात.
पंचकोश– योगशास्त्रानुसार मानवी आस्तित्व पाच भागांत वाटलेले आहे, ज्यांचा एकमेकांशी घनिष्ट संबंध असतो. • अन्नमय कोश – अन्नापासून निर्माण होतो. • प्राणमय कोश – प्राणापासून बनतो. • मनोमय कोश – मनापासून बनतो. • विज्ञानमय कोश – अन्तर्ज्ञानातून निर्मित. • आनंदमय कोश – आनन्दानुभूतीतून निर्मित.
पाच कर्मेंद्रिये– वाचा,हात,पाय,लैंगिक व उत्सर्जन संबंधित इंद्रिये मिळून पाच कर्मेंद्रिये बनतात.
नसे नाव ऊर्जा, न मी पाच वारे
नसे पाच कोशात, धातू न सारे ।
न पायी न हाती न शू शी न वाणी
सदा मोदरूपी खरी चेतना मी ॥ २
न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ
मदो नैव मे नैव मात्सर्यभावः ।
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः
चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥ ३॥
मराठी– मला कोणाबद्दल अप्रीती नाही, जिव्हाळाही नाही. मला हाव नाही,कोणताही भ्रम नाही मला ताठा नाही, कोणाबद्दल असूयाही नाही. मी कर्तव्यपालन, धनसंपादन, इच्छापूर्ती व मुक्ती या (चार पुरुषार्थां) पैकी कोणी नाही. मी नित्य आनंदस्वरूपी शुद्ध चैतन्य आहे.
तिरस्कार ना प्रेम ना हाव मस्ती
नसे भ्रांति वा ना असूयेस वस्ती ।
पुरूषार्थ चारी कदापी नसे मी
सदा मोदरूपी खरी चेतना मी ॥ ३
न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं
न मंत्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः ।
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता
चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥ ४॥
मराठी– मी सदाचार वा दुष्कृत्ये, सुख वा दुःख नाही. मी मंत्रोच्चारण, तीर्थक्षेत्रे, वेदपठण वा होमहवन (यापैकी काहीही) नाही. मी खाण्याची क्रिया, खाद्यपदार्थ वा खाणाराही नाही. मी नित्य आनंदस्वरूपी शुद्ध चैतन्य आहे.
सदाचार वा सौख्य दुष्कृत्य दुःख
न क्षेत्रे क्रतू मंत्र वा वेदवाक्य । (क्रतु-यज्ञ)
न खाणे न मी खाद्य ना भक्षिणारा
सदा मोद चैतन्य मी शुद्ध सारा ॥ ४
न मे मृत्युशंका न मे जातिभेदः
पिता नैव मे नैव माता न जन्म ।
न बंधुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः
चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥ ५॥
मराठी– मला मरणाची शक्यता (भीती) नाही (मला माझ्या आस्तित्वाबद्दल शंका नाही). मला विविध ज्ञातींमध्ये (धर्म,लिंग,जन्म,जात इ.) विभिन्नता नाही. मला जन्म नाही, बाप नाही, आईही नाही. नातलग नाही, सखेसोबती नाही. गुरू नाही, शिष्य तर नाहीच नाही. मी नित्य आनंदस्वरूपी शुद्ध चैतन्य आहे.
यमाची न भीती न वा ज्ञाति भिंती
अजन्मा मला माय ना बाप नाती ।
कुटुंबी, सखे ना गुरू शिष्य नाही
सदा मोदरूपी खरी चेतना मी ॥ ५
अहं निर्विकल्पो निराकाररूपो
विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम् ।
सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः
चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥ ६॥
मराठी– माझ्यात कोणतेही बदल होत नाहीत, मला कोणताही आकार नाही. मी सर्व अवकाश व्यापले असून सर्व इंद्रियांचा नियंता आहे (मी सर्वत्र पसरलेला असून सर्व इंद्रियांचा आधार आहे). सर्वांबद्दल मला सारखेपणा आहे. मला मोक्ष नाही (पण) मला कोणतेही बंधन नाही. (मी कोणापासूनही वेगळा होत नाही पण मला कोणाबद्दलही स्नेह आपुलकी नाही). मी नित्य आनंदस्वरूपी शुद्ध चैतन्य आहे.
विकारा न थारा न आकार काही
जगा व्यापिले जिंकुनी इंद्रिये ही ।
नसे मोक्ष वा बंधने, एक सारे
सदा मोदरूपात चैतन्य न्यारे ॥ ६
॥ इति श्रीमच्छङ्कराचार्यविरचितं आत्मषट्कं सम्पूर्णम् ॥
— धनंजय बोरकर
(९८३३०७७०९१)
वाह. खूपच सुंदर निरूपण. मोजक्या आणि सोप्या शब्दात ..
Thanks for the elaboration. It is the ultimate wisdom .
.
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता
इथे भोजन ह्याचा संबंध खाणे, खाद्यपदार्थ किंवा भक्षण करणारा इतकाच मर्यदित नसावा तर पंचेंद्रियांनी जे अनुभवता येते ते सर्व असाही असावा.
लेखात लिहिल्या प्रमाणे ‘प्रथम मी काय नाही हे सांगून शेवटी थोडक्यात मी कोण आहे हे मांडले आहे ‘ हे जरा रास्त वाटत नाही कारण प्रत्येक श्लोकाच्या शेवटी ते ठासून सांगत आहेत कि चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम्.
सर. शब्दाचा अर्थ व त्या पासून होणारा बोध हे वेगळे असू शकतात, किंबहुना बऱ्याच वेळेस असतात. ग्यानबाची मेख हा वाक्प्रचार यामुळेच आला असावा. देवाचिये द्वारी उभा क्षणभरी याचा अर्थ ‘क्षणभर तरी उभा राहा’ असा घ्यायचा का ‘उभा राहून आयुष्याचे क्षण भर’ असा घ्यायचा’
दुसरे उदाहरण म्हणजे येशू ख्रिस्ताचे प्रसिद्ध सांगणे: …Love thy neighbour as thyself. याचा शब्दशः अर्थ आपल्या शेजाऱ्यावर स्वतःवर करशील तसे प्रेम कर असा घ्यायचा का? जर हे वाक्य आपण वेगळ्या प्रकारे interprete केले “Love thy neighbour as the Self in thee would love him” तर वेगळा अर्थ जो रास्त वाटतो तो निघतो. The Self in thee (with S capital) would mean the atman or God that resides in you where as self (with s small) would mean an individual – as in selfish.
सर. Relationships are of two types. One is Relative relationship as that of one person with another like एकच माणूस हा मामा, काका, वडील, मुलगा, नवरा, भाऊ ई. असतो. And the second is Absolute Relationship – that everyone has with HIM. It is the same. इथे समत्वाची जाणीव होते.
सर. माफ करा मी हे लिहीत आहे. मी तुमच्या एव्हडा विद्वान नाही. पण आपल्या सारख्या इतरांच्या सहवासात जे मी हे शिकलो ते आपल्याशी केवळ share केले आहे.
नमस्कार
निर्वाण षटक मला खूप आवडतं.आपण त्यांचे मराठी रुपांतर खूप सुंदर केले आहे.मनाला भावल.आनंद
मिळाला.खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छ.
उर्मिला आपटे
खूप छान!
सोपं करून अर्थ विषद केला आहे.??
धन्यवाद!?
Stanza 6, 3rd row:
न चासंगतं न मुक्तिर न मेय:
There is difference in my copy. Please elaborate on the authenticity.
Please read it as
न चासंगतं नैव मुक्तिर न मेय:
नितीन वैद्य
ही माझी खूप आवडती प्रर्थना . याचं मराठी स्रूपही तितकंच भावलं. खूप खूप धन्यवाद. याला कोणीही सुंदरशी चाल लावून रेकॅार्डिंग र्सृत केलं तर आवडेल.
अर्सोथ सोप्या भाषेत समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद.
जयगुरुदेव ?? सरळ आणि सोपे
आवडले खुपच धन्यवाद काही अध्यात्मिक शंका असल्यास कसा संपर्क साधावा?
PLEASE SEND THE NIRVAN SHATAKAM ON MY EMAIL
धन्यवाद .अतिशय साध्या व सोप्या भाषेत अर्थ समजावुन सांगितला आहे.
फारच छान भाषांतर उत्तम नमस्कार
खूप छान , मला हे माझ्या कडे अर्था सह ठेवायचे आहे , कसे मिळेल.
खूप सुंदर! शब्दार्थ आणि भावार्थ दोन्ही सुरेख…
अधुनिक विनोबा भावे…
??
This is my very favourute prayer
of Aadi Shankaracharya. You have done great justice to bring it in Marathi, Your poetic translation is
excellent. It is lyrical,precise and has come out with exact meaning.Can you send it to me by e mail?
This is my very favourute prayer
of Aadi Shankaracharya. You have done great justice to bring it in Marathi, Your poetic translation is
excellent. It is lyrical,precise and has come out with exact meaning.
वा! खूप छान ! सरळ आणि सोपे