माझ्या बागेत आपोआप उगवलेले एक रुईचे झाड आहे. अडचण करणारे नसले तरी त्याची जागा जिथे आहे तिथे योग्यही वाटत नाही. ते तोडून टाकायचं मनात आलं होतं परंतु , पण त्या झाडाच्या शेंगा तयार होऊन एकदा का फुटल्या आणि त्यातील चकचकीत शुभ्र तलम कापूस बाहेर डोकावूं लागला की आपल्या अगदी छोट्याश्या घरट्यात पिल्लांसाठी मऊशार गादी तयार करण्याकरिता तो कापूस चोचीत धरून नेणाऱ्या चिमुकल्या शिंजीर ( Sunbirds) आणि शिंपी ( Tailor Birds ) पक्षांची सुरू असलेली लगबग पाहिली आणि ते झाड तसंच वाढू देण्याचं मनात पक्कं केलं.
त्या पक्षांचा विणीचा हंगाम आणि त्या काळात झाडाकडून तलम कापसाची उपलब्धता हा निसर्गाने घडवून आणलेला कालयोगही लक्षात आला.
आणि मग त्या झाडाला जपायला लागलो. पाहता पाहता आता ते चांगले दहा फूट उंचीचे झाले आहे . एकमेकांना पूरक बनण्यासाठी निसर्गाने सृष्टीतील प्रत्येक घटकाला काही ना काही जबाबदारी सोपविलेली असते. आता , रुईचच पहा ना ! रुईच्या कळ्या उमलून निळसर पुष्पगुच्छ तयार झाले की की त्या फुलांतील मध पिण्यासाठी भुंगे या गुच्छावरून त्या गुच्छावर सतत गुणगुणत फिरत असतात. त्याचवेळी ते फुलांमधील परागीभवनाचे काम चोख बजावत असतात . त्यामुळे उत्तम फळधारणा होते. झाडाला शेंगा धरतात. यथावकाश शेंगांचा पोपटी रंग लोप पावतो आणि त्या दाट मळकट हिरव्या रंगाच्या दिसू लागतात. कालांतराने आतील बिया रुजण्यायोग्य झाल्या की शेंगेचं कवच मधोमध शिरेवर दुभंगतं. आतील कापूस दृष्य होतो. लहान पक्षी याची जणू वाटच पहात असतत. सारखे भुर्र भुर्र करत शेंगेतील कापूस त्यांच्या सुई एवढ्या चोचीमधे ओढून जेवढा येईल तेवढा घेऊन ते बांधत असलेल्या घरट्याकडे फेऱ्या मारतात. या प्रक्रियेत शेंगेतील कापूस सैल होतो . तलम तंतू परिधान केलेल्या , शेंगेबाहेरील विश्वात झोकून देण्यासाठी रांगेत वाट पहात असलेल्या बिया वाऱ्याच्या झुळुकीच्या झोतात अगदी सहजपणे येतात. तलम तंतू हलवत आपल्या मागून निघायच्या तयारीत असलेल्या भावंडंबियांना बाय बाय करतात. त्यांची आता यापुढे एकमेकींशी कधीही भेट होणार नसते. तंतूंनीच मागच्या बी बरोबर हस्तांदोलन करत , एक एक करत बीया स्वतःला वाऱ्याच्या स्वाधीन करतात . मधे अडथळा नसेल तर बी मैलोंगणती उडत जाते . वारा थांबला, दंव अंगावर पडलं किंवा पावसाच्या थेंबानी भिजवलं की , ती बी जमिनीवर येऊन स्थिरावते . धुलिकणांच्या दुलईत झोपून पावसाच्या सरीची वाट पाहते .
पावसाच्या पाण्याने ती रुजते . तिला कोंब फुटतो . ती काळया आवरणाचा त्याग करते . ते आवरण ओलेपणाने भिजून मऊ झालं की त्यातील पोषक द्रव्य सुध्दा शोषून घेते आणि भोवलालच्या हजारो लाखो कोंबांबरोबर वाढीस लागून पाहता पाहता स्वतःच एक नवीन झाड बनून जाते. हे नवीन झाडसुद्धा आता भुंगे , कीटकांना मध देत त्यांच्याकडून परागीभवन करवून घेतं . पुढे बियांच्या स्वरूपातील हजारो प्रतिनिधी तयार करून , लहान पक्षांना घरट्यासाठी कापूस देऊन त्यांच्या चोचीने उघड्या शेंगेतील कापूस पिंजून घेत ,वाऱ्याच्या झोतात आणवून त्यांना स्वतःचे हरितध्वज रोवण्यासाठी सर्वदूर रवाना करते. जमिनीलगत असलेले एखादे बारीकसे रोपटे असो की महाकाय वटवृक्ष असो. प्रजातीचा प्रसार करण्यासाठी निसर्गाने प्रत्येक घटकासाठी पक्की योजना करून ठेवलेली असतेच असते. उगाच नाही , साध्या गोकर्ण फुलाच्या वेलीवरची शेंग वाळली की ती एखादया स्प्रिंगसारखी फुटून तिच्यातील बिया मूळ झाडापासून लांबवर फेकल्या जातात.
उंच झाडावरून तयार नारळ खाली जमिनीवर पडला तरी आतील ” बीज ” सुखरूप राहावे म्हणून चवडांचं भक्कम आवरण त्याचं संरक्षण करतं आणि पाण्यात पडला तरी पाण्याच्या तळाशी न जाता त्या नारळाला तरंगत असतानाही कोंब फुटतो. निसर्ग अगाध आहे.
-अजित देशमुख. (नि)
अप्पर पोलीस उपायुक्त,
9892944007
ajitdeshmukh70@yahoo.in
Leave a Reply