भालजी पेंढारकरांसारख्या नररत्नाच्या पोटी जन्माला आल्यानंतर ‘रारंगढंग’कार प्रभाकर पेंढारकर यांना स्वत:ची कारकीर्द घडवताना नेहमीच एक गडद सावली सांभाळावी लागणार होती. त्यांनी ती लिलया जपत स्वत:चा ठसा उमटवला. त्यांच्या निधनामुळे स्वत:ची वेगळी वाट चोखाळणार्या एका व्यासंगी कादंबरीकाराला मराठी साहित्यविश्व अंतरल्याची हळहळ सतत जाणवत राहील. त्यांच्या स्मृतींना दिलेला उजाळा.चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांचे लखलखणारे स्वाभिमानी व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्व दंतकथांचा विषय बनले आहे. अशा प्रभावी व्यक्तीच्या तेजोवलयात वाढणार्या अपत्याला स्वत:ची वाट चोखाळणे फार दुस्तर ठरते. परंतु, भालजींचे सुपुत्र प्रभाकर पेंढारकर यांनी वडिलांच्या तेजोवलायाने झाकोळून न जाता, त्यांना चित्रपट दिग्दर्शनात सहाय्यक म्हणून समर्थपणे वाटचाल केलीच; शिवाय फिल्म्स डिव्हिजनमध्ये निर्माता म्हणून 30 वर्षे काम करून अनेक पुरस्कारप्राप्त माहितीपटांचीही निर्मिती केली. वडिलांचा चित्रपटकथा लेखन-दिग्दर्शन हा वारसा चालवूनच ते थांबले नाहीत. फिल्म्स डिव्हिजनच्या निमित्ताने भारतभर माहितीपट निर्मितीसाठी संचार करत असताना त्यांनी जे विराट निसर्गरूप बघितले आणि मानवी कर्तृत्वाचे जे अचाट, उत्तुंग नमुने बघितले त्याचे शब्दांकन करून मराठीतील कादंबरीविश्वही संपन्न समृद्ध केले. त्यांच्या ‘रारंगढंग’ या कादंबरीने मराठी वाचकांपुढे अस्सल अनुभवाचे एक अनोखे जग उभे केले.बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या वतीने हिमालयात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विश्वनाथ मेहेंदळे हा तरुण मराठी अभियंता लष्करी अधिकार्यांच्या करड्या शिस्तीचे पालन करत रस्ता बांधण्याचे काम पूर्ण करतो. या घटनेचे चित्रीकरण करण्यासाठी प्रभाकर पेंढारकर यांना पाठवण्यात
ेते. ते या घटनेवर माहितीपट तयार करूनच थांबत नाहीत, तर त्या रस्तेबांधणीच्या निमित्ताने ‘एका बाजूला हिमालय आणि लहरी निसर्ग तर दुसर्या बाजूला वेगवेगळ्या स्वभावाची पण सारख्याच जिद्दीची माणसे’ यांच्यातील संघर्षाची, मृत्यूच्या घोंगावणार्या भीषण तांडवाची, रौद्र गंभीर कहाणी अक्षरबद्ध करतात; आणि ती मराठीतील एक अनोखी, अभिमानास्पद साहित्यकृती ठरते. कर्तृत्वशाली वडिलांच्या तेजोवलयात झाकोळून न जाता मराठी
रसिकांच्या
हृदयावर प्रभाकर पेंढारकर आपली स्वतंत्र नाममुद्रा उमटवतात. प्रतीक्षा, किनार लाल झाली, चक्रीवादळ वगैरे कादंबर्यांद्वारे आणि ‘एका स्टुडिओचे आत्मचरित्र’ सारख्या लालित्यपूर्ण कृतीद्वारे साहित्यकार ही आपली प्रतिमा दृढमूल करतात याचे अप्रूप वाटल्याशिवाय राहत नाही. ढांग म्हणजे उभे सरळसोट कडे. हिमालयातील रारंग नावाच्या कड्यातून रस्ते काढण्याच्या कामगिरीवर पंचविशीतल्या विश्वनाथ मेहेंदळे या तरुण इंजिनिअरची नेमणूक होते. हे काम उत्तम आणि टिकाऊ व्हावे ही त्याची तरुण सुलभ जिद्द. आपण बांधलेलेरस्ते या प्रदेशातल्या लोकांच्या उपयोगी पडावेत, डोंगराळ भागातील जनता देशाला जोडली जावी, डोंगराळ प्रदेशात सुधारणा व्हाव्यात ही त्यांची इच्छा तर बॉर्डर रोड टास्क फोर्सचे प्रमुख कर्नल राइट, मेजर बंबा वगैरे लष्करी अधिकार्यांच्या मते ‘रस्ते हे सैनिकांचे शस्त्र; जलद हालचाली करणे, आपल्याला लढाईसाठी योग्य जागा मिळणे, वाहतूक झटपट करता येणे’ यासाठी रस्ते बांधणे आवश्यक. या दोन भूमिकांमधील फरक लक्षात येतो, तेव्हा विश्वनाथला हे काम सोडून द्यावे असे वाटते. रस्ते हे ज्ञानाचा, सुधारणांचा, समाधानाचा प्रवाह बनणार नसतील, केवळ धूळ उडवणारे आणि येथील स्वच्छ वातावरणात सुधारणेचं प्रदूषण निर्माण करणारी रहदारी वाढवणारे असतील तर तो या प्रदेशावर अत्याचार ठर
ेल असे त्याला वाटते. त्याची मन:स्थिती द्विधा होते. लष्करी अधिकार्यांना आपल्या श्रेणी आणि पदाबाबत असणारा अहंकार, करड्या शिस्तीचा वाटणारा बडिवार, लष्कराबाहेरच्या सिव्हिलियन्सबद्दल त्यांच्या मनात असणारा तुच्छतेचा भाव, मानवी आणि निसर्गप्रणीत अडचणींकडे साफ दुर्लक्ष करत हा रस्ता विशिष्ट कालावधीत पूर्ण करण्याबाबतचे काटेकोर वेळापत्रक विश्वनाथला अस्वस्थ करते. त्याच्या लेखी रस्ताबांधणी हे केवळ एक कंत्राटी काम नसते तर निसर्ग आणि माणूस यांच्या परस्परसंबंधाचे, सहकार्याचे, द्वंदाचे एक रोमांचकारक पर्व असते.
माणसामाणसातील स्वभाव-प्रवृत्तींच्या वैचित्र्यामुळे आणि आपलाच अनुभव खरा मानण्याच्या आग्रहामुळेही अनेक वाद-विसंवाद नित्य झडत राहतात. विश्वनाथ या सर्वांना तोंड देत रस्त्याचे काम नियोजित वेळेत पूर्ण करतो; परंतु त्याचा एक कमकुवत भाग कोसळतो. तो कोसळलेला भाग विश्वनाथ कोणालाही न विचारता, म्हणजे लष्करी अधिकार्यांना न सांगता पुन्हा मजबूत बांधून काढतो. हे कृत्य बेकायदेशीर आहे असा आरोप ठेवून त्याचे कोर्ट मार्शल केले जाते. आरोपीची स्वतंत्र बुद्धी आणि विचारपद्धती पाहता असा माणूस सैन्याच्या शिस्तीत आणि कार्यपद्धतीत बसण्याची शक्यता दिसत नाही, तेव्हा याचा तीन वर्षाचा करार रद्द करावा असा निर्णय दिला जातो. ही शिक्षा त्याच्या व्यक्तिमत्त्वाला ललामभूत ठरावी अशीच असते. असाच संघर्ष ‘चक्रीवादळा मध्ये दिसतो. सुनामी आणि चक्रीवादळात उद्ध्वस्त झालेल्या समुद्रकाठच्या गावांच्या पुनर्वसनाच्या वेळी, परदेशातील एक वास्तुशास्त्रज्ञ स्थानिक साहित्य वापरून टिकाऊ घरे बांधण्याचे एक नवे प्रारूप समोर ठेवतो. पण, येथील शासन यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्था त्यात आपल्याला काही कमाई होणार नाही हे लक्षात घेऊन त्याला विरोध करते आणि पुनर्वसनाची एक उत्तम संधी वाया घालवते हे सर्व कादंबरीद्वारे स्पष्ट केले जाते. येथेही प्रभाकर पेंढारकर हे सुनामीनंतरच्या उद्ध्वस्त जीवनाचे चित्रण करण्यासाठी गेलेले असतात. तेथे मदतीला आलेल्या संघटना-व्यक्तींचे अवलोकन करताना त्यांना एकूण समस्येचे, संघर्षाचे अनुभव येतात. हे दुर्दैवी अनुभव आणि त्याचे व्यामिश्र स्वरूप ते कादंबरीच्या रूपात मांडतात. प्रभाकर पेंढारकर यांचे ‘एका स्टुडिओचे आत्मवृत्त’ हे ताजे पुस्तकही गाजते आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते त्या पुस्तकाला पुरस्कारहीमिळाला. साहित्यसम्राट न. चि. केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषि
क त्याला मिळाले. कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओची स्थापना १९३२ मध्ये छत्रपती राजाराममहाराजांच्या हस्ते झाली. त्यात आरंभी मूकपट तयार होत. पुढे बोलपट निघू लागले. भालजी पेंढारकर यांनी या स्टुडिओत सुरुवातीपासून लक्ष घातले, शिस्त लावली. प्रार्थनेने दिवस सुरू करण्याचा पायंडा पाडला… पुढे भालजी काही काळ या स्टुडिओपासून दूर जातात… परत येतात… तिथेही राजकारण माजते. ‘कालीयामर्दन’ हा चित्रपट भालजी पूर्ण
करतात, पण त्याच्यावर दादासाहेब निंबाळकरांचे नाव टाकले
जाते… 1935 मध्ये भालजी पुन्हा बाहेर पडतात… 1942 मध्ये ‘बहिर्जी नाईक’साठी ते पुन्हा स्टुडियोत येतात. गांधीहत्येनंतरच्या काळात हा स्टुडियो जळून भस्मसात होतो. भालजींना कैदेत टाकतात. ‘मीठ भाकरीची प्रिंट जळते. भालजी हा चित्रपट जिद्दीने पूर्ण करतात. पावनखिंड, नायकिणीचा सज्जा, मोहित्यांची मंजुळा, साधी माणसं वगैरे चित्रपट काढतात. ‘तांबडी माती’ला राष्ट्रपतीपदक मिळते. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळतो. 96 व्या वर्षी भालजींचे देहावसान होते. स्टुडिओच्या आत्मवृत्ताच्या निमित्ताने हा भूतकाळ पेंढारकरांनी चित्रपटाप्रमाणे समोर उभा केला.प्रभाकर पेंढारकर हे बाहेर सभासंमेलनात कधी दिसत नसत. आपल्या कामात ते मग्न असत. पुरस्कार मिळाले तरी ते हुरळून गेले नाहीत. आपल्या लेखनविषयांबाबत त्यांना पूर्ण माहिती असे. ते चाचपडत नसत. निसर्ग, माणूस आणि नियती या सर्वांचे व्यापक भान त्यांना होते. मानवी बुद्धीचा आणि अहंकाराचा प्रभाव कार्यनाश कसा करतो याचे त्यांना घडलेले दर्शन विदारक होते. त्याकडे ते वस्तुनिष्ठ दृष्टीने पाहत असत. त्यांना महाकादंबरीकाराची दृष्टी लाभली होती; परंतु फार सीमित विषय घेऊन त्याचेच जगद्व्याळ रूप हेरण्यात त्यांनी समाधान मानले. ‘रारंगढांग’ हे त्यांच्या लेखनातले सर्वोच्च शिखर ठरले.
(अद्वैत फीचर्स)
— शंकर सारडा
Leave a Reply