नवीन लेखन...

निसर्गरम्य पहाडी

डोंगर उतरणीवरून खाली येताना, मागून चंद्र उगवावा आणि पायाखालची वाट उजळून जावी. आजूबाजूला हिरवी झाडी आणि प्रचंड वृक्षांची साथ असावी आणि बाजूनेच एखादा पाण्याची ओहोळ आपल्या निरव आवाजाने साथ देत असावा. आसमंतात अन्य कुठलाच आवाज नसावा. अशा वातावरणात बहुदा “पहाडी” रागाचा जन्म झाला असावा. अर्थात, निसर्ग आणि प्रदेश याचे ओतप्रोत दर्शन या रागातून सतत झुळझुळत असते. किंबहुना लोकसंगीताशी इतके जवळचे नाते राखणारे जे थोडे फार राग आहेत, त्यात पहाडी राग, फार वरच्या क्रमांकावर आहे. हिरव्या जर्द झाडीतून स्त्रवणाऱ्या आणि त्याला मिळणाऱ्या खळखळणाऱ्या पाण्याच्या नादाशी नाते जुळवणाऱ्या सुरांशी या रागाचे फार जवळचे साहचर्य आहे. मुळात निसर्ग  काहीतरी सुचवित असतो आणि अशावेळी जर का आपण निसर्गाशी जवळीक निर्माण करण्याची इच्छा दाखवली तर निसर्गच जणू, आपल्याला या रागाशी साहचर्य घडवून आणतो. या रागात सगळे स्वर शुद्ध स्वरूपात लागत असले तरी बरेचवेळा “कोमल धैवत” वापरून, या रागात गंमत आणि वैविध्य निर्माण केले जाते. या रागाचे चलन पाहिल्यावर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते. हा राग मंद्र सप्तकात किंवा शुद्ध स्वरी सप्तकात अधिक खुलतो. अर्थात, लोकसंगीतात बरेचवेळा स्वरांच्या आकृतीबंधाबाबत जसे स्वातंत्र्य घेतले जाते तसाच प्रकार या रागाबाबत घडतो. याचा परिणाम असा झाला, चित्रपट गाणी किंवा एकूणच सुगम संगीतात, या रागावर आधारित गाणी भरपूर आढळतात. काही नकलाकार यात “कोमल गंधार” आणि “कोमल निषाद”  वापर करतात आणी या रागाचे सौंदर्य अधिक खुलवून मांडतात.

इथे आणखी एक मत मांडावेसे वाटते. तसा पहाडी राग “अटकर” बांध्याचा आहे. यमन, मालकंस प्रमाणे याचा विस्तार अफाट पसरलेला नसल्याने, बरेचवेळा हा राग “धून” स्वरूपात ऐकायला मिळतो. याच मुद्द्याला धरून आपण इथे पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी सादर केलेली पहाडी ठुमरी केवळ अप्रतिम आहे. पहिल्याच सुरांतून, या रागाचे संपूर्ण दर्शन आणि वातावरण करण्यात, हा वादक यशस्वी होतो.
भारतीय संगीतातील जी प्राचीन वाद्ये आहेत, त्यात बासरीचा समावेश होतो. मुळातले हे सुषिर वाद्य, भारतीय रागदारी संगीतात स्थिरावले, ते पंडित पन्नालाल घोष यांनी पण त्याचा जागतिक विस्तार केला तो मात्र पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी. पंडितजींची वाद्यावरील पकड इतकी असामान्य आहे की, ऐकताना माणसाला चक्क गुंगी येते!! इथे त्यांनी जी ठुमरी सादर केली आहे, त्यात, ठुमरीचा नखरा तर आहेच पण त्याचबरोबर सूरांतील हळवेपण देखील लगेच दृग्गोचर होते.सुरवातीची जी आलापी आहे, ती बारकाईने ऐकली तर ध्यानात यावे. पुढे जेंव्हा गत सुरु होते तेंव्हा मात्र एका असामान्य गायकाच्या ठुमरीची आठवण येते. अर्थात, त्या ठुमरीच्या अंगाने जरी वादन झाले असले तरी देखील, त्यात स्वत:चा असा खास विचार दिसतो. सुरवातीच्या समेवरील आलापीनंतर, एकदम “कोमल गंधार” जो लागतो, तो विलक्षण आहे.
आता, मघाशी मी ज्या असामान्य गायकाची आठवण करून दिली, त्या उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांच्या “तोरे तिरछी नजरिया के पार” या ठुमरीचा विचार करायला घेऊ.
पतियाळा घराण्याचे अध्वर्यू म्हणून या गायकाचे वर्णन करता येईल. आवाजात थोडासा खर्ज पण तरी वरच्या सप्तकात सहज विहार करणारा गळा!! ठुमरी या गायनाला मैफिलीचा दर्जा देण्यात या गायकाचा महत्वाचा वाटा. खरे तर तीनही सप्तकात या गायकाला लीलया गाता येत असे आणि याचा परिणाम, परिणामकारक ठुमरी गायन. जरा बारकाईने ऐकले तर या गायकाने, ग्वाल्हेर, जयपुर गायकी देखील आत्मसात केल्याचे समजून घेता येईल.
प्रस्तुत ठुमरी गायनात देखील याच वैशिष्ट्यांचा आढळ सापडेल. गळ्याची लवचिकता, हे खास वैशिष्ट्य सांगता येईल. याचा फायदा असा झाला, गायकीत “अनपेक्षितता” नेहमीच कायम राहिली आणि त्यामुळे गाणे अतिशय रंगतदार झाले. आणखी वेगळेपण सांगायचे झाल्यास, आपल्या शास्त्रात “प्रसादगुण” हे खास वैशिष्ट्य मानले आहे आणि उस्तादांच्या गायकीत याचे ओतप्रोत दर्शन घडते तसेच सरगम, बहुतेक गायकांच्या बाबतीत, तानेचा तांत्रिक आविष्कार अशा स्वरुपाची असते परंतु या ठुमरीत सरगम हही इतकी ओघवती आहे की कुठे ताण संपते आणि परत सुरु होते, याचा सत्कृत्त्दर्शनी पत्ता लागत नाही.
हिंदी चित्रपट गीतांत, खैय्यामने जितका या रागाचा उपयोग करून घेतला आहे, तितका इतर कुणी केल्याचे आठवत नाही. पहाडी रागात ज्या कुठल्या भावनांचा आढळ होईल, त्या सगळ्या भावनांचा, त्याने आपल्या गाण्याच्या “तर्ज” बांधण्यासाठी उपयोग केला आहे. प्रणय, विरह, व्याकुळता, आनंदविभोर अवस्था, या सगळ्या छटा त्यांनी आपल्या चालीत गुंफलेल्या आढळतील.”जाने क्या धुंढती रहती है ये आंखे  मुझ मे” ही गाणे खास पहाडी रागावरील उदाहरण म्हणून घ्यावे. खरतर हे गाणे म्हणजे अनन्यसाधारण कुवतीची कविता म्हणून देखील आस्वाद घेता येईल. कैफ़े आझमी काय प्रतिभेचा कवी होता, याचे ही कविता, उत्तम निर्देश करता येईल. पहाडी रागात विरहाची अशी भावना देखील दाखवता येते, हे खैय्यामने फार सुंदररीत्या दाखवून दिले आहे.
गाण्याचे सुरवातीचे शब्दच बघा किती प्रत्ययकारी आहेत.
“जाने क्या धुंढती रहती है ये आंखे मुझ मे,
राख के ढेर मे शोला है ना चिंगारी है”
खरतर सगळी कविता हाच वाचिक अनुभव आहे आणि अशा कवितेला खैय्यामने जो स्वरसाज चढवला आहे, त्याने या कवितेचा आशय अधिक अंतर्मुख होतो. रफीच्या गायकीचा अनोखा आविष्कार आपल्याला ऐकायला मिळतो. गाण्यात कुठेही तालवाद्य नसून, गाण्यात गिटार आणि इतर “धून” वाद्यांनी ताल पुरवलेला आहे त्यामुळे, झाले असे, कवितेवर कुठेही स्वरांचे आक्रमण झाल्याचे दिसत नाही पण तरीही स्वरांनी आपली “जादू” दाखवून दिली आहे. अर्थात, ही किमया सगळी संगीतकार म्हणून खैय्याम यांचीच यांचीच.
असेच एक गाणे, कविता म्हणून फार अर्थपूर्ण आहे. जावेद अख्तरची ही कविता आहे. खरतर हे गाणे वाचताना, चित्रपटासाठी हे गाणे लिहिले आहे, हे वाटतच नाही. साधारणपणे, गाण्यातली शब्दरचना, ठराविक “मीटर” मध्ये लिहिलेली असतात, ज्यायोगे संगीतकारांना चाल बांधण्यास अवघड होऊ नये.
“नीला आसमान सो गया.
आंसूओ में चांद डुबा, रात मुरझाई
जिंदगी में दुर तक फैली है तनहाई
जो गुजरे हम पे वो कम है, तुम्हारे गम का मौसम है”.
सिलसिला चित्रपटातील हे गाणे अतिशय श्रवणीय आहे.  संगीतकार शिव-हरी या जोडगोळीने फारसे चित्रपट केले नाही पण, तरीही ह्या गाण्यासारखे चिरस्मरणीय गाणे मात्र दखल घेणारे निर्माण केले. खरतर ही कविता(च) आहे, चालीच्या सर्वसाधारण मीटरमध्ये बसू न शकणारी परंतु संगीतकारांनी गाण्याची लय अशी ठेवली आहे की सगळे गाणे ऐकणे हा अविस्मरणीय अनुभव झाला आहे. लताबाईंनी या गाण्यात जी आवाजाची “पट्टी” लावली आहे, ती थक्क करणारी आहे आणि त्यामुळे आपण या गाण्यात कधी गुंतून जातो, हे समजत देखील नाही.
याच रागात अशीच एक चिरस्मरणीय रचना ऐकायला मिळते. मुळात मेहदी हसन यांचे गायन, हाच श्रवणानंद असतो. उर्दू शायरी जरी गेयातापूर्ण असली तरी प्रत्येक शायरीबद्दल हेच म्हणता येणार नाही पण, या गायकाचे खास विशिष्ट्या असे, गाताना, समजा कवितेत असा शब्द आला, तर तिथे गायकी ” मुडपून”घेण्याची तयारी दाखवत आणि शब्दांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेत असत.
बहादूर शहा जाफर या अलौकिक शायराच्या हातून लिहिली गेलेली गझल, एक कविता म्हणून देखील अतिशय दर्जेदार आहे.
“बात करनी मुझे मुश्किल कभी ऐसी तो ना थी
जैसी अब है तेरी महफ़िल कभी ऐसी तो ना थी.”
मेहदी हसन साहेबांची खासियत अशी आहे, ऐकताना सहज, सोपे वाटणारी गायकी, कधी अवघड वळणाकडे जाते, त्याचा लगेच पत्ता लागत नाही. “बात करनी मुझे मुश्किल कभी ऐसे” ही रचना पहाडी रागात आहे पण, रागातील अवघड हरकतींना पूर्ण फाटा  देऊन,अर्ध्या ताना घेणे, किंवा एखादी हरकत इतकी जीवघेणी घेतात की, ऐकताना आपण स्तिमित होऊन जातो. अत्यंत मुलायम आवाज, साधारणपणे मंद्र सप्तक किंवा शुद्ध स्वरी सप्तकात गायकी ठेवायची आणि लिहिलेल्या शायरीला पूर्ण न्याय द्यायचा, हीच त्यांची नेहमी भूमिका राहिली. पहाडी रागाचे इतके विलोभनीय रूप इतर गाण्यांत फार तुरळक आढळेल.
मराठीत असेच एक संयत आणि मुग्ध प्रणयाचे चित्रण असलेले गाणे या रागावर बांधले आहे. खरतर आशा भोसले यांनी गायलेल्या सर्वकालीन अप्रतिम मराठी गाण्यातील एक गाणे, अशी या गाण्याची महती सांगता येईल. कवी सूर्यकांत खांडेकर हे नाव तसे फार प्रसिद्ध नाव नाही परंतु त्यांच्या काही रचना, गाणे म्हणून अप्रतिम अशा गणल्या जाव्यात.
“सहज सख्या एकटाच येई सांजवेळी
वाट तुझी पाहीन त्या आम्रतरूखाली.”
खरतर सगळी कविता म्हणजे अनोख्या प्रणयाचे सुंदर चित्रण आहे आणि अशी शब्दकळा हाती आल्यावर, श्रीनिवास खळ्यांनी त्याला चाल अर्पिण्यासाठी “पहाडी” राग योजावा, हा काही योगायोग नव्हे. खळे साहेबांचे एक वैशिष्ट्य सांगता येईल. चाल बांधताना, सुरवातीला रागाच्या प्रमुख स्वरांचा उपयोग करतील पण लगेच रागाला दूर सारून, चालीचे स्वत:चे म्हणून वेगळे अस्तित्व दाखवून देतील आणि हे त्यांच्या बहुतेक सगळ्या रचनांमधून ऐकायला मिळते आणि याचे महत्वाचे कारण म्हणजे संगीतकाराची कवितेवर असलेली अनन्यसाधारण श्रद्धा.  गायकी अंगाची चाल आहे, हे आपल्याला गाणे प्रत्यक्ष गायला घेतल्यावर समजते अन्यथा गाणे ऐकताना साधी, सोपी चाल ऐकत आहोत, हाच भास होत असतो.
लोकसंगीताचा आधार घेऊन जन्माला आलेला हा “पहाडी” राग म्हणजे क्षणात तुम्हाला तुमचे अस्तित्व विसरायला लावणारा राग आहे आणि असे घडणे, हाच कुठल्याही संगीताचा प्राथमिक उद्देश असतो.
– अनिल गोविलकर

Avatar
About अनिल गोविलकर 92 Articles
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..