— सौ. अतुला प्रणव मेहेंदळे
आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपच्या लेखिका
“छ्या! बाबांनी नुसता वैताग आणलाय. किती सारखं हे केलंस का? ते घेतलंस का? बॅग जागेवर ठेव. मला डॉक्टर कडे घेऊन चल. माझी औषधं आण वगैरे वगैरे…
आता मी माझी कामं करायची की ह्यांच्या मागे रहायचं. तरी बरं तू सारखं त्यांचं हवं नको बघत असतेस.. तुला कसा त्रास होत नाही या सगळ्याचा.” स्वप्निल चिडचिड करत होता. आणि मेघना त्याचं फक्त ऐकत होती. निहार च्या समोर तो हे बोलतो ते तिला अजिबात आवडत नाही. त्यामुळे ती दरवेळी गप्पच बसते. त्यात तिला हे सगळं रोजचंच होतं. स्वप्निल आपल्याकडे सगळं बोलतो पण बाबांसमोर बोलती बंद होते. एका अर्थाने ते उत्तमच होतं. आजपण अशीच चिडचिड करत स्वप्निल ऑफिस ला गेला. आणि निहार कॉलेजमध्ये प्रोजेक्ट सबमिशन होतं तिथे गेला. थोड्या वेळाने मेघनाला रोजच्यासारखा वेळ मिळाला, तेव्हा ती बाल्कनीतल्या खुर्चीत बसून स्वतःच्याच विचारात गढली. “हा स्वप्निल किती बदललाय! किती प्रेमळ आणि काळजी करणारा होता दोन वर्षांपूर्वी. दोन वर्षांपूर्वी आई गेल्या आणि त्यानंतर जो हा असा वागायला लागलाय. कधीकधी तर धडकी भरते की याच्या अशा वागण्यामुळे बाबांना काही होणार तर नाही ना? स्वप्निल ला वाटत असलं की आपलं बोलणं बाबांपर्यंत पोहोचत नाही. तरी त्यांना न ऐकू जाण्याईतपत तो नक्कीच हळू बोलत नसतो. त्यामुळे बाबा नक्कीच दुखावले जात असणार. पण या दोघांच्या मध्ये माझं मात्र भरीत होतं.
बाबांचं रोजचं आवरायला आता वयोमानानुसार वेळ लागतो. तरी ते सकाळी स्वप्निल उठायच्या आत उठून आंघोळीला जातात. पण तिथेही वेळ लागतो आणि मग त्यांची आणि स्वप्निल ची वेळ एकदम येते.. त्यात पूर्वीच्या काळातला दोन बेडरूमचं घर असलं तरी बाथरूम एकच.. तिथून जी चिडचिड चालू होते ती तो बाहेर जाईपर्यंत. मग जरा शांतता येते घरात. पुन्हा रात्री झोपायला बाबा आणि निहार हॉल मध्ये झोपतात आणि आम्ही दोघे बेडरूममध्ये. मला खरंतर खूप अवघडल्यासारखं होतं. पण आई गेल्या त्यानंतर बाबांनीच एके दिवशी सांगितलं, “अरे मी एकटा आता बेडरूममध्ये झोपून काय करू.. हिने हिच्या आडमुठ्या स्वभावामुळे बेडरूम काही कधीच सोडली नाही. आता असं करा तुम्ही दोघे इतकी वर्ष हॉलमध्ये झोपलायत, निदान आता तरी तुम्ही बेडरूममध्ये झोपा. मी आणि निहार हॉलमध्ये झोपतो. निहार मोठा झालाय आता.” किती तो समजूतदारपणा. पूर्वी खरंच सगळे आईंच्या धाकातच होते म्हणा ना. प्रेमळ होत्या पण कुठल्याच गोष्टीवरचा ताबा त्यांनी कधीच सोडला नाही. बाबा त्यांना परोपरीने समजवायचे पण त्यांच्यापुढे कुणाचं काही चालायचं नाही. फक्त स्वप्निल त्यांचा प्रचंड लाडका होता. आई सांगायच्या ना तेव्हाही “या दोघांच्या मधून जरा वाराही जात नाही.. अजिबात पटत नाही बापलेक दोघांचं.” बाबा ही आता ६५ च्या पुढेच आहेत. त्यांची पण आता खूप पटकन चिडचिड होते, लक्षात रहात नाहीत कित्येक गोष्टी. स्वतःवर ताबा रहात नाही. सगळं समजतं मला पण त्यांचा विचार दुसरं कोण करणार. मलाच समजून घ्यायला हवं.” असा विचार करतच ती परत कामाला लागली. हे असं गेले बरेच महिने चालू होतं. शीत युद्ध म्हणाल तर तसंही नाही. कारण इतर वेळी बापलेक बऱ्यापैकी बोलायचे. पण स्वप्निल च्या गडबडीचा वेळ बाबांनी घेतला की ह्याचं डोकं फिरायचं. पण एका रविवारी अचानक ठिणगी पडली.
त्यादिवशी सकाळी स्वप्निल निहारला क्लासला सोडून घरी आला. मुकुंदराव त्याची वाट बघत बसलेच होते. मेघना ही त्यांच्यासमोर होतीच. स्वप्निल ने विचारलं, ” हे काय, आज बैठक कसली भरली आहे? काही झालंय का? बाबा तुम्हाला काही होतंय का? तेव्हा मुकुंदराव म्हणाले,” छे रे! तुझीच वाट बघत बसलोय. हात पाय धुऊन ये. मला तुम्हा दोघांशी बोलायचं आहे आणि ते ही निहार नसताना.” स्वप्निल विचार करता करता हात पाय धुऊन कपडे बदलून आला आणि बसला हॉलमध्ये. “बोला बाबा पटापट. मला ऑफिस चं थोडं काम आहे. ते ही जेवायच्या आधीच करून घेईन म्हणतोय. आणि मी काय म्हणतो तुमचं तितकं महत्वाचं नसेल तर आपण संध्याकाळी निहार खाली खेळायला गेला की बोलूयात का?” त्यावर मुकुंदराव जरा चढ्या आवाजातच बोलले, ” नाही मला आज आणि आत्ताच बोलायचं आहे. उशीर करून चालणार नाही. ” त्यावर मेघनाने नेहमीप्रमाणे मध्यस्थि केली. “तुम्ही बोला बाबा! याचं काय ऐकताय. नुसती मजा करत असतो हा मध्येमध्ये.” मुकुंदरावांनी बोलायला सुरुवात केली. “मी सरळ मुद्द्यालाच हात घालतो. एकंदर परिस्थिती पाहता मी एक निर्णय घेतला आहे. मी आता साठी च्या पुढचा निरुपयोगी म्हातारा झालो आहे त्यामुळे मी खूप विचारांती असं ठरवलंय, नव्हे मी निश्चय केलाय आणि तो अमलात ही आणला आहे. मी स्वतःला वृद्धाश्रमात नोंदवून घेतलं आहे. आणि तिथेच रहाणार आहे. मी पेणच्या एका चांगल्यापैकी वृद्धाश्रमात जाऊन चौकशी करून थोडे पैसे ही भरून आलो आहे. मागच्या महिन्यात मी पेण ला गेलो होतो ते याचसाठी. तिथे चांगली काळजी घेतली जाते वृद्धांची. तिथे कायमचं रहाता येईल एवढा पैसाही हाताशी आहे.” हे ऐकून मेघना आणि स्वप्निल जागीच थिजले. दोघांच्याही तोंडून शब्दच फुटेना. दोघेही अवाक् झाले. “बाबा हे काय बोलताय तुम्ही.” स्वप्निल ने मृदू स्वरात विचारलं. त्यावर मुकुंदराव कसनुसं हसत म्हणाले, ” अरे, हे मी तुम्हा कुणाला त्रास नको म्हणून नाही करत आहे. पण मलाच आता माझी लाज वाटते की मला तुमच्या कसल्याच उपयोगी पडता येत नाही आणि उगीच माझी लुडबुड मात्र सहन करावी लागते.. पण मलाच आजकाल वाटत रहातं की माझं खायला कहार आणि भुईला भार होत चाललं आहे. आणि ते खरं ही आहेच की…. ” असं म्हणताच मुकुंदराव मुसमुसायला लागले. घरात निःशब्द शांतता पसरली. शेवटी मेघना ने ती कोंडी फोडली. “बाबा हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही आमची अशी वाईट मस्करी तर करत नाही आहात न? अहो माझ्याकडून काही चुकलं आहे का? असा टोकाचा निर्णय तुम्ही कसा घेतलात? अहो या घरात रहायला आल्यापासून म्हणजेच १९-२० वर्षांपासून मी कधीच तुम्हाला सासऱ्यांच्या जागी बघितलं नाही. कायम वडिलांसारखं वागवलं. तुम्हीही तितकंच प्रेम मला दिलंत. त्यामुळे मला कधीच माझ्या बाबांची आठवण आली नाही. मग हे का वाटलं तुम्हाला? नक्कीच माझ्याकडून काहीतरी राहिलं असेल त्याशिवाय तुम्ही असं नाही वागणार!” असं म्हणून मेघना तर मोठ्याने रडायलाच लागली. त्यावर बाबा म्हणाले, “नाही ग मेघना. तुझी काहीच चूक नाही. पण अगं मला कळत का नाही. तुझी किती धावधाव होते माझ्यामुळे. परवाचंच बघ ना! तू विश्वासाने मी घरात आहे म्हणून चावी न घेता भाजी आणायला गेलीस आणि मी विसरभोळा गोकुळ, चक्क मध्याचा फोन आला म्हणून त्याला भेटायला बाहेर गेलो आणि मग नुसती तुझी धावपळ. त्या कोपऱ्यावरच्या चावीवाल्याला बोलवावं लागलं. किती हा वेंधळेपणा माझा! अगदी काही म्हणजे काही लक्षात नाही रहात गं. आणि मग अगदी कानकोंडं व्हायला होतं. इतकीही आपली मुलांना सोबत होत नाही. मी चांगला हिंडता फिरता आहे. पण उपयोग काडीइतकाही नाही. उलट त्रासच जास्त माझ्यामुळे. शिवाय स्वप्निल ला तर माझ्यामुळे रोज आंघोळीला जायला उशीर होतो. त्याची नक्की बिचाऱ्याची ऑफिसमध्ये चिडचिड होत असणार. मला कळत का नाही.. पण काय करणार गं इतकी वर्ष नोकरी केली तेव्हाची लवकर उठायची सवय काही केल्या जात नाही.. ही होती तेव्हा अडवायची. म्हणायची, “थांबा जरा मुलांना त्यांची घाईची वेळ आटोपून घेऊदेत. मग नंतर आपल्याला काय हवा तेवढा वेळ आहे. ” पण त्यानंतर माझं गाडं अगदीच रुळावरून घसरलं आहे. किती गं करता माझ्यासाठी तुम्ही. पण मी नुसता धोंड झालोय. हिच्या जाण्यानंतर तर मला हे जास्तच जाणवलं आहे. बरेच दिवस विचार केला आणि ठामपणे ठरवलं आता आपलं चंबुगबाळं आवरायला हवं. हीच्याशिवाय मला या घरात करमत नाही रे मुलांनो. अजूनही तिचा सारखा आजूबाजूला भास होत रहातो. कदाचित माझ्या समवयस्क लोकांमध्ये राहिलं की मन रमेल. विसर पडेल जुन्या गोष्टींचा. अगदी नाहीच रमलो तर येईन की परत. आणि मी काही कायमचा जात नाही.. शनिवारी-रविवारी कधी तुम्ही या मला भेटायला. कधी मी येईन माझ्या या भरल्या गोकुळात.” असं म्हणून त्यांनी डोळ्यांना रुमाल लावला.. स्वप्निल आता अगदी हळवा झाला. त्याने बाबांच्या मांडीवर हलकेच डोकं ठेवलं.. “बाबा किती सहन करताय तुम्ही हे मला कळलंच नाही हो.. आईला जाताना दिलेलं वचन मी सोयीस्कररीत्या विसरलो होतो. तिने मला सांगितलं होतं, “ह्यांना माझ्याशिवाय जराही करमणार नाही. माझ्यानंतर ह्यांना शेवटपर्यंत सांभाळ. तरच मला शांती मिळेल.” किती स्वार्थी झालो होतो मी. तरी मेघना सतत मला सांगत असते थोडा त्यांच्या वयाचा विचार कर.. पण मला तर वाटत होतं की म्हातारपण जणूकाही फक्त तुम्हालाच येणार आहे मला नाहीच.. मला माफ करा बाबा..माझी चूक झाली. तुम्ही कुठेही जायचं नाहीये. तुम्हाला आईची शपथ आहे. मी तुम्हाला वेळ द्यायला हवा हे पटलं आहे मला.” त्यावर मुकुंदराव उठले आणि स्वप्निलच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, ” तुला चूक कळली हे उत्तमच आहे. तुझ्या मुलांच्या बाबतीत हे असं कधीच न होवो ही काळजी तू घेशीलच. पण आता अजून एक चूक करू नकोस. मला अडवू नकोस. शपथेच्या टुकार बंधनांमध्ये मला अडकवू नकोस. मी मोकळ्या मनाने एक पाऊल पुढे टाकत आहे, तू ही खुल्या मनाने ते स्वीकार. माझं ठरलं आहे तेच होणार. चार दिवसांनी नवीन महिन्याची ‘एक’ तारीख आहे त्यादिवशी मी तिकडे जाणार आहे. आणि मला सोडायला सुद्धा येऊ नका कारण नाहीतर मला पाय काढणं जड जाईल. चला मी आवरतो. आणि हो निहार ला काय आणि कसं सांगायचं ते मी बघतो. तुम्ही वाईटपणा घेऊ नका.” असं म्हणून ते जायला लागले. आणि स्वप्निल आसवं गाळत तसाच बसून राहिला.
बाबांच्या पाठमोऱ्या आकृती कडे बघून मेघनाला मात्र काहीच सुचेना झालं.. मुकुंदरावांच्या मनात आता फक्त एकच येत होतं,
“प्रवेश सरला अंक बदलला,
अंधारातच मंच मिळाला,
पुन्हा तुझ्यास्तव याच तमांतून,
नवा मंच उजळेल!
भारूनिया अवकाशच अवघा खेळ नवा रंगेल…….”
ll शुभम् भवतु ll
— सौ. अतुला प्रणव मेहेंदळे
Leave a Reply